मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

नागेश सामंत : विवेकी आत्मभानाचा महोत्सव



नागेश सामंत : विवेकी आत्मभानाचा महोत्सव
दाभोलकर, मृत्युलेख, नागेश सामंत, अनुभव, पर्यावरण, तरुण पिढी

कार्यकारणभाव शिकवणे सोपे असते; पचविणे खूप अवघड असते. नागेश सामंत गेल्याची बातमी अगदी अचानक कानावर आदळली आणि हादरलेल्या माझ्या मनाने साक्षात् अनुभव घेतला. पंचमहाभूतापासून बनलेले शरीर अखेर त्याच्यातच विलीन होणार असते, हे निखळ सत्य असते; पण त्याचे कठोर वास्तव लक्षात येते ते स्वत:वर बेतल्यावर. हा चटका, ही धग नागेश गेल्यावर जाणवली.

महाराष्ट्र अंनिस ही तरुण संघटना आहे. अवघी १७ वर्षांची. मी ज्या साधना साप्ताहिकाचा संपादक आहे, त्याची वाटचाल आहे साठ वर्षांची. स्वाभाविकच प्रारंभकाळातील अनेक साथी कालवश होण्याची घटना तेथे सतत घडते. एकेक पान गळावया ही सहवेदना नित्याची बाब बनते. अंनिस दुसऱ्या टोकाला उभी. सारे साथी मैदानात सोबतील उभे. अशा वेळी मागच्या वर्षीचे रामचंद्र तावरे, डॉ. मोहन मावलगेंचे जाणे सुन्न करून गेले. नागेशच्या जाण्याने तर काही सुचेनाच. भावनांच्या कल्लोळात मनाचा नुसता गलबला झाला.

१९९१ साली मी चाळीसगावला पहिल्यांदा उतरलो. नागेश स्टेशनवर आला होता. त्यांच्या गाडीने घरी जाणे, उत्तम पाहुणचार घेणे, जिव्हाळ्याची आत्मीयता याचे जे नाते त्या पहिल्या भेटीत जमले, तो जणू पुढे माझा हक्कच झाला; पण माझाच का? जे-जे कार्यकर्ते व्हाया चाळीसगाव कोठेही गेले, तरी त्यांच्यासाठी नागेशचं घर आणि कुटुंब त्यांचे स्वत:चे दुसरे घर झाले; अगदी रेल्वेत चढविताना जेवणाचा डबा; तोही शाकाहार-मांसाहार याची आवड लक्षात ठेवून दिलेला, इथपर्यंतची काळजी वाहणारे.

अंनिससारख्या चळवळी स्थिरावणे अवघड असते. प्रवाहाविरुद्ध पोहणे, अप्रिय बोलणे, स्वत:ची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकणारी वक्तव्ये अथवा चळवळी करणे, स्वत:चा वेळ, पैसा, श्रम खर्च करणे आणि त्या मोबदल्यात कसलीच अपेक्षा न बाळगणे हे सारे करण्यासाठी कार्यकर्त्यांचा कस अव्वल दर्जाचा असावा लागतो. पुन्हा ते कर्तृत्व अंगी असले, तरी स्वत:ची महत्त्वाकांक्षा मर्यादित करावी लागते; अन्यथा त्याचे ताणतणाव संघटनेत निर्माण होतात. हे सारे ज्यांना सहज जमले, त्या दुर्मिळ कार्यकर्त्यांत नागेश सामंतांचा नंबर फार वरचा होता.

प्रबोधन हे जणू त्यांनी स्वत:चे व्रत केले होते. ते आकर्षक वक्ते नव्हते; पण अभ्यास व तळमळ यामुळे त्यांचे प्रतिपादन भिडत असे. दोनशे-दोनशे किलोमीटरपर्यंत स्वत:च गाडी हाकत ते जात असत आणि व्याख्याने आटोपून रातोरात परतही येत असत. त्यांच्या व्यवसायाचा व्याप चांगलाच मोठा होता; पण संघटनेच्या कामाआड त्यांनी कधीही तो येऊ दिला नाही. समितीची पुस्तके विकणे, हा त्यांचा आवडीचा छंद होता. वार्षिक अंकासाठी कार्यकर्तानिहाय जाहिरातींच्या उद्दिष्टांची यादी सुरु झाली, की डोळे झाकून त्यांच्या नावापुढे पंचवीस हजारांचा आकडा टाकला जाई. जाहिरातीची रक्कम कितीही असली, तरी पर्यावरणमैत्रीसाठी फक्त नाव छापावयाचे, ही अफलातून कल्पना त्यांचीच. चार हजार रुपयाला पूर्ण पान असा जाहिरातीचा दर. समजा, या दराने सात जाहिराती मिळाल्या तर पंधरा हजार अंकात मिळून एक लाख पाने लागणार. त्याचा कागद झाडे तुटल्याशिवाय तयार होणार नाही. त्यामुळे पर्यावरणाला इजा पोचणारच. जाहिरात देणारी व्यक्ती जाहिरात देत असे, सामंतांच्या प्रेमापोटी. त्याच प्रेमाने ते त्याला हेही पटवत आणि विशेष म्हणजे त्यांचे जाहिरातदार हे मानतही. सामंत गेली अनेक वर्षे समितीचे पदाधिकारी नव्हते. तरीही निमंत्रित या नात्याने ते कायम म्हणजे अगदी कायम राज्य कार्यकारिणी बैठकीला उपस्थित राहत. अभूतपूर्व पावसाने पालघरची कार्यकारिणी पुढे ढकलली गेली. निरोप न पोचल्याने त्या तसल्या जीवघेण्या पावसात सर्व अडथळे ओलांडून फक्त एकटे नागेश सामंत बैठकस्थळी पोचले होते (आणि कोणावरही दोषारोप न करता शांतपणे माघारी वळले होते.)

