मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 2/3)




धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 2/3)
दाभोलकर, धर्मचिकित्सा, यातुधर्म, नैतिकता, मानवीयता, कर्मकांड, विवेकवाद, मनुस्मृती  
धर्माचे भाग
व्यवहारात जी धार्मिकता येते, त्यामध्ये प्रथा, रूढी, चाली-रीती असतात. उपासनापद्धती असते, पुरोहितशाही व कर्मकांडे असतात, समाजव्यवस्था व नियमन असते आणि अहिंसा, सत्यपरिग्रह अशी उच्च नैतिक मूल्येही असतात. या सर्वांच्या मिलाफातूनच धर्म साकार होतो आणि धर्मपण व्यक्ती मानसात, समाजमानसात एकवट मुरलेले असते.
     
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना किंवा धर्मनिरपेक्ष पद्धतीने समाजजीवन घडवताना याचा विचार सारासार विवेकाने करावयास हवा. धर्माच्याच नावाने बळकट झालेल्या रूढी, परंपरा सर्वच धर्मांत प्रगतीचे अडथळे ठरत असतात. चुकीच्या मार्गाने समाजाला नेत असतात. उदाहरणे नेहमीची आहेत; पण त्याबाबत प्रश्न विचारणेच लोकांना आक्षेपार्ह वाटते. मुलगी ही दानपात्र वस्तू समजून मोठ्या हौसेने कन्यादान केले जाते. स्वत:चा कोणताही अपराध नसताना विधवा बनलेल्या स्त्रीला हळदी-कुंकवात अघोषित मज्जाव असतो. शुभकार्यात तिचे पांढरे पाऊल न पडेल, याची दक्षता घेतली जाते. कन्यादान होत असताना स्वत:च्या पोटात जिने मुलीला वाढविले, तिला तो हक्क वैधव्यामुळे नाकारला जातो. कन्यादानाची प्रथा चूकच आणि त्यामध्ये विधवा झाली, या कारणासाठी आईला दूर ठेवणे ही तर महाचूक. वेळेचे अपरंपार महत्त्व असलेल्या आजच्या गतिमान समाजात प्रत्येक पिंडदानाच्या कार्यक्रमावेळी स्मशानात शेकडो लोक पिंडाला कावळा कधी शिवतो, याची वाट पाहत हजारो तास वाया घालवतात. एका विवाहाला ५ ते १० किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात आणि महाराष्ट्रात दरवर्षी तीन लाख लग्ने होतात. याचा अर्थटंचाई असलेला सुमारे ३० लाख किलो तांदूळ रंगवून म्हणजे खाण्याला निरुपयोगी बनवून अक्षता टाकणे, या रुढीपायी उधळला जातो व शब्दश: पायदळी तुडवला जातो. मुसलमान समाजात तीन वेळा ‘तलाक’ हा शब्द तोंडी उच्चारला तर केवढेही दीर्घ विवाहबंधन संपुष्टात येते. लग्न हा करार असल्याने तलाकपीडित पत्नीला पोटगी देण्याचीही गरज उरत नाही. मूल होण्याची अजिबात शक्यता नसली तरी जोडप्याला मूल दत्तक घेता येत नाही. या रुढींना धर्माचे प्रामाण्य द्यावयाचे का, हे पदोपदी प्रश्नचिन्हांकित करावयास हवे.

