बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 3/3)




धर्मचिकित्सेतून मानवतेकडे (भाग 3/3)
दाभोलकर, धर्मचिकित्सा, यातुधर्म, नैतिकता, मानवीयता, कर्मकांड, विवेकवाद, मनुस्मृती  
धर्म या विषयाबाबत मांडणी करताना जे-जे आक्षेप घेतले जातात, त्या-त्या बाबतीत एक युक्तिवाद नेहमी केला जातो. तो असा की, हे आक्षेप खऱ्या धर्माविषयी नाहीतच. खरा धर्म माणसामाणसांत भेदभाव करत नाही. शोषणाला, हिंसेला खऱ्या धर्माची मान्यता कधीच नसते. धर्माच्या नावाखाली इतिहासात जो दुष्टपणा घडला तो वस्तुत: धर्माची विकृती होती. जे चांगले घडते ते खऱ्याखुऱ्या धर्मामुळे घडले. मग प्रामाणिकपणे खऱ्या धर्माची व्याख्या करावी लागेल. या व्याख्येत एक बाब समान असते, ती अशी की, त्या-त्या धर्माचे जे धर्मग्रंथ असतात त्यातील शब्द हाच प्रमाण मानणारा धर्म तो खरा धर्म. परंतु धर्मग्रंथातील या शब्दाचे देखील विविध अर्थ सांगितले जातात. मग खरा धर्म कोणता? सर्व धर्मांमध्ये एक संकल्पना समान आढळते, ती म्हणजे खरा धर्म म्हणजे पावित्र्याची भावना. पावित्र्य अंगी असणाऱ्या, अपवित्र असलेल्या आणि लौकिक अशा प्रकारचा भेद करणे हे धर्माचे मूळ आहे. व्यक्ती अद्वैती असो वा द्वैती, ख्रिस्ती असो वा मुस्लिम; भेद करण्याची ही दृष्टी सर्व धर्मांना समान आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणसे ख्रिस्तापेक्षा वा बुद्धापेक्षा वा इतर धर्मगुरूपेक्षा वेगळी असतात; तसेच पावित्र्याच्या मुळे लाभलेले हे भिन्नत्व धर्मात मानलेले असते. एखादी व्यक्ती एवढेच नव्हे, तर पशू व वृक्ष देखील पवित्र मानले जातात. त्यांच्या ठायी पावित्र्य, शिवत्व मानले जाते. याच विचारातून पुढचा टप्पा असा की, सामान्य लौकिक अथवा अपवित्र वस्तूंचा व्यवहार हा पवित्र गोष्टीकडून नियत केला जातो. हे कळल्याखेरीज अस्पृश्यतेचा प्रश्न समजणे अशक्यच आहे. जातिसंस्था ही श्रमविभागणी आहेच; परंतु तिचे कार्य हे पावित्र्याच्या संकल्पनेच्या आधारे संघटित केलेले आहे. ब्राह्मण सर्वाधिक पवित्र. ही पावित्र्याची मात्रा कमी-कमी होत जाते आणि शेवटी अस्पृश्यामध्ये पावित्र्याचा अंशही नसतो; उलट ते अपवित्र असतात, आणि या सर्वाला धर्मग्रंथाचा आधार असतो म्हणून कोणीही ज्याला खरा धर्म म्हणावा त्याला सर्व बाबींचे पवित्र, अपवित्र व लौकिक अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण करावे लागते. उदा. धर्मग्रंथ, पुरोहित, मंदिर, गायीसारखे प्राणी यांना पवित्र मानले जाते. प्रेत, तथाकथित शूद्र, रजस्वला स्त्री इ.