बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

सातारा येथील बैठकीचा वृत्तांत



सातारा येथील बैठकीचा वृत्तांत

दाभोलकर, वृत्तांत

       

       
ता. १५ व १६ मे रोजी सातारा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची दोन दिवसांची बैठक झाली. त्यामध्ये संघटनेसमोरील सर्व बाबींवर सखोल विचारविनिमय झाला. अनेकांनी अतिशय चांगल्या व उपयुक्त सूचना केल्या; तसेच प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने काही निर्णयही घेण्यात आले.
           
घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पुढे थोडक्यात दिली आहे. (चर्चेमध्ये विचारविनिमयासाठी जे मुद्दे पुढे आले, त्याचे टिपण स्वतंत्रपणे प्रसिद्ध करावे, अशी कल्पना आहे. त्यामुळे संघटनांतर्गत कोणत्या स्वरुपाचे विचारमंथन चालू आहे, याची कल्पना सर्वांना येईल. तसेच या अनुबंधाने आपापली मतंही इतरांना व्यक्त करता येतील व त्याचा फायदा संघटनेला होईल.)

अ) संघटनात्मक कार्यक्रमाबाबत घेण्यात आलेले निर्णय.
१) यावर्षी संघटनेची बांधणी चांगल्या प्रकारे करण्यासाठी अधिक परिश्रमपूर्वक काम करण्याचे ठरले. यासाठी प्रथमत: ज्या शाखा कार्यरत राहू इच्छितात त्यांनी संघटनेबाबतच्या किमान उद्दिष्टांची पूर्तता काटेकोरपणे केली आहे का, याची पाहणी करण्याची जबाबदारी जिल्हानिहाय  सोपवण्यात आली. या निकषात २५ सर्वसाधारण सभासद, ११ जणांची कार्यकारिणी, नियमित साप्ताहिक वा पाक्षिक बैठक, वार्तापत्राचे वर्गणीदार व केंद्राची किमान १० पुस्तकांची लायब्ररी संलग्न फी रू. ५०/- भरणे या निकषांचा समावेश आहे. जुलैअखेरपर्यंत याप्रमाणे खऱ्या अर्थाने कार्यरत असलेल्या शाखांची संख्या नक्की करण्यात येईल व त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल.
२) मराठवाडा विभागात समितीचे कार्य वाढवण्याचे अधिकाधिक प्रयत्न केले जातील.
३) साधारणत: प्रत्येक तीन महिन्यांनी कार्यकारिणीची बैठक घेतली जाईल. त्यासाठी ज्यांना आवश्यक असेल त्यांना प्रवासखर्च देण्यात येईल.
४) संघटनात्मक बाबी पूर्ण झाल्यावर सध्याच्या कार्यकारिणीस दोन वर्षे पूर्ण झाली असल्याने लोकशाही पद्धतीने नवी कार्यकारिणी निवडण्यात येईल.

ब) सत्यशोध प्रज्ञा परीक्षा
१) यावर्षी समितीचे कार्य असलेल्या सर्व जिल्ह्यांत सत्यशोध प्रज्ञा परीक्षेची केंद्रे निर्माण होतील, असा प्रयत्न केला जाईल. किमान १० जिल्ह्यांत तरी ही केंद्रे चालू होऊन १० हजार विद्यार्थी परीक्षेला असावेत, असे उद्दिष्ट आहे.
२) या परीक्षेची केंद्रे चालविण्यासाठी जिल्हा पातळीवर शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील. ही शिबिरे सप्टेंबरअखेरपूर्वी पूर्ण होतील. परीक्षा जानेवारीत घेतली जाईल.
३) आपापल्या शाखेच्या नियमित स्वरुपी उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रत्येक शाखेने आपल्या कार्यकर्त्यांमार्फत परीक्षेचे एक केंद्र आपल्या ठिकाणी चालवावे, अशी अपेक्षा आहे. ४) परीक्षेसाठी सध्या तयार करण्यात आलेल्या पुस्तकात काही त्रुटी आहेत. यासाठी पुस्तकाचे पुनर्लेखन करण्याबाबत अलका जोशी, विवेक काशीकर, पां. न. निपाणीकर, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. महाजन, मधुकर महाजन यांची एक समिती नेमण्यात आली. या समितीने पुनर्लिखित पुस्तक ऑगस्टअखेरपर्यंत तयार करून द्यावे व सप्टेंबरअखेरपर्यंत ते छापून तयार करावे, असा निर्णय घेण्यात आला.

क) पुस्तिका वितरण
१) समितीच्या सर्व पुस्तिका वितरणाचे मध्यवर्ती केंद्र श्री. एम. एस. पांगे, सातारा यांचे राहील.
२) प्रत्येक जिल्ह्याचे एका व्यक्तीकडे जिल्हा पातळीवरील वितरण       केंद्र राहील व त्याच्याकडे समितीच्या सर्व पुस्तिका उपलब्ध राहतील.
३) पुस्तकविक्रीचे सर्व व्यवहार शक्यतो रोखीने करावेत.
४) प्रत्येक केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या प्रयत्नाने प्रत्येक पुस्तिकेच्या १० प्रती खपवण्याचा प्रयत्न करावा.
५) समितीने स्वत:चे भरपूर भांडवल घालून पुस्तिका काढल्या आहेत. त्याप्रमाणात त्यांची विक्री करण्यात संघटना कमी पडण्याची शक्यता चर्चेत जाणवली.