त्यांचा मनमोकळा स्वभाव आणि सर्वांसोबत अनौपचारिक मैत्री करण्याची वृत्ती, यामुळे कळत-नकळत खूप चांगले परिणाम संघटनेत घडून येत. नव्या कार्यकर्त्यांशी त्यांचा सततचा संवाद असे. आपोआपच एक घरगुती नाते तयार होई. कार्यकर्त्यांच्या घरातील आजारीपण, मुलांचे शिक्षण, व्यवसायाची अडचण, याबद्दल ते स्वत:हून माहिती घेत, उपाय सुचवत, कृती करत. ते एक यशस्वी उद्योजक होते. त्यांच्या व्यवसायात त्यांना सर्व प्रकारच्या खाचाखोचांसह प्रचंड ज्ञान होते; परंतु एकूणच व्यवसायाचे शास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय होता. व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्याबाबत मदत करायला ते सतत तत्पर असत.

संघटनेतील त्यांच्या सहभागामुळेच चाळीसगाव हे चळवळीला हुकमी मदत करणारे केंद्र झाले होते. राज्य कार्यकारिणी चाळीसगावला झाली, खानदेशचे विभागीय शिबीर चाळीसगावला पार पडले. पशुहत्याबंदी परिषद चाळीसगावला उत्तम प्रकारे संपन्न होऊ शकली, हे सर्व त्यांच्यामुळेच घडले.

परंतु, या सर्वांपेक्षा त्यांची आणखी काही वेगळी वैशिष्ट्ये होती आणि माझ्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची होती. त्यातील पहिले म्हणजे स्त्री-पुरुष समानतेबद्दलचा त्यांचा आग्रह. हे मत केवळ बौद्धिक नव्हते, स्वत:च्या जीवनात त्याची अंमलबजावणी करण्याचा ते मनापासून प्रयत्न करत आणि कार्यकर्त्यांनीही तो करावा, यासाठी अत्यंत पोटतिडकीने बोलत. ही समता स्वत:च्या घरात प्रत्यक्षात आणल्याशिवाय समितीच्या कामात कमी असलेला महिलांचा प्रभाव वाढणार कसा, असे त्यांचे रास्त मत होते. त्यांचा दुसरा आग्रह वाचनाचा होता. समितीच्या कामात येणारे तरुण टिकून कसे राहतील?’ हा एक सतत चर्चिला जाणारा मुद्दा आहे. याबाबत अनेक उपाय अनेकजण सुचवत. चमकदार उपक्रम, संघटनाबांधणीची कसोशीने अंमलबजावणी, प्रसारमाध्यमांचे सहकार्य या स्वरुपाचे अनेक मुद्दे पुढे येत; परंतु सामंतांचे एकच ठाम मत असे. ते मत ते आग्रहाने मांडत. ते मत असे, की वरील सर्व उपाय हे खरे तर दुय्यम आहेत. खरा उपाय आहे तो एकच आणि तो म्हणजे कार्यकर्त्याचे वाचन वाढावयास हवे. कार्यकर्त्यांचे वाचन वाढले तर तो स्वप्रेरणेने आपोआप चळवळीत टिकून राहील. त्यांचे हे मत मला हल्ली अधिकाधिक पटू लागले आहे (आणि त्याचा अवघडपणाही जाणवू लागला आहे). वाचनापलिकडे संघटनावाढीची ताकद आहे, ती फक्त कार्यकर्त्यांच्या विचार व आचारात किती सुसंगतपणा आहे, या कळीच्या मुद्द्यात. याबाबतची सामंतांची वाटचाल मला त्यांच्या अस्सलपणाची प्रतीक वाटते. छानपैकी जगावे असा संदेश देणारा चालू जमाना आहे, हे छान जगणे कोणत्या क्षणी चंगळवादी होते, ते सांगणे जवळपास अशक्य आहे. स्वकर्तृत्वाने उत्तम धनसंपदा मिळवलेल्या नागेश सामंतांनी याबाबत स्वत:च्याच विचार-आचाराचा आदर्श उभा केला. स्वत:च्या तीनही मुलींच्या बाबतीत ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा विवाह केला, ती वाटचाल त्यांच्यातील या बदलाची जिती-जागती साक्ष आहे. विचारांची आणि कृतीची ही दिशा त्यांनी कधी आणि कशी पकडली, मला माहीत नाही. अशा गोष्टीबाबत संघटना म्हणून कधी गंभीर चर्चा केल्याचे मला आठवत नाही; परंतु मी समितीत आलो आणि बदलत गेलो, असे सामंत अनेकांना सांगत. सामंतांचे असणे म्हणजे विवेकी आत्मभानाचा सहजपणे; पण कृतिशील, अतिथ्यशील महोत्सव होता. बहरलेला मोहोर अकाली गळून पडावा, तसा हा महोत्सव अचानकपणे संपुष्टात आला.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट २००६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...