शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

संधी आणि आव्हाने



संधी आणि आव्हाने
दाभोलकर, कार्यक्रम, अनुभव
      



मला नेहमी वाटते, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला आज जेवढी मान्यता आहे, तिचा पुरेपूर लाभ घेण्यास आपण अपुरे ठरतो. हे लिहिताना (ता. ११ मार्च) गेल्या पंधरवड्यातील घटना माझ्यासमोर आहेत.
     
२५ फेब्रुवारीला मी चिपळूणला मंदार शिक्षण संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या व्याख्यानासाठी गेलो होतो. समोर २ हजार कॉलेज विद्यार्थी होते. मानधन व प्रवासासाठी दहा हजार रुपये मिळाले; वर संस्थेच्या सर्व शाखांनी पुस्तक संच विकत घेतले. वार्तापत्राचे वर्गणीदार झाले. नव्या वर्षाच्या प्रारंभी शिबीर घेण्याचे कबूल केले. २६ तारखेला आणखी एका शिक्षणसंस्थेचा रौप्यमहोत्सव होता इचलकरंजीला. त्यांच्या सर्व विश्वस्तांनी, कर्मचाऱ्यांनी वार्तापत्राची वर्गणी त्यांनी दिलीच; वर वार्तापत्रासाठी अकरा हजार रुपये दिले. त्याच दिवशी पुण्यात डी. एड्. विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर झाले. त्याला ७०-८० जण उपस्थित होते. २७ तारखेला कुंडली जाळण्याचा कार्यक्रम पुणे येथे महात्मा फुले यांच्या वाड्यावर झाला. पोलीस आधी भलत्याच गुर्मीत होते. सोमवार असल्याने महात्मा फुले वाडा बंद होता. बाहेर रस्त्यावर कार्यक्रम घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. ३०-४० कार्यकर्ते जमले होते, त्यांची सभा घेतो, असे म्हटल्यावर जमावबंदीचा हुकूम लावला; कुंडली जाळण्याचा मुद्दा तर दूरच राहिला. डॉ. बाबा आढाव, विद्याताई बाळ कार्यक्रमासाठी आले होते. सर्वांनी ठरविले सभा घेऊ. कुंडलीचे दहनही करू; पण पोलिसांच्या मनमानीला झुकायचे नाही. जवळ-जवळ सर्व चॅनेलचे प्रतिनिधी आले होते. कार्यक्रमाच्या आधी त्यांनी छोट्या मुलाखती घेतल्या. त्यामध्ये आम्ही पोलिसांच्यावर सडकून टीका केली. सत्याग्रह करून अटक करवून घेण्याचा इशारा दिला. प्रकरण चिघळेल, महाराष्ट्रभर गाजावाजा होईल, असे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सपशेल माघार घेतली. सर्व प्रतिबंध मागे घेतले. कार्यक्रमाला सन्मानपूर्वक लेखी परवानगी दिली. वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी जोरदार बातम्या दिल्या. त्याच दिवशी सायंकाळी यवतमाळ येथील दूरदर्शनचे वार्ताहर व ‘अंनिस’चे कार्यकर्ते आनंद कसांबे यांच्या अंधारवाटा या चित्रफितीचे प्रकाशन डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. चित्रफीत पडद्यावर दाखवण्यात आली. त्यातील भयानक वास्तव पाहून अंनिसच्या पुढील आव्हानाची खडतरता सर्वांनाच समजली. २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञानदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबीर झाले. त्यात १०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होते. विद्यापीठाच्या कुलसचिवांनी उद्घाटन करताना समितीच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्याच दिवशी औरंगाबाद येथेच देवगिरी महाविद्यालयात डी. एड्.च्या विद्यार्थ्यांचे शिबीर झाले. त्याला मुस्लिम विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. ३ मार्चला मुंबईत विले-पार्ले येथे माझ्या मुलाखतीचा जाहीर कार्यक्रम झाला. तुडुंब गर्दी होती. त्यामधून १५ हजार रुपयांच्या देणग्या मिळाल्या. दुसऱ्या दिवशी पार्ले येथेच अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण शिबीर झाले. त्यातून काही नवीन कार्यकर्ते मिळण्याची क्षमता निर्माण झाली; शिवाय मुलाखत व शिबीर यामध्ये जवळजवळ १२ हजार रुपयांची पुस्तके विकली गेली. पर्यावरणपूरक होळीसाठी महाराष्ट्र वनखात्याच्या सचिवांनी एक पत्रक काढले आहे. त्यामध्ये स्पष्टपणे समितीच्या नावाचा उल्लेख आहे आणि समितीच्या प्रमाणेच वन खात्याने आपापल्या पातळीवर विविध प्रकारे पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. हे पत्रक घेऊन पुणे जिल्ह्याचे प्रसिद्धी अधिकारी स्वत:हून माझ्याकडे आले. वातावरणनिर्मितीसाठी त्यांनी स्वत:च्याच पुढाकाराने होळीच्या आदल्या दिवशी माझी १० मिनिटांची मुलाखत आकाशवाणीवर त्याच दिवशी सर्व केंद्रावर प्रसारित केली. पिंपरी-चिंचवडच्या शाखेने प्रतिवर्षीप्रमाणे होळीची पोळी जमा करण्याचा कार्यक्रम घेतला. राज्य पातळीवरील दोन चॅनेलनी येऊन त्याचे चित्रीकरण केले. ७ तारखेला नाशिक येथे ११ डी. एड्. कॉलेजातील प्रत्येकी १० याप्रमाणे ११० विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबीर झाले. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या प्रमुख श्रीमती पवार उद्घाटक म्हणून आल्या होत्या. या संस्थेच्या नाशिक जिल्ह्यात ३०० शाखा आहेत. श्रीमती पवार यांनी बुवाबाजी, चमत्कार, फलज्योतिष यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे ठणकावून सांगितले.
     