ना अपवित्र मानले जाते. दैनंदिन वापरातील वस्त्रे, भाजीपाला, कागद पेन्सिल इ.ना लौकिक वस्तू म्हणता येईल. स्थळ, काळ, सजीव प्राणी, निर्जीव वस्तू इ. सर्व प्रकारच्या पदार्थांची वरीलप्रमाणे तीन गटात विभागणी केली जाते. पवित्र व अपवित्र, वस्तूंचे एक अलौकिक विश्व, तर व्यावहारिक वस्तूंचे दुसरे लौकिक विश्व मानले जाते. पवित्र व अपवित्र वस्तूंमध्ये स्वभावत:च काहीतरी अलौकिक सामर्थ्य असल्याची समजूत असते. म्हणूनच त्या वस्तूंच्या बाबतीत विविध प्रकारचे विधिनिषेध मानले जातात. पवित्र वस्तूविषयी आदरयुक्त भीती, तर अपवित्र वस्तूविषयी तिरस्कारयुक्त भीती वाटते. या सर्व विवेचनाचा अर्थ असा की, ज्याला खरा धर्म मानले जाते, त्यामध्ये अपरिहार्यपणे अस्तित्वात असलेल्या पावित्र्याच्या संकल्पनेमुळे वस्तूंच्या बाबतीत अंधश्रद्धेवर आधारलेली एक विषमता तयार होते. येथे हे समजून घ्यावयास हवे की, सर्व वस्तू लौकिक पातळीवरीलच मानल्या, तरी त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार होणारा भेद शिल्लक राहीलच; परंतु पावित्र्याच्या संकल्पनेमुळे निर्माण होणारी विषमता आणि या प्रकारची विषमता या दोन्ही एक नव्हेत. पहिल्या प्रकारची विषमता लहरीपणा, परंपरा, रूढी, धर्मग्रंथांची मान्यता यावर आधारलेली आहे. तिच्या मुळाशी कोणताही वस्तुनिष्ठ निकष नाही. दुसऱ्या प्रकारची विषमता मात्र वस्तुनिष्ठ अशा निकषावर आधारलेली असते. उदा. जगातील वस्तूंचे विभाजन करणे, यात चूक नाही; मात्र ते वर्गीकरण उपयोगी-निरुपयोगी, हितकारक-अहितकारक, स्वच्छ-अस्वच्छ अशा प्रकारे असेल. स्वच्छ व आरोग्याला हितकारक पाणी प्यावे. अस्वच्छ व अपायकारक पाणी पिऊ नये, अशा वस्तुनिष्ठ मुद्द्यांवर हे विभाजन करावे लागेल. ऋग्वेद, बालकवींची कविता आणि विज्ञानाचे पुस्तक याचे उदाहरण घेतले, तर हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. पावित्र्याची संकल्पना मान्य करणारी धार्मिक व्यक्ती कसलाही विचार न करता ऋग्वेदाला पवित्र मानेल. बालकवींची कविता व विज्ञानाचे पुस्तक यांना ती लौकिक मानेल व ऋग्वेदापेक्षा त्यांचे स्थान नि:संशयपणे हलके आहे, असे मानेल. याउलट पावित्र्याची संकल्पना नाकारणाऱ्या इहवादी माणसाच्या दृष्टीने तिन्ही पुस्तके लौकिक पातळीवरची मानली जातील. ज्या व्यक्तीला काव्याची अधिक आवड असेल, त्याच्या दृष्टीने बालकवीच्या कवितेला अधिक महत्त्व प्राप्त होईल. त्याला विज्ञान अधिक प्रिय असेल तर तो विज्ञानाच्या पुस्तकाला अधिक प्राधान्य देईल. त्याला मानवजातीचा इतिहास, संस्कृत भाषा इ. अधिक अभ्यासनीय वाटत असतील तर तो ऋग्वेदाला अधिक महत्त्व देईल.

