गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

प्रबोधनाच्या चळवळीत बोलत राहिले पाहिजे



प्रबोधनाच्या चळवळीत बोलत राहिले पाहिजे

दाभोलकर, प्रबोधन, व्याख्यान, चमत्कार सादरीकरण, संभाषण
अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत भाषणे देताना हल्ली काही वेळ मला मनातल्या मनात कंटाळा येतो, म्हणजे श्रोत्यांना कंटाळा आलेला नसतो. ते मजेत प्रतिसाद देत असतात. हसत असतात. टाळ्या वाजवत असतात. मला कंटाळा येण्याचे कारण म्हणजे मी आतापर्यंत दिलेल्या हजारो भाषणातील ते आणखी एक भाषण असते. काही मुद्दे, काही उदाहरणे, काही विवेचन थोडे-फार वेगळे असते. पण आता हजारो भाषणे देऊन झाल्यानंतर नवीन भाषण देणे तसे अवघडच असते. या मानसिकतेचा एक परिणाम असा होतो की, भाषणाचे निमंत्रण स्वीकारण्यास माझे मन फारसे उत्सुक नसते. शिवाय अनेकदा एका तासाच्या भाषणासाठी सात-आठ तासांचा जाण्याचा आणि परत येण्याचा प्रवास करावा लागतो. हे आठवायचे कारण म्हणजे मुंबईत रिझर्व्ह बँकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी मला भाषणाला बोलविले होते. मी हो म्हणालो; पण तरीही भाषणाला जाताना माझ्या मनात वरील विचार सुरूच होते. भाषण झाल्यानंतर मी त्या विचारांचा आढावा घेतला आणि मला स्वत:चाच आधीचा विचार चूक ठरवणारे काही नवीन मुद्दे लक्षात आले म्हणून ते कार्यकर्त्यांच्या बरोबर; तसेच वाचकांच्या बरोबर शेअर करत आहे. हे मुद्दे असे-
१) ज्या ठिकाणी भाषण होते, त्या ठिकाणच्या शाखेतील कार्यकर्त्यांना सन्मानित वाटते. कारण आपल्या चळवळीतील माणसांचा व आपल्या विषयाचा आणि विचारांचा सन्मान झाल्याची त्यांची भावना होते.
२)  आपले भाषण स्वत:ला रिपीटिशन वाटणे स्वाभाविक आहे. कदाचित आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांनाही काही प्रमाणात ते तसेच वाटणे शक्य आहे. मात्र भाषणाला आलेला बहुसंख्य श्रोतृवर्ग हा नवीन असतो. त्यांनी हे  विचार आणि मुख्य म्हणजे विचार पद्धती कधीही ऐकलेली नसते. त्यामुळे  त्यांना भाषण भावते; निदान विचारप्रवृत्त करते.
३) भाषणाच्या निमित्ताने श्रोत्यांना वार्तापत्राची, पुस्तकांची, संघटनेची थोडी माहिती होते; तसेच वार्तापत्राची नोंदणी, पुस्तकांची विक्री ही बाब शक्य होते.
४) व्याख्यानाला मिळालेले मानधन चळवळीला दोन पैसे मिळवून देते.
५) बहुतेक भाषणानंतर मला दोन-चार व्यक्ती अशा भेटतातच की, ज्यांना हा विचार माहीत असतो, नव्हे; त्यांचा तोच विचार असतो. परंतु ते आवर्जून भाषणाला येतात. कारण त्यांना वैचारिकदृष्ट्या एकाकी वाटत असते. त्यांच्या आजूबाजूला ते सदैव आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जातात वा लोकांचे टोमणे खातात. अशा वेळी आपल्या विचारांचा कोणीतरी ठामपणे विचारपीठावरून आपलेच विचार मांडत आहे आणि दाद मिळवत आहे, ही बाब त्यांना आधार देणारी वाटते. विचाराच्या लढाईतील त्यांचे एकाकीपण कमी करते.

६) मुंबईत मी वैज्ञानिक दृष्टिकोन व समाजपरिवर्तन या विषयावर बोललो. भाषणानंतर काही प्रतिक्रिया मला अशा मिळाल्या की, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमागे व्यापक विचार आहे, ते आम्हाला ते भाषण ऐकल्यावर समजले. तोपर्यंत आमचा असाच समज होता की, अंधश्रद्धा निर्मूलन ही फक्त बुवाबाजी, भूत, भानामती एवढ्यापुरतीच काम करणारी संघटना आहे. आपल्या चळवळीची समग्रता लोकांना कळण्यासाठी व्याख्याने उपयोगी ठरतात. यासाठी कार्यकर्त्यांनी काय करावयास हवे?
) केवळ चमत्कार सादरीकरणाबरोबरच त्यासोबत वैज्ञानिक दृष्टिकोन अथवा बुवाबाजीविरोधी संघर्ष कशासाठी व कशाप्रकारे, यातील मुद्द्यांचा समावेश करावा. त्यामुळे भाषणाची परिणामकारकता वाढते.
ब)  विविध विषयावरील व्याख्यानांची तयारी करावी जसे- खगोलशास्त्र व फलज्योतिष, निरामय मानसिकता, फुले- आंबेडकरांचा बुद्धिवादी विचार व व्यापक परिवर्तन, आधुनिक समाज व वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे.
क) या विषयावरील भाषणांना लगेच निमंत्रणे येणार नाहीत. तेव्हा ती लावून घेण्यात कमीपणा बाळगू नये.
ड) वेगवेगळ्या प्रसंगी व वेगवेगळ्या श्रोत्यांसमोर वेगवेगळे मुद्दे बोलण्याची तयारी ठेवावी.
एक अनुभव सांगण्यासारखा आहे. इस्लामपूरला शिबिराला गेलो होतो. चौकात माझे भाषण ठेवले होते. भाषण उशिरा सुरू झाले. विषयही थोडासा जडच होता. खुल्या चौकातील जागा तशी काहीशी गैरसोयीची. त्यामुळे भाषणाच्या प्रतिसादाबद्दल मी साशंक होतो. भाषणाला गर्दीही झाली आणि एकूण कार्यक्रम ठीक झाला; परंतु त्यानंतर मला आलेल्या एका पत्राने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी विषयाच्या कोणत्याही पैलूवर; पण तळमळीने भाषण करण्याची गरज मला पटली. त्याचे कारण कोल्हाटी समाजातील सातारा जिल्ह्यातील औंध तालु्क्यातील एका माणसाचे मला पत्र आले. त्यांनी लिहिले होते, ‘माझी सासुरवाडी इस्लामपूर आहे. त्यामुळे तुमचा कार्यक्रम आज मी ऐकला म्हणून मी हे पत्र लिहिले आहे. माझ्या समाजात बालवयातच लग्ने होतात. देवाच्या विषयी अंधश्रद्धा आहेत. दारूमध्ये समाज गुरफटला आहे. नेतेमंडळी लक्ष घालत नाहीत. माझा समाज खालच्या लायकीचे जीवन जगतोय. मी पुढारी नाही. कार्यकर्ता नाही; पण माझा समाज सुधारावा, अशी माझी कळकळ आहे. आपण थोडे लक्ष घालावे ही विनंती. कृपया माझे नाव कोणालाही सांगू नये,’ मला एवढेच लक्षात आले की, त्या दिवशी जर चौकात मी बोललो नसतो तर या माणसाची माझी भेट कशी झाली असती?

मतितार्थ एवढाच की, प्रबोधनाच्या चळवळीत आहोत म्हणून सतत आणि जाणीवपूर्वक बोलत राहिले पाहिजे.


अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर २००९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...