सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 1/3)



 धर्मचिकित्सेतून मानवतेकडे  (भाग 1/3)
दाभोलकर, धर्मचिकित्सा, यातुधर्म, नैतिकता, मानवीयता, कर्मकांड, विवेकवाद, मनुस्मृती  
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे सतत चर्चेचा विषय ठरत आले आहे. याचे एक महत्त्वाचे कारण असे की, या विषयाचा संबंध श्रद्धेशी येतो आणि याचा जवळपास सर्वांच्या लेखी अर्थ धर्मश्रद्धा’च असा असतो. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांनी म्हणूनच धर्म या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेबद्दल भूमिका घेण्याची गरज आहे. ‘धर्म’ या शब्दाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होतो. वाहणे हा वाऱ्याचा आणि प्रकाशणे हा सूर्याचा धर्म आहे. येथे धर्म या शब्दाचा अर्थ गुणधर्म असा आहे. आई-वडिलांची आज्ञा पाळणे हा मुलांचा धर्म आहे. येथे धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा आहे. तहानलेल्यांना पाणी देणे आणि शरण आलेल्यांना अभय देणे हा धर्म आहे. या ठिकाणी धर्म याचा अर्थ नैतिक कर्तव्य असा आहे. माझा हिंदू, मुसलमान, बौद्ध वगैरे वगैरे धर्म आहे. याचा अर्थ उपासनापद्धती व श्रद्धा असा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याला याच भूमिकेतून धर्मविषयक भूमिकेचा विचार करावा लागेल. याबरोबरच आणखी एक बाब निर्विवादपणे मनात पक्की करावी लागेल ती अशी की, धर्म ही मानवानेच निर्माण केलेली सामाजिक संस्था आहे.
     
मानवी जीवनात धर्माला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. सर्व जगातील मानवसमूहांत आदिम अवस्थेपासून या-ना-त्या स्वरुपात धर्माने माणसाची सोबत केली आहे. आधुनिक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही गेल्या अवघ्या ४०० वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला होता. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले होते. विज्ञानाचा उदय होण्याआधी त्यांना विशाल स्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले होते. सर्व बाजूंनी धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली. धर्म व्यक्तीला जन्मत:च मिळतो. त्याचा संस्कार लहानपणापासून होतो. त्यावेळी चिकित्सा करण्याचा प्रश्नही उपस्थित होत नाही. व्यक्ती प्रौढ होते, चिकित्सक विचार करण्याची तिची क्षमता तयार होते. ही क्षमता वापरून इतर धर्मांबरोबर स्वत:च्या मायधर्माची तुलना ती करू लागते, तेव्हा धर्मविचाराला प्रारंभ होतो. वस्तुस्थिती अशी आहे की, बहुतेकांच्या जीवनात हे घडतच नाही. बदलत्या वयापरत्वे काही कर्मकांडे, धार्मिक वाचन, तीर्थयात्रा एवढेच घडते. स्वाभाविकच लहानपणापासूनचा धर्मसंस्कार गडद होत जातो. मनाला समाधान देत जातो. त्या त्या व्यक्तींना ही बाब उचित व उपयुक्त वाटते व त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही.