ड) मुखपत्र
१) समितीचे मासिक वार्तापत्र पनवेल येथून दरमहा प्रकाशित केले जाईल व उल्हास ठाकूर वितरणाची जबाबदारी पार पाडतील.
२) सर्वांच्या विचारविनिमयातून संपादक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली, ती पुढीलप्रमाणे.
संपादक - डॉ. प्रदीप पाटकर,
संपादक मंडळ - शुभांगी शहा, विवेक काशीकर व डॉ. प्रदीप पाटील.
अंकाची सजावट, मांडणी यासाठी श्री. मिलिंद जोशी यांनी आवश्यक ती मदत करावी.
३) अंकाचा एकूण खर्च हा वर्गणी व जाहिराती यातून उभारला जावा. त्यासाठी बाहेरून निधी घेण्याची गरज शक्यतो येऊ नये.

इ) संमोहन
१) संमोहनाबाबतची समितीची भूमिका लेखी छापील स्वरुपात तयार करावी.
२) संमोहनाबाबत त्या भूमिकेच्या आधारे जिल्हा पातळीवर व्याख्याने वा शिबिरे घ्यावीत. ३) या शिबिरातून जिल्हा पातळीवर काही कार्यकर्ते या कामासाठी प्राथमिक स्वरुपात तयार होतील, असे पाहावे.
) शोध भुताचा, बोध मनाचा मोहीम
१) मन, मनाचे आजार, मनाचे आरोग्य, त्याबाबतच्या अंधश्रद्धा व त्यासाठीचे प्राथमिक उपाय यादृष्टीने मानसिक आधार केंद्रे प्रामुख्याने कोकणात व शक्य झाल्यास इतर जिल्ह्यात स्थापन करावीत.
२) शोध भुताचा, बोध मनाचा ही प्रचारमोहीम शक्य असेल त्या स्वरुपात जिल्हा पातळीवर राबवावी.

उ) जिल्हा शिबिरे
१) जिल्हा पातळीवर घेण्यात येणाऱ्या शिबिरांसाठी वक्ते शक्यतो जिल्ह्यातीलच असावेत.
२) शिबिरे तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसाची या स्वरुपाची घ्यावीत. प्रत्येक शिबिरात एक-दोन विषय घ्यावेत. त्यामुळे खर्च फारसा येणार नाही.
३) वक्ता तयारीसाठी सप्टेंबर महिन्यात वक्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात यावे. ते पुण्यात होईल.

ऊ) निधी उभारणी
१) निधी उभारणीबाबत काही शाखांनी; तसेच काही कार्यकर्त्यांनी आपणाकडून देण्यात येणाऱ्या रकमा जाहीर केल्या. उशिरात उशिरा डिसेंबरअखेरपर्यंत ही रक्कम डॉ. विद्याधर बोरकर यांच्याकडे पाठवावयाची आहे.
२) हितचिंतकांना विनंती करून छोट्या देणग्या घेऊन निधी उभारणी सातत्याने चालू ठेवावी, जाहीर कार्यक्रमानंतर दोन रुपयांची देणगी मदत कूपन्स विकावीत, शासकीय योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागात कार्यक्रम सादर करून निधी उभारावा, अशा विविध शक्यतांचा विचार व निश्चिती करण्यात आली.

ए) धर्मचिकित्सा
१) रूढी, कर्मकांडे, परंपरा, नवस-सायास यातील ज्या बाबी अंधश्रद्धेला, शोषणाला उघडपणे खतपाणी घालणाऱ्या असतील, त्यांच्याविरोधात शक्यतेनुसार संघर्ष करावा.
२) शक्यतेनुसार विधायक पर्याय उभा करावा.
३) धर्मचिकित्सा हा सर्व चिकित्सांचा पाया असल्याने त्याबाबत कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत पातळीवर व समितीने संघटनात्मक पातळीवर वाचन, विचारविनिमय चालू ठेवावा.

ऐ) बुवाबाजीविरोधी लढा
१) समितीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षांत बुवाबाजीविरोधात लढवलेल्या चळवळीच्या आधारे या विषयाचे स्वरूप, सामर्थ्य व मर्यादा याबाबत सखोल चर्चा झाली. त्यामध्ये विचार करावयास लावणारे अनेक मुद्दे पुढे आले. या विषयाचे चळवळीतील महत्त्व लक्षात घेता या विषयावर समितीच्या मुखपत्रातून विस्तृत चर्चा घडवून आणावी, असे ठरले.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (जुलै १९९३)

1 टिप्पणी:

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...