शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

कुतूहल




कुतूहल
दाभोलकर, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्नोत्तरे, विज्ञान साक्षरता
नितीन ओक हे नाव चळवळीतील जुन्या कार्यकर्त्यांना आठवत असेल. हा अकोल्याचा गणिताचा प्राध्यापक. घरी पुरोगामी विचारांचा वारसा. काही दिवस त्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. परंतु त्यामधील अपुरेपणा त्याला जाणवू लागला. मग त्याने कुतूहल नावाची संस्था काढून कामाची सुरुवात केली. संस्थेच्या कामाबद्दल त्यानेच पत्रात लिहिलेले थोडेसे सविस्तर देत आहे....

कुतूहल ही अजून नोंदणीकृत न केलेली संस्था आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी सध्याच्या शिक्षणपद्धतीला नाव ठेवण्याऐवजी आपण काहीतरी करावं, या उद्देशाने काम सुरू केलं; मात्र तेव्हा काय करायचं? कसं करायचं? हे नक्की नव्हतं. अनेक विचार डोक्यात होते. कदाचित तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम डोक्यात होतं. कदाचित संशोधनासाठी विद्यार्थी बोलवणं हे डोक्यात होतं किंवा मुंबई विद्यापीठ व नागपूर विद्यापीठ यातील फरक समोर होता.... सुरुवात संदिग्ध होती.

सुरुवातीला काम केवळ दोन पद्धतीचं होतं- १) दर रविवारी आम्ही काही मित्र बसून विज्ञानावर चर्चा करायचो. यातून काही चुकीच्या कल्पना दुरुस्त व्हायच्या, तर एका शाखेचे दुसऱ्या शाखेशी संबंध शोधले जायचे. आणखी दुसरा उपक्रम म्हणजे इथल्या देशोन्नती नामक वर्तमानपत्रात कुतूहल या नावाने सदर सुरू केले. यात वाचकाच्या प्रश्नांना साध्या भाषेत उत्तरं दिली जायची. याचा प्रतिसाद अवर्णनीय होता. काही आठवड्यांनी रविवारच्या दिवशीची उपस्थिती वाढली. हळूहळू विज्ञानाबाबतच्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि विद्यार्थी ज्ञानाचा किती भुकेला आहे, याची जाणीव झाली आणि उन्हाळ्यात विज्ञान शिबिरे घेतली. केवळ २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. साधारण २०-२२ दिवसांच्या शिबिरात न्यूटनचे नियम, चुंबकत्व, विद्युत पेशी, विश्वाची निर्मिती, जीवसृष्टीची निर्मिती इत्यादी विषय, काही प्रात्यक्षिके असा कार्यक्रम होता. आठवी ते दहावीचे विद्यार्थी होते. आनंद होता. रोज तीन तास शिबीर ठरले होते. मात्र सगळे साधारण पाच-सहा तास थांबायचे. भरपूर शिकता आलं, शिकवता आलं. या दरम्यान कुतूहल जवळ देणगीद्वारे दोन सूक्ष्मदर्शक आले होते. त्यानंतर आतापर्यंत कुतूहलजवळ विदर्भातील सर्वांत मोठा टेलिस्कोप, स्लाईड प्रोजेक्टर, दोन मायक्रोस्कोप, २००-२५० स्लाईडस्, सुमारे ४०-४५ कार्यकर्ते (सभासद नव्हे) आहेत. या वर्षीचे उन्हाळी शिबीर प्रथम वर्षाचे विद्यार्थीच घेणार आहेत. सध्या अडीच तासाचा विश्व या विषयावरचा स्लाईड शो घेणारे सुमारे तीन-चारजण आहेत. या १६-१७ नोव्हेंबरला अकोल्याला खगोल अभ्यासकांचे शिबीर ठरले आहे. यासाठी आम्ही नारळीकर, यशपाल यासारख्यांना आमंत्रित केले आहे. एव्हानापर्यंत उद्देश स्पष्ट झाला आहे. खालील विचारांवर भर दिला जातो.
1.      विज्ञान गरजेनुसार प्रगत झालं; शाळेत प्रश्न विचारण्यासाठी नव्हे,
2.      विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत परस्परसंबंध आहे (तो कसा ते दाखवले जाते.)
3.      विज्ञान पोलीस यंत्रणेशिवाय कायदे पाळते. (यावर भर दिला जातो. सहजपणे नीतिमत्ता शिकवली जाते.)
4.      विज्ञानात समानता हा कणा आहे. यासाठीच नेहमी धडपड असते, पाण्याची पातळी असो, विद्युत प्रवाह वा जीवसृष्टीची निर्मिती फार महत्त्वाची बाब ठरते. (हे सांगितल्यावर, मला जाणवलेला फरक म्हणजे एक कटू विद्यार्थी जो पहिल्या दिवशी मागूनही त्याच्याजवळची पेन्सिल व स्केल देत नव्हता.  त्याने शेवटच्या दिवशी सगळ्यांसाठी भेटी आणल्या. मिळून मिसळून वागू  लागला.)

