बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

बुवाबाजीचे घातक चाळे (भाग 1)





बुवाबाजीचे घातक चाळे  (भाग 1)

दाभोलकर, बुवाबाजी, अंधश्रद्धा
बुवाबाजीविरुद्धची लढाई हा चळवळीतील नेहमीच आकर्षणबिंदू राहिला आहे. मात्र बुवाबाजी या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. कथित बुवा-बाबा, स्वामी-महाराज, मांत्रिक, देवऋषी, संत-महंत असे सर्वचजण स्वत:च्या अध्यात्मिक दैवी शक्तीचा छुपेपणाने व खुलेपणाने प्रसार करत लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा करत असतात. या प्रत्येकाचे मंत्र-तंत्र, गिऱ्हाईक, कार्यपद्धती वेगवेगळी असते. यापैकी ज्यांची बुवाबाजी थेट असते, ते सहजपणे लक्षात येतात. भूत उतरवणारा भगत, करणी काढणारा मांत्रिक, हातातील कुंकवाचा बुक्का करणारी अंगात देवी आलेली बाई, शरीरात नसलेली कुंडलिनी जागृत करणारी निर्मलामाता आणि स्वत:ला चमत्काराचा अवतार म्हणवून घेणारा सत्यसाईबाबा. हे सगळे आपापल्या पातळीवर बुवाबाजीच करीत असतात. परंतु चमत्कारांशी जोडलेल्या या बुवाबाजीसोबत संघर्ष करणे थोडे सोपे असते. कारण एकतर हे चमत्कार वैज्ञानिक दृष्टिकोनाशी उघडपणे विसंगत असतात. घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगितले असल्याने चमत्कारांचे अस्तित्व मान्य करणे ही कर्तव्यचुती ठरते. कोणी फार आग्रहाने दावा केलाच, तर तपासणीचे खुले आव्हानही त्याला देता येते. जी बुवाबाजी उपचारांशी जोडलेली असते, त्याबाबतीत काही कायदेही मर्यादित अर्थाने मदतीला येतात.
    असे संघर्ष करू लागलो की, एक हमखास सल्ला मिळतो, अनेक ठिकाणी भोंदूगिरी, फसवणूक, लुबाडणूक सुरू आहे. एका अर्थाने ती बुवाबाजीच आहे. तेव्हा त्याविरोधात समिती का नाही चळवळ करत? समितीचा अशा प्रकारांना निश्चितच विरोध असला, तरी या प्रकारांच्याविरुद्धचा संघर्ष हा समितीने आपल्या कार्याचा भाग कधीच बनविलेला नाही. याबाबत आणखी थोडे खोलात जाऊन विचार केला म्हणजे बुवाबाजीचे खरे स्वरूप लक्षात येईल. तो मुद्दा असा की, कोणत्याही प्रकारे उपचार करणे वा चमत्कार करणारे बाबा-बुवा कमीच असतात. असे काहीच न करता ज्यांच्याभोवती तुलनेने कमी-जास्त प्रमाणात; पण एकूण विचार करता मोठ्या प्रमाणात लोक जातात, अशा बाबा-बुवा-स्वामी, महाराज यांचे प्रमाण समाजात मोठे असते आणि त्या-त्या सर्व जणांना ते बाबा-बुवा तारणहारच वाटत असतात.  यापैकी उपचार, चमत्कार न करणारे बाबा अथवा महाराज हे सर्व परमार्थ, ईश्वरभक्ती, ईश्वरप्राप्ती, ब्रह्मज्ञान या नावानेच करत असतात. त्यांची खरी ताकद ही फसवणूक करण्याचे कसब यामध्ये नसते, तर लोकांच्या मनात कथित परमार्थाबद्दल परंपरेने आलेली जी विलक्षण मान्यता असते, ती या बाबा-बुवांनी खुबीने आपल्याशी जोडलेली असते, त्यामध्ये असते. अशा बुवाबाजीचे वर्णन अथवा व्याख्या परमार्थ मार्गातील लुच्चेगिरी असे करता येईल; किंवा जो, या व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या दु:खाची कारणे व त्यावरील उपाय विवेकवादी विचारसरणीशी विसंगत अशा दैवासारख्या भ्रामक कल्पना, अनेकविध अन्याय रूढी, कालविसंगत परंपरा यांना समर्थन देत सांगतो, प्रश्न सोडवण्याचा अवैज्ञानिक चुकीचा मार्ग दाखवतो व सर्वांगाने फसवणूक व शोषण करतो तो बुवा आणि त्याची कार्यप्रणाली म्हणजे बुवाबाजी असे म्हणता येईल. न्यायालय, निर्बंध, चळवळी इत्यादी मार्गांनी इतर क्षेत्रांतील दोष नष्ट करता येतात. परंतु प्रच्छन्न फसवणुकीच्या बाबी सोडल्या तर परमार्थ व ब्रह्मज्ञान हे असे क्षेत्र आहे, की तेथे कायदा पोचत नाही आणि बहुसंख्यांना या विषयाबाबत काहीही माहीत नसते, कळत नसते, कळून घेण्याची इच्छा नसते, माणसे प्रवाहपतित असतात व त्यातच धन्यता मानतात; त्यामुळे जवळजवळ अशक्य बनते.
