मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

दिवा आणि तुफान यांची कथा



दिवा आणि तुफान यांची कथा

दाभोलकर, कलकी भगवान, विष्णू अवतार, भगवती अम्मा, विश्वनाथ स्वामी, न्यायालयीन लढा
व्ही. विजयकुमार हे नाव तुम्ही कधी ऐकले असण्याची शक्यताच नाही. बी. एस्सी. डिग्री मिळवण्यासाठी त्याला चार वेळा परीक्षेला बसावे लागले. नंतर त्याने चेन्नई येथे एल.आय.सी.त लेखनिकाची नोकरी केली. त्यानंतर कृष्णमूर्ती फौंडेशनच्या एका शाळेत व्यवस्थापक म्हणून नोकरी पत्करली. अवघ्या नऊ महिन्यांतच त्याला तेथून काढण्यात आले. त्यानंतर चार मित्रांच्या सोबतीने आंध्र प्रदेशातील राजपूताना व्हिलेज, जि. चित्तूर येथे त्याने शाळा सुरू केली. हा प्रयत्नही अयशस्वीच ठरला. परंतु खरे यश आणि लॉटरी तर पुढेच होती. १९८९ मध्ये विजयकुमार यांनी स्वत:ला विष्णूचा दहावा वा अवतार घोषित केले आणि ‘कलकी भगवान’ हे नाव धारण केले. या कलकी भगवानाच्या नावावर चमत्कारांचा महापूर आला आणि बघता-बघता एक प्रचंड संस्थान उभे राहिले. त्यांची पत्नी व्ही. पद्मावती याही भगवती अम्मा झाल्या. भक्तांचा पैशाचा महापूर सुरू झाला. आश्रमात भगवती माताजी भक्तांना दर्शन देतात. आश्रमासमोरचा प्रचंड मंडप खच्चून भरलेला असतो. बैलगाड्या, बस, ट्रक, खासगी गाड्या यांची रांग लागलेली असते. ५-६ हजार भाविकांची गर्दी असते. माताजीएक शब्दही उच्चारत नाहीत; फक्त दर्शन देतात. एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय गृहिणीसारख्या दिसणाऱ्या माताजी; परंतु हजारोंचे डोळे त्यांच्यावर खिळलेले असतात आणि डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत असतात. फोटो काढायला सक्त मनाई असते. पिवळ्या पोषाखातील स्वयंसेवक पिवळ्या पिशव्या घेऊन भक्तांच्या रांगेतून हिंडत असतात आणि भक्त आपला खिसा त्या पिशव्यात मोकळा करतात. भजन सुरू असते. माताजी मध्येच हात वर करतात आणि आनंदाने चित्कारत भाविकांचा समूहही आपला हात वर नेतो. मग काही वेळाने भजन थांबते. माताजी निघून जातात. कोणालाही त्यांच्या जवळपासही फिरकू दिले जात नाही. कलकी भगवान यांच्या वरदापलयम आश्रमात सुरक्षाव्यवस्था अधिकच कडक असते. तेथे तर चक्क दर्शनाचा लिलाव होतो. गटामध्ये मिळून महाराजांना भेटून जे मुक्तिदर्शन घेतले जाते, त्याची फी असते, प्रत्येकी फक्त पाच हजार आणि महाराजांशी एकट्याचीच फक्त भेट व्हावी, यासाठी स्पेशल दर्शनाची फी आहे फक्त रु. ५० हजार.