आपापल्या दैवताची उपासना कशी करावी? आपले पारलौकिक कल्याण कसे साधावे? हा खरे तर ज्या-त्या व्यक्तीचा प्रश्न आहे आणि त्याचा अधिकारही. पण त्यासाठी जे केले जाते त्यामध्ये फक्त आंधळेपणाच असेल, तर व्यक्तिगत धार्मिक उपासना म्हणून त्याचा आदर करावयाचा की सारासार माणूसपण गहाण पडते म्हणून त्याचा अव्हेर करायचा! महाराष्ट्रातल्या जत्रा-यात्रांत पावलोपावली हा प्रश्न पडतो. देवाला केलेला नवस फेडण्यासाठी पळत येऊन मंदिराच्या दगडी भिंतीवर टक्कर देऊन डोके फोडून घेणे, पाठीच्या कातडीतून धारदार गळ आरपार घालून घेणे, बैलगाडीवर ठेवलेल्या काठीच्या बगाडाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत टांगून ठेवून ती बैलगाडी पळवत नेणे, नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने देवापुढे बोकड मारून रक्तमांसाचा चिखल करणे, धुळीत लोटांगणे घालत देवळाला प्रदक्षिणा घालणे अशा सर्व बाबी त्या-त्या व्यक्ती वा संप्रदाय यांच्या लेखी उपासनापद्धतीच असतात. आरती किती वेळा करावी? नमाज किती वेळा पढावा? गायत्री मंत्राचे पठण किती वेळा करावे? रूद्राक्षाची माळ कितीदा ओढावी? रोजे किती कडक पाळावेत? मांसाहार पूर्णपणे सोडावा, सूर्यास्तापूर्वी भोजन उरकून घ्यावे, अग्निहोत्राने स्वत:ची अध्यात्मिक चलती साधावी, अशा उपासनेच्या प्रत्येकाला इष्ट वाटणाऱ्या आणि फलदायी ठरणाऱ्या या पद्धती या इतर कोणाला अर्थहीन आणि अनावश्यक वाटल्या, तरी त्याचे आचरण करण्याचा व आपले लौकिक व पारलौकिक कल्याण साधण्याचा व्यक्तीचा अधिकार मान्यच आहे. परंतु डोळसपणे त्याची कालयोग्य चिकित्सा करण्याचा अधिकारही मान्य व्हावयास हवा की नको? दगडूशेठ हलवाई गणपतीपुढे काही वर्षांपूर्वी अग्नीत लक्ष मोदकांची आहुती दिली. ते उपासना स्वातंत्र्य म्हणून मान्य करावे काय? वैराग्याची मूर्ती असणाऱ्या बाहुबलीच्या मस्तकावर शेकडो लिटर दही, दूध, तूप, मध यांचा वर्षाव धर्मउपासनेची सुसंगत की विसंगत? कालबाह्य धार्मिक व्रते ही धार्मिक उपासनेचा भाग केल्याने कोणते धर्माचरण साधते, याचा विचार सूज्ञपणे करावयास हवा, असे समितीला वाटते.

धर्माचा विषय खरे तर ईश्वर आणि मनुष्य यांचा संबंध हा आहे. परंतु संपूर्ण मानवी जीवनाला गवसणी घालण्याच्या धर्माच्या प्रवृत्तीमुळे धर्म आणि नीती ही एकमेकांशी कायमची जोडली गेली आहे; किंबहुना धर्माशिवाय नीती असून शकते, अशी कल्पना करणेसुद्धा माणसाला जड जाते. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांत सुसंवाद असावा, सहकार्याची भावना नांदावी, सर्व माणसांच्या मूलभूत गरजांची परिपूर्ती आणि व्यक्तित्त्वाचा विकास सामूहिक प्रयत्नातून व्हावा, यासाठी नीतिमूल्ये व नीतिनियम यांची आवश्यकता असते. नीतीच्या या कार्याचा तसा धर्माशी काही साक्षात् संबंध नाही. तेव्हा धर्माशिवाय नीती संभवतच नाही, ही कल्पना चुकीची आहे. वेगवेगळ्या धर्माच्या नावाखाली आजतगायत जवळपास सर्व धर्मांत अनीतीची व क्रूरपणाची कृत्ये घडली आहेत. जगाच्या इतिहासात धर्माच्या प्रेरणेनुसार अटीतटीचे झगडे झाले आहेत. रक्तपात व कत्तली झाल्या आहेत. सर्वांत भयावह म्हणजे या अमानुष नरसंहाराचा अभिमानच बाळगला गेला आहे. कारण ही सर्व कृत्ये धर्मासाठी केलेली असल्यामुळे धर्मकृत्ये होती. त्यामुळे ती नैतिकच आहेत, असे मानले गेले. सत्य, अहिंसा, समता, दया, क्षमा, सहिष्णुता इत्यादी सर्वमान्य मूर्त नीतितत्त्वे आणि सामाजिक जीवनातील त्याचा व्यवहार यात फरक असतो, रीती म्हणून उच्च तत्त्वाचा उद्घोष करणे सोपे असते; परंतु माणसाचा नैतिक व्यवहारही समाजव्यवस्थेच्या एका चौकटीतच होत असतो. त्या व्यवस्थेचे स्वरूपच व्यावहारिक नीतीला जन्म देते. त्या व्यवस्थांमध्ये परिवर्तनाचा विचारही केला जात नाही. अमूर्त नीतितत्त्वाचा जयजयकार आणि व्यवहारात संस्थाअंतर्गत अनीतीला धर्ममान्यता असा अंतर्विरोध धर्मात आणि हिंदू धर्मात तर फारच ठळकपणे दिसून येतो. हिंदू धर्मातील तत्त्वचिंतकांना, साधू-संतांना अस्पृश्यता, स्त्रीदास्य, शूद्रांचे सर्व प्रकारचे शोषण या गोष्टी गंभीरपणे अनीतिमूलक आहेत, अशी शंकासुद्धा आली नाही. जमीनदार, सावकार, पुरोहित, राजा, शासनसंस्था यांच्याद्वारे कित्येक शतके कष्टकरी लोकांचे जे राजरोस शोषण चालू होते, त्यात पुरेपूर अनीतीच आहे, असे त्या-त्या काळातील जाणत्या जबाबदार व अत्यंत धार्मिक लोकांनाही कधी वाटले नाही. समग्र समाजजीवनच अंतर्विरोधाने भरलेले होते. अजूनही ते तसेच आहे. त्यामुळे धर्माच्या आधारे नीतिमान समाजाची निर्मिती करण्याचा पुकारा करणाऱ्या शक्तींची चिकित्सा करण्याची गरज आहे. धर्म आणि नीती यांच्या या स्वरुपामुळे हिंदू माणसाच्या मनावर एका विशिष्ट प्रकारचे संस्कार झाले आहेत. व्यक्तिगत जीवनातील नीतिनियम तो पाळतो; पण सामाजिक नीतीबाबत उदासीन असतो. स्वत:चे शरीर, घर कटाक्षाने स्वच्छ ठेवले जाते; पण रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडलेले असले तरी त्याबद्दल काही वाटत नाही. उलट सहजपणे त्या ढिगात स्वत:च्या घरातील कचरा नेऊन टाकला जातो.
     