     
परंतु, आजची परिस्थिती यासंदर्भात बरीच बदललेली आहे. धर्माचा अभिमान, अस्मिता, आग्रह, अहंकार अधिकाधिक बलवान करण्याचा प्रयत्न सर्वच धर्मात चालू आहे. त्याला परधर्मद्वेषाचे रूप देखील अनेकदा येते. देवळात जाणे, यात्रा करणे, धर्माची व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, देवतांचे व धर्माचे उत्सव या गोष्टींकडे त्या-त्या धर्मातील सर्वसामान्य समाजच नव्हे, तर तरुण पिढीही आकर्षित झालेली दिसते. धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करणे चालू झाले आहे. संतांनी धर्मभावना नैतिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला. सध्या जे उधाण धर्मभावनेला आले आहे, तेही धर्मभावना धर्मांधतेकडे वळवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे लक्षण आहे. धर्म या घटिताच्या सर्व प्रकारच्या आविष्कारासाठी शब्दश: कोट्यवधी नव्हे, तर अब्जावधी रुपयांचा व्यवसाय होतो आहे. आधुनिक जमान्यात हे व्यापारीकरण एकवेळ समजू शकते; परंतु धार्मिक सणासाठी कोणत्याही असामाजिक शक्तींकडून बिनदिक्कतपणे पैसे घेतले जातात. त्या बदल्यात त्यांना प्रतिष्ठा दिली जाते. बुद्धिदात्या गजाननाच्या मिरवणुकीत बुद्धी मातीला मिळवणारी मदिरा प्राशन करून नाचले जाते. या सर्वांवरून धर्मभावनेचे हे बाजारीकरण व विकृतीकरण स्पष्ट होते. खरेतर हा सर्व खटाटोप राजकीय सत्तेसाठी असतो. लोकशाहीत राजकारण करणे, यात काहीच गैर नाही. मात्र त्यासाठी लोकांच्यात जाऊन त्यांच्या जीवनविषयक प्रश्नांच्यावर अंग मोडून काम करावे लागते. त्याऐवजी लोकांची धर्मभावना जास्तीत जास्त उद्दीपित करून व उद्दीपित ठेवून त्याआधारे सत्तेकडे वाटचाल करावयास मिळाली तर तो सोयीचा व सुखाचा राजकीय शॉर्टकट ठरतो. यामुळेच एखादे प्रार्थनास्थळ पाडणे या मुद्द्यावर खंडप्राय देशाच्या निवडणुका खेळल्या जाऊ शकतात. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी, असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात असल्याने आणि या विचाराचा संबंध हरघडी धर्माशी येत असल्याने धर्मचिकित्सा अपरिहार्य बनल्याचे मानावे लागते. पारलौकिक दिव्यशक्तीचा ओढा हा सर्व धर्मात समान भाग आहे; पण अशा शक्तीची साधना थोड्यांनीच करावी; याउलट त्या धर्मातील बहुजनांनी धर्मभावना ही एक ऐहिक शक्ती संपादनासाठी उपयुक्त गोष्ट मानावी, अशी भूमिका धर्माच्या आधारे आता सगळेच धर्म घेऊ लागले आहेत. जगातले सारे मुसलमान पॅन इस्लामिझमच्या झेंड्याखाली संघटित झाले पाहिजेत, यहुद्यांनी आंतरराष्ट्रीय संघटना करून इस्राईल हे राष्ट्र बलिष्ठ केले पाहिजे आणि हिंदूंनी हिंदू राष्ट्राची तयारी चालू केली पाहिजे, असे मानणाऱ्यांना बळ लाभण्याचा सध्याचा काळ आहे. एकंदरीत, मानवी जीवन पूर्वीपेक्षा जास्त अस्थिर व संघर्षमय झाले आहे. या संघर्षाला तोंड देण्यासाठी धर्मभावनेला केवळ साधन बनवण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. ही धर्मभावनादेखील पारंपरिक भावनेप्रमाणे दृढ व तीव्र असते. या भावनेचा परिपोषही कौटुंबिक व सामूहिक शिकवणीच्या परंपरेतून होतो. ही पारलौकिकाच्या अंगापासून मुक्त झालेली नसते; पण या धर्मभावनेचा सारा भर संघशक्तीवर आणि संघर्षासाठी लागणाऱ्या भौतिक बळावर असतो. हिंदूंच्यात धर्म वास्तवात जातीच्या रूपाने व्यक्त होतात. त्यामुळे जाती आणि उपजातीही आता याच पद्धतीने संघटित व संघर्षशील होऊन व्यक्त होऊ लागल्या आहेत. या भयावह परिस्थितीत धर्माला दुय्यमत्व देऊन, वर्गसंघर्षाच्या मार्गाने लोकांच्या भौतिक गरजांवर संघर्ष उभारून