शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

वार्तापत्राची भूमिका



वार्तापत्राची भूमिका
  
दाभोलकर, वार्तापत्र, लेखनशैली, तात्त्विक मतभेद, संयम, कार्यकुशलता
महाराष्ट्रभर फिरत असताना वार्तापत्र पोचते आहे, आवडते आहे, हे आता जाणवू लागले आहे. वर्गणीदारांची संख्याही वाढू लागली आहे. (अर्थात ती अजून बरीच वाढवावयास हवी); परंतु एक उणीव मला सातत्याने जाणवत आहे, ती म्हणजे प्रत्यक्षात चळवळ करणारी, धडपडणारी आपली कार्यकर्ती मंडळी लिहिताना हात भलताच आखडता घेतात.

वार्तापत्राची मूळ भूमिका काय? ते सर्वप्रथम वार्तापत्र आहे. महाराष्ट्रभर आपल्या संघटनेत, उपक्रमात, आपण केलेल्या चळवळीत आणि लढ्यात जे घडते त्याचे प्रतिबिंब वार्तापत्राच्या पानातून उमटावे, ही सर्वांची अपेक्षा अगदी स्वाभाविक आहे. शिवाय हे सगळे त्या-त्या वेळी घडावयास हवे म्हणजे त्यात ताजेपणा राहतो आणि पुन्हा नव्याने घडणाऱ्या घटनांच्यासाठी पाने मोकळी राहतात. १३ डिसेंबरला आपल्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी उमरगा तालुक्यातील अनेक भूकंपग्रस्त गावात शोध भुताचा मोहीम राबवली. हा उपक्रम भूकंपग्रस्तांच्या दृष्टीने वेगळा होता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांचे चळवळीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून वेळ काढून पदरमोड करून कार्यकर्ते आले. परंतु कोणत्या गावातून हा कार्यक्रम झाला? कसा झाला? सहभागी होणाऱ्या गावकऱ्यांना काय वाटले? याची नीटपणे नोंद आणि रिपोर्टिंग एकत्रितपणे तयारच झाले नाही; मग ते वार्तापत्रात येणार कुठून? आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाखांना, आपल्या अन्य वाचकांना ते कळणार कसे? शिवाय खरे तर रिपोर्टिंग म्हणजेच सर्व काही नव्हे. आपण काही केवळ त्यात भाग घेणारे नव्हतो तर संयोजकही आपणच होतो; मग या संयोजनात त्रुटी कोणत्या जाणवल्या? चांगले काय झाले? काय फसले? भावी काळात असे कार्यक्रम घेताना कोणती काळजी घ्यावयास हवी? याचा विचारविनिमयही वार्तापत्रातून कोणीतरी उपस्थित केल्याशिवाय पोचणार कसा?

मल्लिनाथ महाराज हे लातूर भागातील प्रस्थ. लातूरच्या कार्यकर्त्यांनी जिवाची बाजी लावून त्या महाराजाविरोधी यशस्वी झुंज दिली. त्याची हकिकत यावयास हवीच; परंतु त्याबरोबरच यामुळे चिडून जाऊन आपल्या लातूरच्या कार्यवाहांवर खुनीहल्ला झाला. पंधरा कार्यकर्त्यांच्यावर दरोड्याच्या आरोपाखाली खोटे खटले घालण्याचा प्रयत्न झाला. हे वार्तापत्रात ताबडतोबीने यावयास नको काय? त्यामुळे अशा हल्ल्यांचा महाराष्ट्रव्यापी निषेध करता येतो. आपापल्या ठिकाणी बुवाबाजीविरोधी लढताना घ्यावयाची काळजी ही अधिक काटेकोर बनते.