    बुवाबाजीचे हे एक रूप आहे; परंतु बाबांना आपले तारणहार मानणारी भक्ताची मानसिकता समजून घेणे, हे त्यांचे आणखी एक रूप आहे; आणि ती मानसिकता नीटपणे समजावून घेतल्याशिवाय बुवाबाजीविरोधाच्या वैचारिक लढाईचा अर्थबोध होणार नाही. अर्थातच या मानसिकतेलाही अनेक महत्त्वाच्या; पण अनुषंगिक बाबी जोडलेल्या असतात व त्यातूनच माणसांच्या, भक्तांच्या मनावर प्रभाव टाकणारे अद्भुत रसायन तयार होते.
    देवाच्या मूर्ती सर्वत्र असतात; परंतु दगडूशेठ हलवाईचा गणपती अथवा सिद्धिविनायक याचे महात्म्य वेगळेच असते. बालाजीची मंदिरे नवीन नाहीत; पण तिरुपतीचे बालाजी एकमेवाद्वितीयम् आहेत. याचे केले जाणारे स्पष्टीकरण असे असते की, या स्थानात अथवा मूर्तीत काही अद्भुत सामर्थ्य आहे. खरे तर असे अद्भुत सामर्थ्य हा जादूटोण्याचा प्रकार आहे; परंतु तसे मान्य करणे अशक्यच. प्रत्यक्षात घडते ते असे की, या विशेष पवित्र मूर्तीची उपासना केली तर तिच्या अद्भुत सामर्थ्याने संकट निवारले जाईल, असे भक्त मानतो. जीवनात कोणत्याही लहान-मोठ्या अरिष्टापासून हे दैवी सामर्थ्य आपला बचाव करेल, अशी भावना बाळगली जाते. अर्थात बहुतेकवेळा हे सारे अव्यक्तपणे स्वत:शीच ठेवले जाते. जाहीरपणे वेगळेच सांगितले जाते. तेही महत्त्वाचे असते. ते असे की, या विशिष्ट मूर्तींची भक्तीही आम्ही करतो. यामध्ये आणखी काहीच साधावयाचे नाही; फक्त भक्तीच साधावयाची आहेही भक्ती कशासाठी? याचे उत्तर तत्परतेने असे मिळते की, या भक्तीत जीवनाचे सार्थक आहे.हे सार्थक कशामुळे होते? याचे उत्तर येते की, या भक्तीतून जीवनाचे अध्यात्मिक कल्याण घडते. अध्यात्मिक कल्याण होते म्हणजे काय होते, याचा पुरावा द्या. हा प्रश्न अप्रस्तुत असतो. कारण तसा पुरावा मागू नये अशीच धारणा असते. उलट प्रश्न विचारला जातो, पुरावा कशाला मागता? त्यांचा अधिकारच आहे तसा पुढे अशीही मल्लिनाथी केली जाते की, आईवडिलांना, गुरुजनांना प्रत्येक बाबतीत पुरावा मागता काय? आइनस्टाइनसारख्या थोर शास्त्रज्ञाने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला, त्याला पुरावा मागाल काय? वरील सर्व युक्तिवाद हा विशिष्ट देवाच्या विशिष्ट मूर्तीच्या अलौकिकत्वाबद्दल केला जात असला, तरी अगदी असाच युक्तिवाद आपापले बाबा, गुरू, महाराज, स्वामी यांच्या भजनी लागलेले लोक करत असतात. बाबांच्या कृपा-कटाक्षातून लाभणारी आनंदाची अनुभूती आणि होणारे पराकोटीचे अध्यात्मिक कल्याण हा त्यांच्या लेखी अनुभवण्याचा भाग असतो. त्याचा पुरावा मागण्याची आवश्यकता नसते. असा पुरावा मागणे ही काही फार चांगली गोष्ट नसते. यामुळे श्रद्धेला अकारण तडा जातो, असे त्यांचे ठाम प्रतिपादन असते.