सध्या तरी विज्ञान व वैज्ञानिक विचारसरणी हाच प्रमुख उद्देश आहे. मला असे वाटते की, आपल्या चळवळीला ज्या दिशेने क्षितिजे विस्तारावयाची आहेत, त्यासाठी ही माहिती उपयोगी ठरावी. आपल्या समितीचे कार्य चांगल्या अर्थाने आता काहीसे स्थिरावत आहे. बुवाबाजीविरोधाचे संघर्ष, चमत्कारांची प्रात्यक्षिके, सत्यशोध प्रज्ञा प्रकल्प, प्रकाशने, वार्तापत्र या सर्व बाबींना नियमितपणा आला आहे. अशावेळी पुढच्या टप्प्यावर झेप घेण्याचा विचार आपण करावयास हवा. त्यासाठीच्या कार्यक्रमात विज्ञान साक्षरता हा महत्त्वाचा भाग असेल, यात मला शंका नाही. दैनंदिन जीवनात विज्ञान सहजपणे हाताळता आले पाहिजे. घरातील फ्यूज उडाला तर चटकन बदलता आला पाहिजे. ही याची एक बाजू आणि दुसरी म्हणजे सतत वर्धिष्णू होणाऱ्या विज्ञानाच्या दुनियेचे आकलन अवघड असले, तरी अर्थबोध व्हावयाला हवा. सुपर कंडक्टर आणि इंटरनेट हे शब्द कानावर पडल्यावर चेहरा कोरा करकरीत राहता कामा नये. या बाबींची कार्यप्रणाली न समजली तरी चालेल (ती समजणे अवघडही आहे); परंतु ते म्हणजे काय हा अर्थबोध होणे गरजेचे. कुतूहलसारखे उपक्रम आपल्या शाखा, कार्यकर्ते घेत गेले तर त्यामध्ये चळवळीचा विस्तार आहे. नित्य नवीन नूतनता आहे आणि गतिमान जगाचा सूर पकडण्याची कालसुसंगतता आहे. आपल्याच बिरादरीतील नितीन ओकने हे सिद्ध केले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी १९९६)




