बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

भ्रामक वास्तुशास्त्राचे जोखड झुगारून द्यावयास हवे!



भ्रामक वास्तुशास्त्राचे जोखड झुगारून द्यावयास हवे!

दाभोलकर, वास्तुशास्त्र, शास्त्रीय दमबाजी, दैववाद, मानसिक गुलामगिरी
स्वत:ची वास्तू, स्वत:चे घर ही व्यक्तीला प्राणप्रिय गोष्ट असते. जीवनातील सुख-दु:खे तो वास्तूच्या चार भिंतीत अनुभवतो. जन्मापासून मृत्यूपर्यंतचे प्रमुख संस्कार त्या चार भिंतीत होतात. व्यक्तीच्या भावभावना, स्वत:च्या घराशी अगदी सहजपणे निगडित असतात. हे घर सोयीचे, सुरक्षित आणि सुखावणारे असावे, अशीच प्रत्येकाची भावना असते. घरामधल्या आवश्यक बाबी उदा. स्वयंपाकघर, कोठीची खोली, कपडे वाळत घालण्याची वा भांडी घासण्याची जागा अशा छोट्या-मोठ्या सर्व बाबी सोयीप्रमाणे असणे, ही वास्तूची गरज असते. वास्तू बळकट, दीर्घकाळ उत्तम प्रकारे टिकणारी असावी, याची काळजी म्हणजे वास्तूची सुरक्षितता. तिसरी बाब मन सुखावण्याचा. कोणत्या स्वरुपाच्या वास्तूत आपल्याला प्रसन्न वाटते, याचे अक्षरश: व्यक्तीगणिक वेगळे गणित असते. म्हणूनच बंगल्याचे असंख्य प्रकार नजरेस पडतात. थोड्याफार फरकाने हीच गोष्ट घरातील फर्निचर, व्यवसायाचे ऑफीस अथवा कारखाना यांना लागू पडते.
वास्तूच्या बांधकामाशी अनेक गोष्टी निगडित असतात. ज्या ठिकाणी वास्तू बांधावयाची ती जागा (तिथला परिसर, जमिनीचा पोत, तेथील हवा, पाणी, ऊन, तापमान, पाऊस इत्यादी); तसेच तेथे अगर आजूबाजूच्या परिसरात प्राप्त होऊ शकणारे बांधकाम साहित्य या सर्वांचा वापर कौशल्याने योग्य त्या प्रकारे करून वास्तुरचना उभारणे आणि ती दीर्घकाळ उभी राहील, याचीही काळजी घेणे हा भाग शास्त्र आहेच; तसेच कलादेखील. या वास्तूत राहाणारा माणूस बुद्धिमान असतो; तसेच भावनाशीलही. म्हणूनच त्याची सामाजिक स्थिती, सवयी, चाली रीती, वागणूक, भावभावना याचा शास्त्रीय व कलापूर्ण वापर म्हणजेच वास्तुशात्र.
पण स्वत:चे घर ही तर प्राणप्रिय वास्तू असते. जीवनातील सर्व सुख-दु:खे व्यक्ती त्यामध्ये अनुभवते. वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीला जर प्रश्न पडले - घरात वारंवार आजारपण का येते? ठरत आलेले मुलीचे लग्न का मोडते? घरात भांडणे का होतात? स्वत:चा व्यवसाय का बसला? हे आणि असे असंख्य प्रश्न असोत. या सर्वांचे उत्तर एकच सांगितले जाते, ‘वास्तू न लाभल्याने. घरातील आजारपण हे आरोग्याच्या सवयी व आहार यावर अवलंबून नसते, तर ते असते झोपणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे डोके उत्तरेस करून झोपण्याच्या सवयीवर; मुलीचे लग्न मोडण्यासाठी हुंडा, मानापमान कारणीभूत नसतात, तर घरातील अग्नी कोणत्या दिशेला पेटवला जातो, त्यावर हे ठरत असते. भांडणे होण्याचा संबंध कुटुंबातील स्वभाववैशिष्ट्यांशी संबंधित नसतो, तर घरसजावटीसाठी दिवाणखान्यात ठेवलेल्या कॅक्टसच्या कुंड्यांचा काटेरीपणा ही भांडणे घडवून आणतो आणि न चालणारा उद्योगधंदा याचा संबंध आर्थिक धोरण व तीव्र अनिष्ट स्पर्धा याऐवजी असतो, ईशान्य दिशेला संडास बांधण्याची घोडचूक केल्याचा परिणाम. याचा अर्थ एवढाच की, माणसाचे मन थोडेच वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करते? त्याचे खेळ काही औरच असतात. त्यामुळे घरदार, व्यवसायाची जागा ही केवळ सोयीची आणि सुरक्षित असून चालत नाही, ती लाभणारी असावी लागते. म्हणजे असे की, त्या वास्तूत राहावयास गेले की, सुखाची बरसात सुरू व्हावी, अशी अपेक्षा माणूस बाळगतो. मुलीचे लग्न उत्तम ठिकाणी जमावे, मुलाला शैक्षणिक यश लाभावे, आजारपण घरातून दूर पळावे, दिगंत कीर्ती लाभावी अशा अनेक स्वप्नांचे मनोरे व्यक्तीने रचलेले असतात आणि ही स्वप्ने साकार करणारे असे घर त्याला हवे असते. याचा परस्परसंबंध काय? कार्यकारणभाव कोणता? हा विचार करण्याची गरज त्याला वाटत नाही. हीच गोष्ट व्यवसायांच्या जागांची. व्यवसाय त्वरित भरभराटीला यावा, कामगारांचे प्रश्न निर्माण होऊ नयेत, अपघात टळावेत, हे सगळे घडून येणारी म्हणजेच थोडक्यात लाभणारी जागा व्यावसायिकाला हवी असते. गरज तसा पुरवठा हे व्यवहाराचे सूत्र आहे आणि दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए हा जगाचा अनुभव आहे. यामुळेच आर्किटेक्चर कॉलेजमध्ये पाच वर्षे घालवून शिकलेला वास्तुविशारद ही पदवी मिळवतो आणि वास्तू लाभेल कशी, याचा आद्यशोध ज्या विश्वकर्माने लावला, त्याप्रमाणे व्यवसाय करणारा स्थपती अथवा वास्तू या नावाने ओळखला जातो. दोघांचा विषय वास्तुशास्त्र हाच; पण एकाचा भर आधुनिक विज्ञानावर, दुसऱ्याचा जोर प्राचीन दैवी ज्ञानावर.
प्राचीन शास्त्राच्या नावाने सुरू झालेला हा कल्पनाविलास मग कसाही उधळतो आणि तरीही त्याला वास्तुशास्त्राचा शास्त्रीय आधार समजावा, असा दावा करतो. याचे काही नमुने पाहा. दिशामहात्म्य सांगण्यासाठी कथन केलेले उत्तर दिशा-उत्तरेकडची वस्तू वा व्यक्ती स्थिर असते. सहजासहजी जागा सोडत नाही. उदा. ध्रुवतारा. ही दिशा कुबेराची असून त्याकडे धन आणि ऐश्वर्य यांचे अपरिमित भांडार आहे. जर घराचे तोंड उत्तरेस असेल तर या कुबेरदेवतेची दृष्टी त्या कुटुंबावर सदैव पडते. कोणतीही आर्थिक कमतरता राहत नाही. पश्चिम या दिशेचा अर्थ टाकाऊ अगर निरुपयोगी. ही दिशा वरुणाची. पाऊसपाणी यावर त्याचा अधिकार आहे. या दिशेला कोणतीही गोष्ट केल्यास ती भरभराटीस येत नाही. म्हणून या दिशेला कमीत कमी खिडक्या, दरवाजे ठेवावेत म्हणजे त्या दिशेचा वास्तूवर परिणाम होत नाही. दक्षिण-दक्षिण म्हणजे मौजमजा, व्यसन, भांडण, नुकसान, मृत्यू, वास्तुपुरुष मंडलामध्ये दक्षिण दिशेस यमदेवता आहे, असे मानले जाते. म्हणून या दिशेला कमीत-कमी खिडक्या व दारे असावीत किंवा नसावीतच.
ही सगळी शास्त्रीय (!) दमबाजी झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष केले तर काय भोगावे लागते, याचे गडद चित्र अर्थात रंगविलेले असतेच. पुन्हा-पुन्हा अपघात, सतत आजारपण, शस्त्रक्रिया, अकाली मृत्यू हे वास्तुदोषामुळे उद्भवतात. वांझपणा, मतिमंदपणा, वेडेपणा, आत्महत्या हे प्रकार घरात आढळल्यास वास्तुदोष जरूर शोधावा. व्यवसायात अपयश, आर्थिक अडचण, लग्न न जुळणे, घरातील अशांती हे सारे वास्तुदोषानेच घडते. हे सारे ऐकल्यावर होम, स्वीट होम या कल्पनेने ते घर बांधावयास निघालेल्या माणसाने वास्तू व त्याचे वास्तुशास्त्र यांचे पाय न धरले तरच नवल!
