शनिवार, २७ जानेवारी, २०१८

कायद्याची डायरी




कायद्याची डायरी
दाभोलकर, कायदा, घटनाक्रम, उपक्रम, मुख्यमंत्र्यांना निवेदन, जेलभरो आंदोलन
एप्रिल महिन्यात जादूटोणाविरोधी कायद्याबाबत खूपच हालचाली झाल्या. ‘अंनिस’चे कार्यकर्ते व वार्तापत्राचे वाचक या दोघांनाही याबद्दल उत्सुकता असणार म्हणून डायरीवजा त्याची नोंद खाली देत आहे.

मार्च महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्र्यांना कायद्याबाबत व्यक्तिगत निवेदने जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत देण्याचा कार्यक्रम झाला. या निवेदनावर आपल्या भागातील मान्यवरांच्या आवर्जून सह्या घेणे; तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सह्याही मोठ्या प्रमाणात गोळा करणे, हे काम उत्साहाने करण्यात आले. कायदा करण्याचे लेखी आश्वासन १४ वर्षांपूर्वी मिळाले म्हणून १४ हजार व्यक्तिगत निवेदने पाठवण्याचे ठरले होते. हा कार्यक्रम १९ फेब्रुवारीला चालू झाला आणि मार्चअखेरीस महाराष्ट्रातून जवळजवळ ३० हजार निवेदने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोचली. यातील मान्यवरांची निवेदने खुद्द मुख्यमंत्र्यांच्या टेबलावरही ठेवण्यात आली आणि त्याचा एक परिणामही घडून आला.

मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी, जादूटोणाविरोधी कायदा मंत्रिमंडळात मंजूर करून विधानसभेत तो सुधारित कायदा मांडावा, यासाठी काहीच घडत नसल्याने मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेष उपोषण महात्मा फुले जयंती ता. ११ एप्रिल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ता. १४ एप्रिल करण्याचे ‘महाराष्ट्र अंनिस’ने जाहीर केले होते. २४ मार्चला मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून १ एप्रिलनंतर केव्हाही बेमुदत उपोषणासाठी मी बसेन, असे कळवले होते. ३१ मार्चला मुख्यमंत्र्यांचे माहिती व जनसंपर्क प्रमुख सतीश लळित यांचा मला फोन आला की, एका आठवड्यात हा कायदा मंत्रिमंडळासमोर मंजूर होऊन विधिमंडळात मांडला जाईल. तेव्हा तुम्ही उपोषणाला बसू नये, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. कायदा करण्याबाबत मुख्यमंत्री ठाम आहेत.

ता. ३ एप्रिलला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांची कार्यालयात भेट घेतली. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री, आत्ता १० मिनिटांत येत आहेत. त्यांची भेट घ्या.’ मी म्हणालो, ‘मला तशी उभ्या-उभ्या दोन मिनिटांची भेट नको आहे. सविस्तर नियोजनपूर्वक अर्ध्या तासाची बैठक हवी आहे.’ त्यांनी माझी मागणी मान्य केली आणि भेट नियोजन ठरवण्याची जबाबदारी असलेले श्री. संजय यादव या मुख्यमंत्र्यांच्या पी. एस. यांच्याकडे माझे पत्र पाठवले. १५ मिनिटांनी मला श्री. यादव भेटले. त्यांनी, ‘मुख्यमंत्रीसाहेब चेंबरमध्ये आहेत त्यांना भेटत का नाही’, असे विचारले. अशा भेटीत काही निष्पन्न होत नाही. ही माझी रेकॉर्ड मी पुन्हा त्यांच्यासमोर वाजवली. ते म्हणाले, ‘निदान १२ तारखेची बैठक तरी नक्की होईल.’ मग त्या आशेने मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. चेंबरमध्ये आम्ही दोघे सोडून कोणीही नव्हते. मी मुख्यमंत्र्यांना बैठकीची मागणी केली. ते अनपेक्षितपणे म्हणाले, ‘तुम्हाला आज सायंकाळी सवड आहे का? आज मी वेळ देऊ शकेन, असे मला वाटते.’ मी संधी साधण्याचे ठरवले.