गुरुवार, ७ डिसेंबर, २०१७

देश-विदेशातील कौतुकाची थाप



देश-विदेशातील कौतुकाची थाप
दाभोलकर, महाराष्ट्र फौंडेशन, व्यापक वैचारिक भूमिका, कौतुक
श्री. सुनील देशमुख हे नाव महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींना आता नवीन नाही. मराठी वाङ्मयासाठी दोन लाखाचे घसघशीत पुरस्कार आणि तेही कायमस्वरुपी सुरू केले, ते अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या श्री. सुनील देशमुख यांनी. या पुस्तकांची निवडही विधायक, पुरोगामी निकषावर नि:पक्षपातीपणे केली जाते. जानेवारी महिन्यात मुंबईत झालेल्या या पुरस्कार वितरणप्रसंगी श्री. देशमुख यांनी जे छोटे भाषण केले, त्यामध्ये या पुरस्कारासाठी ज्या कसोट्या मानण्यात आल्या आहेत, त्यांचा उल्लेख आहे, त्या अशा आहेत-
१)    जे साहित्य मानवी स्वातंत्र्य, समता, न्याय यासारख्या चिरकालीन मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणेने उद्युक्त झाले आहे.
२)    ज्या साहित्यातून मानवी जीवनाचे समर्थ जीवनदर्शन घडते.
३)    ज्या साहित्यातून सार्वकालीन व सार्वत्रिक मानवी मूल्यांचा आविष्कार आढळतो.
हे सारे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्यापक वैचारिक भूमिकेशी किती जवळचे आहे.

आज हे सारे लिहिण्याचे कारण असे की, श्री. सुनील देशमुख यांना त्यांच्या काही मित्रांनी असे सुचविले की, तुम्ही साहित्य पुरस्कार देताच; परंतु महाराष्ट्रात सामाजिक कार्यासाठी तळमळीने झटणाऱ्या काही संस्था आहेत, चळवळी आहेत, त्यांनाही आपण मदत करावी. देशमुखांनी मोठ्या मनाने ते मान्य केले व ५० हजार रुपयांची व्यक्तिगत देणगी समितीला पाठवली. त्यासोबत आलेल्या पत्रात ते लिहितात, आपले कार्य समाजप्रबोधनाचे आहे व २१ व्या शतकाच्या दाराशी पोचताना अजून गणपती दूध पित आहे. अशावेळी आपल्या कार्याचे सामाजिक महत्त्व अनमोल आहे. याला हातभार लावता यावा, हीच माझी इच्छा आहे. अशी मनापासून मनमोकळी कौतुकाची थाप पाठीवर पडली की, कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत होतोच व बिरादरी सातासमुद्रापलिकडे विस्तारित आहे याचीही सुखद भावना होते. ही बिरादरी प्रखरपणे कशी सहविचाराची असते, यासाठी त्यांच्याच वरील भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा मुद्दामहून लिहितो.

अगदी अमेरिकेसारख्या यांत्रिकदृष्ट्या प्रगत देशात धर्मांधता आणि निरनिराळ्या जमातीतला विसंवाद वाढत आहे. म्हणजे एका बाजूला अलोट यांत्रिक प्रगती, तर दुसऱ्या बाजूने अंधश्रद्धा, धर्मांधता, जातीयता आणि इतर संकुचित विचाराची लाट. या एकाच काळी, स्थळी आढळणाऱ्या विसंगत गोष्टींचे आकलन कसे करायचे? अशीच वरकरणी विसंगत गोष्ट वैयक्तिक पातळीवरही आढळते. अगदी सुशिक्षित माणसंसुद्धा दैनंदिन जीवनाच्या धकाधकीतून येणाऱ्या वैफल्यानं बुवाबाजी, भ्रष्टाचार, धर्मांधता यांच्या आहारी जातात आणि त्यांच्या कलानं किंवा कालबाह्य मुहुर्तावर दैनंदिन जीवनातले निर्णय घेतात. याचं तरी कारण काय?’

आणखी एक अनाकलनीय गोष्ट म्हणजे जगातल्या कुठल्याही राष्ट्रांच्या किंवा मानवसमूहाच्या बुद्धिमत्तेत काहीही फरक नसतो, हे वारंवार आणि शास्त्रीय पद्धतीनं सिद्ध झालं असतानाही निरनिराळ्या राष्ट्रांच्या भौतिक प्रगतीत जमीन- अस्मानचा फरक का आढळतो?’