केवळ प्राचीनता व धार्मिकता पुरेशी नाही म्हणून की काय (नकली) वैज्ञानिकता जोडीला आणली गेली आहे. काही वास्तुविशारद, अभियंते व बांधकाम व्यावसायिक शास्त्राचे नाव घेत या प्रकाराला खतपाणी घालत आहेत. एनर्जी फ्लो थिअरी, टोपोलॉजी थिअरी, कॉन्डंट थिअरी, हार्टमन ग्रिड असे शब्द आले की, आभास तर निश्चितच शास्त्राचा निर्माण होतो.
एवढे सारे पुरेसे नाही म्हणून या मांडणीला प्रारब्ध कल्पनेची जोड दिली जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेले घर व्यक्तीला त्याचे दैव अनुकूल करण्यात बदत करते म्हणे आणि तसे झाले नाही तर... बी. एन. रेड्डी हे माजी खासदार आहेत व वास्तुशास्त्रीही. त्यांच्या मते, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, नरसिंह राव, चंद्रशेखर या साऱ्या पंतप्रधानांना सत्तेवर असताना आणि नंतर जे सोसावे लागले, याचे कारण त्यांच्या वास्तूची दारे दक्षिण-पश्चिम आहेत. त्यामुळे नशीबच उफराटे झाले. हेच दरवाजे जर पूर्व-उत्तर दिशेला असते तर तकदीर नक्कीच बदलली असती.
धंदा भरभराटीला आणावयास हवा तर त्यासाठी काही नामवंतांच्या साक्षी हव्यातच. काही दिवसांपूर्वीच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये या प्राचीन वास्तुशास्त्रामागे धावणाऱ्या कंपन्यांची नावे आली आहेत. त्यामध्ये लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो ही इंजिनिअरिंग कंपनी, लिंटास ही अग्रगण्य जाहिरात कंपनी, ‘झी टीव्ही’चा दिल्ली येथील स्टुडिओ, ‘इस्पातचा पोलाद कारखाना, बिर्ला कंपनीचा सेंच्युरी केमिकल; तसेच जहाज बांधणी, हिंदुस्तान मोटर्स, ओरिएन्ट फॅन अशा बड्याबड्यांच्या साक्षी आहेत. या कंपन्यांनी आपल्या धंद्याच्या नवीन जागा वास्तुशास्त्राप्रमाणे बांधल्या. काहींनी जुन्या जागांच्यात या शास्त्रानुसार बदल केले; तर काहींनी कर्मचारी बसण्याची अंतर्गत रचना बदलली. या सगळ्या कंपन्यांना त्यामुळे आणखी चांगले दिवस आले. काहींना तर चक्क निर्यातीच्या ऑर्डर मिळाल्या, असे त्यांचे मत बातमीत नोंदवले आहे.
मध्यंतरी बंगळुरू येथे वास्तुविशारद परिषद झाली. त्यामध्ये अशी मागणी करण्यात आली की, कर्नाटक राज्याचे बांधकामाचे नियम प्राचीन वास्तुशास्त्राशी सुसंगत नाहीत म्हणून ते बदलावयास हवेत. अर्थात, या साऱ्याबरोबर वास्तुशास्त्रामुळे त्या वास्तूत राहणाऱ्याचे दैव २५ टक्केच बदलले जाते. उरलेले ७५ टक्के त्याच्या पूर्वप्राक्तनातील कर्मावर अवलंबून असते, असे सांगावयासही परिषद विसरली नाही.

प्रश्न माणसांनी आणि समाजव्यवस्थेने निर्माण केलेले असतात. राहावयाचे घर कसे आहे, यावर त्यात राहणारा तरुण बेकार राहत नाही. त्याचा संबंध असतो देशाच्या अर्थकारणाशी. कारखान्याचा प्लॉट आणि त्यावरची इमारत यांचा कामगारांच्यात उडालेल्या हिंसाचाराचा काही संबंध नसतो. तो असतो मालक-मजूर संबंधांमध्ये. भरभराट होणे, संपन्नता येणे हे व्यक्तीचे परिश्रम आणि गतिमान अर्थकारण याची सांगड घालण्यावर अवलंबून असतो.