अर्थात हे सगळे सुरळीत पार पडले, तरी त्याला विरोध करणाऱ्या शक्तींनी त्यांच्याकडून अडथळे आणण्याचा प्रयत्न करून पाहिलाच. चिपळूण येथील माझ्या भाषणाच्या आधी संस्थेच्या अध्यक्षांना ४०-५० फोन गेले की, दाभोलकरांचे भाषण रद्द करा. जमले तर भाषणात विघ्न आणावे म्हणून सनातन प्रवृत्ती रत्नागिरीपासून येऊन प्रेक्षकात बसल्या होत्या. त्यांना कसलीही संधी मिळाली नाही, ही बाब अलाहिदा. पार्ले येथील कार्यक्रमाबाबतही त्यांनी हा प्रयोग करून बघितला, तेथेही तो फसला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कुंडली जाळल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेदमंत्र पठण केले आणि समितीविरुद्धचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पुणे येथील ज्योतिष संस्थांनी एकत्रितपणे कुंडली जाळून त्यांच्या श्रद्धा दुखावल्या, याबद्दल उच्च न्यायालयात समितीविरुद्ध दावा दाखल करण्याची घोषणा केली आहे. या साऱ्यांचा मतितार्थ काय?
     
मला तो असा वाटतो की, एकाच वेळेला आपण संधी आणि आव्हाने अशा कालखंडातून जात आहोत. बहुजन समाजातील, ग्रामीण भागातील, उद्याचे संभाव्य शिक्षक आपल्या शिबिरांना त्यांच्या संस्था पाठवत आहेत आणि विद्यार्थी प्रशिक्षणातून प्रभावित होत आहेत, ही आश्वासक गोष्ट आहे. समितीला अर्थसहाय्य देण्यासाठी लोक आपणहून तयार होत आहेत, याचा आधार आहेच. प्रसारमाध्यमे सामान्यत: अनुकूलच आहेत. मात्र याबरोबरच समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि कार्याला खंडित पकडण्यासाठी एक बऱ्यापैकी मोठा संघटित वर्ग टपून बसला आहे, याचे भानही सतत बाळगावयास हवे. महाविद्यालयीन विद्यार्थी शिबिराला येतात ते प्रभावितच होतील, असा प्रशिक्षण ढांचा व्यक्तिनिरपेक्षपणे तयार करावयास हवा. या शिबिरातून प्रभावित होणाऱ्या तरुण मनांना सतत संपर्कात ठेवणे, शक्यतो कार्यान्वित राखणे हे तर सगळ्यात महत्त्वाचे आव्हान आहे.
     
आपली समिती या आव्हानाला उतरेल, असा निर्धार करूया. विश्वास बाळगूया.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(२०१२ एप्रिल)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...