त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात माझी पत्रकार परिषद झाली. त्याला दूरदर्शन, आय.बी.एन. लोकमत, झी.टी.व्ही., ए.बी.पी. माझा, टी.व्ही.९ व आकाशवाणी या सर्वांचे प्रतिनिधी हजर होते. त्यामध्ये मी असे सांगितले की, शासनाची कमालीची अकार्यक्षमता व असंवेदनशीलता याच्या विरोधात ११ ते १४ एप्रिल आम्ही आत्मक्लेष उपोषण सातारला करत असून १६ एप्रिलला मुंबई येथे जेलभरो आंदोलन करणार आहोत. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे ठामपणे व उघडपणे कायद्याच्या बाजूने आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कायद्याच्या बाजूने सक्रियता दाखवावी, असे आवाहन केले.

सायंकाळी ५ वाजता मी पुन्हा मुख्यमंत्री कार्यालय, विधानभवन येथे गेलो. त्यावेळी तेथे कमी बजेट मिळाले म्हणून शिवसेना-भाजपचे आमदार मुख्यमंत्री कार्यालयाचा पॅसेज पूर्णपणे अडवून उभे होते. तो तिढा अर्ध्या तासात सुटला. नंतर शिष्टमंडळांची गर्दी होती. अनेक आमदार आपापल्या कामासाठी मुख्यमंत्र्यांच्या खोलीत ठाण मांडून बसले होते. या सर्व गोंधळात माझी भेट कशी होणार, हे मला कळत नव्हते. परंतु मुख्यमंत्र्यांचे बहुतेक कार्यालयीन कर्मचारी हे ठामपणे कायद्याच्या बाजूचे आहेत. ३ तारखेला मुख्यमंत्र्यांच्यासमवेत माझी भेट घालून देण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. मात्र एकंदरीत वातावरणाचा ताण बघता ते कसे जमणार, याची मलाच नव्हे, तर त्यांनाच काळजी होती. मुख्यमंत्री कोठेतरी गेले होते. बहुधा विधानसभेत आणि त्यांची अधिरतेने वाट पाहणाऱ्या आमदारांच्या गर्दीने त्यांचे ऑफीस ओसंडून वाहत होते. तेथेच एका खुर्चीवर मी चिकाटीने बसून होतो. असा अर्धा तास गेला आणि अगदी अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांच्या ऑफीसला लागून असलेल्या त्यांच्या अ‍ॅन्टी चेंबरमधून मला आत बोलवण्यात आले. तेथे मुख्यमंत्री ना. चव्हाण व संसदीय कामकाजमंत्री ना. हर्षवर्धन पाटील हे फक्त दोघेच होते. आमची तिघांची बैठक चालू झाली. मुख्यमंत्र्यांची अशी स्वतंत्र व आवश्यक तेवढा वेळ देणारी भेट मला आतापर्यंत कधी मिळाली नव्हती. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना हा कायदा करण्याबाबत शासनाची अनास्था आम्हाला कशी-कशी जाणवते, हे सांगितले. गेल्या पाच अधिवेशनांत कार्यक्रमपत्रिकेत हा कायदा असूनही त्यावर एक शब्दाची चर्चा झाली नाही, हे निदर्शनास आणून दिले. तसेच या अधिवेशनाच्या पूर्वी त्यांनीच या अधिवेशनात कायदा मंजूर करण्याची ग्वाही दिली होती, तिकडे लक्ष वेधले. अशा परिस्थितीत वारकरी बांधवांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तयार झालेले कायद्याचे सुधारित प्रारूप अजून मंत्रिमंडळासमोरही आलेले नाही, तर त्यानंतरची सर्व प्रक्रिया होऊन उरलेल्या दिवसांत ते मंजूर होणार कसे? त्यासाठी शासनाला असाधारण कार्यक्षमता दाखवावी लागेल, असे सुनावले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधला. त्यांचे मुख्य सचिव अजितकुमार जैन यांना बोलावले. येणाऱ्या मंत्रिमंडळात कायदा चर्चेला येईल आणि विधानसभेत याच अधिवेशनात तो मांडला जाईल, असा शब्द त्यांनी दिला. उपोषण न करण्याची विनंती केली. मात्र या अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचा शब्द देण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शवली. उपोषण सुरू करू नका, अशी विनंतीही केली. अर्थात, याबाबतचा निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकारी समिती घेईल, असे मी त्यांना सांगितले.

