सोमवार, २९ जानेवारी, २०१८

महाराष्ट्र शासनाने भूत-भानामती कमिशन नेमावे




महाराष्ट्र शासनाने भूत-भानामती कमिशन नेमावे
दाभोलकर, भानामती कमिशन, मानसिक आजार
महाराष्ट्रात भूत-भानामतीग्रस्त रुग्णांची पाहणी करण्यासाठी शासनाने एक कमिशन नेमावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. अंधश्रद्धांची पाहणी करण्याचा काहीसा प्रयत्न कर्नाटक व आंध्र शासनाने भानामती कमिशन नेमून यापूर्वी केलेला आहे. महाराष्ट्रात हा प्रयत्न अधिक व्यापक व सखोल होण्याची गरज आहे. भुताने झपाटणे, देवी अंगात येणे, बाहेरची लागण इत्यादी अंधश्रद्धा दूर करून जनजागरण करण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली काही वर्षे करत आहे. तरीही शासकीय सहकार्याची आवश्यकता आहे.

मानसिक आजारांचे व उपचारांचे स्वरूप
भूत-भानामती हे खरे तर मानसिक आजार असतात. या प्रकारच्या आजारात व्यक्तीची मनोवस्था बदलते. ती उद्दीपित होते किंवा उदासीन बनते. बडबडू लागते, गाऊ लागते, असंबद्ध वर्तन करू लागते वा डोळे मिटून अनैसर्गिक अवस्थेत बसून राहते. व्यक्तीच्या चेहऱ्यात, आवाजात बोलण्याच्या तपशिलात बदल होतो. मराठवाड्यात अंगात येण्याच्या प्रकाराला ‘भानामती’ म्हणतात. या स्त्रिया अंगावरील कपड्याचे भान न राहून आळोखे-पिळोखे देतात, घुमतात, जमिनीवर लोळतात. अंगात आलेल्या काही व्यक्ती लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. हातातून हळद-कुंकू काढतात, पेटता कापूर खातात.

सुशिक्षित-अशिक्षित, ग्रामीण-शहरी, गरीब-श्रीमंत या सर्व ठिकाणी या प्रकाराबाबत प्रचंड कुतूहल, अज्ञान व गैरसमज आहेत. यामुळे प्रबोधन व शक्यतेनुसार उपाययोजना हे काम सध्या प्रामुख्याने केले जाते. नुकत्याच झालेल्या नवरात्रात संपूर्ण महाराष्ट्रात समितीतर्फे हेच काम प्रकर्षाने केले गेले.

मानसिक आजारात मोडणाऱ्या या सर्व प्रकारांची व्याप्ती खूप मोठी आहे. अपवाद वगळता सर्वांचा या प्रकारांच्यावर गाढा विश्वास असतो. मानसिक रुग्णाबद्दल समाजाचा दृष्टिकोनही उपहासाचा असतो. त्यामुळे भूत लागलेली व्यक्ती मनोरुग्ण आहे, यापेक्षा तिला बाहेरच्या कोणी पिशाच्याने झपाटले ही कल्पना सोयीची वाटते. हा समज बळकट करणारा देवऋषी-मांत्रिक सहज उपलब्ध असतो. संघटनेच्या प्राथमिक पाहणीत दापोली, जि. रत्नागिरी व चोपडा, जि. जळगाव या तालुक्यांच्या डॉक्टरांपेक्षा मांत्रिक- देवऋषींची संख्या व व्यवसायाची भरभराट जास्त आढळली.

या लोकांच्याकडे जाऊन खर्च खूप होतोच; परंतु अत्यंत चुकीच्या मार्गाचे अशास्त्रीय उपचार केले जातात. देवऋषींकडे गेल्याने मूळ रोग बरा होत नाही, वाढत जातो व क्रॉनिक होते. डॉक्टरकडे इतक्या उशिरा नेल्यानंतर औषधांचाही फायदा होत नाही. मग लोक चुकीची समजूत करून घेतात की, देवऋषीकडे नेले तेव्हा बरे वाटले होते. डॉक्टरांकडे नेल्यामुळे कोप झाला व आजार वाढला.

देवऋषी किंवा मांत्रिकाकडे भूत उतरवण्यासाठी मारझोड केली जाते. स्त्री-रुग्णांबाबत गैरप्रकार घडतात. या सर्व प्रकारात उपचारांसाठी ज्यांची मदत अत्यावश्यक ते रुग्णाचे नातेवाईक हा प्रकार बाहेरचा समजून दूर होतात. मानसोपचारतज्ज्ञाकडे नाईलाजाने नेले जाते, तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. एका प्रतिनिधिक उदाहरणाने हे स्पष्ट होईल.