वरील बाबीवरही असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की, नीतीची निर्मिती पावित्र्याच्या कल्पनेतून झालेली असते आणि ती कल्पनाच नाकारली तर नीती म्हणजेच खरा धर्म, म्हणजेच सुरळीत समाजजीवन कोसळून पडेल. याबाबतही स्पष्ट कल्पना बाळगावयास हवी. ती अशी की, पावित्र्याची संकल्पना व नीतिमूल्ये यांच्यामध्ये अंतर असते. समाजधारणेसाठी पावित्र्याच्या संकल्पनेची आवश्यकता नाही. नीतिमूल्ये मात्र समाजधारणेला आवश्यक असतात. अर्थात, त्याचे स्वरूप देश, कालसापेक्ष, परिवर्तनशील व न्याय आणि विवेकावर आधारलेले असे असते. समाजातील नीतिमूल्ये जर कोणाचे अन्यायी हितसंबंध जपत असतील कोणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवत असतील, तर ती नीतिमूल्ये ही त्याज्यच मानावी लागतील. थोडक्यात, कोणताही खरा धर्म पावित्र्याच्या संकल्पनेच्या नावाने विषमतेचे समर्थन करणारी मूल्ये स्वीकारावयास सांगू शकत नाही.

गूढ अलौकिकाने युक्त अशा पावित्र्याची संकल्पना नाकारली तरी व्यावहारिक जीवनात पावित्र्याची एक लौकिक संकल्पना स्वीकारता येते. उदा. भगतसिंगांसारख्या हुतात्म्याची स्मृती अथवा त्याचे चरित्र किंवा स्वत:च्या आईचे वात्सल्य हे पवित्र आहे, असे म्हणता येईल. मात्र या दोन उदाहरणांमध्ये निर्देश केलेले पावित्र्य हे लौकिक स्वरुपाचे आहे. हे पावित्र्य असलेल्या भगतसिंग, आई वगैरे व्यक्तींच्याबद्दल आपल्याला आदर असतो; परंतु त्यांच्या ठिकाणच्या पावित्र्यामध्ये अतिमानवी स्वरुपाचे काही अलौकिक स्वरुपाचे सामर्थ्य असते, असे मानले जात नाही आणि त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून त्यांच्या कृतीची कोणतीही चिकित्सा न करता त्याला संमती देण्याचीही गरज नसते.

वरील सर्व बाबी काहीशा विस्ताराने सांगण्याचे कारण असे की, ज्याला खरा धर्म मानला जातो, जो नैतिकतेवर आधारित आहे असा ठाम दावा केला जातो तो धर्म मानवीच नव्हे, तर संपूर्ण अस्तित्वाचीच दोन कोटीमध्ये विभागणी करतो. एकीकडे जे पवित्र आहे, नित्य आहे, ते असते आणि दुसरीकडे सामान्य माणसे ज्या प्रकारे जगत असतात, तो संसार अथवा माया असते. सामान्य वस्तूंचा व्यवहार हा पवित्र गोष्टींकडून म्हणजेच खऱ्या धर्माकडून नियंत्रित केला जात असतो. या मांडणीबाबत पर्यायी विचार करण्याची एक वेगळी पद्धती अंधश्रद्धा निर्मूलन समिती देऊ इच्छिते. ती थोडक्यात अशी -