कलकी भगवान यांनी एकूण ११ ट्रस्ट स्थापन केले आहेत. सर्वांमध्ये त्यांचे सगेसोयरे आणि कुटुंबीयच विश्वस्त आहेत. भगवानांच्या कुटुंबियांचे साम्राज्य महाप्रचंड आहे. १९९३-९४ पर्यंत त्यापैकी कोणी आयकरही भरत नव्हते. परंतु आता त्यांचा मुलगा व्ही. कृष्णा आणि इतर नातेवाईक यांच्या नऊ खासगी कंपन्या तयार झाल्या आहेत. एकट्या मुलाकडे ३३ गाड्या आहेत, या कंपन्यांच्या नावावर शेकडो एकराची शेतजमीन आहे. १० वर्षांपूर्वी भाड्याच्या घरात राहणारी ही मंडळी आज पंचतारांकित हॉटेलला लाजवेल, अशा एक नाही, तर नऊ बंगल्यांचे मालक आहेत. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए या उक्तीची सार्थ प्रचिती करून देणारे हे सारे वास्तव आहे. विश्वनाथ स्वामी हा एक सामाजिक कार्यकर्ता. गेली किमान २१ वर्षे तो व्ही. विजयकुमार ऊर्फ कलकी भगवान यांना ओळखतो. विजयकुमार यांच्या शाळा काढण्याच्या प्रयत्नातही विश्वनाथ स्वामी सहभागी होता. आज त्याने एकट्याने या सर्व प्रकाराविरुद्ध अक्षरश: धर्मयुद्ध छेडले आहे. आक्षेप घेण्यासारखे बरेच आहे. कलकी भगवानाचा धार्मिक प्रभाव हा एक गूढ भाग आहे. कथित पवित्र आश्रमात लैंगिक घोटाळे असल्याची चर्चा चालू आहे. मात्र या सगळ्यांबाबत पुरावे नाहीत. त्यामुळे विश्वनाथ स्वामी यांनी आपल्या चळवळीत एकच मुद्दा मध्यवर्ती केला आहे. तो असा की, कथित भगवान कलकी यांनी ग्रामीण जनतेची सेवा करण्यासाठी ट्रस्ट स्थापन केले आहेत. कोट्यवधी रुपये जमवले आहेत. गरिबांना मोफत घरे, मोफत शिक्षण अशी उद्दिष्टे दाखवलेल्या सर्व ट्रस्टमार्फत प्रत्यक्षात मात्र एकही नव्या पैशाचे काम करण्यात आलेले नाही. कलकी आश्रमाच्या आजूबाजूच्या गावात काम करून विश्वनाथ स्वामी यांनी त्या लोकांची त्याबद्दलची प्रतिज्ञापत्रे घेतली. यांच्या मते गेल्या १४ वर्षांत कलकी भगवान यांचा मुलगा, भाऊ, मेहुणा यांच्या नावावर ८५ कोटी रुपयांची नोंदणी प्राप्त मालमत्ता आहे आणि प्रत्यक्षात हा आकडा ३०० कोटीपर्यंत असण्याची शक्यता आहे. हे सर्व पैसे आले कोठून? ग्रामीण सेवा व विकास या नावाने पैसा जमा करण्यात आला आणि तो बिनदिक्कतपणे व्यक्तिगत भरभराटीसाठी भगवान आणि त्यांच्या कुटुंबियांनी वापरला, असा स्वामीचा आरोप आहे.
आयुष्याचे मिशन करून जिवाच्या आकांताने विश्वनाथ स्वामी याविरुद्ध लढत आहेत. अशी लढाई कायदेशीरच लढावी लागते आणि ती प्रचंड परिश्रम करायला लावणारी व थकवून टाकणारी असते. महाप्रचंड आर्थिक घोटाळा आहे, याची खात्री पटल्यानंतर स्वामी यांनी संबंधित शासकीय यंत्रणा हलवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामध्ये आयकर विभाग, राज्य पोलीस, सी.बी.आय. परदेशी चलन विनिमय विभाग या सर्वांसोबत त्यांनी अखंड पाठपुरावा केला. उपयोग शून्य झाला. काही जणांनी साधे उत्तर पाठवण्याचीही दखल घेतली नाही, तर काहीजणांनी कोणतीच कारवाई केली नाही. भगवानांच्याकडून संबंधित खात्यांचे अर्थपूर्ण समाधान करण्यात आले. वर्षभराच्या या प्रयत्नानंतर स्वामी ३ डिसेंबर २००२ ला मद्रास हायकोर्टात गेले. सर्व संबंधित शासकीय विभागांनी याबाबत आपले म्हणणे सादर करावे, असा आदेश दिला. यामध्ये आणखी एक वर्ष गेले.