व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते बोले तैसा चाले... असा प्रयत्न करतात. हा रस्ता खडतर असतो. विशेषत: ज्यावेळी भावना गुंतलेले प्रसंग असतात, त्यावेळी तर चांगलीच सत्त्वपरीक्षा होते. घरातल्यांची नाराजी पत्करून कार्यकर्ते आपले ब्रीद सांभाळतात. घटना व्यक्तिगत असते; पण तिची चौकट पूर्ण सामाजिक असते. बहुसंख्य कार्यकर्त्यांना व्यक्तिगत जीवनात हे या ना त्या स्वरुपात सोसावे लागणार असते. समाजही या कसोटीकडे साक्षेपी बघत असतो. आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या आयुष्यात अशा घटना घडतात. ते कसोटीला उतरतात. पण त्यावेळची स्वत:च्या मनातली, कुटुंबातील, समाजातील घालमेल शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न जवळपास होत नाही. एक अनुभव तसाच व्यक्तिगत बनून राहतो.

असे बरेच काही-काही सतत घडत असते की, ज्याची नोंद आवश्यक असते; पण होत नाही. खरे तर आपण वार्तापत्र विकतो ते सवलतीच्या दरात. वार्षिक ४० रुपये खर्च एका अंकामागे आपल्याला सहज येतो. परंतु आपण मात्र अंक देतो अवघ्या वार्षिक २० रुपयांत. हे यासाठीच की, वार्तापत्र जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचावे सुलभपणे आणि त्याबरोबरच आपली चळवळ ही त्यांच्यापर्यंत पोचावी; परंतु त्यासाठी लिहिण्याचा जो स्वाभाविक प्रतिसाद हवा, तो मात्र मिळताना दिसत नाही.

असे का होते? शक्य आहे की, याचे महत्त्वच लक्षात आले नसेल. कदाचित महत्त्व लक्षात येत असेल; परंतु आळस कुरघोडी करत असेल. काहीही असले तरी त्यावर मात करणे सहज शक्य आहे. एक अडचण अशीही दिसते की, इच्छा आहे, सवड आहे; पण लेखन जमतच नाही. तसे असेल तर ती चुकीची कल्पना मनातून पहिल्यांदा हद्दपार करा. महत्त्व आहे तुमच्या अनुभवाच्या जिवंतपणाला. ते तुम्हाला जमतील तशा भाषेत लिहा. गरज वाटली तर त्यासोबत त्या विषयाला धरून जे छापून आले त्याची कात्रणे पाठवून द्या. या सगळ्या घटना आणि त्यामागचा आशय संपादक स्पष्ट करून मांडतील व आपले काम साध्य होईल. काही जणांची अशीही तक्रार असते की ‘आम्ही लिहितो हो; पण ते छापले जात नाही.’ खरे तर अशी तक्रार करण्याची पाळी तुमच्यावर आली तर अपवादानेच. कारण तुमच्यासाठी तर वार्तापत्र सुरू आहे. परंतु लिहीत असताना (विशेषत: ज्यांना या ना त्या स्वरुपात लिहिण्याची सवय आहे) विषय नेमक्या शब्दांत मांडला जावा. लिखाण चांगले उतरावे, यासाठी थोडे अधिक परिश्रम घेण्यास काय हरकत आहे? आणि याबरोबरच एक गोष्टही मनात बाळगावयास हवी ती अशी की, आपल्याला चांगले वाटणारे आपले लेखन संपादित व संस्कारित करण्याचा अधिकार आपणच संपादकांना दिला आहे, तो त्यांनी बजावला तर ते आपण मान्य करावयास हवे.

तेव्हा थोडक्यात काय? लिहिते व्हा, इतरांना लिहिते करा आणि अगदीच अडचण आली तर संपादक मंडळाशी संपर्क साधून त्यांचा प्रतिनिधी बोलावून; पण आपली लढाई सर्वांच्यापर्यंत पोचेल याचा सजग प्रयत्न करा.

