शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

‘अंनिस’चा बीजग्रंथ : तिमिरातुनी तेजाकडे




‘अंनिस’चा बीजग्रंथ : तिमिरातुनी तेजाकडे
दाभोलकर, पुस्तक लेखन, मांडणी, विवेककारण
१९८५ साली भ्रम आणि निरास हे अंधश्रद्धा निर्मूलनावरचे माझे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव महाराष्ट्रात दृष्टिक्षेपात नव्हते. माझ्या परीने या विषयाचा विचार व व्यवहार या पुस्तकात मी मांडला आहे. ते पुस्तक लिहिण्यासाठी मी बरेच परिश्रम घेतले होते. या विषयावर त्यावेळी मराठीत जवळपास पुस्तक नव्हतेच. त्यावेळी मला असे वाटत होते, की माझी एकूण मांडणी इतकी विस्तृत आणि भक्कम आहे, की माझे पुस्तक म्हणजे या विषयातील शेवटचा शब्द ठरेल. हा माझा अर्थातच भ्रम होता आणि त्याचा निरास यथावकाश होत गेलाही. त्यानंतर दहा वर्षांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे माझे पुस्तक आले. खरे तर माझ्या भाषणांचे शब्दांकन असे त्याचे स्वरूप आहे. तरीही त्याचाही उपयोग बहुतेक कार्यकर्त्यांनी भाषणे देण्यासाठी केला. दोन मर्यादा स्पष्ट होत्या. एक तर त्या पुस्तकात बुवाबाजी, संमोहन असे काही विषय लिहिलेलेच नव्हते, मांडणी भाषणाच्या अंगाने झाल्याची मर्यादा होती; शिवाय त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनासारख्या काही विषयांची मांडणी बऱ्याच प्राथमिक स्वरुपात झाली आहे, असे आज मला वाटते. गेली तीन-चार वर्षे मला असे जाणवत होते, की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल आपणाला जे म्हणावयाचे आहे, ते पूर्ण तपशिलात मांडावयास हवे आणि त्याला प्रत्यक्ष संघर्षाच्या अनुभवाची जोडही द्यावयास हवी. एका अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरचा एक विस्तृत बीजग्रंथ लिहावयास हवा.

तिमिरातुनी तेजाकडे हे माझे ४८० पानांचे पुस्तक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होते आहे. त्यामध्ये हा प्रयत्न मी केला आहे. या प्रयत्नाला द्विदशकपूर्ती वर्षाची पार्श्वभूमीही आहे. चळवळ सुरू झाली त्यावेळी काहींना ती म्हणजे जादूचे प्रयोग दाखवण्याचा बालिशपणा वाटला, तर काहींना चळवळ ही परिवर्तनाला पूरक; परंतु बिनमहत्त्वाची अत्यंत दुय्यम बाब वाटली. २० वर्षांतील प्रत्यक्ष कार्याच्या वाटचालीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या दोन्ही शंका खोट्या ठरवल्या आहेत. तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तकातून याचे दर्शन घडावे, अशी अपेक्षा आहे.

पुस्तकात तीन भाग आहेत. पहिला ‘अंनिस’च्या विचाराबाबत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष व विज्ञान, वास्तुशास्त्र, मनाचे आजार, भूतबाधा व अंगात येणे, संमोहन, छद्मविज्ञान, बुवाबाजी अशा सर्व बाबींवर त्यात तपशीलवार मांडणी केली आहे. दुसऱ्या भागात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याशी व्यापक अर्थाने संबंधित असलेले परमेश्वर, धर्म, अध्यात्म, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद, श्रद्धा-अंधश्रद्धा, महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा बुद्धिप्रामाण्यवादी विचार याबाबत मांडणी केली आहे. तिसऱ्या भागात यासंदर्भात केलेल्या चळवळींची नोंद आहे. मात्र हा भाग अतिविस्तृत होण्याचा धोका लक्षात घेऊन असेच संघर्ष घेतले आहेत, की ज्यामध्ये माझा थेट संबंध आहे; आणि तेही पुन्हा बुवाबाजी, भूत, भानामती, भविष्य, धर्मचिकित्सा, चमत्कार अशा विविध बाबींतील अवघे एक अथवा दोन प्रातिनिधिक स्वरुपातच घेतले आहेत.
     
या सर्व मांडणीमागचे मूळ सूत्र विवेककारण असे आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विचार आणि कृती या पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलन ते विवेककारण अशी केलेली वाटचाल वाचकांना लक्षात यावी. अधिक नेमकेपणाने बोलायचे तर ही वाटचाल अंधश्रद्धा निर्मूलन-शास्त्रीय विचारपद्धती-मानवतावाद-विवेकवाद अशी आहे. ही वाटचाल तशी नवीन नाही. समितीच्या कार्याची जी चतु:सूत्री आहे, ती जर नीटपणे लक्षात घेतली तर त्यामध्ये ही मांडणी आहेच. परंतु त्यातील प्रत्येक टप्प्यावर वास्तवात विचार व आचार या पातळीवर समितीचे प्रतिपादन व कार्य काय आहे, याची कल्पना पुस्तकाच्या वाचनातून नक्कीच येईल. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्याला संपूर्ण पुस्तक, संपूर्ण नवे लेखन असे वाटणार नाही. कारण यातील काही मुद्दे, काही प्रसंग कोठे ना कोठे मी अन्यत्र लिहिले आहेत. मात्र तरीही बरेच विवेचन त्याला प्रथमच वाचावयास मिळेल आणि एकसंधपणे मिळेल, असे मला वाटते. या विषयाशी ज्यांचा संबंध नाही त्यांना तर हे पुस्तक, नवी दृष्टी देणारे ठरेल, अशी मला आशा आहे. मला नम्रपणे असे वाटते, की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाची एवढी विस्तृत व सम्यक मांडणी मराठी भाषेत तर आज नाहीच. परंतु भारतातील अन्य भाषेतही बहुधा नाही. हे सारे लिहीत आहे, याचे उद्दिष्ट लेखनाची भलावण हे नाही तर द्विदशकपूर्ती वर्षात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनात्मक मजबूत पायाबरोबरच वैचारिक भरभक्कम आधारावर कृतिशीलपणे उभी आहे, हे समाजाला समजावे हीच आहे.


अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल २०१०)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...