रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

नाठाळाच्या माथी हाणू काठी



नाठाळाच्या माथी हाणू काठी

दाभोलकर, चळवळ, शिबीर, सजगता, बुवाबाजीला विरोध
सत्यशोध प्रज्ञा परीक्षेच्या शिबिरासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर उतरलो. ५०० पुस्तकांचे मजबूत ओझे बरोबर होते. पुन्हा मी आणि कुमार मंडपे या दोघांचे पाच दिवसांच्या दौऱ्याचे सामान. एक रिक्षा गच्च भरली असती. पण रिक्षा करण्याची वेळ आलीच नाही. रोटरी क्लबला संध्याकाळी भाषण असल्याने; शिवाय जळगाव संयोजनात त्यांचा सहभागही असल्याने रोटरीचे सदस्य व त्यांच्या दोन मारुती गाड्या स्टेशनवर हजर होत्या.

जळगावचे शिबीर संपले. धावत-पळत संध्याकाळपर्यंत साक्री गाठावयाची होती. पारोळ्याचा कार्यकर्ता लालचंद नागदेव गाडी घेऊन आला होता. ती भाड्याची अँबॅसिडर अंमळनेरहून आली होती. अंमळनेर-जळगाव-पारोळा-साक्री-अंमळनेर असा प्रवास गाडीने केला. दिमतीला गाडी म्हटल्यावर प्रवास सुखकारक झालाच; परंतु भाड्याची गाडी म्हटली की, ६०० रुपये तरी खर्च झाले असणार.

साक्रीचे शिबीर उत्तम झाले. शिबीर संपल्यावर रेल्वे गाठण्यासाठी धुळेमार्गे चाळीसगाव गाठावयाचे होते. थोडी धावपळ होणार होतीच, तर साक्रीचे संयोजक नानासाहेब ठाकरे यांनी न मागताच त्यांची गाडी थेट चाळीसगावपर्यंत दिली आणि चाळीसगावला आपले कार्यकर्ते नागेश सामंत यांच्याकडे नेहमीप्रमाणे भरपेट जेवण झाल्यावर रेल्वे स्टेशनवर पोचवण्यासाठी त्यांची मारुती होतीच.

मोठीच सोय झाली हे तर खरेच. प्रवासाची दगदग टळली. वेळ कमी लागला. जाता-जाता पारोळ्याच्या कार्यकर्त्यांना भेटता आले. साक्रीहून परत येताना असलोदच्या डॉक्टर बाबा प्रकरणी पराक्रम गाजवणाऱ्या प्रतिभा साळुंखेच्या घरी चहा घेता आला. एकूण शरीर व मन दोन्ही सुखावले. खरे तर हातातली बॅग सांभाळत एस.टी.चे दार शक्यतो सर्वप्रथम पकडणे हे प्रवासातील धावपळीसाठी मी कमवलेले आवश्यक कौशल्य. स्वाभाविकच मनात विचार आला आपली दगदग टळली. सोय वाढली; पण या चळवळीचा खरंच फायदा झाला का? एकतर जळगावहून साक्रीला पोचायला बसच्या तिकिटाच्या दसपट खर्च आला. साक्रीचे शिबीर संपल्यानंतर बाकीचे सहकारी बसनेच परतले. त्यांच्या मनात गाडीतून आरामशीरपणे निघून गेलेल्या माझ्याबद्दल नेमकी कोणती भावना आली असेल?

प्रश्न केवळ माझा नाही. धावपळ जसजशी वाढते, कार्यकर्त्याला थोडेबहुत नाव, प्रतिष्ठा मिळते, तसे आपोआपच समाजाकडून त्याला मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडतो. त्यामधून सुविधा वाढतात आणि हळूहळू त्यांचे हक्कात रूपांतर होते. एकेक सवयी नकळत लागत जातात. अमुक अथवा तमुक अनुकुलता असेल तरच काम करेन, अशी एक मानसिकता नकळत तयार होते. सुरुवातीला चळवळ विस्तारासाठी सुखकारक आणि उपकारक वाटणाऱ्या या सुविधा कार्यकर्त्याच्या मर्यादा बनतात. करणारे भलाईने करत असतात; परंतु दीर्घकालीन परिणाम इष्ट होतोच असे नाही; अनिष्टही होऊ शकतो. सुखसोयी देणारा प्रामाणिकपणे व जिव्हाळ्याने देत असतो. त्या नाकारणे प्रत्येक वेळी इष्ट नसते व शक्यही; परंतु त्या घेत असतानाच त्याबाबतची एक सजगता स्वत:च्या मनाशी नक्की बाळगावयास हवी आणि वास्तवाच्या भूमीवरून व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घोळक्यामधून जमिनीवर असलेले आपले पाय कधी सुटू नयेत, काळजी बाळगावयास हवी, असे माझ्या मनात प्रकर्षाने येऊन गेले.