    घटनेमध्ये नागरिकाचे कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मुख्य तत्त्व म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत जेवढा पुरावा, तेवढाच विश्वास ठेवायचा. खरे तर दैनंदिन व्यवहारातदेखील ही बाब आपण पाळत असतो; किंवा एक विवेकी नागरिक म्हणून पाळावी, अशी अपेक्षा असते. आईवर श्रद्धा असते म्हणून तिच्या सूचनेप्रमाणे ग्रहणकाळात दारे-खिडक्या बंद करून बसण्याची गरज नसते. वडिलांच्यावर श्रद्धा आहे तरीही जातीसाठी माती खाण्याच्या त्यांच्या विचाराला ठामपणे नकार देत मुलगा आंतरजातीय विवाह करू शकतो. शाळेत गुरुजी पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते असे नुसतेच शिकवत नाहीत; तर त्याचा पुरावा देतात आणि ते पुरावा कसा तपासायचा, हे पण शिकवतात. त्यांनी तसे विज्ञान शिकवावे, अशी रास्त अपेक्षा असते. एका विशिष्ट टप्प्यावर ज्येष्ठता प्राप्त असलेले गुरुजी, दुसऱ्या टप्प्यावर त्या शिष्याचे सहकारीदेखील होऊ शकतात आणि श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही न मानता विचारांचे आदान-प्रदान होऊ शकते. आइनस्टाइनचा सिद्धांत समजून घेण्यासाठी पुरेसा अभ्यास व परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणाही सुजाण व्यक्तीला तो समजून घेणे शक्य होते. न्यूटनच्या सिद्धांतातील त्रुटी आइनस्टाइन दूर करू शकतो आणि त्याच्यामागील उणिवा कोणीही दाखवल्या तर वैज्ञानिक विश्वात त्याचे स्वागतच होते. थोडक्यात, पुरावा मागणे, त्यासाठी प्रश्न विचारणे हे डोळसपणाचे मान्यताप्राप्त वर्तन आहे. ही प्रवृत्ती माणसाला पुढे नेते; त्याचा विकास व प्रगती करते. लहान मूल अनेक निर्णयांच्यावर आईवडिलांच्यावर अवलंबून असते. ते जसजसे मोठे होत जाईल, तसतसे स्वतंत्रपणे स्वत:चे निर्णय घेऊ लागते. व्यक्ती प्रौढ झाल्यावरही आई-वडिलांना विचारूनच प्रत्येक निर्णय घेऊ लागली, तर पालकांनी केलेले त्यांचे संगोपन अपुरे व अयोग्य आहे, हे आपण समजू शकतो. याच तर्काने निश्चितपणे असे म्हणता येते की, जो गुरू असतो तो शिष्याला दृष्टी देतो, त्याच्या पायावर उभे करतो, जीवनात स्वकर्तृत्वाने लढण्याची हिंमत देतो. आपल्या भक्ताच्या जीवनातील सर्व प्रश्नांची सर्वकालीन जबाबदारी घेतल्याचा दावा जो गुरू करतो, तो त्या भक्ताला कायमचा दुबळा करतो, पांगुळगाडा देतो, स्वत:वर अवलंबून राहण्यास भाग पाडतो. तो खरा गुरू नव्हेच. आपापल्या बाबाला, बुवाला, स्वामींना, महाराजांना प्रत्येक भक्त सद्गुरूंच्या स्वरुपात पाहत असतो. ज्ञान मिळविण्यासाठी गुरूंकडे जाणे, त्याच्या सहवासात राहणे, त्याला प्रश्न विचारणे हे योग्य आणि आवश्यकच आहे. पण त्यापलिकडे जाऊन उपनिषदांमध्येही गुरुसेवा व गुरुकृपा यांना महत्त्व दिलेले नसून कुशाग्रता, तीव्र जिज्ञासा, बुद्धिमत्ता आणि परिश्रम यांना दिले आहे. मात्र पुढे गुरूचा कानमंत्र घेणे, दीक्षागुरू करणे, गुरुकृपेने जीवन उद्धरून जाणे याचे महत्त्व फार वाढले. शिवाय जीवनाचे अंतिम आणि सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट हे ब्रह्मज्ञान व मोक्ष मिळविणे हेच मानले गेले. म्हणजे नेमके काय, याचा पत्ता व्यक्तीला लागणे शक्यच नव्हते; परंतु तो गुरूमार्फत लागेल, या कल्पनेने जर मोक्ष संपादन करायचा असेल तर गुरूला संपूर्ण शरण जावे, त्याची सेवा करावी, त्याला प्रसन्न करून घ्यावे, म्हणजे मनुष्य कृतार्थ होतो, अशा समजुती समाजात फार दृढ झाल्या; आजही आहेत. मराठीमध्ये गुरुकृपेचे भरपूर वर्णन गुरुचरित्र या ग्रंथात आले आहे. हे सर्व विवेचन आख्याने, गोष्टी आणि सकाम भक्ती या अंगाने बुद्धीला सोडून असल्याने खरे तर ते तर्कदृष्ट्या विचारात घेण्यासारखे नाही, परंतु या स्वरुपाच्या ग्रंथांचे परिणाम जनमानसावर आहेत, होतात व टिकून राहतात. त्यामुळेच आसारामबापूंच्यासारखे आजचे गुरूमहाराज, गुरू या कल्पनेबद्दल काय सांगतात पाहा - टाईम्स ऑफ इंडिया या नामवंत दैनिकाने छापलेल्या त्यांच्या मुलाखतीत आसारामबापूंनी हे गुरुपुराण सांगितले आहे. त्यातील थोडासा भागदेखील ही गुरुबाजी थेट बुवाबाजीला जाऊन भिडण्याची, नैसर्गिक शक्यताच कशी आहे, हे स्पष्ट करतो. ते म्हणतात, “ज्याप्रमाणे आपण चांगली शाळा, चांगला शिक्षक, चांगला डॉक्टर शोधतो, त्याप्रमाणेच प्रत्येकाने चांगला गुरूही शोधावा.” स्कंद पुराणात अशा गुरूबद्दल शिवशंकराने पार्वतीला गुरुमहिमा सांगितला आहे. गुरू हा शिष्याचा सर्व संशय मुळापासून उखडून काढतो. सर्व भीती घालवतो, जीवन - मृत्यूच्या चक्रातून त्याला वाचवतो. अशाच गुरूला सद्गुरू म्हणतात. केवळ त्याच्या दर्शनाने वासना व विकार गळून पडतात आणि अक्षय्य आनंदाचा ठेवा मिळतो. या गुरूमुळे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून व्यक्तीची सुटका होते. पूर्वजन्मीचे पुण्य असेल तर असा गुरू लाभतो. माणसांचे, आपल्या भक्तांचे दु:ख गुरू तीन प्रकारे दूर करू शकतो. १.ध्यान, २.बौद्धिक पातळीवरील सत्संग आणि ३.गुरूची इच्छाशक्ती व त्याच्याभोवतीचे दैवी वलय आणि स्पंदने याद्वारे लोकांचे आजार बरे करण्यापासून ते कोट्यवधी लोकांपर्यंत आनंदलहरी पोचवण्याचे काम गुरू करतो. अंधश्रद्धाळू बनून गुरूच्या पायावर आपली बुद्धी सर्वस्वी गहाण ठेवल्याशिवाय अशी गुरुभक्ती सुचणे अवघड आहे. परंतु ज्या वेगाने बाबा-बुवा, गुरू/सद्गुरू, स्वामी, महाराज यांचे पीक वाढते आहे, ते लक्षात घेता आसारामबापूंनी वर्णन केलेली मानसिकताच आज बुवाबाजीला शरण जाताना आपला प्रभाव गाजवते आहे. आपला समकालीन गुरू शोधणे आणि त्या सद्गुरूंना संपूर्ण भक्तिभावासहित शरण जाणे ही कबीर, नानक आणि काही मध्ययुगीन मुस्लिम संतांच्या विचारांचीही देणगी आहे. स्वत:चा आत्मा परमेश्वराशी जोडण्याचे काम गुरुभक्तीमुळे गुरूच्याद्वारे घडून येते, असे त्यांचे प्रतिपादन आहे.
    ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत, अमृतानुभवात आणि आपल्या स्फुट अभंगात गुरुभक्तीचे व गुरुकृपेचे खूप वर्णन केलेले आहे. प्रचलित असलेल्या अनेक संप्रदायांत जे गुरुभक्तीचे स्तोम आहे आणि आपापल्या बाबाला गुरूच्या रूपात पाहण्याची जी मानसिकता समाजात दिसते, त्यास ज्ञानेश्वरांनी प्रगट केलेली गुरुभक्ती कारणीभूत झालेली असल्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी एका सुंदर रूपकाने गुरुस्तुती केली आहे. दहाव्या अध्यायाच्या प्रारंभी गुरूचा अनुग्रह हाच कोणी गणेश, असे समजून त्याची स्तुती केली आहे. अध्याय बारामध्ये सद्गुरूंच्या कृपादृष्टीचे स्तवन आहे. अध्याय चौदामध्ये आचार्य नमन व प्रसाद याचना केलेली आहे. अध्याय पंधरामध्ये श्रीगुरुचरणाची मानसपूजा करून सोळाव्याच्या प्रारंभी सद्गुरू हाच कोणी चित्सूर्य असे समजून स्तुती केली आहे. अध्याय सतरा व अठरामध्येही गुरुस्तुती भरपूर आहे. मात्र ज्ञानेश्वरांचे मत असे आहे की, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करीत करीत निष्कामतेने जेव्हा साम्यबुद्धी प्रगट होते, त्यावेळी सद्गुरू आपोआप भेटतात. गुरूला शोधावा किंवा धुंडाळावा लागत नाही, तर त्यासाठी स्वत:ला अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो, मग गुरू आपोआपच भेटतो. रात्रीचे चार प्रहार संपले की, सूर्योदय जसा आपोआप होतो अथवा चंद्राला पौर्णिमेने आलिंगन दिल्यावर जशी त्यातील उणीव नष्ट होते, त्याप्रमाणे अनासक्तीने कर्मे करण्याची सवय झाली म्हणजे वृत्तीत समत्व येते आणि साम्य स्थिती पावली की, सद्गुरू आपोआप भेटतात. स्वकर्तव्य सोडून जे लोक आज हा बुवा, तर उद्या तो महाराज, परवा वेगळाच स्वामी असे करत हिंडतात, त्यांनी ज्ञानेश्वरांचे हे मत जरूर अभ्यासावे. गुरू उद्धार करतो हे खोटे आहे, गुरू म्हणजे देशिक-दिशा दाखवतो तो. दिशा दाखवणे हे काम गुरूचे; पण त्या दिशेने मार्ग आक्रमण्यासाठी परिश्रमपूर्वक स्वत:चा अधिकार वाढवावा लागतो. गुरू अथवा बाबा डोक्यावर हात ठेवतो आणि सर्वकालीन चिंतामुक्त करतो, हे सर्वार्थाने चूक तर आहेच; परंतु मानवी प्रगतीला मारक आहे आणि गुरू असलाच तर तो कसा असावा, हे एकनाथांनी सांगितले आहे. आपल्या योगक्षेमाचे संकट जो दुसऱ्यावर घालत नाही, काही न मागता घरी कोणी द्रव्य आणून दिले तरी जो त्याला शिवत नाही, इतका जो नि:स्पृह व निरपेक्ष असतो, जो निर्वैर व शांत असतो तोच गुरू ठरू शकतो, असे एकनाथांनी म्हटले आहे. आपल्या कथित गुरूंना भक्तांनी या मापाने तपासायला हवे आणि गुरूंनी स्वत:ची उंचीपण या निकषावर मोजावयास हवी. ब्रह्मज्ञान आहे की नाही, हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू; परंतु ते असेल तर कोणाला प्राप्त होते, याबद्दल शास्त्र असे सांगते की, त्यासाठी साधनचतुष्ट्यसंपन्न असे व्यक्तिमत्त्व लागते. म्हणजेच नित्य व अनित्य याचा विवेक, विषय सुखाची अरूची, क्षम, दम, तितिक्षा, संतोष, शांती व सरलत्व या साधनांची संपन्नता व शरीर आणि मन यांच्या बंधपाशातून मुक्त होण्याची उत्कटता इत्यादी साधनांनी संपन्न असेल तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी मानावा. तीन विषयांच्या म्हणजेच इच्छांच्या पलिकडे जो गेला आहे, तोच या ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. या इच्छा म्हणजे विषय, वित्त व लौकिक. जोवर स्त्रीविषयक आसक्ती, द्रव्याविषयी प्रेम व लौकिकाची हाव आहे, तोपर्यंत ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा त्या माणसाला आहे, असे देखील मानता येत नाही. मग त्याला गुरू करणे तर दूरच राहिले. कोणत्याही बाबाला गुरुपद चिकटवण्याच्या आजच्या जमान्यात याची आठवण ठेवणे गैरसोयीचेच ठरणार.
    अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात एक जाणीव सतत बाळगावी लागते. ती ही की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची जोड ही व्यापक समाजपरिवर्तनाच्या कामाशी घालावी लागते. समाजामध्ये अशा अनेकांगी शक्यता असतात की, ज्या बाबा तयार करण्यात हातभार लावत असतात. १० वर्षांपूर्वी नांदेड येथील एक विलक्षण केस आमच्याकडे आली होती. तो अवघा १६-१७ वर्षांचा मुलगा होता. तीन वर्षे त्याच्या अंगात दत्ताचा संचार येणे सुरू झाले होते. गुरुवारी दत्ताच्या आरतीला जमणाऱ्यांची संख्या वाढत चालली होती. भविष्य सांगितले तर बरोबर येते, हा लौकिक पसरत चालला होता. त्याने दिलेल्या दत्ताच्या अंगाऱ्याचा रुग्णांना गुण येऊ लागला होता. नांदेडमध्ये समितीचे कार्य चांगले होते. बुवाबाजीचे प्रकार, अंगात येणे याबाबत जोरदार प्रबोधन मोहीम सुरू होती. वृत्तपत्रांतून बातम्या येत होत्या. त्या या बालदत्तमहाराजाच्या वाचनात आल्या. त्याने पत्र पाठविले, मला महाराज बनविण्यात आलंय, माझ्या नावाने आपला धंदा चालवण्यासाठी नाटक उभं केलंय, माझी शाळा त्यासाठी मधीच सुटलीय. कृपा करून मला यातून बाहेर काढा. त्याला समितीने सोडवले. या पद्धतीने गाड्याचे वाहक बाबाच्या, बुवाच्या प्रभावाच्या भरमसाठ कहाण्या सांगायला सुरुवात करतात. जास्तीत जास्त माणसांना बाबांची प्रचिती घेण्यास उद्युक्त करतात. बाबा आणि गाड्यांचे वाहक या दोघांनाही हा सिद्ध साधकाचा धंदा किफायतशीर ठरतो. बाबाच्या स्थळावर तर धंद्याचे एक मोठे चक्रच सुरू होते. खाण्यापिण्याच्या पदार्थांची हॉटेल्स व टपऱ्या, फुलाच्या माळांची विक्री, शीतपेयांची दुकाने, बाबाच्या पोथ्या, बिल्ले, माळा, फोटो येणाऱ्या गाड्यांची किरकोळ दुरुस्ती, वाहनतळ, एक ना अनेक प्रकारचे उद्योग बाबांच्या कृपाप्रसादाने पावन होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गरजेपोटी सुरू होतात आणि मग ते सुरूच राहणे ही त्या-त्या धंदेवाल्यांची पोटापाण्याची गरज बनते. त्यासाठी ते बुवाबाजीचे उघड समर्थक व प्रचारकच बनतात.