त्याद्वारे त्यांना एकूणच धर्मभावनेचे मिथ्यापण लक्षात आणून देणे हेच योग्य आहे, अशी एक विचारपरंपरा आहे. वास्तवात ती यशस्वी झालेली दिसत नाही. कामगारांच्या वर्गसंघर्षासाठी प्रसिद्ध असलेली मुंबईची महानगरी ही धर्माच्या आधारे उभ्या राहिलेल्या संघटनेच्या प्रभावाखाली काही दशके असावी, हा अंतर्विरोध पुरेसा बोलका आहे. कामगारांचे प्रशिक्षण होऊ शकले नाही, हा युक्तिवाद अपुरा आहे. या प्रश्नाकडे अधिक साक्षेपीपणे पाहावयास हवे. असा एक प्रश्न सहजच विचारता येण्यासारखा आहे की, महाराष्ट्रातील महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या सर्वांनी कठोर धर्मचिकित्सा करूनही धर्मभावनेलाच नकार का दिला नाही? वरील नावांच्या बरोबरच लोकहितवादी, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, वा. म. जोशी यांच्याबद्दलही असेच प्रतिपादन करता येईल. वर उल्लेख केलेल्या सर्व थोरांचे कार्य आपापल्या क्षेत्रात मोठे आहेच; परंतु त्याबरोबरच त्यांनी ‘धर्माचा विचार’ केला, असे दिसून येते. त्यांचे विचार, निष्कर्ष व कृती वेगवेगळी होती. त्या कोणाला पटतील वा न पटतील; पण त्यांनी धर्माचा विचार आस्थेने व शोध घेण्याच्या बुद्धीने केला. त्यामधून त्यांनी समाजविन्मुख धर्म/समाजसन्मुख केला. परलोकवादी धर्म इहलोकवादी केला. ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला. धर्माचे भ्रष्टीकरण व साधनीकरण होण्याचे भय वाढते आहे अशा वेळी तर या स्वरुपाची विधायक धर्मचिकित्सा हा महत्त्वाचा प्रश्न मानावयास हवा.
     
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्माबद्दलची भूमिका तटस्थतेची आहे. काहींना ती अपुरी वा अशास्त्रीय वाटते, तर काहींना मतलबाची. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्याच्या धर्माला नकार देऊन चळवळीत सामील होण्यासाठी समिती सांगत नाही. समिती तटस्थ आहे, याचा अर्थ समिती या संघटनेच्या व्यासपीठावर कोणत्याही धर्माचे कसलेही कर्मकांड केले जात नाही आणि त्याबरोबरच कोणत्याही धर्मकार्यात संघटना म्हणून समिती सहभागी होत नाही. व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते धर्माचरणाच्या संदर्भातील आपापले निर्णय घेत असतात; परंतु तरीही एक महत्त्वाची बाब समिती करू इच्छिते आणि करतेही. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेची तरतूद कलम २५, २६, २७, २८ मध्ये आहे. त्याप्रमाणे व्यक्तीला उपासनेचे पूर्ण स्वातंत्र आहे. परंतु हे स्वातंत्र्य सार्वजनिक नीतिमत्ता, कायदा-सुव्यवस्था, राष्ट्रीय एकात्मता, सार्वजनिक आरोग्य या बाबींनी नियंत्रित केले आहे. याबाबत समाजात जागृती करण्याचे व आग्रह धरण्याचे कार्य समिती करते. उदा. २००६ साली देवदासी प्रतिबंध कायदा अधिक कडक स्वरुपात संमत झाला. कोणीही व्यक्ती अथवा तिचे पालक असे म्हणू शकत नाहीत की, माझे वय १८ वर्षे पूर्ण आहे आणि पालकांच्या संमतीने मी माझ्या धर्मपालनासाठी देवाशी लग्न लावते. हे धर्मपालन प्रत्यक्षात सार्वजनिक नीतिमत्तेला बाधक ठरते. कारण देवाशी लग्न लागणे, असे काही अस्तित्वात नसल्याने प्रत्यक्षात अशी व्यक्ती ही वेश्याव्यवसायात ढकलली जाण्याची शक्यता असते. याबरोबरच भारतीय घटनेत नागरिकांची कर्तव्ये दिली आहेत. त्यातील एक कर्तव्य सुधारणेच्या तत्त्वाचा परिपोष करणे व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे आहे. याचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून समाजसुधारणेसाठी धर्मचिकित्सा करणे, हे भारतीय संविधानाने  नागरिकांना घालून दिलेले