या सर्व गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी प्रगत आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाची आज आवश्यकता आहे. ज्या-ज्या समाजात किंवा राष्ट्रात सामाजिक प्रगतशील आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रूजला, जोपासला गेला आणि आचरला जातो, त्या-त्या लोकांचं भौतिक जीवन समृद्ध झालंच; पण सांस्कृतिकदृष्ट्याही ते सरस समजलं गेलं. त्यांच्या प्रगतीत आणि अन्य समाजाच्या अवस्थेत प्रगत आणि विज्ञाननिष्ठ म्हणजे पुरोगामी दृष्टिकोनाचं आचरण किंवा अभाव हाच मूलभूत फरक राहिलेला आहे.

नास्तिकवाद्यांच्या जागतिक परिषदेत गौरव
सध्या जगभर, म्हणजे महाराष्ट्रात आणि भारतातसुद्धा, धर्मांध मूलतत्त्ववाद्यांचा जोर वाढत आहे. दैनंदिन जीवनाच्या धकाधकीतून वैफल्य येऊन हा समाज अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, बुवाबाजी आणि जातीयता यांच्या आहारी जाणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. यात भरडल्या जाणार आहेत त्या जगभरच्या स्त्रिया आणि समाजातले दुर्बल घटक. समितीच्या विचारविश्वाशी अशी स्पष्टपणे सुसंगत असलेल्या मान्यवर व्यक्ती जगभर असाव्यात आणि त्यांनी सहकार्याचा हातही आपणास पुढे करावा, ही बाब नक्कीच उमेद वाढवणारी आहे

हीच बाब आहे लंडनमध्ये गेली ४० वर्षे वास्तव्य करणाऱ्या श्री. गोविंद देवधेकर यांची. ते मूळचे मुंबईचे. दरवर्षी ते भारतात मुंबईला एक महिना येतात. आपल्या वार्तापत्राचे सर्व अंक आवर्जून वाचतात. तसेच त्या दरम्यान वृत्तपत्रातून काही ना काही चळवळीबद्दल येतच असते. त्यांना या चळवळीबद्दल खूप आस्था व प्रेम वाटते. ते स्वत: विवेकवादी व नास्तिक आहेत. परंतु देव व धर्म याबद्दल तटस्थ असल्याची आपली भूमिका त्यांना भारताच्या संदर्भात व प्रत्यक्ष कार्याच्या दृष्टीने योग्य वाटते. समितीच्या कार्याला ते सतत मदत करत असतात. यावर्षी त्यांनी गैरसमजांच्या प्रदेशात हे आपले पुस्तक बघितले. त्यांना ते आवडले. त्याच्या दोन हजार प्रतींसाठी त्यांनी २० हजार रुपये त्यांच्या ट्रस्टमार्फत देऊ केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याबद्दल त्यांनी परदेशातही तेथील मासिक, साप्ताहिकातून काही लिखाण केले आहे.

न्या. आर. ए. जहागीरदार हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत. त्यांनी स्वत:च्या उत्पन्नातून रॅशनॅलिस्ट फौंडेशन स्थापन केले. त्यामार्फत चळवळींना मदत करण्याची त्यांची इच्छा. प्रथा ही न्यारी हे उत्तम कांबळे लिखित पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. पुस्तकाची निर्मिती आपण दर्जेदार करू शकलो आणि तरीही किंमत खूपच कमी राखू शकलो, याचे कारण त्यांच्या ट्रस्टने आपल्याला या पुस्तक प्रकाशनासाठी २० हजार रुपयांची देणगी दिली. त्याही पलिकडे जाऊन चळवळीच्या कार्याशी ते सतत जिव्हाळ्याने संबंधित असतात. संधी असेल तेथे चळवळीच्या कार्याबद्दल गौरवाने बोलत असतात.

