शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

विचारांचा जागर कृतिशील व सर्वंकष करायला हवा!




विचारांचा जागर कृतिशील व सर्वंकष करायला हवा!
दाभोलकर, नाट्यप्रयोग, विरोध, आव्हानात्मक घटना
दोन घटना आणि मला जाणवलेला त्यांचा निष्कर्ष नोंदवत आहे. कार्यकर्त्यांना, वाचकांना काय वाटते, हे समजून घेण्यास मी उत्सुक आहे.

घटना क्र. १
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका जिल्हा शाखेने निधी उभारणीसाठी एक नाटकाचा प्रयोग घेतला. नाटकातील प्रमुख कलावंत हा महाराष्ट्रातील रंगभूमीवरचा सर्वाधिक लोकप्रिय आहे. नाट्यप्रयोग ठरवण्यासाठी त्याच्याशी संपर्क झाला, त्यावेळेला त्याने सिद्धिविनायकाच्या पुढे लागलेल्या रांगा पाहून स्वत:ला अस्वस्थ होते,’ अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक नाटक यशस्वी केले. निधी चांगला जमवला. गर्दी उत्तम होती. शहरातील सुजाण वर्ग उपस्थित होता. अशा कार्यक्रमात नेहमीच मध्यंतराच्यावेळी एखादा छोटा कौतुक समारंभ होतो. निधी जमवण्यासाठी मदत करणाऱ्या सहकाऱ्यांचे कौतुक, प्रमुख कलावंतांच्यातर्फे कामाला सदिच्छा, असा तो छोटेखानी कार्यक्रम असतो. स्वाभाविकच त्या कार्यक्रमात त्या सुप्रसिद्ध कलावंताला अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली, की त्याने ‘अंनिस’च्या कामाचे दोन मिनिट कौतुक करून या कामाला सदिच्छा द्याव्यात. त्याच्या करिष्म्यामुळे, त्याच्या तोंडातून आलेले शब्द लोकांना अधिक भावतील व ‘अंनिस’च्या कामाबद्दल त्यांच्या मनात अधिक अनुकुलता निर्माण होईल, अशी साधी अपेक्षा कार्यकर्त्यांनी बाळगली होती. अशी सदिच्छा देण्यास त्या अभिनेत्याने नकार दिला. कुठल्याही वैचारिक (आणि म्हणूनच मतभिन्नता असणाऱ्या) कामाबद्दल सदिच्छा व्यक्त करून त्या कामाबद्दल व विचारांबद्दल मतभिन्नता अथवा विरोध असणाऱ्या अव्यक्त रसिकजनांना हे आवडले नाही तर...? अशी त्याच्या मनात शंका होती आणि त्यामुळे सदिच्छा न देताच त्यांनी तिकीटविक्री करणाऱ्यांचा सत्कार केला.

घटना क्र. २
हुपरी, जि. कोल्हापूर येथे एका मुख्याध्यापिकेने असा दावा केला, की तिला साक्षात्कार झाला आहे. साक्षात्कार असा होता, की एका जागेत एक देवाची मूर्ती आहे आणि त्याच्या पलिकडे सोन्याने भरलेला हंडा आहे. एवढे सांगूनच ती थांबली नाही, तर तिने स्वत:च्या खर्चाने त्या जागेत जेसीबी वगैरे लावून जोरदार खोदाई चालू केली. खोदकाम चार दिवस चालले. विषय चर्चेचा, उत्सुकतेचा झाला. वृत्तपत्रे व दृक्श्राव्य माध्यमे यांना खमंग बातमी मिळाली. खोदाई स्थळाला जत्रेचे रूप येऊ लागले. कोल्हापूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाने हस्तक्षेप करून हा प्रकार थांबविण्याची मागणी केली. आश्चर्य म्हणजे या मागणीला वृत्तपत्रांनी पाठिंबा दिला आणि प्रशासनाने तालुका तहसीलदारांमार्फत नोटीस देऊन खोदकाम थांबविण्यास आदेश दिला. स्वाभाविकच धार्मिक बाबतीत शासनाने हस्तक्षेप करून भावना दुखावल्याचा आरोप झाला. शासनाचे आम्ही काही चालू देणार नाही. खोदकाम करणे हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही बजावणारच. कोण विरोध करतो ते पाहू,’ अशी राणा भीमदेवी थाटाची आगखाऊ भाषणे जिल्ह्यातील दोन शिवसेना आमदारांनी केली. गंमत म्हणजे स्थानिक वृत्तपत्रांनी त्यांना अक्षरश: दोन ओळी जागा दिल्या. तरीही चिकाटीने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळ भेटवले आणि असे सांगितले, की आमच्या धार्मिक श्रद्धेच्या आड प्रशासनाने येता कामा नये आणि ते आले तर आम्ही मानणार नाही. प्रशासनाने अशी भूमिका घेतली, की ही अंधश्रद्धा आहे आणि त्यामुळे कायदा-सुव्यवस्था धो्क्यात येऊ शकते. मग ही अंधश्रद्धा कशी?’ असा पेटंट मुद्दा शिवसेनेनं काढला. शासनाने ठाम भूमिका घेतली की, हा निर्णय बदलणार नाही. तुम्ही कायदा हातात घेतल्यास कारवाई करू; परंतु तुमचा विरोध असल्यास तुम्ही कोर्टामार्फत आमचा निर्णय बदलून घेऊ शकता. धर्मरक्षकांना अर्थातच एवढा उत्साह नव्हता. त्यामुळे हे सर्व प्रकरण थांबलेच.

काय घडते आहे? स्वत:च्या व्यावसायिक यशाने सुखावलेल्या आणि त्याच वेळी ते यश कायम टिकावे, या इच्छेने धास्तावलेल्या कलाकाराने स्वत:ची भूमिका बदलून एक पलायनवादी भूमिका घेतली. खरे तर हे कचखाऊ व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. मात्र त्याला आता व्यावसायिक शहाणपणा असे नाव दिले जाते. उत्तुंग लोकप्रियता लाभूनही त्याची जराही पर्वा न करता आपले वैचारिक भान परखडपणे व्यक्त करणाऱ्या निळूभाऊ फुले वा श्रीराम लागू यांचे मोठेपण यातून अधिकच जाणवते.

दुसऱ्या उदाहरणातील अनुभव आश्वासक आहे. प्रसिद्धिमाध्यमांनी योग्य भूमिका घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कणखरपणा दाखवला. यामध्ये त्यांच्या त्यांच्या मूल्यमापनाचा भाग आहेच; परंतु याबरोबरच समाजामध्ये ‘अंनिस’ने सातत्याने जी भूमिका लावून धरली, त्याचे साद-पडसाद त्यांच्या मनात उमटले असण्याची ही खूण आहे.

अर्थ असा की, विचारांचा जागर अधिक कृतिशील, अधिक प्रभावी आणि अधिक सर्वंकष करावयास हवा. त्यामुळे असलेली अनुकुलता टिकून राहील आणि आज असलेली प्रतिकुलता उद्याच्या अनुकुलतेत रूपांतरित होऊ शकेल.

हे घडणे सोपे नाही; आव्हानात्मक आहे. मुळात हा निष्कर्ष बरोबर आहे का आणि असेल तर यासाठी काय करावयास हवे, याबाबत जरूर कळवावे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च २०१०




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...