हे सर्व समजते; पण उमजत नाही. युक्तिवाद साधारणपणे असा केला जातो की, फारसा तोटा नसताना या शास्त्राचा आधार घेऊन प्रचिती येते की, नाही, हे का पाहू नये? बाकीचे छोटे-मोठे तोटे सोडा; पण या तर्कदुष्ट विचाराने, तथाकथित वास्तुशास्त्राच्या आहारी जाणे म्हणजे देशाच्या घटनेचा आणि त्याबरोबर स्वत:चा आणि मानवजातीचाच अपमान आहे.
खरे तर घर बांधण्यासाठी शासनाने तयार केलेले नियम हे सर्वसाधारण नागरिकाचे आरोग्य उत्तम राहावे, सुरक्षित राहावे, आग, भूकंप अशी आपत्ती आलीच, तरी एकामुळे सर्वांचे नुकसान होऊ नये, या उदात्त हेतूने शास्त्रीय पायावर केलेले असतात. घर बांधताना सर्व खोल्यांची प्रायव्हसी राखली जाईल. दिवाणखाना, शयनकक्ष वाऱ्याच्या योग्य दिशेला आणि शौचकूप, स्नानगृह वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला असेल, हे पाहावे. ओट्यावरील बेसिन, मोरी ज्या बाजूस असेल त्याच्या विरुद्ध बाजूस गॅस सिलिंडरचा कप्पा असावा. स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅनची तरतूद असावी, अशा कार्यकारणभावाशी जोडलेल्या साध्या गोष्टी तर सामान्यांनाही कळतात. त्याहीपलिकडे सल्ला देण्यासाठी वास्तुविशारद आता तालुका पातळीपर्यंत उपलब्ध आहेत.
प्राचीन वास्तुशास्त्राला कवटाळताना हे सारे शहाणपण आपोआप मोडीत निघते. बौद्धिकदृष्ट्या योग्य अशा ऐहिक व्यवहाराला दुय्यम स्थान मिळते. सामाजिक अवनती होते. संशोधन मागे पडते. व्यवसायाचे अपयश, घरातले आजारपण, भांडण या सर्वांना भलतीच कारणे सुचवली जातात आणि वास्तूची रचना झाली असेल तर पाडापाडी करून फेररचना करणे श्रीमंतांनाच परवडते. गरिबांची फरफट होते. नवी बुवाबाजी बोकाळते. माणसे स्वत:ची विवेकशक्ती विसरतात, इच्छाशक्ती गहाण टाकतात. नकळत भित्री, दुबळी बनतात. वास्तू लाभण्याच्या व न लाभण्याच्या गूढ प्रकाराबरोबरच भविष्य, मंत्र, ताईत, तोडगे, यज्ञ, होम, हवन, बाबा, गुरू, महाराज यात अडकतात. स्वत:ची स्वतंत्र दृष्टी हरवतात. व्यक्तिस्वातंत्र्य गमावतात. त्याहीपुढे जाऊन या निर्णयाचे समर्थन करतात. त्याला शास्त्र म्हणून गौरवतात. स्वत:च्या जीवनात आणि जनमानसात दैववादी विचार घट्ट करतात. कोणताच लाभ झाला नाही तर असे का, याचा विचार करण्याऐवजी आपले पूर्वपाक्तनच याला जबाबदार. वास्तुशास्त्र तरी काय करणार, अशी समजूत करून घेतात. शहरी सुशिक्षितांच्यात वाढत जाणारी ही मानसिकता मन विषण्ण करते, भयसूचक इशारा देते.
 तथाकथित प्राचीन वास्तुशास्त्राचे आजच्या जीवनात पडणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबरच जीवन-मरणाचा बनलेल्या घरबांधणीच्या प्रश्नाचे आणि व्यक्ती, समाज, देश यांना आधुनिक बनवण्याच्या प्रयत्नाचे एकेक पाऊल मागे पडत असते.