आपल्या सामाजिक जीवनात जिकडे-तिकडे स्वार्थीपणा व भ्रष्टाचार बोकाळला आहे. धर्मश्रद्धेचा लोप झाल्याचा हा परिणाम आहे, असे सनातनी लोक म्हणत असतात. धर्मबंधने सैल झाल्यामुळे नीती, अनीतीचा धरबंद राहिलेला नाही, हा कार्यकारणभाव पटण्याजोगा नाही. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले लोक परंपरागत धर्मातील रूढ आचार पाळण्यात सर्वांत पुढे असतात, ही खेदजनक वस्तुस्थिती सर्वत्र व सर्व धर्मात दिसते. तीर्थयात्रा, दान-धर्म, व्रतवैकल्ये, जप-ज्याप्य हे सर्व काही व्यवस्थित चालू असते. खऱ्या विशुद्ध नैतिक धर्माशी त्यांचे काही देणे-घेणे नसते. म्हणून एका बाजूला धर्माचा उदंड उदो-उदो आणि त्याच वेळेला दुसरीकडे आकंठ भ्रष्टाचारात बुडालेला समाज, असे चित्र आज आपल्या देशात दिसते. भ्रष्टाचाराने स्वत:चा सर्व प्रकारचा अनैतिक स्वार्थ साधणाऱ्या सामान्य जनानांच नव्हे, तर त्यांचे नेतृत्व करणाऱ्या कथित धार्मिक वृत्तीच्या नेत्यांना यामध्ये काही चूक आहे, असे वाटत नाही. म्हणूनच समाजातील अनेक अपप्रवृत्तींचा संबंध धर्मश्रद्धेच्या लोपाशी आहे, हे नाकारावे लागते. या अपप्रवृत्ती सध्याच्या अर्थरचनेने व एकंदर समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत व जोपासलेल्या मनोवृत्तीत आहेत. धर्माच्या आधारे व्यक्ती आणि समाज अधिक नीतिमान करणे हे ज्यांना करावयाचे असेल त्यांना तसे स्वातंत्र्य भारताच्या घटनेनेच दिले आहे; परंतु प्रत्यक्षातील आचरणाच्या कसोटीवरच त्याचे मूल्यमापन कठोरपणे करावयास हवे. नीतिमान समाजासाठी धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, मानवतावादी विचारसरणीचा व त्या मूल्यभावनांचा सर्वत्र प्रसार होऊन त्याला समाजाची मान्यता मिळणे, हीच आजच्या काळाची गरज आहे.
     