विजूभाई देसाई हे पुण्याचे यशस्वी व्यावसायिक, कट्टर बुद्धिप्रामाण्यवादी. हैदराबाद येथे अलिकडेच श्री. गोरा यांनी नास्तिकवाद्यांची जागतिक परिषद भरवली. त्यासाठी ते गेले होते. तेथे ते १० मिनिटे बोलले आणि ते सर्व भाषण त्यांनी केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याची माहिती देणारे. ही सर्व माणसे आपल्या बिरादरीतील ज्येष्ठ मंडळी, मनापासून अंतरीच्या उमाळ्याने चळवळीला सहकार्य करणारी, सांभाळणारी, वाढवणारी. शेवटी बिरादरी याचसाठी असते ना?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(डिसेंबर १९९५)

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी



मानसिक गुलामगिरीविरोधातील सहकारी
दाभोलकर, व्यापक परिवर्तन, अभियान, संघटन, पुस्तक विक्री, जनसंवाद
कोल्हापूरला डॉ. श्रीराम लागूंच्या सोबत कार्यक्रमाला गेलो होतो. रात्री कॉ. गोविंद पानसरे यांच्याबरोबर गप्पा झाल्या. पानसरे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे सरचिटणीस आहेत. कम्युनिस्ट संघटनेत हे पद त्या-त्या पातळीवरील सर्वोच्च असते. पानसरे हे चळवळीचे ज्येष्ठ मित्र आहेत. बोलताना त्यांनी आपले मन मोकळे केले. ते म्हणाले, ‘खरे सांगू, तुमची ही चळवळ मी गेली काही वर्षे पाहत आहे, ऐकत आहे; पण त्याकडे माझे फारसे लक्ष नव्हते. यावे असेही वाटले नाही; पण गेल्या दोन वर्षांत मला लक्षात आले की, चळवळ अंधश्रद्धेविरुद्ध चालवीत असला तरी तुम्ही भाषा बोलत आहात व्यापक परिवर्तनाच्या चळवळीची आणि ती मनापासूनची आहे; म्हणून मला तुमच्या कार्यात आस्था आली. समितीच्या कामाला व्यापक समाजबदलाच्या कामाचा भाग बनवण्याच्या आपल्या प्रयत्नाची ही उचित नोंद आपल्याला समाधान देणारी वाटावयास हवी.

याच विचाराचा एक भाग म्हणून आपण लढा नव्या स्वातंत्र्याचा, बेड्या तोडू गुलामीच्या हे अभियान घेत आहोत. त्यामागचा विचार व त्याबाबतचा व्यवहार हा दोन्ही चळवळीची बिरादरी वाढवण्यास उपयुक्त आहे. नगर जिल्ह्यात ता. २४ ते २८ हे अभियान प्रथम चालेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबरच, स्वातंत्र्य सैनिकांची संघटना, कामगार संघटना, युवावर्ग त्यामध्ये सहभागी होत आहे. ज्यासाठी स्वातंत्र्य मिळाले, त्यापेक्षा काही विपरीतच देशात घडत आहे. व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, फुटीरता, धर्मांधता जनजीवनात वाढते आहे, याची खंत स्वातंत्र्य सैनिकांना आहे. नवे आर्थिक धोरण हे बरोबर की चूक, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्यामुळे लोकांच्या समोर प्रसारमाध्यमातून सादर होणारे बेबंद चंगळवादी जीवन हे निश्चितच घातक आहे. सरळपणे अर्थार्जन करून ते जीवन लाभणे केवळ अशक्य; मग भ्रष्टाचार वा दैववाद याचा आश्रय माणसे घेऊ लागली आहेत. अंधश्रद्धा वाढवण्याचा उद्योग राजकारणी लोक, शासन, प्रसारमाध्यमे करीत आहेत. गुलामगिरीची ही विविध रूपे आहेत. स्वातंत्र्यसैनिक राजकीय गुलामगिरीविरुद्ध लढले, कामगार लढू इच्छितो मानसिक गुलामगिरी संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची धडपड आहे. या साऱ्यांनी आपली बिरादरी एकच आहे, हे ओळखून खांद्याला खांदा भिडवण्यास नको काय? ‘लढा नवा स्वातंत्र्याचा ही या दृष्टीने चांगली सुरुवात आहे. आपण आपापल्या ठिकाणी प्रत्यक्ष कामातून ही बिरादरी बळकट करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.