कर्तव्य आहे. धर्मशास्त्राप्रमाणे श्रीगणेशाची मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी लागते; परंतु विषारी रासायनिक रंगांनी रंगवलेल्या व पाण्यात न विरघळणाऱ्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’पासून बनलेल्या गणेशाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात पाण्यात विसर्जित झाल्यास पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी वैज्ञानिक दृष्टिकोन व सुधारणेचे तत्त्व यांचा विचार करून या धर्माचरणाची चिकित्सा करावी लागते व पर्याय सुचवावे लागतात. खरे तर ही सर्व मांडणी समाजाला हितकारक असते. सारासार बुद्धीला ती सहजपणे समजू शकते. परंतु याबाबत स्वत:ला धर्मरक्षक म्हणवणारे कडवा विरोध करतात. त्यावेळी त्यांच्यामते धर्माची व्याख्या काय असते? ‘समाजाचे धारण करतो तो धर्म. ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. जगात असा आदर्श धर्म कुठेही नाही, तरी प्रत्येक धर्म मात्र स्वत:ला आदर्श मानतो. समाजाची धारणा म्हणजे कल्याण कशामुळे होते? ते प्रत्यक्षात होते की, नाही ते कुणी ठरवायचे? प्रत्येक धर्म हे स्वत: ठरवत असतो. धारणा होत नसेल तरच तो धर्म कुणी बदलायचा, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आमचा धर्म धारणा करणाराच आहे, असा प्रत्येक धर्माचा ठाम सिद्धांत असल्याने धर्माने धारणा होते की नाही, ही शंका उपस्थित करणे धर्मद्रोहाचे लक्षण असते. व्याख्या आदर्श अशा धर्माची करायची. आपल्या धर्माची चिकित्सा वगैरे काहीही करायची नाही आणि त्यातून लोकांसमोर असा आभास निर्माण करायचा की, त्यांचा विशिष्ट धर्म हाच आदर्श आहे. ही बौद्धिक चलाखी भल्याभल्यांच्या लक्षात येत नाही. धर्मसंबंधातील वादाचा खरा मुद्दा आदर्श धर्म कसा असावा हे सांगणे नाही, तर प्रत्यक्षातील धर्म असे आदर्श आहेत का? ते आदर्श आहेत की नाहीत हे कुणी ठरवावेआदर्श नसतील तर कुणी बदलावेत? हे ते वादाचे प्रश्न आहेत. कोणताच धर्म असे अधार्मिक व धर्मद्रोही प्रश्न उपस्थित करू देणार नाही. आजची भारताची राज्यघटना व त्यानुसार निर्माण झालेले कायदे व प्रशासन समाजाच्या धारणेसाठीच आहेत म्हणून राज्यघटनेला धर्मग्रंथ मानण्यास व त्यातील आदेशांना धर्म मानण्यास कोणताही धार्मिक तयार होत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सा करू इच्छिते; परंतु धर्माचा पगडा असलेल्या एका फार मोठ्या जनसमूहाला ही धर्मचिकित्सा म्हणजे धर्मद्रोह वाटतो. या ठिकाणी ‘अंनिस’च्या भूमिकेचे वेगळेपण व सामर्थ्य स्पष्ट होते. जगातील विवेकवादी अशी भूमिका घेतात की, धर्म या कल्पनेला पूर्णत: नकार द्यावयास हवा. इहवादी असलेले मार्क्सवादी असे मानतात की, स्वत:च्या शोषणातून मुक्त होण्यासाठी धर्म नावाच्या मिथ्या कल्पनेला लोक कवटाळतात. यासाठी त्यांना धर्मचिकित्सेत न अडकवता प्रत्यक्ष शोषणाच्या लढ्यात आणले पाहिजे. त्यामुळे वास्तव बदलेल. शोषण संपेल आणि त्या शोषणातून मुक्तीचा आधार शोधण्यासाठी धर्मभावनेला जवळ करणारे शोषितांचे मन धर्म या भ्रमातून मोकळे होईल. या दोन्ही भूमिकांच्यात संबंधितांनी धर्माकडे पाठ फिरविली आणि त्यामुळे धर्माच्या संदर्भात लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. लोकांच्या धर्मभावनेची विधायक कृतिशील चिकित्सा करणारे समितीचे कार्य यापेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामुळेच धर्माचे तथाकथित ठेकेदार समितीच्या कार्याला तीव्र विरोध करतात. कारण धर्माची चिकित्सा करणे हे काम त्यांना त्यांच्या मुळावर येणारे वाटते.

यातुधर्म     
विविध ठिकाणच्या आदिमानवाच्या सामाजिक जीवनात प्राथमिक धर्मभावना यातुप्रधान होती. विश्वातील सर्वांत - माणसात, प्राणिमात्रात, निर्जीवांच्यात - एक ‘यातु’तत्त्व आहे. त्याची उपासना विविध कर्मकांडांनी करायची. या क्रिया म्हणजे ‘यातुक्रिया’. पाऊस पाडण्याकरिता करावयाचा यज्ञ, शत्रूचा युद्धात पराभव व्हावा म्हणून करावयाचा विधी, वास्तू लाभावी यासाठीची वास्तुशांती, ग्रामदेवतांचे उत्सव या साऱ्या यातुक्रिया होत्या. त्याद्वारे सिद्ध होणारा तो यातुधर्म अशी धर्माची आदिम अवस्थेतील कल्पना होती. यातू दोन प्रकारचे होते. व्यक्ती, कुटुंब व समाज यांच्या हितासाठी करावयाची साधना म्हणजे शुक्ल यातू; तर सवत वांझ व्हावी, रक्ताच्या उलट्या होऊन शत्रू मरावा यासाठीचे उपाय म्हणजे कृष्ण यातू. चेटूक करणे, मूठ मारणे, भानामती, जादूटोणा हे त्यांचे प्रकार. या सर्व बाबी अत्यंत उघड स्वरुपाच्या व शोषण करणाऱ्या अथवा निरर्थक असणाऱ्या व त्यामुळे वेळ, बुद्धी, श्रम, पैसा वाया घालवणाऱ्या अंधश्रद्धा आहेत, हे स्पष्ट आहे. खरे तर हे सर्व यातुकल्पनेवर आधारलेले धर्मजीवन विज्ञान व आधुनिकता यामुळे दुर्बल होऊन अस्त पावावयास हवे होते. आजच्या आव्हानांना सामोरे जावयाचे तर यातुनिर्भर धर्मश्रद्धेतून माणसाने मुक्त होणे गरजेचे होते. तसा प्रयत्न ज्या प्रमाणात झाला, त्याला यश आले नाही. कृष्ण यातूमध्ये वर्णन केलेले प्रकार हे उघडपणे शोषण करणारे आहेत. म्हणून त्याचा समावेश जादूटोणा व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन २००५ या कायद्याच्या विधेयकात केला गेला. तरीही हा कायदा हिंदू धर्माच्या विरोधी आहे, असा चुकीचा डांगोरा स्वत: हिंदूरक्षक म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी पिटला. प्रच्छन्नपणे शोषण असणाऱ्या बाबींच्या संदर्भात व्यवहारात ही स्थिती आहे. मग परंपरेने चालत आलेल्या असंख्य कालबाह्य बाबी खरे तर ‘यातू’ असताना त्याला धर्म मानले जाते, यात नवल नाही. यामुळेच यातू व धर्म या शब्दांनी निर्देशित केल्या जाणाऱ्या समजुती व आचार यांच्यामध्ये एकरुपता आढळते. साधे घरबांधणीचे उदाहरण घेऊया. आजही सुशिक्षित बहुसंख्य व्यक्तीही घर बांधावयाच्या जागेचे भूमिपूजन त्या जागेतील दुष्ट शक्ती नाहीशा व्हाव्यात, या यातुकल्पनेने करतात. चौकटीपर्यंत घराचे बांधकाम झाले की, त्या चौकटीला काळी बाहुली, लिंबू, मिरची बांधतात. घरात शांती नांदावी म्हणून वास्तुशांतीची यातुक्रिया केली जाते. कुलपरंपरा असेल तर पशुहत्याही केली जाते. लग्नानंतरचा गोंधळाचा कार्यक्रम, मुरळ्या, वाघ्या यांची प्रथा, मंत्र-तंत्र, शकुन, तोडगे यांचा प्रभाव समाजाच्या सर्व घटकांत, सुशिक्षित, अशिक्षितांच्यात, शहरी, ग्रामीण लोकांच्यात, स्त्री-पुरुषांच्यात आढळतो. महाराष्ट्र समाजसुधारकांचा वारसा सांगतो; परंतु धर्म या संज्ञेचा तात्त्विक आशय पाहण्यास तो उत्सुक नाही. धर्मश्रद्धा म्हणजेच पारंपरिक यातुनिर्भर श्रद्धा असेच मानले जाते. यातून संकट टळेल, पुण्य मिळेल अशी अपेक्षा भक्ताच्या अंत:करणात असते. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. अंत:करणाच्या शुद्धीला त्यांनी महत्त्व दिले आहे. कर्तव्य कर्म करावेच; पण ते ईश्वरअर्पण बुद्धीने करावे, माणुसकीने वागावे हे संतांनी सांगितले आणि आचरलेही; परंतु नव्या धर्मश्रद्धेचा हा मार्ग पारंपरिक यातुक्रियांची जागा घेऊन मराठी मनाला व्यापून टाकू शकला नाही, असा अनुभव येतो.