ता. ७ एप्रिल - मुख्यमंत्र्यांशी झालेला संवाद सांगणे व उपोषण आणि ‘जेलभरो’ याबाबत निर्णय घेणे, यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक ७ एप्रिलला पुण्याला झाली. त्याला बहुतेक सरचिटणीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाबाबत तपशीलवार चर्चा झाली. त्यांची भेट मिळणे, कायदा मंत्रिमंडळासमोर ठेवणे व तो विधानसभेत मांडणे, या मर्यादित यशामुळे उपोषण रद्द करावे; मात्र धरणे व ‘जेलभरो’ कायम ठेवावे, असे ठरले. सातारा येथे उपोषणाबाबत पूर्वतयारी चालू झाली होती. ती स्थगित करण्यात आली.

ता. १० एप्रिल - मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांची भेट त्यांच्या कार्यालयात घेतली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात हा विषय घेतलेला नाही. यामुळे फसवणूक झाल्याची भावना असल्याचे त्यांच्यासमोर मांडले. ते चटकन् उठले. मुख्यमंत्री ऑफीसमध्येच होते. त्यांना भेटले. पाच मिनिटांत परत येऊन म्हणाले, ‘या मंत्रिमंडळात निश्चितपणे तो येईल म्हणजे येईलच, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.’ ही बाब आश्वासक होती; पण समाधानकारक नव्हती. मंत्रिमंडळाची मीटिंग होती १७ तारखेला, १८ तारखेला अधिवेशन संपत होते. त्यामुळे मंत्रिमंडळाने केलेला कायदा हा विधिमंडळासमोर दुसऱ्या दिवशी मांडणे शक्यच होणार नव्हते. कारण त्याआधी किमान दोन दिवस तरी विधी खात्याला त्यावर काम करणे गरजेचे होते. अर्थातच ‘जेलभरो’चा निर्णय होताच, तो अधिकच दृढ झाला.
ता. ११ ते १४ एप्रिल - महाराष्ट्रामध्ये सातत्याने संपर्क करण्यात आले. मुंबईला आझाद मैदानावर मंडप, माईक, भोजन याची व्यवस्था करण्यात आली. समिती विवेकवादी संघटना असल्याने सत्याग्रहाला येणाऱ्या सर्वांनी तिकीट काढून येणेच अपेक्षित होते. हा खर्च बराच असतो आणि सामान्य कार्यकर्त्यांना तो करणे अवघड असतो. तरीही एकंदरीत १३० कार्यकर्त्यांची नोंदणी झाली आणि किमान १०० कार्यकर्ते ‘जेलभरो’ करतील, हेही नक्की झाले.

ता. १५ एप्रिल - मी, अविनाश पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्याला झी-२४ तास; तसेच आय.बी.एन. लोकमत या चॅनेलचे प्रतिनिधी आलेले नव्हते. त्यामुळे रात्री आम्ही त्यांच्या कार्यालयातच गेलो. दोघांनीही तत्परतेने ‘बाईट’ घेतले.

ता. १६ एप्रिल- सकाळी ७ वाजता मुंबईचे कार्यकर्ते मैदानात हजर होते. आठ वाजता नाष्टा, चहा पोचला. मंडप ऐसपैस होता. स्टेज होते. ध्वनिक्षेपकही होता. ९ पासून कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. दुपारी १ ला त्यांना फूड पॅकेटस् दिले. त्यावेळी ही संख्या दीडशेच्या पुढे गेल्याचे लक्षात आले. महिलांची संख्याही चांगली होती. धरण्याला पाठिंबा देण्यासाठी पुष्पाताई भावे आवर्जून आल्या. आ. जयदेव गायकवाड, आ.विद्या चव्हाण, आ. डॉ. सुधीर तांबे यांनी काही काळ धरण्यात भाग घेतला. पाठिंबा दिला. दूरदर्शन, डी.डी.१, टी.व्ही.९, आय.बी.एन. लोकमत चॅनेलचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारी अडीच वाजता कार्यकर्त्यांनी दोन-दोनच्या रांगा लावल्या. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे फोटो हातात घेतले आणि ‘जादूटोणाविरोधी कायदा झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत मोर्चा आझाद मैदानाच्या बाहेर निघाला. अपेक्षेप्रमाणे दाराच्या बाहेर पोलिसांचे पिंजरे असलेल्या गाड्या स्वागतासाठी सज्जच होत्या. तीन गाड्या खच्चून भरल्या आणि जोरजोरात घोषणा देत त्या गाड्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. पोलिसांना दोन पर्याय होते. एकतर रात्रभर ताब्यात ठेवून सकाळी न्यायालयासमोर उभे करणे, दुसरा अटक न दाखवताच नाव नोंदवून कार्यकर्त्यांची यादी करून त्यांना सोडून देणे. त्यांनी दुसरा पर्याय निवडला. त्यामुळे कार्यकर्ते ‘जेलभरो’च्या अस्सल अनुभवाला मुकले. चार वाजता सर्व कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