संघटनेच्या आघाडीवर या महिन्यात...
चळवळ सशक्त, मजबूत करावयाची तर संघटनाही तशीच हवी. संघटना तशी निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हवा. क्रियाशील कार्यकर्त्यांचा, सामान्य सभासदांचा, वार्तापत्र वर्गणीदारांचा आणि वार्तापत्राचे केवळ वाचक असणाऱ्या हितचिंतकांचा देखील. हा सहभाग कसा असावा, याचे एक वेळापत्रकच आपण तयार केले आहे.

हा अंक तुम्हाला पोचेल, त्यावेळी आपला पुस्तक विक्री पंधरवडा सुरू झाला असेल. १ ते १५ ऑक्टोबर हा त्याचा कालखंड. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महाराष्ट्रात स्वतंत्र चळवळ म्हणून अलिकडेच सुरू झाले. दलित चळवळ जशी दलित साहित्य घेऊन आली, तसे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू झाल्यावर या विषयाची पुस्तके मोठ्या प्रमाणात बाजारात आली. आपल्या समितीने देखील गेल्या तीन वर्षांत मिळून दहा पुस्तके-पुस्तिका प्रकाशित केल्या.
     
पण लक्षात घ्या, आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत. प्रकाशक पुस्तकांच्या प्रती काढतात. एक हजार वा दोन हजार आणि त्या खपतात दोन-तीन वर्षांत, आपल्याला हे परवडणारे नाही आणि महाराष्ट्रव्यापी संघटनेला शोभणारेही नाही.
     
आपली पुस्तके मोठ्या प्रमाणात विकली गेलीच पाहिजेत. त्याची अनेक कारणे आहेत. एक तर आपण काही सर्वदूर पोचू शकत नाही. पण पुस्तके अनेकांच्या हातातून जातात. ठिकठिकाणी लोकांच्या मनात विचाराचे बीज टाकत जातात. चळवळीला हे खूप उपकारक ठरते. पुस्तके विकताना अनेकांशी संवाद होतो. चळवळीबद्दलचे जनमानस अधिक चांगल्या प्रकारे समजते. कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना एक कृती कार्यक्रम मिळतो. आपल्या पुस्तकांच्या किमती फारच माफक आहेत आणि ती विकत घ्या, असे सांगायला आपण तोंड उघडले तर लोकांचा हात विषयाच्या उत्सुकतेने, चळवळीच्या प्रेमापोटी, कमी किमतीमुळे-कारण कोणतेही असो; त्याच्या खिशात जातोच, असा अनुभव आहे.

तेव्हा १५ ऑक्टोबरपर्यंत; पण उशिरात उशिरा ऑक्टोबरअखेर क्रियाशील सचिव यांच्याकडून रोखीनेच घ्यावयाची. स्वत:चे शंभर रुपये घालायचे ते शाखा पातळीवर एकत्र करून वा स्वतंत्रपणे मारुतराव पांगे, ४०, शिवनेरी हौसिंग सोसायटी, अजिंक्यतारा रोड, गोडोली, सातारा. ४१५ ००१ या पत्त्यावर पाठवावयाचे. संघटनेच्या पोस्टेज खर्चाने, सवलतीच्या दरात पुस्तके आपल्याकडे येतील. पुस्तके विकायला बाहेर पडायचे. ती विकली जातातच, असा अनुभव आहे; परंतु समजा नाहीच विकली गेली तर पुस्तके परत पाठवा. संघटना आपले पैसे परत पाठवेल. पण ही पाळी येणारच नाही. मित्रांच्यात, शाळेत, ऑफिसात पुस्तके सहज विकली जातील. भाषणानंतर लोक हौसेने घेतील आणि वाढदिवस, लग्न अशा वेळी भेट म्हणून पुस्तकेच देण्यास विसरू नका.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९५)