इतिहासात असे घडलेले आहे की, धार्मिक पद्धतीने विचार करण्याची रीत सर्वप्रभावी बनली. इतिहासात सामान्य माणसे पोट भरण्यासाठी कष्ट करीत होती, कलावंत कला निर्मिती करत होते, सत्ताधारी राज्यशकट हाकत होते. हे सर्व घडत असतानाच या सर्वांच्या पलिकडे एक सर्वोच्च मूल्य होते ते म्हणजे धर्म. प्रश्न असा आहे की, इतर सर्व मूल्ये ज्यापुढे गौण आहेत व ज्याकडे जाण्याची केवळ साधने आहेत, अशा सर्वात प्रथम असलेल्या (खऱ्या) धार्मिक मूल्याला आपण मानायचे की नाही. याबाबत ‘अंनिस’चे मत असे आहे की, सामाजिक मूल्ये, नैतिक मूल्ये, सौंदर्यविषयक मूल्ये, न्याय, कर्तव्य, बंधुभाव या संकल्पना धर्मकल्पनेवर आधारण्याची आवश्यकता नाही व त्या मूल्यांच्यावर धर्माचे प्रभुत्व चालावे, अशीही गरज नाही. ही मूल्ये स्वतंत्रपणे अस्तित्वात असू शकतात. एका उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल. काही शतकांपूर्वी राजा नसलेली समाजव्यवस्था ही कल्पना अशक्य वाटली असती. आज लोकशाही पद्धतीनेच समाजजीवन अधिक चांगले चालू शकते, ही बाब सर्वमान्य झाली आहे. याचाच अर्थ असा सर्व माणसे (धार्मिक माणसे देखील) जी मानवी मूल्ये मनोमनी मानतात, त्यांच्याकडे केवळ मानवी मूल्य म्हणून बघता येणार नाही का? एका सर्वोच्च अशा धार्मिक मूल्याची मांडलिक मूल्ये म्हणून ती अस्तित्वात असणे आवश्यक नाही. प्रत्यक्ष अनुभव व्यक्तीला असे सांगतो की, मानवी जीवनात प्रत्येक क्षणी अधिकाधिक सुधारणा करता येतात. स्वत:च्या मर्यादा ओलांडून माणूस म्हणून अधिक चांगल्या तऱ्हेने जगणे या प्रयत्नात गूढ असे काहीही नाही. स्वत:ची मर्यादा जाणणे आणि ती उल्लंघण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हे धर्म न मानताही कोणीही करू शकतो.

समिती असे मानते की, व्यक्तीने आपला आळशीपणा, आपली सान्तता आणि त्याचबरोबर मानवी मूल्यांसाठी झगडण्याची स्वत:मधील क्षमता नीट ओळखली पाहिजे. माणूस म्हणून माणसात अफाट क्षमता आहेत. त्याबरोबरच त्याच्या त्रुटीदेखील ओळखून मान्य करावयास हव्यात. त्यातील पहिली बाब म्हणजे त्याचा आळशीपणा. माणूस स्वत:च्या मर्यादा ओलांडून अधिक उन्नत बनण्याचा प्रयत्न करतो, तसाच स्वत:च्या मर्यादित कक्षामध्ये आळशीपणाने समाधानाने पडूनही राहतो. मानवी बुद्धी, मन, जाणीव, कर्तृत्व यांच्या मर्यादांची समज म्हणजेच मानवाचे सान्तत्व. विश्वाची नियमबद्धता काही मर्यादित प्रमाणात आपल्याला समजते आणि त्याचा विस्मयकारी अफाटपणा लक्षात घेतला तर ती गूढही वाटते. मानवाला अशा प्रकारे स्वसामर्थ्य आणि मर्यादा, यांचा प्रत्यय येतो. त्यासाठी धर्माची गरज नाही. ज्या मानवी मूल्यांच्यासाठी झगडावयाचे, त्यासाठी धर्माची गूढ गहन जाणीव असण्याची गरज नाही.
     
समिती असे मानते की, एक अरिष्ट आज जगभर मानवी समाजाला ग्रासते आहे. या स्फोटक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वशक्तीमान ईश्वराबद्दल वा लौकिक विश्वाच्या पलिकडच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करणे जरा थांबवले तरी चालेल. अंतिम सत्य शोधण्यासाठी बाहेर पडण्याची काही गरज नाही. एक साधा प्रश्न प्रत्येकजण स्वत:ला विचारू शकतो. तो म्हणजे, आजच्या संकटाच्या काळात माझे मानवतावादी कर्तव्य कोणते आहे? मानवी जीवन अर्थपूर्ण व सुखकारक करणारी मूल्ये कोणती आहेत? उदा. न्याय हे मानवी मूल्य आहे ना? पदोपदी त्याची पायमल्ली होताना मी पाहतो ना, मग त्यासाठी मी लढले पाहिजे. या ठिकाणी एक बाब फार महत्त्वाची आहे ती अशी की, आपण माणसे असल्याने मानवी मूल्ये आपल्या दृष्टीने रहस्यमय असूच शकत नाहीत. आपल्याला ती मनोमनी जाणवतात आणि सगळ्यांनाच स्पष्टपणे ठाऊक असतात. ज्यांना मानवी मूल्यांसाठी झगडायचे नाही, तीच मंडळी मानवी मूल्ये म्हणजे काहीतरी गहन गंभीर कूट प्रश्न आहे, अशी बकवास करत असतात आणि या मूल्यांचे घाऊक ठेकेदार असलेले धर्म, धार्मिक संस्था व धार्मिक नेते मानवी मूल्याकरिता करावयाच्या निकडीच्या लढाईकडे पाठ फिरवत असतात. मानवी मूल्ये ही काहीतरी गूढ बनवण्याची गरज नाही. साध्या खेड्यातल्या मुलांनाही शाळेत जाऊ लागल्यावर स्वच्छता म्हणजे काय, चांगले अन्न म्हणजे काय आणि समूहात माणुसकीने कसे वागावे, हे कळायला लागते. म्हणूनच स्वत:च्या विवेकाच्या आधारे मानवी मूल्यासाठी करावयाच्या संघर्षामध्ये आपण स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे, ती अशी की, या मानवी मूल्यांना दुसरीकडे कोठेही आधार नाही. धर्म, परमतत्त्व, निसर्ग, विज्ञान यांच्यात त्यांना अधिष्ठान नाही. मानवी मूल्यांना फक्त एकच एक परिमाण असते ते म्हणजे मानव आणि या अर्थाने धर्माला असेलच तर एकचि अर्थ असतो तो म्हणजे साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
     
एक साधा अनुभव लक्षात घ्या. एखादा छोटा असहाय्य मुलगा वा वृद्ध रस्ता ओलांडण्यासाठी उभा असतो. त्यांना मदत हवी असते. त्या रस्त्यावरून जाणारा दुसरा धट्टाकट्टा सक्षम माणूस काळजीपूर्वक हात देऊन सुखरूपपणे त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोचवितो. ही एक साधी घटना. एका समाजघटकाला गरज आहे माणुसकी म्हणून दुसऱ्या संवेदनशील समाजघटकाने त्याला मदत केली. आता तो मुलगा अथवा वृद्ध त्यांच्यावरील पारंपरिक संस्कारामुळे असे म्हणू शकतात की, ‘आम्ही देवाची प्रार्थना केली, देवा मला मदत कर आणि देवाने त्या गृहस्थाच्या रूपाने येऊन आम्हाला मदत केली. हे स्पष्टीकरण नाकारावयास हवे. कारण रस्ता ओलांडण्याची गरज ही मानवी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीला मानवानेच मानवतेच्या भूमिकेतून उत्तर दिले, हेच वास्तव आहे.

याचा अर्थ असा की, समाज योग्य दिशेने बदलण्याचा जो प्रयत्न करावयाचा, त्यासाठी कुठल्या तरी अतिमानवी शक्तीकडून मदत मिळण्याची शक्यता नाही. परंतु तरीही परिवर्तनासाठी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत उभे राहण्याची हिंमत देव आणि धर्मभावनेशिवाय कुठून येते? माणसाला असाध्य असलेल्या; पण श्रेयस्कर वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या मागे तो लागतो (आणि जे श्रेयस्कर आहे त्यालाच आपण मूल्य म्हणतो) स्वत:च्या शक्तीपलिकडे असणाऱ्या एखाद्या मूल्यांसाठी धडपडतो. तेव्हा इतर माणसे त्याच्या बरोबर सहकार्य करतील किंवा त्याला मदत करतील व त्याद्वारे त्याला इष्ट वाटणाऱ्या मूल्यांच्या समीप कोणत्याही देवाचा वा धर्माचा आधार न घेता जाऊ शकेल, यावर त्यांचा आशावाद आधारलेला असतो. कोणत्याही अतिनैसर्गिक शक्तीवर; मग त्या शक्तीला धार्मिकतेचे नाव असो वा पावित्र्याचे, अवलंबून राहणे ही कल्पनाच मुळात माणसाचा तेजोभंग करून त्यांना खच्ची करते. मानवी मूल्यांच्या साधनेसाठी कोणत्याही खोट्या वा खऱ्या धर्मावर अवलंबून राहण्याच्या कल्पनेची तरफदारी आवश्यक नाही. धर्माच्या काही हजार वर्षांच्या प्रदीर्घ काळात मूल्यनिर्मितीसाठी माणूस त्यावर अवलंबून होता. मात्र ही मूल्ये प्रत्यक्षात अवतरू शकली नाहीत. तशी वाटचाल थोडी फार झाली असे कोणाला वाटत असेल, तरी माणसाने स्वत:च्या पायावरच उभे राहून ही वाटचाल करावी, हेच सर्वार्थाने श्रेयस्कर आहे, असे समिती मानते. सर्वांनी मनापासून हे केले तरच मानवजातीला भवितव्य आहे, ही बाब इतकी महत्त्वाची आहे की, स्वत: धार्मिक अंगाने न जाणाऱ्यांनी देखील धर्माच्या आधारे मूल्ये प्रस्थापित करणाऱ्यांचा हात हातात घ्यावयास हवा. माणसाला मदत फक्त माणसाकडूनच मिळू शकते, हे लक्षात घ्यावयास हवे.

धर्माबाबतच्या आणखी एका आयामाची दखल आवर्जून घ्यावयास हवी. धर्माच्या उदयाच्या काळात त्याचे काम समाजाला नीतिनियम आणि कायदे देण्याचे होते. माणसाच्या समाजाच्या बाह्यांगाला, भौतिक जीवनाला आकार देण्याचे होते; परंतु कालौघात माणूस बनल्यानंतर माणसाच्या म्हणून काही गरजा निर्माण झाल्या. भौतिक ठरणाऱ्या परिपूर्तीसाठी बाह्यविश्वात प्रवास करणाऱ्या माणसाला एक माणूस म्हणून अंत:प्रवासाचीही गरज वाटू लागली. माणूस दारिद्र्य आणि विषमतेमुळे असहाय्य बनतोच; त्याबरोबरच मृत्यूच्या निश्चिततेची अंतर्यामी झालेली जाणीवही त्याला एकाकी, असहाय्य बनवते. स्वत:च्या वासनांचे मनातील तांडव त्याला भयचकित करते आणि दया, क्षमा, प्रेम, करुणा या सद्गुणांनी मन मोहरून निघावे ही कल्पना त्याला भुरळ घालते. अलौकिक शक्तीचे अस्तित्व कल्पिणे, दु:खमुक्तीसाठी, वासना विकारावर मात करण्यासाठी सद्गुणांच्या विकासासाठी त्या कल्पित अलौकिक शक्तीला श्रद्धेने अनन्यभावे शरण जाणे हा एक मार्ग मानवाने निवडला; परंतु ईश्वराच्या अस्तित्वाविरुद्ध बंडाचा मानवी इतिहासही कमी नाही. अशा वेळी स्वत:ला घडविण्याच्या प्रक्रियेत माणूस आतून एक शक्ती अर्जित करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वत:च स्वत:चा आधार बनतो. दु:खमुक्तीसाठी त्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीस शरण जाण्याची गरज उरत नाही. हा त्याचा अर्जित करण्याचा प्रयत्न त्याला एकट्याला एकाकीपणे करावा लागतो. याला अनेकांनी मअंतर्प्रवासफ असे नाव दिले आहे. ही शक्ती प्राप्त होणे म्हणजेच जगाकडे, निसर्ग, समाज व स्वत:कडे बघण्याची एक स्वतंत्र सम्यकदृष्टी प्राप्त करणे. या दृष्टीमुळे माणसाचे अस्तित्व समाज, निसर्ग आणि स्वत:शी नवे उच्च दर्जाचे नाते जोडतो. मानवी वाटचालीची ही शोकांतिका आहे की, मानवी दु:खमुक्तीसाठी वासनाविकारावरील विजयासाठी नैतिक उन्नयनासाठी जे मार्ग माणसांनी आपापल्या प्रकृतीप्रमाणे शोधले, विकसित केले त्या सर्वांना विशिष्ट धर्मसंप्रदायांनी आपलाच एक भाग मानले. त्याच्यात कर्मकांड घुसवून शोषणाची व्यवस्था अबाधित ठेवली. आपापल्या धर्मसंस्था श्रीमंत अन् दिमाखी बनविल्या. माणसांना मुक्त, शक्तिशाली बनवण्याऐवजी त्यांना अंधश्रद्ध व शरणागत बनविले. माणसांनी कधी आव्हानापोटी, तर कधी स्वार्थी हेतूने धर्ममार्तंडांना प्रतिसाद दिला.