त्याच दिवशी रात्री साडेसात ते आठ टी.व्ही.९, रात्री ९.१५ ते १० ए.बी.पी. माझा, व १० ते ११ आय.बी.एन. लोकमत या चॅनेलवर कायद्याबाबत चर्चा झडल्या. आय.बी.एन. वरील ‘आजचा सवाल’ होता, ‘जादूटोणाविरोधी कायदा करण्याबाबत सरकार चालढकल करत आहे काय?’ त्याला ८७ टक्के इतक्या दर्शकांनी होकारार्थी मत नोंदवले. हे कार्यक्रम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बघितले गेले. त्यामुळे कायद्याला जनमानस अधिक अनुकूल होण्यासाठी मदत झाली.
ता. १७ एप्रिल- मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्याचे प्रारूप मंजुरीसाठी येत असल्याबाबत मला माहिती मिळाली.
ता. १८ एप्रिल- १७ तारखेची मंत्रिमंडळाची बैठक रात्री ११.३० पर्यंत चालली. तेथे एकमताने या कायद्याला मंजुरी मिळाली, अशी माहिती मिळाली.

ही सर्व वाटचाल हा एका नव्या पर्वाचा प्रारंभ आहे. हा कायदा आता कायदे खात्याकडे जाईल. त्यानंतर गृहखात्याकडे जाईल. नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मांडला जाईल आणि या शासनाकडे जर राजकीय इच्छाशक्ती असेल, तर तो पावसाळी अधिवेशनात मंजूरही होऊ शकेल. याला विरोध करणाऱ्या संघटना आपला विरोध; जो अत्यंत चुकीचा व खोटा अपप्रचार आहे, तो अधिक जोराने करून कायदा होऊ नये, यासाठी आकाशपाताळ एक करतील. परंतु शेवटी सत्याचाच विजय होतो, हा इतिहासाचा दाखला आहेच.

जाता-जाता असे कार्यक्रम आयोजित करणे, यासाठी बरीच धावपळ व निधी लागतो. मुंबईतील कार्यकर्त्यांनी ही धावपळ तर केलीच; शिवाय स्वत: मिळवलेल्या ३ लाख रुपयांच्या जाहिरातींची १० टक्के रक्कम, जी त्या शाखेला मिळणार होती, ती सर्व त्यांनी आंदोलनाच्या खर्चाला दिली. असे सहकारी आणि असे संघटन कोणालाही आश्वासक व अभिनंदनीयच वाटेल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मे २०१३)




शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

कायद्याच्या आघाडीवर




कायद्याच्या आघाडीवर
दाभोलकर, कायदा, इच्छाशक्तीचा अभाव, उपोषण, कायदा प्रक्रिया
जादूटोणाविरोधी कायदा या अधिवेशनात मंजूर करण्याबाबत शाब्दिक सहानुभूती भरपूर आहे. मात्र तिचे प्रत्यक्षात कृतीत रूपांतर होऊ शकते का, याबद्दल मी साशंक आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अवघे दोन दिवस मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येथे कायदा या अधिवेशनात होईलच, अशी ग्वाही पत्रकार परिषदेत दिली. दैनिक ‘सकाळ’ने त्यांच्या सर्व आवृत्त्यांत ठळकपणे पहिल्या पानावर हे छापले. इतर वृत्तपत्रांनीही या बातमीस यथोचित जागा दिली. त्यानंतर दोनच दिवसांनी अधिवेशनापूर्वीचे विरोधकांसमवेतचे चहापान झाल्यानंतरच्या वार्तालापात मुख्यमंत्र्यांनी याच बाबीचा पुनरुच्चार केला. त्यामुळे अनेकांना असे वाटले की, कायदा या अधिवेशनात नक्की होणार; परंतु कथनी आणि करणी यात नेहमीच बरेच अंतर असते. कायदा मंजूर होण्यासाठी काय घडावयास हवे, याची नोंद खाली क्रमश: दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया किती खडतर असते, याची कल्पना येऊ शकेल.