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

आपली बिरादरी



आपली बिरादरी
दाभोलकर, हुसेन जमादार, दि. य. देशपांडे, आजचा सुधारक, मे. पुं. रेगे, डॉ. आ. ह. साळुंखे
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आपण चालवतो, हे खरेच. पण त्याबरोबरच आपल्या समितीचा हा सततचा आग्रह राहिला आहे की, समाजपरिवर्तनाच्या एका व्यापक चळवळीचे आपण भागीदार आहोत. आपले दैनंदिन काम आणि त्यांचे काम हे वरवर दिसायला भले वेगळे असो; परंतु माणसाला स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय आणि विवेकशील दृष्टी देऊन एक नवा माणूस, एक नवा समाज घडवण्याचेच हे वेगवेगळे प्रयत्न आहेत आणि म्हणूनच या स्वरुपाच्या काम करणाऱ्या संघटना या आपली बिरादारी आहे, भावकी आहे, ही समज अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी बाळगली की, आपली हिंमत वाढते आणि जबाबदारीही.

अडचण अशी आहे की, आपल्याला या आपल्या बिरादरीचे भानच नसते; मग संपर्क, सहभाग या तर पुढच्या पायऱ्या झाल्या. संघटनात्मक राज्यव्यापी दौरा मे व जूनमध्ये झाला. जिल्हा मेळाव्यात मी बहुतेक ठिकाणी हा प्रश्न विचारत असे की, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेने मराठी साहित्य विश्वात अगदी अलिकडे दिलेला पुरस्कार कोणता? आणि तो ज्यांना मिळाला त्या चळवळीच्या मित्रांचा कर्तृत्वाचा आलेख कोणता? जवळपास सर्वत्र उत्तराऐवजी मौन पाळले जाई वा क्वचित प्रसंगी अपुरे उत्तर येई.

महाराष्ट्र फौंडेशन या अमेरिकन संस्थेने (जी अमेरिकेत गेलेल्या महाराष्ट्रीयन माणसांनी स्थापन केली आहे.) यावर्षी साहित्य क्षेत्रासाठी घसघशीत पुरस्कार सुरू केले. ललित साहित्य व वैचारिक साहित्य यामध्ये दीर्घकाळ प्रभावी योगदान देणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील एका मान्यवरांना प्रत्येकी दोन लाख रुपये, गेल्या तीन वर्षांतील उत्तम साहित्यकृतीबद्दल प्रत्येकी २५ हजार रुपयांचे चार पुरस्कार आणि दर्जेदार वैशिष्ट्यपूर्ण वैचारिक कामगिरी बजावणाऱ्या नियतकालिकांना प्रत्येकी ५० हजारांचे तीन पुरस्कार असे या बक्षिसांचे स्वरूप होते.