पुणे जिल्ह्यात ओतूर येथे मानसोपचार केंद्र चालवले जाते. महिन्यातून एक दिवस या कामासाठी येरवडा मनोरुग्णालयातील ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिता अवचट जातात. वर्षात त्यांनी ५१४ रुग्ण तपासले. त्यापैकी जवळजवळ सर्वजण आधी देवऋषी या मांत्रिकाकडे उपचार घेऊन आले होते. मांत्रिकाकडे हा आजार बरा होत नाही. वैद्यकीय औषधाने मात्र १०० टक्के बरा होतो. ही औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा मिळतात. खेड्यात मांत्रिकाकडे अशा मुलांचे घोळकेच्या घोळके नेलेले दिसतात.

मांत्रिकाकडे केवळ मानसिक नव्हे, तर शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. या सर्व प्रकाराच्या बळी बहुतेक वेळा स्त्रियाच असतात, ही अधिक खेदजनक बाब आहे. परभणी-नांदेड जिल्ह्यातील काही भागात अंगात येणाऱ्या स्त्रियांची एकेका गावातील संख्या विश्वास बसू नये इतकी मोठी आहे. या सर्व प्रकारात मग काही प्रमाणात ढोंग व फसवणूकही होते.

कमिशनची आवश्यकता
महाराष्ट्रातील भूतबाधाग्रस्त रुग्णांची पाहणी करण्यासाठी कमिशन नेमले जाईल, त्यात पुढील व्यक्तींचा सहभाग असावा.
१)    शासनाने नियुक्त केलेले अधिकारी
२)    मानसोपचारतज्ज्ञ
३)    अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते.

कमिशनमुळे पुढील गोष्टी लोकांसमोर येतील.
१)    समस्येची व्याप्ती आणि गांभीर्य.
२)    मानसिक रुग्णांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण.
३)    समस्येवरील उपाययोजनेसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सेवेची ग्रामीण           भागातील उपलब्धी व तिची कार्यक्षमता.

व्यापक चळवळीचे स्वरूप
कमिशनच्या पाहणीनंतर या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व्यापक स्वरुपाची जनचळवळ उभी करण्यासाठी पुढील गोष्टी करता येतील.
१)    गावातील डॉक्टरांचे मानसिक आजारांबद्दल व त्या वरील प्राथमिक उपचारांबद्दल प्रशिक्षण करणे.
२)    महत्त्वाच्या स्थानिक व्यक्तींना चळवळीमध्ये सहभागी करून घेणे.
३)    भोंदू डॉक्टरांविरुद्ध जशी न्यायालयीन कारवाई केली जाते, तशी दिशाभूल व शोषण करणाऱ्या देवऋषी, मांत्रिक यांच्या विरुद्धच्या न्यायालयीन कारवाईची तरतूद करणे.
४)    मानसिक आरोग्य हा सर्व आरोग्याचा पाया असतो, तो बळकट करण्यासाठी कर्नाटकात राबविण्यात येतो तसा कम्युनिटी सायकीअ‍ॅट्री हा प्रकल्प राबविणे.

भानामती स्क्वॉड
भानामती या शब्दाला आणखी एक अर्थ आहे. घरातील वस्तू आपोआप पेटणे, घरावर दगड पडणे, अंगावर, वस्त्रावर बिब्ब्याच्या फुल्या उठणे अशा बाबींनाही भानामती-काळी जादू म्हटले जाते. हे प्रकार महाराष्ट्रात कुठे ना कुठे घडतात, हे अधून-मधून कानावर येते. असे घडू लागले की, त्या भागात हा प्रकार करणी, जादूटोणा समजला जातो व भीतीचे, गूढतेचे वातावरण तयार होते.

हे सर्व प्रकार करण्यामागे बहुधा सायकॉलॉजिकली -माल अ‍ॅडजेस्टेड वा मेंटली अ‍ॅबनॉर्मल व्यक्ती असतात. काही वेळा यात केवळ फसवणूक होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आलेली अशी सर्व प्रकरणे आम्ही उघडकीस आणली आहेत. अशा प्रकारात संबंधितांच्या कुटुंबियांचे सहकार्य मिळणे अत्यावश्यक असते. ते अनेकदा नाकारले जाते व प्रकरण चालूच असते. अशा प्रकारांचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाच्या राज्यात भानामती स्क्वॉड होते. ते या प्रकारांचा बंदोबस्त करत अशी एखादी समिती शासनाने नेमावी. भानामतीची घटना त्यांना कळवणे संबंधितांवर बंधनकारक असावे. चौकशी करून उपाययोजना करण्याचे अधिकार समितीला असावेत. असे झाल्यास भानामतीमुळे होणारी घबराट टळेल व गूढ शक्तीतील फोलपणा लोकांना उमगेल. केवळ पोलीस अधिकाऱ्यांना हे काम देऊन चालणार नाही. कारण त्यांचाही या प्रकारांवर विश्वास असतो. परंतु त्यांचे प्रशिक्षण करता येईल व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, मानसोपचारतज्ज्ञ, पोलीस अधिकारी यांचा समावेश असलेली ही समिती या प्रकरणाचा त्वरित व निश्चित बंदोबस्त करू शकेल.

या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून उपाययोजना सुचवण्यासाठी आम्ही शासनाने भूत-भानामती कमिशन नेमावे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९८८)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...