     
सत्याचा शोध हा परिवर्तनासाठी परवलीचा शब्द असतो. या सत्याच्या भावासाठी बाह्यविश्वात धर्माने सांगितलेला सत्याचा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनाने माणसाने घेतला. धर्माला त्या क्षेत्रातून माघार घ्यावी लागली. गॅलिलिओला शिक्षा सुनावणाऱ्या पोपला चारशे वर्षांनी का होईना; पण स्वत:ची चूक जाहीरपणे मान्य करावी लागली. मात्र बाह्यविश्वाच्या या चिकित्सेबरोबरच अंतर्विश्वासंबंधी सांगितल्या गेलेल्या अज्ञानमूलक व अंधश्रद्धेवर आधारित बाबींचा त्यागही करावा लागेल. हाच माणसासंबंधी नव्या चिंतनाचा पाया ठरेल. तो कोणत्याही प्रस्थापित धर्माचा भाग असणार नाही किंवा तो स्वत:ला प्रस्थापित धर्मात परिवर्तित करून घेणाराही नसेल. हे नवे चिंतन संपूर्ण मानवजातीला कवेत घेणारे असेल. त्याला जात, वंश, राष्ट्र, धर्म याच्या मर्यादा नसतील, या नव्या चिंतनाला जुन्या धर्माची चिकित्सा आणि विविध ज्ञानशाखांनी मिळवलेली माहिती पोषक ठरेल. मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, जीवशास्त्र व समाजशास्त्र यांच्या आधारे हा अंतर्प्रवास पुढे जाईल. माणूस म्हणून माणसाच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत, याचे भान आले की, त्याच्या पूर्ततेसाठी होणारे प्रयत्न ओझे न वाटता आनंददायी कृती वाटेल. हे नवे चिंतन प्रस्थापित धर्मांना एका पातळीवर पर्याय देईल. त्याच्या अभावी माणसे अधिकाधिक अंधश्रद्ध बनतील वा टोकाची भोगवादी बनतील. या दोन्ही गोष्टी मानवी जीवन सार्थ बनवणाऱ्या नाहीत. या नव्या चिंतनाला कोणते नाव द्यावयाचे हा एक प्रश्न आहे. त्याच्यासाठी अद्याप तरी कोणत्याही भाषेत नवा शब्द निर्माण झालेला दिसत नाही. जो शब्द शोधला जाईल तो निश्चितपणे धर्म असा नसेल. धार्मिक भावनांचा, धर्माचा पूर्ण आदर करूनही वरील सर्व मांडणी धर्मभावनेच्या पलिकडे जाणारी, कृतिशील मानवतावादी व नैतिकदृष्ट्या उत्क्रांतीवादी आहे. तोच समितीच्या विचारांचा रस्ता आहे.                    
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(विशेषांक २००८)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...