धर्माचे आधार
यातुप्रधान धर्म असो अथवा धार्मिक दर्शनाचा विषय असलेले अतीत तत्त्व; त्यांना खरेखुरे अस्तित्व आहे का, हे प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने उपस्थित करता येतात व ते रास्त आहेत व करावयासही हवेत, असाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचार आहे. मात्र याबाबत प्रयत्न करतानाच धर्माला अगाध सामर्थ्य कशामुळे लाभले, याची समाजशास्त्रीय जाणही हवी. मानवी संस्कृतीत मानवी अनुभवाची व त्याच्याशी संलग्न असणाऱ्या व्यवहाराची जी अनेक रूपे प्रकट झाली आहेत, त्यापैकी धार्मिक अनुभव व व्यवहार हे एक रूप आहे. मानवी बुद्धी ज्यावेळी पुरेशी तार्किक बनली नव्हती, तेव्हा धर्मासारखी गंभीर संस्था निर्माण झाली. ती हजारो वर्षे मानवी मनाचा ताबा घेऊन वावरली. आजही बालमनात व इतरत्रही धर्म हा बुद्धिवादाच्या अनुरोधाने वाढत नाही. धार्मिक विचार हे तर्कशुद्धतेवर आधारलेले नसतात म्हणून समुदायाच्या लेखी त्याची मातब्बरी कमी होत नाही, असे मानसशास्त्र मानते. मानवी जीवनाचे एक अंग तर्काच्या कक्षेच्या बाहेर असते. यामुळे माणसाला विश्वात प्रतीत होणारा जो अनुभव असतो, तो स्वभावत:च दुहेरी असतो - एक म्हणजे सभोवतालच्या वस्तूची प्रचीती देणारा इंद्रियजन्य अनुभव आणि अतीत तत्त्वाची प्रचीती देणारा अध्यात्मिक धार्मिक अनुभव असे धर्मश्रद्धा मानणाऱ्यांचे प्रतिपादन असते.

