बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

एक प्रेरणादायी वाट


एक प्रेरणादायी वाट
दाभोलकर, निधी संकलन, संघटन

यावेळी जे लिहिणार आहे, ते लिहू की लिहू नको, याबद्दल मनात वाद झालेलाच आहे. असे लिहिणे संबंधित व्यक्तीला आवडणारे नाही, याची कल्पना आहे. त्या नाराज होणार नाहीत; पण त्यांना अवघडल्यासारखे नक्की वाटेल. उगीचच लिहिले असे त्या मनातल्या मनात म्हणतील. हे सारे माहीत असूनही आणि गृहीत धरूनही मी हे लिहीत आहे. घटना अशी आहे की, दि. २६, २७, २८ जूनला चाळीसगाव येथील विभागीय संघटनात्मक शिबीर आटोपले. तीन दिवस शिबीर वगळता माझा मुक्काम सामंतांच्या घरीच होता. त्यांची पत्नी, कन्या, जावई यांच्याबरोबर बऱ्याच गप्पाही झाल्या. श्रीमती नीता सामंत शिबिरातही सहभागी होत्या. शिबीर संपवून मी मंगळवारी सातारला पोचलो. बुधवारी नीताताईंचे पत्र पोचले. सोबत एक लाखाचा चेक होता. नम्रपणे या देणगीचा उल्लेख ‘अल्पशी भेट’ असा होता. समितीचे कार्यविचार व संघटना या दृष्टीने तीन दिवस पाहावयास मिळाले व आवडले, याची नोंद होती. स्वत:ला शक्य असेल तर काही काम करणे आवडेल, असेही कळवले होते. नागेशची आठवण होते. या साऱ्याने मला गलबलून आल्यासारखे झाले.

नागेश सामंत हे चळवळीचे खंबीर आधार होते. सर्वार्थाने काही काळ समितीचे खजिनदारही होते. त्यांची मानसिकता ही आतून-बाहेरून चळवळीला जोडलेली होती. नीताताई त्याच मार्गाने जाऊ इच्छित आहेत, याचे लख्ख दर्शन त्या छोट्या पत्रातही होते. चळवळीसाठी पैसे लागतातच; विशेषत: ‘अंनिस’सारख्या संघटनेकडेही कोणतीच शासकीय ग्रँट अथवा देशी-विदेशी फंडिंग नसल्यामुळे ही गरज अधिकच तीव्र जाणवते. मी कार्यकर्त्यांना सतत हे सांगत असतो की, पैसे मागताना संकोच करणे; ही मध्यमवर्गीय चुकीच्या मानसिकतेची खूण आहे. पैसे लागतात म्हणून ते मागावयास हवेत. नाही मिळाले तरी मागावयास हवेतच. पैशावाचून अडतेच अडते आणि आवश्यक तेवढे पैसे मिळाले तर सुलभताही प्राप्त होते. मात्र माझे सांगणे एवढेच असते की, पैसे मिळतील का, या शंकेने चिंताग्रस्त होऊन कामाचे नियोजन आखडू नका. पैसे येतील, असा विश्वास बाळगा आणि झपाटून काम करा. माझा अनुभव सांगतो की, पैसे येतात आणि पुरेसे येतात; पण समजा नाहीच आले तर महात्मा गांधींच्या वाक्यावर विश्वास ठेवून कोणतेही चांगले काम कधीही पैशावाचून अडत नाही, याचाच अर्थ प्रयत्न करूनही पैसे मिळाले नाहीत, तर ते जे मिळवण्यासाठी जिवाचा आकांत करण्याऐवजी कामाची गुणवत्ता, नैतिकता वाढवण्याचा प्रयत्न करा. पैसे येतीलच. नीताताईंच्या भरघोस देणगीनंतर हे पुन्हा एकदा मनात आले; परंतु याबरोबरच आणखीही एक वेगळा विचार मनात आला.
समितीचे आजचे अर्थकारण तीन बाबींवर अवलंबून आहे. एक तर बहुतेक कार्यकर्ते स्थानिक कामासाठी जो प्रवास होतो, फोनबिल येते, ते स्वत: सोसतात. दुसरा मार्ग म्हणजे देणग्यांचा. बहुतेक वेळा त्या परिचित अथवा काही वेळा अपरिचित व्यक्तींकडून येतात. तिसरा मार्ग सर्वांत महत्त्वाचा तो म्हणजे वार्षिक अंकाच्या जाहिरातींचा. समितीच्या कार्यकर्त्यांच्यात एक वर्ग मर्यादित साधनसामग्रीवर संसार चालवणारा आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणावयाचे नाही. पण समितीमध्ये एक कार्यकर्त्यांचा वर्ग असा निश्चितपणे आहे की, ज्यांचे सर्व काही उत्तम चालू आहे. अशा व्यक्तींकडून समिती काय अपेक्षा करते? संघटनेच्या क्रियाशील कार्यकर्त्याने उत्पन्नाच्या अर्धा टक्का किंवा अडीचशे रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम संघटनेला द्यावयाची असते. बहुतेक शाखांत हे घडत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीही संघटनेला काही आर्थिक मदत बहुधा देत नाही. स्वत:च्या कुटुंबातील मंगलकार्य वा अन्य आनंदाच्या बाबी अशा प्रसंगी संघटनेला आवर्जून पैसे देणारे काहीजण आहेत; पण ते हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच. आर्थिक क्षमता असूनही मदत न करणाऱ्यांची भूमिका बहुधा अशी असावी की, संघटनेला वेळ देत आहोतच. स्थानिक प्रवास, फोन बिल हेही सोसत आहोत; मग आणखी वेगळे पैसे देण्याची गरज काय? हा विचार संघटनेच्या दृष्टीने चुकीचा व धोकादायक आहे. भारतात अनेक डाव्या व उजव्या संघटना अशा आहेत की, ज्यामधील कार्यकर्ते संघटनेने स्वत:वर सोपवलेले काम तर करतातच; परंतु शिवाय स्वत:च्या उत्पन्नातील ५ ते १० टक्क्यांपर्यंतचा भाग संघटनेला कोणताही गाजावाजा न करता देऊन टाकतात. संस्था उभ्या राहतात, त्या अशा समर्पित भावनेच्या आधारावरच. आपल्या संघटनेतील प्रत्येकाने याबाबत कळकळीने स्व-मूल्यांकन करावे, असे मला वाटते. तसे झाले तर अनेकांच्या लक्षात येईल की, मी चळवळीला दरमहा वा वार्षिक या पद्धतीने काही आर्थिक मदत देऊ शकतो. त्यामुळे बाहेरचे देणगीदार मिळवणे व दरवर्षी वाढत्या रकमेने जाहिराती मिळवणे, या ताणातून काही प्रमाणात सुटका होऊ शकते. हे पैसे मध्यवर्तीला देण्याची अजिबातच गरज नाही. आपापल्या शाखेला, जिल्हा शाखेला वा मध्यवर्तीला जे सोयीचे त्याप्रमाणे हे पैसे देता येतील. आयकर माफीचा फायदाही मिळवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक प्रेरणादायी पाऊलवाट संघटनेत तयार होईल. नीताताईंच्या देणगीमुळे या सगळ्या विचाराला पुन्हा एकदा चालना मिळाली.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट २००९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...