धर्मातील रूढी, परंपरा, कर्मकांडाद्वारे व्यक्त होतात. कर्मकांडे ही कोणत्याही मानवी संस्कृतीत आहेत आणि असणारच. ती माणसाच्या परस्परसंवादाची आणि उपजत कृतज्ञता बुद्धीची आविष्कार असतात. मात्र शोषणाला पूरक आणि मिथ्याकथनाचा आधार घेणाऱ्या कर्मकांडांना विरोध करावा लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे म्हटले आहे की, ‘खुळचट कर्मकांडांनी देश भिकेला लागला.’ व्यक्तीने कोणती कर्मकांडे करावीत? याचे वर्णन करणाऱ्या ‘राजतरंगिणी’ या प्राचीन ग्रंथात, वर्षभरात करावयाच्या एकूण ७०० कर्मकांडांचा उल्लेख आहे. याचा अर्थ व्यक्तीला त्यापलिकडे काही सवड शिल्लकच राहत नाही. केली कर्मकांडे तर बिघडले काय, असा प्रश्न सतत विचारला जातो. कर्मकांडांचे तोटे अनेक आहेत. एक तर कर्मकांडप्रधान व्यक्ती आणि समाज बौद्धिकदृष्ट्या योग्य अशा ऐहिक व्यवहारास दुय्यम स्थान देतात, त्यामुळे सामाजिक अवनती होते. उदा. संशोधन मागे पडते. दुसरे असे की, ज्या समाजात अशा कर्मकांडांचे स्तोम माजते, त्या समाजाची आर्थिक पीछेहाट होते. आर्थिक व्यवहारात लागणारा उत्साह व उपक्रमशीलता भजन-पूजनात जातो. श्रीमंतांनाच ते परवडते आणि कथित मोक्षाचे धनीही तेच होतात. तिसरे असे की, कर्मकांडे हा एक प्रकारचा बहिर्मुख निवृत्ती मार्ग आहे. व्यक्ती त्यामुळे आत्मकेंद्रित होते आणि परलोकाच्या कल्पनेत अडकते. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरोहित वर्गाचा स्वार्थ साधला जातो. ज्या परमेश्वराच्या उपासनेसाठी कर्मकांडे केली जातात, तो परमेश्वर मानणाऱ्या संतांनाही त्याची गरज लागत नाही. परमेश्वराचे नुसते नामस्मरणही त्याला पोचते, असा त्यांचा विश्वास असतो. खरा प्रश्न असतो, तो असा की, भावना परोपकाराची हवी, नीतीची हवी. ही भावना नसून कर्मकांडे असतील तर त्याचा उपयोग शून्य आणि ती असतील तर कर्मकांडांची गरजच नाही. ज्या कर्मकांडात नैतिक नियमांना प्राधान्य असते, त्यांना व्रते म्हणतात. उदा. सत्य भाषण. तेव्हा धर्मातील कर्मकांडाचा भाग साक्षेपाने विचारात घ्यावयास हवा.
     
धर्माचा आणखी एक भाग पुरोहितशाहीचा आहे. परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी निर्माण झालेली ही दलाल व्यवस्था आहे. परमेश्वराला जे-जे काही द्यावयाचे, ते-ते पुरोहितामार्फत देण्यात येते आणि व्यवहारात पुरोहित त्याचा उपभोग घेतो. बहुतेक धर्मात ही व्यवस्था दिसते. परमेश्वराकडे पोचण्याचे एक शास्त्र आहे आणि प्रत्येक कार्य जसे त्याला कार्याशी प्रशिक्षित तज्ज्ञाला दिले जाते, त्याच पद्धतीने देवाच्या पूजेचे कार्य हे प्रशिक्षित पुरोहित करतो, असा युक्तिवाद केला जातो. यात तथ्य नाही, असेच मानावयास हवे. देव आहे की नाही, हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू; पण तो आहे, असे मानले तरी त्याची जी गुणवैशिष्ट्ये आणि थोरवी वर्णिली आहे. त्याच्याशी कोणत्याही स्वरुपातील मध्यस्थाची कल्पना ही अनावश्यक व विसंगत ठरते. प्रत्यक्षात एका बाजूला ती बहुसंख्य ठिकाणी एका जातीतच बंदिस्त झाली आहे. ज्याला पुरोहित अथवा पुजारी व्हावयाचे असेल, त्याचा अभ्यासक्रम तयार करावा व तो उत्तम प्रकारे उत्तीर्ण होणाऱ्या कोणाही स्त्री-पुरुष व्यक्तीस ते स्थान द्यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ सालीच केली होती.
     
