व्रतवैकल्यांचे
पालन व पर्यावरणरक्षण
दाभोलकर, धर्मचिकित्सा, पर्यावरण, रूढी-परंपरा
धर्म समाजाची धारणा करतो, असे मानले जाते. त्याचप्रमाणे धर्म समाजजीवनास
अवरूद्धताही आणतो, हे
वास्तव आहे. धर्माच्या समर्थनाने हिंदू स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती. अस्पृश्यांना
अमानुष वागणूक देण्यात येत होती. स्वातंत्र्य चळवळीतील जागृती, समाजसुधारकांचे प्रयत्न, गतिमान झालेले जग, संविधानाचे अधिष्ठान या सर्वांमधून परिस्थिती
बदलली. वरील बाबींना स्पष्ट नकार देण्यात आला. त्या जनमानसातून गेलेल्या नाहीत;
पण धर्माच्या नावाने त्यांचे समर्थन आज कोणीही
करत नाही. एकतर या बाबी खऱ्या हिंदू धर्माचा भाग नाहीत, रूढी होत्या, अशी पळवाट काढतात किंवा चूक होती ती सुधारली,
हे मान्य करतात.
स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन याला समाजहिताचे सर्वव्यापी
संदर्भ होते, तसेच
आज पर्यावरणरक्षणाला आले आहेत.
तुटणारी वृक्षसंपदा, आटणारे
जलस्रोत, प्रदूषित पाणी या गोष्टी
आता सर्वमान्य झाल्या आहेत. आश्चर्य म्हणजे धर्माची व्रते, वैकल्ये, सण, रूढी, परंपरा यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात
पर्यावरणाशी पूर्णपणे विसंगत वर्तन चालले आहे. या बाबींना मान्यता, प्रतिष्ठा, प्रसिद्धी लाभत आहे. त्या विरोधात बोलले,
तर हिंदू धर्मरक्षक जणू काही धर्मावरच टीका
केली, असे आकांडतांडव करून आक्रमक
पवित्रा घेत आहेत. सगळ्यात चिंताजनक म्हणजे ज्या शिक्षणक्षेत्रात पर्यावरणाचे आणि विधायक
धर्मचिकित्सेचे संस्कार व्हावयाचे, तेथेही
उलटी वाटचाल सुरू आहे. वटसावित्रीपासून सुरू होणारी व्रते आणि सण यांचा माहोल दिवाळीपर्यंत
चढत्या भाजणीत असतो. त्याकडे नजर टाकली तरी काय दिसते?
वटसावित्रीच्या व्रतातील अवैज्ञानिकता व कमालीची पुरुषप्रधानता
बाजूला ठेवू. वडाच्या झाडाला पवित्र मानल्यामुळे त्याची तोड या व्रतामुळे कधी काळी
थांबली असेलही; पण
आज उलटे चित्र दिसते. महानगरात सोडा; शहरांतही वटपौर्णिमेच्या दिवशी गाड्या भरभरून वडाच्या फांद्या विक्रीसाठी
आणल्या जातात. या सोयीमुळे व्रत झपाट्याने पसरले; पण मूळची श्रद्धा शब्दश: वडाच्या झाडाच्या
मुळावर उठली. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी वैभव महालक्ष्मीचे व्रत करण्यासाठी
फळझाडांच्या फांद्या तोडल्या जातात. पूजेनंतर त्या पाण्यात फेकल्या जातात. गेल्या दशकात
ज्या गतीने हे व्रत सर्वदूर पसरले, ती
गती अचंबित करणारी आणि पर्यावरणाला उद्ध्वस्त करणारी आहे. याच पद्धतीने दसऱ्याला आपट्यांच्या
पानांचा, होळीला पर्यावरणाला उपयुक्त
एरंडाचा संहार होतो. शंकराला आवडतो म्हणून बेल दर सोमवारी तोडला जातो. श्रावणी सोमवारी
तर विचारायलाच नको. मंगळागौरीसाठी आवळापाने, केवडा, फणस, पळस, रूई, कवठाची पाने, धोतरा, शमी, घरगा, आंब्याची पाने जमा केली जातात. शनि-मारुतीला
रूईच्या पानाचे तोरण, तीळ,
तेल, उडीद वाहिले जाते. सर्व एकत्र झाल्याने यातील
बहुतेक भाग वाया जातो. होळीत दरवर्षी काही हजार मण लाकूड व मौल्यवान खत असलेल्या
शेणी, उत्तम
खाद्यपदार्थ असलेल्या पुरणाच्या पोळीसह जाळले जाते. वड, पिंपळ, उंबर हे पवित्र वृक्ष तोडू नयेत,
या धार्मिक श्रद्धेवर
आता उपाय शोधण्यात आला आहे. हे वृक्ष; तसेच पूजा करून तोडलेली उंबराची झाडे दत्ताच्या
देवळात धुनी अखंड पेटती ठेवण्यासाठी वापरली जातात. दर अमावस्येला लाखो लिंबू-मिरची-बिब्बे
वाहनांना बांधून वाया घालवले जातात. ट्रकच्या चार चाकाखाली प्रत्येकी एक लिंबू ठेवून
असंख्य लिंबांतील, पोषणाला
उपयुक्त ‘क’
जीवनसत्त्व शब्दश: मातीत मिसळले जाते. मारुतीच्या मस्तकावर ओतून अथवा नवरात्रात नऊ दिवसरात्र अखंड दिवे
तेवत ठेवून हजारो लिटर खाद्यतेल वाया घालवले जाते. शंकराच्या पिंडीवर केलेल्या दुधाच्या अभिषेकानेही हेच
घडते. महाराष्ट्रात हिंदू धर्मियांत प्रतिवर्षी सुमारे तीन लाख लग्ने होतात. प्रत्येक
लग्नात रंगवून केलेल्या १० ते १५ किलो अक्षतांच्या रूपाने हजारो टन तांदूळ कचऱ्यात
जातो.