मासलेवाईक उत्तरे दाखल करण्यात आली. राज्याच्या गुप्तहेर खात्याने असे प्रतिपादन केले की, कलकी भगवान यांना भारतातील सर्व राज्यातून; तसेच परदेशातूनही मदत मिळते. त्यामुळे याचा तपास करणे त्यांच्या मर्यादेच्या बाहेर आहे. सी.बी.आय.ने म्हणणे दाखल केले की, तपासाबाबतचे थेट व प्रत्यक्ष आदेश उच्च न्यायालयाने दिल्याशिवाय ते काही करू शकत नाहीत. आयकर विभागाने गोपनीय अहवाल दिला, जो मागणी करूनही उपलब्ध झाला नाही आणि परदेशी चलन विनिमय विभागाने नऊ महिन्यांत कोणताच रिपोर्ट दिला नाही. तो मिळवण्याच्या खटपटीत स्वामी होतेच. तोपर्यंतच उच्च न्यायालयाने निकालही देऊन टाकला. ती ऑर्डर अशी, ‘या प्रकरणाशी संबंधित विभागांना दक्ष करण्याचे काम उच्च न्यायालयाने केले आहे आणि या प्रकरणात लोकहिताच्या दृष्टीने ते पुरेसे आहे. यापुढील कार्यवाही संबंधित विभागांनी करावयाची आहे. या कारणाने ही जनहित याचिका काढून टाकण्यात येत आहे. स्वामी यांनी कोर्टाला पुन्हा-पुन्हा विनंती केली की, ‘संबंधित विभागांना आपण या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. कारण माझा आरोप अत्यंत स्पष्ट आहे. तो असा की, ग्रामीण सेवेसाठी गरीब खेडूतांच्या नावाने कोट्यवधी रुपये जमा करून त्यांचा स्पष्टपणे अपहार झाला आहे. मात्र न्यायमूर्तींनी हे मान्य केले नाही. कोर्टाच्या या आदेशानंतर पुन्हा एकदा सर्व संबंधित शासकीय विभागांना स्वामी यांनी लिहिले आणि न्यायालयाचा आदेश त्यांना पाठवला. न्यायालयाने या विषयाबाबत आपणास दक्ष केले असल्याने आपण कारवाई करावी, अशी विनंती केली. कोणत्याही विभागाने या पत्राला साधे उत्तर पाठवण्याचीही तसदी घेतली नाही. या परिस्थितीत स्वामी यांना दिल्लीला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे आता ठोठावे लागत आहेत.