धर्माचा आविष्कार हा कर्मकांडाद्वारे होतो. अरिष्टाचे भय नाहीसे व्हावे व इष्टाची तीव्र कामना यामधून ही कर्मकांडे पार पाडली जातात. ही सर्व जाणीव हजारो वर्षांच्या संस्कारातून माणसाच्या मनाच्या अबोध पातळीवर स्वीकारली गेली आहे. माणसाचे हे अव्यक्त मन फार प्रभावी असते. त्याला चिकित्सेची कदर नसते. त्यामुळे प्रत्यक्ष जागृतीमधील विश्वापेक्षा धर्माचे हे अव्यक्त मनातील आभासयुक्त विश्व त्याला खरे वाटले. या विश्वाचे दार यातुक्रियासदृश कर्मकांडांनी उघडता येते, ही बाब माणसांनी सहजपणे स्वीकारली. बिनतोड युक्तिवादाचा सगळा प्रभाव हा व्यक्त मनावरच होतो. अव्यक्त मनाचा भाग बनलेल्या कर्मकांडांना व त्याला अनुषंगून असलेल्या श्रद्धा या अव्यक्त मनाच्या अंगभूत सामर्थ्याने चिकित्सेपासून दूरच राहिल्या. याबरोबरच एक महत्त्वाचे सामाजिक सत्यही आहे, ते असे की, अदृष्टाची भीती व अतृप्त कामनांची पूर्ती या पोटी माणसांनी अतीताबरोबर कर्मकांडाद्वारे जोडलेला धर्म स्वीकारला; त्या दोन्ही बाबी वेगळ्या स्वरुपात; परंतु पूर्ण ताकदीने आजही मौजूद आहेतच. जीवनाचे सर्व आयाम हे आज एका अदृश्य भीतीने व्यापलेले आहे. जगात कुठल्या क्षणी काय घटना घडेल आणि त्याचे थेट परिणाम माझ्या जीवनापर्यंत कसे घडतील, याची अनिश्चितता इतकी वाढली आहे की, अदृष्टाच्या भीतीचे क्षेत्र कमी न होता विस्तारले आहे की काय, असे वाटावे अशी स्थिती आहे. शिवाय मृत्यूची भीती हे सनातन सत्य तर सार्वत्रिक आहे. अतृप्त कामनांच्या पूर्तीबाबतही हेच म्हणता येईल. उपभोगाचे एक अमर्याद विश्व आज खुले झाले आहे. यामुळे अतृप्त कामना क्षणाक्षणाला खुणावत असतात. अशावेळी त्यांच्या पूर्तीसाठी धर्म जवळचा न वाटला तर नवल. याबरोबरच हे लक्षात घ्यावयास हवे की, व्यक्तींनी स्वीकारलेल्या धर्मश्रद्धेला एक सामाजिक रूप आपोआप प्राप्त होते, समुदायप्रियता ही माणसाची एक सहज प्रवृत्ती आहे. समुदायाच्या संगतीत माणूस सहजच समुदायाप्रमाणे वर्तन करतो. सत्य काय, असत्य काय याची तपासणी करणारी तार्किक बुद्धी समुदायात मंदावते. न तपासलेल्या कल्पना सहजपणे स्वीकारल्या जातात. याला Collective thinking of group mind अशी संज्ञा आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस समुदायात वावरतो. मनाच्या कणाकणात संघाच्या सामर्थ्याची छाप पडते. जन्म, लग्न, पूजा, अंत्यविधी या जीवनातील प्रमुख घटनांत सामुदायिक कर्मकांडावरच भर असतो. व्यक्तिगत कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्यास आवश्यक ते आचारनियम तयार करणारी, मानवी उत्सवप्रिय प्रवृत्तीस वाव देणारी धार्मिक कर्मकांडे माणसाच्या मनाला पटतात. उदा. संक्रांत, भाऊबीज, रक्षाबंधन ही या स्वरुपाची धार्मिक कर्मकांडे असतात. दुसऱ्या बाजूला, जी कर्मकांडे अनावश्यक, अर्थहीन अंधश्रद्धा वाढविणारी वाटतात, ती दूर करण्याची हिंमत या कर्मकांडांना पाठिंबा असणाऱ्या सामुदायिक विचाराच्या प्रभावामुळे होत नाही. धर्माचे स्वरूप दैवी व्यक्तीची आज्ञा असे मानत असले, तरी खरोखर मनुष्याच्या मनावर समाजाच्या शक्तीचे दडपण असते. धर्मातील विधिनिषेध, कर्मकांडे यामागे सामाजिक शक्ती असते आणि त्याविरुद्ध बंड करून उठण्याचे सामर्थ्य समुदायप्रिय असलेल्या व अपरिहार्यपणे समाजातच जगणाऱ्या व्यक्तीला कमी असते. धर्म अशा रीतीने समग्र जीवनाला वेढून टाकतो. त्याची अंगोपांगे ही मनुष्याच्या मूलभूत प्रेरणाशी सहजपणे जोडली गेली आहेत म्हणून इतर कोणत्याही सामाजिक संस्थेपेक्षा धर्माचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र आढळून येतो. 
क्रमशः
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...