आरोग्यासाठी औषधे लागतात. व्यक्ती औषधे काही काळच वापरते. परंतु काटेकोर पद्धतीने चाचण्या घेतल्याशिवाय औषधे बाजारात आणता येत नाहीत. तो लोकांच्या जिवाशी खेळ होतो. म्हणून गुन्हा होतो. ज्या वास्तूच्या सान्निध्यात जीवनभर निवास अथवा व्यवसाय होणार, त्याबद्दलची तथाकथित शास्त्रीयता कोणतीही तपासणी न करता बाजारात आणली जातेच कशी? ग्राहकासमोर भुलभुलैय्या उभा करण्याचा हा प्रकार आक्षेपार्ह नव्हे काय? पदवीप्राप्त डॉक्टर उपचारात चुकला तर त्याला ग्राहक संरक्षण कायदा लागू होतो. कोणतीच पदवी नसताना वास्तूमध्ये पाडापाडी करून घरमालकाला भरपूर खर्चात टाकणाऱ्या वास्तुपंडिताला हा कायदा लावला जाणे आवश्यक आहे. विशेषत: आधुनिक विज्ञानावर आधारित उत्तम प्रकारे विकसित असे एक मान्यताप्राप्त वास्तुरचनाशास्त्र अस्तित्वात असताना तर वास्तुश्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना तथाकथित जबाबदारीला सामोरे जावयास नको काय?
कमी दरात स्थानिक वास्तुघटक वापरून बांधलेले शक्य तेवढे चांगले घर हे आजचे खरे गरजेचे वास्तुशास्त्र आहे. या देशातील कोट्यवधी लोकांना स्वत:चे घर नाही. नजीकच्या काळात मिळण्याची शक्यता नाही. लक्षावधी कुटुंबे ज्याला घर हा शब्द वापरणे थट्टा ठरेल, अशा खोपटात अथवा नरकासमान झोपडपट्टीत राहत आहेत. फूटपाथवर राहणाऱ्या असंख्यांना तर थेट आभाळाचेच छत आहे. स्वातंत्र्याचे हीरकमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना वास्तूच्या संदर्भात या देशाची जर कोणती गरज असेल तर ती आहे, या कोट्यवधी लोकांना त्यांच्या नागरिकत्वाचा हक्क म्हणून छोटासा का होईना, स्वत:चा निवारा देण्याची.
याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, माणसाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बुद्धिवादी मन आणि विचार करण्याचे स्वातंत्र्य. माणूस ज्या वेळेला हे विचारस्वातंत्र्य दुसऱ्या कोणाकडे तरी कोणत्याही कारणाने गहाण ठेवतो, त्यावेळी माणसाचे माणूसपण ते काय उरते? आणि स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यास तरी कितीसा अर्थ राहतो? तथाकथित वास्तुशास्त्र नेमके हेच घडवून आणत असते आणि तेही ज्यांच्या खांद्यावर देशाचा अधिक भार आहे, असे मानले जाते त्या उच्चविद्या-विभूषित लोकांत आणि उद्योजकांत. भारताची आजची स्थिती अशी का आहे? वाढत्या भ्रष्टाचारामुळे? राजकारणाच्या गुन्हेगारीकरणामुळे? अकार्यक्षम शासनामुळे? की अमर्याद सत्तालोभामुळे? वास्तवाचा आधार असलेले हे सर्व प्रश्न भ्रामक वास्तुशास्त्र एका तडाख्यात रद्द ठरवते. देशातील प्रमुखांची निवासस्थाने वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कशी चुकीची आहेत, याच्याशी वरील आपत्तींना नेऊन जोडते. श्रीलंकेचा आकार हाच या देशातील कायम अशांततेला कारणीभूत आहे, असे छातीठोकपणे सांगणारे तज्ज्ञ (!) वास्तुशास्त्रज्ञ भारताच्या सद्य:स्थितीचे विश्लेषण; तसेच काही प्रकारे करणार, यात आश्चर्य नाही. या भ्रामक वास्तुशास्त्राच्या नादी लागलेला माणूस आत्मविश्वास गमावलेला असतोच. पण तो अधिकच भित्रा व दुबळा बनवला जातो. स्वत:वरचा ताबा तो गमावतो, प्रयत्नवाद सोडतो. विवेक व इच्छाशक्तीला रजा देतो आणि हे सारे गमावल्यानंतर समजा त्याला काही जरी मिळालेच (ती शक्यता अर्थात नाहीच), तरी त्याची किंमत राजकीय गुलामगिरीपेक्षा घातक असलेली मानसिक गुलामगिरीची निर्मिती हीच असते. भ्रामक वास्तुशास्त्राचे जोखड झुगारून द्यावयास हवे, ते ही मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर २०११)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...