या सर्व कालावधीत ते आजपर्यंत विश्वनाथ स्वामी यांची माहिती गोळा करण्याची व कायदेशीर लढाई अधिक पक्की बनवण्याची अथक धडपड सुरूच आहे. अगदी अलिकडेच या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले. मुरूगप्पन हा स्वत:ला काही नामवंत इंग्रजी व तामिळी दैनिकाशी संबंधित असलेल्या; तसेच काही उपग्रह वाहिन्यांचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणारा पत्रकार स्वामी यांना भेटला. कलकी भगवान हा विषय पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्यासमोर ठळकपणे मांडण्यासाठी स्वामी यांना मदत करण्याचे त्याने मान्य केले. स्वामीवर छाप पाडण्यासाठी कलकी भगवान यांच्या मुलाचे आयकर प्रमाणपत्रही मिळवल्याचे त्यांनी दाखवले. काही दिवस तो सतत विश्वनाथ स्वामीच्या संपर्कात राहिला. स्वामीला संशय आल्यावरून त्यांनी संबंधित दैनिकात चौकशी केली. त्यावेळी असा कोणीही पत्रकार त्यांनी पाठवला नसल्याचे कळले. मुरूगप्पन यांनी गावाबाहेरच्या एका अलिशान बंगल्यात विश्वनाथ स्वामी यांची एक विशेष भेट घडवून आणायची आहे, असे स्वामींना सांगितले. या प्रकरणाचा संशय आल्यावर स्वामींनी पोलिसांशी संपर्क साधला. स्वामींना गाडीतून घेऊन जाण्यासाठी आलेल्या मुरूगप्पनला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या उलट तपासणीत असे सिद्ध झाले की, भगवान कलकी यांच्या अत्यंत जवळच्या प्रमुख माणसाने मुरूगप्पन याला विश्वनाथ स्वामी याला पळवून आणण्यासाठी खास सुपारी देऊन पाठवले होते. मुरूगप्पन हा लेख लिहीत असताना पोलीस कोठडीतच होता. विश्वनाथ स्वामी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये गेले आहेत. ते यासाठी की, कटाच्या सूत्रधाराला अटक करावी.
एक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेली बुवाबाजी संपवण्यासाठी जिवाच्या कराराने विश्वनाथ स्वामी लढत आहेत. ही झुंज अक्षरश: एकाकी आहे. स्वत:ला विवेकवादी म्हणवणाऱ्या संघटना यामागे बोलण्यापलिकडे उभ्या राहत नाहीत, हे स्वत:चे दु:ख त्यांच्या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी मला सांगितले. चळवळीबद्दल हा अपेक्षाभंग आपण सर्वांनी मिळूनच खोटा ठरवायला हवा.
विश्वनाथ स्वामी यांनी ही लढाई दोन वर्षांपूर्वी सुरू केली. स्वत:च्या आयुष्याची तोपर्यंत साठलेली सर्व पुंजी ८७ हजार रुपये त्यांनी त्यात घालवली. आश्रमाच्या बाजूच्या २० खेड्यातील लोकांनी त्याला स्वत:चा दिवसाचा रोज प्रत्येकी रुपये ४० देऊन मदत केली. सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक यांच्याच आधारावर आज लढाईतील उमेद विश्वनाथ स्वामी टिकवून आहेत. ही लढाई त्यांनी थांबवावी म्हणून त्यांच्यावर प्रचंड दबाव आला. त्यांच्यावर हल्लाही झाला. सहा हल्लेखोरांपैकी दोघांना त्यांनी ओळखले देखील. परंतु आजतागायत ती केस पुढे सरकलेली नाही. स्वत:चा उदरनिर्वाह, सततचा संघर्ष, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांचा प्रचंड खर्च हे लक्षात घेता श्री. विश्वनाथ स्वामी यांना आपण सर्वांनी मदत करावयास हवी. त्यांना सध्या त्याची फार गरज आहे. शक्यतो शाखेत, मित्रमंडळीत मदत गोळा करून एकत्रितपणे पाठवावी. पावती एकत्रितपणे शाखेला (वा व्यक्तिगतही) दिली जाईल. त्याबाबत मदत पाठवताना कळवावे. मदत शक्यतो मनीऑर्डरने पाठवावी. मनीऑर्डरचा खर्च वजा जमा रकमेतून काढून घ्यावा. ५०० रुपयांपेक्षा अधिक मदत एखाद्याने पाठवल्यास त्यांना ८० जी खाली आयकर माफीचे प्रमाणपत्र मिळू शकेल. मदत गोळा करण्याची मोहीम चालवून पैसे उभे करावेत, ही कल्पना नाही. आपल्या छोट्या-मोठ्या वर्तुळात संवाद साधून ज्यांना या कामाचे महत्त्व पटेल त्यांच्याकडून निधी घ्यावा.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (मे २००५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...