नीती हा धर्मातील चौथा भाग आहे. मानवाच्या मनात नीतीची भावना धर्मामुळे येते. नीतीने वागले नाही तर भीती वाटते ती धर्माची आणि सगळे जग माझ्याविरोधी गेले तरी चालेल; पण मी नीतीनेच वागेन, अशी हिंमतही सामान्य माणूस धार्मिक नीतीच्या आधारेच बाळगतो, असे धर्माचे समर्थक सांगतात. संघटित धर्माचा उदय हा मानवी जीवनात नीतीची स्थापना करण्यासाठी झाला आणि तसा प्रयत्न धर्माने चुकत-माकत केलाही आहे. धर्माचा आधारच काढून घेतल्यास माणूस अनीतिमान होणार नाही का, समाज नीतिभ्रष्ट बनणार नाही का, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाच्या उत्तरातील पहिला भाग असा की, कोणीही व्यक्ती जर असा दावा करत असेल की, ‘ती नैतिक जगते. याचे कारण तिला तिची धर्मभावना, नैतिक जगण्याची शक्ती देते,’ तर अशा व्यक्तीबद्दल समितीला आदर वाटतो. नीतीने जगणे ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे, असे समिती मानते. मात्र याबाबत एक अपेक्षा समिती बाळगते. चांगल्या आचरणाचे आदेश सर्व धर्म प्रवर्तकांनी दिले आहेत. सत्य बोलावे, हिंसा करू नये, दयाभाव बाळगावा, प्रेम करावे. या नियमांची आवश्यकता व उपयोगिता नाकारता येत नाही; पण परिस्थिती अनेकदा अनपेक्षित असते, वेगळी असते. नीतिनियमांना बाधा आणण्यावाचून गत्यंतरच उरत नाही. सत्य बोलावे हे ठीक; पण रोगी ज्यावेळी स्वत:च्या प्रकृतीबद्दल विचारतो, तेव्हा सर्व सत्य सांगणे अपायकारक ठरण्याची शक्यता असते. घरात विषारी नाग निघाला तर अहिंसेचे पालन योग्य ठरत नाही. यामुळे नीतिनियम व आचरण यांचा मेळ घालणे अवघड बनते. यासाठी या विसंगतीचा निचरा करून सगळ्या इष्ट नीतिकल्पनांना सामावून घेणारे व्यापक तत्त्व असणे आवश्यक आहे. वरील धार्मिक नीतिनियमांचे पालन करावे, असे म्हणण्यात हेतू असतो की, हे नियम चांगले आहेत. विशिष्ट परिस्थितीत सत्य बोलावे की बोलू नये, हिंसा करावी की करू नये, याबद्दल मतभेद असत नाहीत. कोणकोणते वागणे चांगले, याची मोजदाद शक्य नाही त्यापेक्षा चांगले या शब्दाने कोणता अर्थ सांगितला जातो, हे पाहणे उपयुक्त ठरेल. चांगले या संज्ञेचा हा अर्थ, म्हणजे विवेकवादाचे सर्वसमावेशक व्यापक तत्त्व होय. याचा अर्थ एवढाच की, धर्मांनी सांगितलेली नीती ही देखील विवेकवादाच्या आधारे तपासता येऊ शकते. धार्मिक नीतीचा दुसरा भाग असा की, जो संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून लोकांपर्यंत पोचवीत असत. त्यांच्या मते भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, अडाण्याला शिक्षण, बेघराला घर, आजाऱ्यांची शुश्रुषा, प्राण्यांना अभय, हाच धर्म होता. रूढ धार्मिक नीतीला या मानवधर्मी नीतीने प्रभावित केले गेले पाहिजे. धार्मिक नीतीबाबत तिसरा महत्त्वाचा लक्षात ठेवण्याचा भाग असा की, इतिहासात असे घडले आहे की, धार्मिक पद्धतीने विचार करण्याची रीत सर्वांत प्रभावी बनली. सर्वांवरील सर्वोच्च मूल्य, असे धर्माला मानण्यात आले. याची आता गरज नाही. विविध धर्म आणि त्यातील धार्मिक माणसे जी मानवी मूल्ये मनोमन मानतात, त्या मूल्याकडे केवळ मानवी मूल्य म्हणून बघता येणे शक्य आहे. निकोप सामाजिकता, सौंदर्यविषयक मूल्य, न्याय, समता, बंधुभाव या कल्पना तर धर्मकल्पनेवर आधारण्याची आवश्यकता नाही. व्यक्ती धार्मिक असो वा नसो; प्रत्यक्ष अनुभवातून तिला असे वाटते की, मानवी जीवन सतत जास्तीत जास्त सुधारता येणे शक्य आहे. ही वाटचाल नैतिकतेची आहे. ती विवेकाच्या आधारे करता येते, असे समिती मानते. मात्र धार्मिक नीतीच्या आधारे प्रामाणिकपणे हे कोणी करू इच्छित असेल तर समिती त्याचे स्वागतच करते.
     