दीर्घकालीन वैचारिक लेखनकार्याबद्दलचा पुरस्कार श्री. मे. पुं. रेगे यांना मिळाला. रेगे यांचा तत्त्वज्ञान विषयावरील अधिकार सर्वमान्य आहे; परंतु अशा विषयाची सोबत करताना आपल्या समितीच्या कार्याला वैचारिक सोबत करण्यात त्यांनी सतत हक्काची मदत देऊ केली आहे. आपल्या अनेक शिबिरांत त्यांची व्याख्याने झाली आहेत. विवेकवादासारख्या विषयावर तर त्यांनी दोन दिवसांचे स्वतंत्र शिबीर आपल्या कार्यकर्त्यांच्यासाठी घेतले आहे. या सर्व ज्ञानदानासाठी मानधन सोडाच; पण प्रवासखर्चाचे पैसेही त्यांनी घेतले नाहीत. चळवळीला मदत करणाऱ्या प्राज्ञपाठ शाळा, अरुण लिमये ट्रस्ट अशा अनेक संस्थांच्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वाययाची अलिकडे जी निर्मिती झाली, त्यातील पहिले पुस्तक म्हणजे जवळपास १३ वर्षांपूर्वीचे अनिल अवचट यांचे संभ्रम. त्याला रेगे सरांची अतिशय चांगली प्रस्तावना आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अस्तिक शिरोमणी चार्वाक या पुस्तकाला एक पुरस्कार मिळाला आहे. धर्म की धर्मापलिकडे, धर्मातील स्त्रियांचे स्थान, महाभारतातील स्त्रिया, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती ही त्यांची आणखी काही पुस्तके. भारतीय प्राचीन संस्कृती तपासावयाची. धर्माची चिकित्सा करायची. त्याचा वेगळा अन्वयार्थ शोधावयाचा, त्यामागचे शोषण उघडे करावयाचे, हेतुत: डावलले गेलेले सत्य समोर मांडावयाचे, हे काम डॉ. साळुंखे यांनी मोठ्या धैर्याने केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच बुद्धिप्रामाण्यवादाच्या, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या, इहवादाच्या विचाराला या देशात काही हजार वर्षांची भक्कम परंपरा चार्वाकाच्या रूपाने आहे, हे सत्य ताकदीने पुढे आले. या वैचारिक योगदानाबरोबर डॉ. साळुंखे यांनी प्रत्यक्षातला सहभागही सतत दिला आहे. मग तो शिबिरातील असो, व्याख्यानमालेतील असो किंवा एखाद्या उपक्रमातील.

हुसेन जमादार कोल्हापूरचे शे-दीडशे वर्षांची सत्यशोधकी विचारांची परंपरा असलेल्या हिंदू समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे, धर्मचिकित्सेचे काम मुस्लिम धर्माच्या तुलनेने तसे सोपेच. इस्लाममध्ये सत्यशोधनाला परवानगी नाहीच. अशा समाजाच्या मानसिकतेत हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक चळवळ सुरू केली. त्यांच्या अकाली निधनानंतर ही चळवळ ज्यांनी आपल्या खांद्यावर पेलण्याचा प्रयत्न केला, त्या शिलेदारांपैकी हुसेन जमादार एक. जिहाद हे त्यांचे आत्मचरित्र. सामान्य, गरीब मुस्लिम कुटुंबाचे हलाखीचे जिणे पुस्तकाच्या पहिल्या भागात आपल्याला दिसते; तर त्यानंतर इस्लाम धर्मातील अनिष्ट प्रथा-परंपरांच्या विरोधी लढणारे जमादार आपल्याला भेटतात. हे काम खूप अवघड आहे आणि धोकादायक देखील. ते करत असतानाच झुणका-भाकर केंद्र, मुस्लिम महिला वसतिगृह, मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण अशी अनेक कामेही जमादार करत आहेत. आपल्या चळवळीचे ते पहिल्यापासून मित्र आहेत. मे महिन्यात कोल्हापूरला झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास ते आवर्जून उपस्थित होते.

आजचा सुधारक हे मासिक गेले काही वर्षे अतिशय नियमित आणि दर्जेदारपणे नागपूरहून प्रा. दि. य. देशपांडे चालवतात. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला ज्या सखोल विचारमंथनाची गरज आहे, ती भूक आजचा सुधारकमुळे भागवली जाते. गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांचा वारसा समर्थपणे सांभाळण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या समितीतर्फे जो सुधारककार आगरकर पुरस्कार दिला जातो, त्या पहिल्या पुरस्काराचे दि. य. देशपांडे मानकरी होते.

आपल्या चळवळीशी जोडली गेलेली ही आपली कुटुंबीय मंडळी एकमेकांच्या साथीनेच आपण आज चालत असलेली बिकट वाट वहिवाट बनू शकेल. त्यासाठीच या भावकीचं भान हवं; अगत्यही हवं....!
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर १९९५)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...