महाराष्ट्रात दरवर्षी किमान एक कोटी घरात श्रीगणेशाची स्थापना होते.
मूर्ती विसर्जनाद्वारे सात ते दहा हजार टन प्लॅस्टर ऑफ पॅरिस नदीत पडते आणि दगडासारखे
घट्ट बनते. त्यामुळे गाळ साचतो. जिवंत, नैसर्गिक झरे बुजतात. त्यामध्ये कन्सिल्ड जिप्सम,
फॉस्फरस, मॅग्नेशियम, सल्फर हे रासायनिक घटक असतात. हजारो टन निर्माल्यही
पाण्याच्या स्रोतातच विसर्जित होते. मूर्तीसाठी वापरलेल्या रंगात पारा, शिसे, कॅडियम या घातक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटते.
आम्लाचे वाढते, लोहाचे
प्रमाण १० टक्क्यांनी, तर
तांब्याचे २०० ते ३०० टक्क्यांनी वाढते. मासे, वनस्पतींचा मृत्यू होतो. हे पाणी प्यायल्यास
त्वचा, डोळे, पचनसंस्थेचे आजार होऊ शकतात. पारा,
शिसे ही द्रव्ये मतिमंदत्वापासून कॅन्सरपर्यंत
दुष्परिणाम घडवून आणू शकतात, हे
सर्व प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृतपणे सांगितले आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख
नद्या गंभीर प्रमाणात प्रदूषित आहेत. दणकेबाज दिवाळीसाठी प्रतिवर्षी महाराष्ट्रात जवळपास
चारशे कोटी रुपयांची शोभेची दारू व फटाके यांचा शब्दश: धूर होतो. गंभीर ध्वनी व वायुप्रदूषण,
आगीचे अपघात होतात.
या सर्व बाबींना विधायक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र अंधश्रद्धा
निर्मूलन समिती व हरित सेनेसारख्या संस्था करतात. वड, एरंड, बेल यांची रोपे त्या-त्या दिवशी वाटणे,
होळीला कालसुसंगत पर्याय देणे, मातीच्या वा कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती
करून, वनस्पती रंगांनी रंगवून
घरीच पाण्याच्या टबात विसर्जित करणे यासारखे हे उपाय अत्यंत अपुरे ठरतात. खरे तर याबाबत
आता सर्वोच्च न्यायालयाचे अतिशय स्पष्ट आदेश आहेत. त्याला अनुसरून केंद्रीय,
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे, राज्य शासनाचा पर्यावरण विभाग यांनीही नियम
केले आहेत. मात्र प्रत्यक्षातील वाटचाल उलट्या पावलांची आहे. यावर्षी जिल्हा परिषदांनी
वटसावित्रीला सुट्टी दिली. प्रत्येक श्रावणी सोमवारी शाळेला अर्धी सुट्टी असतेच;
आता ती वैभव महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्षातील
प्रत्येक गुरुवारी देणे सुरू झाले आहे. संघटनेत शिक्षिकांचा समावेश साठ टक्के आहे,
असे सांगून शिक्षक संघटना ही मागणी करतात.
गणेश विसर्जन पर्यावरणपूरक करा म्हटले की, धर्मरक्षकांना धर्माभिमान आठवतो. पर्यावरणाचा नाश करणारे वर्तन
ही देवपूजा आणि खरे धार्मिक आचरण होऊच शकत नाही, ही बाब मुलांच्या मनावर बिंबवण्याची जबाबदारी असणारे शिक्षणक्षेत्र
मूक राहते. धर्मचिकित्सा त्यांना धोकादायक वाटते. शासन कायदा-सुव्यवस्थेचा जप करत बघ्याची
भूमिका घेते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला, पर्यावरणीय समाजहिताला, धर्माच्या सामर्थ्यापुढे हतबलता येते. धर्मनिरपेक्षता
हा भारतीय संविधानाचा मूलभूत ढांचा आहे. समाजहितात बाधा आणणारा धर्म त्यासाठी नियंत्रित
करावा लागतो. पर्यावरणासारख्या अत्यंत संवेदनशील बाबतीतही त्या संदर्भात प्रभावी प्रबोधन
नाही; मग
कृतीचा आग्रह दूरच. एकविसाव्या शतकात समाजसुधारकांच्या महाराष्ट्राने धर्मचिकित्सेचा
धसका घ्यावा, याचा
अंतर्मुख होऊन विचार करावयास हवा.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन
वार्तापत्र
(ऑक्टोबर २०१०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा