सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

रामभाऊ गेले



रामभाऊ गेले
दाभोलकर, राम नगरकर, मृत्युलेख, अनुभव

संघटनात्मक दौरा संपवून ८ तारखेस रात्री उशिरा पुण्यात पोचलो. ९ तारखेला सकाळी काही कामे उरकायची होती म्हणून मी व मंडपे सर सकाळी ७ वाजताच मिलिंद जोशींकडे थडकलो. काही बोलण्याच्या आधीच त्याने पेपर समोर टाकला. पहिल्याच पानावर मध्यभागी ठळक बातमी होती - राम नगरकर गेले.

दौऱ्याची सुरुवात १ जूनला पुण्याहूनच झाली होती. त्याच्या आदल्या दिवशी निळूभाऊंच्याकडे (निळू फुले) गप्पा झाल्या होत्या. पेपरातून रामभाऊंच्या अर्धांगवायूची बातमी वाचलेली असल्याने तो विषय निघालाच. काळजीही होतीच. निळूभाऊंनी तब्येत आता बरी आहे, असे सांगितल्याने हायसे वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी रामभाऊंना भेटूनच पुढे जाण्याचा विचार होता.

सकाळी मी, डॉ. बोरकर, बाबा आरगडे, कुमार मंडपे साडेआठ वाजता रामभाऊंच्याकडे पोचलो. ‘अर्धांगवायू’ या शब्दाने डोळ्यासमोर येणारे चित्र कमी-जास्त प्रमाणात बघण्याची मनाची तयारी होती. प्रत्यक्षात बाहेरच्या खोलीत रामभाऊ पान जमवत मस्तपैकी बसले होते. घरगुती वापराची अर्धी चड्डी आणि गंजीफ्रॉक होता. आवाज आणि हसणे नेहमीसारखे गडगडाटी होते. मनावरचा ताण एकदम कमी झाला. रामभाऊंना येऊन गेलेला झटका तसा सौम्य होता. डाव्या हातातील ताकद कमी झाली होती. पूर्वी एकदा असेच झाले असल्याने त्यांनी ताबडतोबीने औषधोपचार केले. गुणही चांगला आला होता. त्यांनी डावा हात स्वत: हळूहळू वर उचलून दाखवला. ताकद पूर्ववत होऊ लागली होती. परंतु वस्तू हातात घेऊन हात उचलणे अजून जमत नव्हते.

माझ्यातला डॉक्टर जागा झाला. रामभाऊंची ज्येष्ठता नजरेआड करून मी त्यांना आरोग्याची काळजी याबाबतच सुनावले. प्रकृती निरोगी राहावी, यासाठी जे-जे करावे लागते, त्याच्याशी रामभाऊंचे गणित व्यस्तच होते. भरपूर वजन, सतत जागरण, सततचा प्रवास व धावपळ, अनेकदा मसालेदार जेवण, त्याआधीचे मद्यसेवन आणि सोबतीला शरीरात ठाण मांडून बसलेला मधुमेह; या सर्वांना यशस्वीपणे तोंड देत तब्येत सांभाळावयाची, हे तसे अवघडच. पण त्याला पर्यायही नव्हता. रामभाऊंनी शांतपणे ऐकून घेतले. वजन थोडे कमी केल्याचे सांगितले. योगासने करत असल्याची माहिती दिली. अवघड होते; पण आशा होती.
९ तारखेला हे सारेच संपले. तिसऱ्या अंकानंतरचा पडदा पडला. रामभाऊ गेल्यावर त्यांच्या कलागुणावर भरभरून लिहिले गेले. ते सगळे खरेच होते. पण माझ्या दृष्टीने आणि आपल्या समितीच्या लेखी रामभाऊ होते एक तळमळीचे कार्यकर्ते. रामभाऊंची आणि माझी ओळखही खूपच उशिरा झाली आणि मैत्री तर चार-पाच वर्षांतील.

घडलं ते असं -  निळूभाऊंनी समितीचे अध्यक्ष व्हावे म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मी त्यांना पत्र लिहिले. निळूभाऊंनी नकार देताना आवर्जून कळवले, ‘कामाचं महत्त्व मी जाणतो. महिन्यातील दोन दिवस मी समितीसाठी देईन. त्यानंतर पहिला दौरा ठरला. निळूभाऊंचं पत्र राम नगरकरांना देखील लिहा. ते पण येतील. आमच्या दृष्टीनं अधिक आनंदाचं काय असणार?

दौऱ्याचा बाज ठरलेला असायचा. पुण्याहून निघताना पहिल्यांदा निळूभाऊंना घ्यायचं. मग गाडी राम नगरकरांच्या घरी. चहा व्हायचाच. निळूभाऊ त्या घरचे ज्येष्ठ कुटुंबप्रमुख आहेत, हे स्पष्टपणे जाणवायचं. रामभाऊंनी खासगी बोलण्यात व जाहीर सभेत याचा उल्लेख करताना कधीही संकोच केला नाही. ‘गर्दी निळूभाऊंची गाडी बघायला असते आणि आम्ही त्या गाडीखालून चालणारे,’ हे त्यांच्या तोंडी नेहमी असायचे.

ड्रायव्हरच्या बाजूची सीट कायम रामभाऊंची. त्यांच्या देहाला निवांतपणे बसायला तेवढी जागा लागायचीच. मागच्या सीटवर निळूभाऊ, मी व आणखी बरोबर असेल तो कार्यकर्ता. गप्पा मजेत चालायच्या. वैचारिक चर्चा, परिवर्तनाच्या चळवळीतील अडचणी असल्याबाबतीत रामभाऊ कधी बोलत नसत. मोकळ्या-ढाकळ्या घरगुती गप्पा-टप्पा हा त्यांचा स्वभाव. रामनगरीतील किस्से आणि स्वत:च्या पत्नीवरचे विनोद हे जाहीर कार्यक्रम एवढ्याच तन्मयतेने ते सांगत आणि ते परत-परत ऐकूनही प्रत्येक वेळेला हसू फुटे. या जोडीने महाराष्ट्र उभा-आडवा; अक्षरश: पालथा घातला असल्यामुळे त्यांना रस्ते, कोणत्या गावी कसे जायचे, हे माझ्यापेक्षा कितीतरी चांगले माहीत होते. त्याबरोबर वाटेत चटकदार मिसळ अथवा चवदार जेवण मिळणारी हॉटेल्सही माहीत होती.

जाहीर कार्यक्रमाचा एक क्रमही बसून गेला होता. प्रथम स्थानिक वक्ते, नंतर काही चमत्कारांचे सादरीकरण. एवढे झाल्यावर रामभाऊ उठत. उठण्याआधी हळू आवाजात; पण हमखासपणे मला विचारत, ‘डॉक्टर, वेळ किती? आणि मी देईन तेवढ्या वेळेत आपले हमखास रंगणारे भाषण बरोबर थांबवत. खरे तर रामभाऊ व्यासपीठाचे ‘वतनदार’ होते. त्यांनी पहिला शब्द उच्चारल्यापासून सारा समुदाय; मग तो शहरी असो वा ग्रामीण, एकदम लक्ष ठेवून ऐकू लागे. अखंड हशा आणि टाळ्या सुरू व्हायच्या. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने असलेल्या महिला एकदम खूष होऊन जात. रामभाऊंचे भाषण म्हणजे तशी रामनगरीच असे. चुकीच्या रूढी, प्रथा, जातीची उणीदुणी, मानापमान यातले अनुभव; कधीकधी रामनगरीतील उखाणा घेण्याचा कार्यक्रमही असे. रामभाऊंची एक्स्प्रेस फास्ट सुटे. माझ्यापुढे पेच असे. कार्यक्रमाचा एकूण परिणाम वाढत राहण्यासाठी त्यातील विचाराचे सूत्र सुटता उपयोगाचे नाही आणि रामभाऊंच्यानंतर माझे भाषण व मग निळूभाऊ हे सर्व पार पडून वेळही फार होता कामा नये. यामधून रामभाऊंच्यावर मर्यादा येत. पण त्यासाठी त्यांनी कधी चकार शब्दाने नाराजी दाखवली नाही. बहुजन समाजाशी संवाद हे रामभाऊंचे जीवनाचे जणू अंत:सूत्र होते. व्यासपीठ असो, वा प्रवास, वा भोजनाचे टेबल; हा संवाद, त्यातील मनमोकळा हशा, अंतरीचा उमाळा कधी आटला नाही.

आणि ८ तारखेला अचानक हे सारेच थांबले. आपल्या चळवळीला हा चटका खूप काळ जाणवत राहणार. 

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (ऑगस्ट १९९५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...