प्रतिभा साळुंखे ही तशी अगदी अलिकडे म्हणजे एप्रिल महिन्यातील असलोदच्या डॉ. बाबा प्रकरणापासून चळवळीत आलेली तरुणी. पूर्वी स्वाध्यायी होती. (पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराची सभासद.) समितीची दोन शिबिरे करून आणि प्रत्यक्ष कृतीने ती आता चळवळीच्या प्रवाहात आहे. साक्रीहून परतताना ती बाबा प्रकरणातील तिचे अनुभव खुमासदारपणे सांगत होती. बहुजन समाजातील, चळवळीशी अपरिचित, एका तरुणीने एका अनोळखी ठिकाणी रात्रभर एका पूर्णत: अपरिचित तरुणासोबत त्यांची पत्नी असल्याचे नाटक प्रभावीपणे वठवावे, याचा मला मनापासून अभिमान वाटला, कौतुकही. विशेष म्हणजे या तथाकथित जोडप्याने मूल होण्यासाठीचा खोळ भरून घेण्याचा कार्यक्रमही बाबाच्या हस्ते त्याच्या आश्रमात जाहीरपणे केला. पारंपरिक विचाराच्या पंचक्रोशीत स्वाभाविकच या आक्रिताची प्रतिक्रिया उमटली. नाराजीचे सूर निघाले. प्रतिभाचे वडील व प्रतिभा यांनी ते पचवले. बुवाच्या विरोधात लढण्याच्या शौर्याएवढेच हे मानसिक धैर्यही मला मोलाचे वाटते.

काहीसे असेच धैर्य तऱ्हेवाईकपणे दाखवले, तासगाव तालुक्यातील राजाराम म्हस्के आणि सदाकळे यांनी. जिवंत असलेल्या सदाकळेचा पिंडदानविधी त्यांनी जाहीर केला. सावर्डे या गावी प्रचंड कुतूहल निर्माण झाले. पिंडदानासाठी पारंपरिक पद्धतीने नैवेद्य स्मशानात नेऊन ठेवला. हे अघटित बघायला कुतुहलाने स्मशानात पुरुषांच्याबरोबर स्त्रियांनीही गर्दी केली. गंमत म्हणजे न मेलेल्या सदाकळेच्या पिंडाला कावळ्याने चटकन टोच मारली. एवढेच नव्हे, तर गोमातेनेही येऊन आपले तोंड लावले आणि नंतर न उष्टावलेल्या उरलेल्या सर्व नैवेद्यावर कार्यकर्त्यांनी ताव मारला. अडावद गावातल्या दोन वर्षांच्या बालकाला नवनाथ प्रसन्न झाले व त्याच्या कपाळावर आपोआप गंध उमटू लागले. ग्रामस्थ अचंबित झाले. काही प्रमाणात टोमणेही झेलावे लगले. परंतु धडाडीच्या एका कृतीतून धक्का देऊन विचाराला चालना मिळाली, हे मात्र नक्की. पुण्याला आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने व उत्साहाने हजर होते. अलका जोशी व डॉ. साळी यांच्यावर पोलिसांनी आकसाने केलेल्या कारवाईचा विषय होता. त्यावर केलेल्या कारवाईची मी माहिती देत होतो. अलका जोशींनी त्यांचे अनुभवकथन व मतप्रदर्शनही केले. दुसऱ्या विषयाला सुरुवात झाली. एवढ्यात मध्येच माझ्याकडे कवठेमहांकाळचा धडाडीचा कार्यकर्ता सुभाष कोष्टी याची चिठ्ठी आली. त्याचे मत असे होते की, आपण अशा बाबतीत यापेक्षा कडक व प्रत्यक्ष कारवाई करावयास हवी होती. नंतर बोलताना त्याने त्याचा अनुभव सांगितला. कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या फौजदाराला २५ मुलांना बरोबर घेऊन दमात घेऊन कसा सरळ केला, याचे ते वर्णन होते.

मला वाटते, चळवळीतील हा एक जुनाच वाद आहे. तो असा की, बुवाबाजीच्या विरोधात आक्रमक व्हावयाचे म्हणजे काय व कसे? बाबाच्या बदमाषीबद्दल प्रचार करणे, बाबाच्या कार्यक्रमात जाऊन आव्हान देणे, बाबाचा तपास नीट घेऊन त्याचे खरे अंतरंग समजून घेणे व लोकांना समजून देणे, त्याला पोलिसांच्या ताब्यात देणे, त्याने स्वत:ची बुवाबाजी कबूल करण्यास व थांबवण्यास नकार दिला तर त्याचा दरबार उधळणे किंवा गरज पडली तर नाठाळाच्या माथी हाणू काठी या तुकोबांच्या अभंगाची शब्दश: अंमलबजावणी करणे. मला वाटते, खरे तर हा प्रश्न केवळ एखाद्या बाबा, बुवा यांच्याविरुद्धची लढाई याच्याशी संबंधित नाही. समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे, त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे इष्ट, रास्त, प्रभावी आणि टिकाऊ मार्ग कोणते, याच्याशी याचा संबंध आहे. याबाबत सामुदायिक विचारमंथनातून जेवढी प्रगल्भ समज आपण निर्माण करू, तेवढे चळवळीला अधिक बळ लाभेल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी १९९४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...