अर्थात केवळ या गरजेमध्येच बाबांचे सामर्थ्य लपलेले असते, असे मात्र नव्हे. बुवाबाजी करणारेही काही चांगली कामे करत असतात. त्यातील काही आधुनिक असतात, तर काही पारंपरिक मान्यता असणारी. पण या कामांतून बाबांना लोकमान्यता, राजमान्यता मिळते, वाढू शकते. बाबाला केलेला विरोध, बुवाबाजी विरोधासाठी केलेली वैचारिक मांडणी यापेक्षा बाबाने चालवलेले दवाखाने, उघडलेली हॉस्पिटल्स, पाण्याच्या कूपनलिका, शाळा यांचे लोकांना जास्त अप्रुप असते. हीच कामे याचपेक्षा फार मोठ्या प्रमाणात शासन करते, लोकांच्या पैशांतून करते, यामुळे आपण शासनाचे कौतुक करत नाही. ते त्यांचे कर्तव्य आहे असे आपण मानतो आणि ही कामे करण्यासाठीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची तपासणी करून त्यांना पुन्हा पाच वर्षांसाठी निवडून द्यावयाचे का, हे ठरवतो. बाबांच्या बाबतीत हा निकष आपण अजिबात लावत नाही. खरे तर बाबा ही सर्व कामे भक्तांच्या देणगीतूनच करत असतो. अपरंपार पैसा आपोआपच मिळत असताना त्यातील थोडा तरी सामाजिक कामास द्यावा हे व्यवहारज्ञान त्याला असते. त्यामुळे त्याच्या वैभवात, ऐषारामात काहीच कमी पडत नाही. ही कामे करणाऱ्या बाबाच्या सामर्थ्याचा उगम हा लोकांना अंधश्रद्धाळू बनवूनच झालेला असतो. लोकप्रतिनिधींच्या कामाची कठोर तपासणी करणाऱ्या आपल्या समाजाला अध्यात्मिक प्रतिनिधींची साधी चिकित्सक चौकशीही चालत नाही. त्याच्या विधायक कामाने जणू त्याला बाकीचे सर्व माफ होते. याबरोबरच सामुदायिक विवाह, ज्ञानेश्वरी सप्ताह, मोठमोठे भंडारे, विश्वशांती यज्ञ असे पारंपरिक कार्यक्रम धुमधडाक्यात सुरू असतात आणि त्यामध्ये रमणारा बहुसंख्य समाज असल्याने व याबाबत पुढाकार घेणारा बाबाच असल्याने त्याबाबतची उलटतपासणीही होत नाही, ही बाबदेखील बाबाचे सामर्थ्य वाढवण्यास कारणीभूत ठरते.
   
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००२)




1 टिप्पणी:

  1. कर्ज! कर्ज !! कर्ज !!!
    आपण एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त खाजगी कर्ज कंपनी शोधत आहात जो संपूर्ण आयुष्यासाठी कर्ज प्रदान करतो. आम्ही सर्व प्रकारचे कर्जे अतिशय वेगवान आणि सोप्या पद्धतीने, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज, तारण कर्ज, विद्यार्थी कर्ज, व्यवसाय कर्ज, गुंतवणूक कर्ज, कर्ज एकत्रीकरण आणि बरेच काही देत आहोत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी आपल्याला नाकारले आहे का? आपल्याला एकत्रीकरण कर्ज किंवा तारण गरजेची आहे का? आपल्या सर्व आर्थिक समस्यांना भूतकाळातील एक गोष्ट बनवण्यासाठी आम्ही येथे आहोत असे आणखी दिसत नाही. आम्ही 2% च्या दराने आर्थिक सहाय्य आवश्यक असलेल्या व्यक्तींसाठी आणि कंपन्यांना निधी देतो. आवश्यक सामाजिक सुरक्षा क्रमांक आवश्यक नाही क्रेडिट तपासणी आवश्यक, 100% हमी. मी तुम्हाला या माध्यमाचा उपयोग करून सांगू इच्छितो की आम्ही विश्वसनीय आणि सहायक मदत देतो आणि आम्हाला तुम्हाला कर्ज देण्यास आनंदच होईल.
    मग आम्हाला एक ईमेल पाठवा: (victoriaemmanuelloan@gmail.com) कर्जाकरता अर्ज करण्यासाठी

    उत्तर द्याहटवा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...