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र, दिंडोरी, जि. नाशिक यांच्या शाखा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पसरलेल्या आहेत. त्यांच्या शिकवणुकीत अनेक अवैज्ञानिक व अंधश्रद्धा वाढवणाऱ्या गोष्टी असतात. जळगाव जिल्ह्यात त्यांच्या प्रचारकांशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे वादविवाद केला. त्यांना जाहीर आव्हान दिले आणि स्वाभाविकच सांगण्यात येणारी मते विज्ञानाच्या निकषांवर टिकण्यासारखी नसल्यामुळे स्वामी समर्थ संप्रदायांच्या सेवेकऱ्यांना (भक्तांना) माघार घ्यावी लागली. हा एक प्रभावी व परिणामकारक कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील शाखेच्या कार्यकर्त्यांनी केला.

खरा मुद्दा आहे तो पुढचा,

यानंतर त्या संप्रदायाचे सेवेकरी, निफाडच्या कॉलेजचे प्राचार्य व्यवहारे यांची व नाशिकच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली. या चर्चेतदेखील ‘करणी खरी असते, अग्निहोमामुळे मनातील विकार नाहीसे होतात, नागनारायण बळी पूजेत (नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या पूजेचा वैशिष्ट्यपूर्ण व लोकांना लुबाडणारा प्रकार) तथ्य असते, असे सांगण्यास सेवेकऱ्यांनी सुरुवात केली. त्याला कार्यकर्त्यांनी विरोधही केला.

परंतु स्थानिक प्रमुख वृत्तपत्रात मात्र बातमी झळकली की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समर्थ सेवेकरी यांच्यात यशस्वी चर्चा होऊन उभय बाजूत समझोता झाला, असे पत्रक नाशिकच्या कार्यकर्त्यांनी काढले आहे. बरे, तर याचा त्वरित खुलासा कडक शब्दांत त्याच वृत्तपत्रात छापावयास लावणे, ही नाशिक शाखेची जबाबदारी होती. कारण अशा बातम्यांतून समितीबाबत लोकांची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता असते. वृत्तपत्राने हा खुलासा छापला नसता तर त्यांनी मध्यवर्तीकडे ताबडतोब कळवणे आवश्यक होते. अकारण व हेतुपुरस्सर चळवळीची बदनामी करणाऱ्या अशा मजकुरांचा प्रतिवाद ताबडतोब करणे शक्य, इष्ट व योग्य असते; परंतु नाशिकची शाखा यात उणी पडली.

परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. रावेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात त्यांना हा अधिकार कुणी दिला?’ असे खडसावणारे पत्रक काढले व ते दै. ‘लोकमत’मध्ये छापून आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक शाखा दुसऱ्या शाखेविरोधात उभी आहे, असे एक विचित्र चित्र यामधून निर्माण झाले. खरे तर असे पत्रक काढण्याची अजिबात गरज नव्हती. खरोखर काय झाले आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांची चूक आहे की, वृत्तपत्रांची याची शहानिशा प्रत्यक्ष भेटून वा निदान पत्राने करून घ्यावयास हवी होती आणि संयुक्तपणे समितीच्या कार्याला सुसंगत अशी भूमिका कणखरपणे घ्यावयास हवी होती. वृत्तपत्रातून वाद वाढवणे, त्यामध्ये आपल्याच अन्य शाखांना अकारण गुंफणे, यातून काय साधले? मला ही गोष्ट उशिरा कळली. धुळे, जळगाव, नाशिक या भागातील वृत्तपत्रे महाराष्ट्रात अन्यत्र मिळत नाहीत. परंतु त्या भागातील कार्यकर्त्यांनी एक तर जागरूकपणे ताबडतोब कळवावयास हवे होते किंवा खरे तर पुढाकार घेऊन प्रकरण लगेच संपवावयास हवे होते. आपल्याबद्दल लोकांच्या मनात हेतुत: गैरसमज करून देण्याचा उद्योग अनेकांचा सुरू असतोच. शिवाय आपली चळवळ आहे प्रवाहाविरुद्ध पोहण्याची. यासाठी तरी आपला संयम, समज व कार्यकुशलता प्रभावीपणे वापरण्याचा आपला प्रयत्न हवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...