धर्माला समाजव्यवस्था-शास्त्र हा एक महत्त्वाचा अर्थ आहे. लोकमान्यांच्या गीता रहस्यातील पुढील उल्लेख पाहावा. धर्म हा शब्द नित्य व्यवहारात कित्येकदा निव्वळ पारलौकिक अर्थी वापरतात. आपण एखाद्यास तुझा धर्म कोणता?’ असा प्रश्न करतो, तेव्हा पारलौकिक कल्याणार्थ तू कोणत्या मार्गाने जातोस, वैदिक, बौद्ध, जैन, ख्रिस्ती की महम्मदी असे विचारण्याचा आपला हेतू असतो आणि तोही त्याप्रमाणे उत्तर देतो. ‘अथा तो धर्मजिज्ञासा’ या सूत्रालाही धर्माचा हाच अर्थ अभिप्रेत आहे. पण एवढाच अर्थ धर्म या शब्दाचा नाही. उदा. चतुर्विध पुरुषार्थाची गणना करताना धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे म्हणतात. यातील धर्म या शब्दातच मोक्ष (पारलौकिक धर्म) येत असेल तर शेवटी निराळा पुरुषार्थ सांगण्याची गरज नव्हती. धर्म या शब्दात तत्कालीन समाजव्यवस्था शास्त्र हाच अर्थ विवक्षित असतो.
     
तेव्हा धर्म म्हणजे रूढी, परंपरा, उपासनापद्धती, सज्जनपणा, सद्गुण एवढाच अर्थ नाही. आम्हाला धर्माचे राज्य स्थापन करायचे आहे, असा पुकारा या देशात अनेकजण करतात. त्यावेळी त्यांचे दाखवायचे दात आणि खाण्याचे दात वेगळे असतात. धर्म याचा अर्थ लोकांना सांगण्यासाठी नैतिक व सांस्कृतिक मूल्यांना असलेली एकूण निष्ठा हा असला तरी व्यवहारातील अभिलाषा, धर्माच्या आधारे समाज नियंत्रणाची असते. समाजव्यवस्थाशास्त्र हा गुलामगिरीच्या व सरंजामशाहीच्या काळात धर्माचा विषय होता. आधुनिक काळात समाजव्यवस्थाशास्त्र हा राजकारणाचा विषय आहे; धर्माचा नव्हे.
     
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातील भूमिका धर्माबाबत तटस्थपणाची आहे. याचा अर्थ भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेले देशउभारणीचे स्वरूप व तत्त्व मोडीत काढून ते विशिष्ट धर्माचे राष्ट्र म्हणून उद्घोषित करण्याचा काही मंडळींच्या उपद्व्यापाचा प्रतिवाद वा प्रतिकार करायचा नाही, असे मुळीच नव्हे. उलट या कारस्थानातील व्यापक धोके लोकांना समजावून सांगणे हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या व्यापक आशयाशी अत्यंत सुसंगत आहे. देशातील समाजकारण, राजकारण, अर्थकारण याचा आधार तथाकथित संत-महंताची धर्मसंसद नक्की करेल, अशा वल्गना या देशात सतत करणाऱ्या बलाढ्य संघटना आहेत. यामुळे हे कधी नव्हे एवढे आवश्यक झाले आहे.
     
धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व मोडीत काढणे हे पूर्णत: संविधानविरोधी आहे, अशी ग्वाही सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिली आहे. धर्माच्या आधारे मते मागितली आणि निवडून आले तरी निवडणूक रद्द होते. कारण एक माणूस, एक मत, एक मूल्य या पायाभूत कल्पनेलाच त्यामुळे सुरूंग लागतो. धर्माचा प्रभाव राजकारण, समाजकारण एवढेच नव्हे, तर जीवनाची सर्व अंगे यावर घट्ट पाडण्याचा ब्राह्मणी धर्माचा शेकडो वर्षांचा अनुभव असताना तर ही गरज अधिकच जाणवते. मनुस्मृतीमधले राजकारण राजाने दंडसत्तेचा वापर कसा करावा, याबद्दल आहे. त्यात भयानक वर्ण विषमता आहे. एक चोरी सोडून बाकीच्या सर्व गुन्ह्यांबद्दल ब्राह्मणांना सौम्य शिक्षा आहेत. इतर वर्णियांना चढत्या क्रमाने शिक्षा आहेत. शूद्रांकरिता क्रूर, अमानुष अशा शिक्षा सांगितल्या आहेत. राजाने दंडसत्तेचा वापर अप्रतिहत करावा, नाहीतर अराजक माजेल असा इशारा मनुस्मृती देते; पण मनूची अराजकाची व्याख्या काय आहे?
     
तर कावळे, कुत्रे यज्ञातील पायसादी हवन लांबवतील, शूद्र सामर्थ्यवान होतील. वर्णसंकर होईल. मनुस्मृतीच्या ९ व्या प्रकरणात मनूने स्त्रियांच्या स्वाभाविक प्रवृत्तीविषयी जे शेरे मारले आहेत, ते वाचताना आज कुठल्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाईल. अर्थात, बहुतेक सर्वच धर्मशास्त्रांमध्ये स्त्रिया, शूद्रातिशूद्र यांना धर्माच्या नावाने अमानुष वागणूक दिली आहे. बोहरा धर्मगुरू धर्माच्या आधारे त्यांच्या धर्मातील लोकांवर जी दंडेली आज राजरोसपणे करतात किंवा परदेशगमनासाठी वाहनांचा वापर केला म्हणून जैन साध्वींना धर्माचार्य धर्मबहिष्कृत करतात, त्यामध्ये धर्मदंडाच्या आधारे व्यक्ती, समाजव्यवस्था नियंत्रित करण्याचा दुराग्रह स्पष्ट दिसतो, या सर्वांचा प्रतिवाद आवश्यकच आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य ही सारासार बुद्धी वापरण्यास व्यक्तीला प्रवृत्त करणारी चळवळ आहे. हे राष्ट्र हिंदूंचे व्हावे म्हणून प्रचार करणारे हे सध्या सारासार बुद्धीने समजणाऱ्या सत्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत काय, अशी शंका येते. राष्ट्र हिंदूंचे झाले तर मुसलमानांचे करायचे काय? एकतर सर्व बारा कोटी मुसलमानांना देशाबाहेर काढावयास हवे, जे अशक्य आहे. त्यांना ठार मारून नष्ट करणे हे त्याहूनही अमानुष आणि अशक्य आहे. युद्ध करणे आणि त्यांना गुलाम करणे हे कदाचित ७० कोटी हिंदूंना वरपांगी शक्य होईलही; परंतु शस्त्रास्त्रे कोठूनही मिळणाऱ्या आजच्या जमान्यात हा उपाय म्हणजे स्वत:च्या हाताने स्वत:ची उद्ध्वस्ततेकडे आणि अराजकाकडे वाटचाल ठरेल. हे सारे स्वच्छपणे समजत असताना एकच गोष्ट उरते ती म्हणजे न्यायाचे, बंधुतेचे, प्रतिष्ठेचे सहजीवन जगण्याची. हे सर्व लक्षात घेता अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे मानते की धर्मातील नैतिक आशयांच्या आचरणाबाबत धार्मिक व्यक्तीसमवेत संवादी व कृतिशील भूमिका घ्यावी. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेच्या चोख अंमलबजावणीचा आग्रह धरावा आणि विवेकवादी जीवनदृष्टीने जगत असताना कोणत्याही धर्माला एक समग्र पर्याय देण्याचा प्रयत्नही करावा. धर्माच्या नावाने कुठल्याही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषणाची चिकित्सा करावयास हवी व शक्यतो प्रतिकारही करावयास हवा, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानते. घटनेचीही या दृष्टिकोनास संमती आहे. कोणत्याही धर्माच्या आचाराशिवाय स्वत:च्या विवेकाच्या साह्याने नैतिकदृष्ट्या संपन्न जीवन जगता येते.
     
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००८)
क्रमशः




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...