१.    २१ डिसेंबरला नागपूरला मुख्यमंत्र्यांनी वारकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा एकदा ९ जानेवारीला वारकरी प्रतिनिधींच्याबरोबर सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे सविस्तरपणे बोलले. त्यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात येणाऱ्या बदलाची नोंद त्यांनी प्रतिनिधींना दिली. हे एक महत्त्वाचे पाऊल शासनाने उचलले.
२.    हा सुधारित मसुदा मुख्यमंत्र्यांच्या सहीने सामाजिक न्याय विभागाकडे जावयास हवा. हा लेख लिहीपर्यंत (२१ मार्च) तो गेलेला नव्हता. स्वाभाविक त्यापुढील सर्व बाबींची तर सुरुवातही झालेली नाही.
३.    सामाजिक न्याय विभागाचे सचिव; तसेच राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री यांच्या सहीने तो महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरी यांच्याकडे जावयास हवा.
४.    चिफ सेक्रेटरी यांनी तो मसुदा मंत्रिमंडळासमोर मांडण्यासाठी मंत्रिमंडळाच्या कामकाज पत्रिकेत समाविष्ट करावयास हवा.
५.    मंत्रिमंडळाने मसुदा मंजूर करावयास हवा.
६.    यानंतर तो मसुदा कायदेशीर परिभाषेत होण्यासाठी विधी खात्याकडे पाठवण्यात येईल.
७.    विधी खात्याने मंजूर केलेला मसुदा हा कायदा सध्याच्या ‘इंडियन पिनल कोड’मधील तरतुदीशी सुसंगत आहे ना, हे पाहण्यासाठी गृहखात्याकडे पाठवण्यात येईल.
८.    गृहखात्याकडून अनुमती आल्यानंतर तो मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रिमहोदया-कडून विधानसभेत मांडण्यात येईल. मसुदा बदललेला असल्यामुळे जुलै २०११ मध्ये मांडलेला मसुदा रद्द झाला आहे. त्यामुळे हा नवा मसुदा सभागृहाच्या पटलावर ठेवावा लागेल.
९.    यानंतर सभागृहाच्या कामकाजपत्रिकेत दाखवून त्यावर चर्चा करून विधानसभेत तो मंजूर करावा लागेल.
१०.   विधानसभेत मंजूर झाल्यानंतर तो विधान परिषदेत मंजूर करून घ्यावा लागेल.

वरील सर्व बाबी जास्तीत जास्त २६ एप्रिलपर्यंत म्हणजे विधिमंडळ कामकाजाच्या शेवटच्या दिवसापर्यंत करवून घ्याव्या लागतील. काहीजणांच्या मते, हे अधिवेशन १८ एप्रिलपर्यंतच चालणार आहे. असे झाल्यास वेळ आणखी कमी होईल.

आतापर्यंतचा शासनाचा याबाबतचा अनुभव उत्साहवर्धक नाही. तरीही अत्यंत चिकाटीने समितीने हा लढा चालू ठेवला आहे. याबाबत आजची परिस्थिती पुढीलप्रमाणे आहे.
१.    मुख्यमंत्री कायदा करण्यास अनुकूल आहेत. मात्र तो त्यांच्या प्राधान्याचा विषय नाही.
२.    उपमुख्यमंत्री कायदा करण्याबाबत आग्रही आहेत.
३.    वारकरी संप्रदायाच्या सूचनेप्रमाणे कायद्यात बदल केला आहे.
४.    या बदलानंतर शिवसेना-भाजपचा विरोध सौम्य झाला आहे. त्यांचा एकच मुद्दा आहे की, कायदा सर्व धर्मियांसाठी हवा आणि तो तसाच असल्यामुळे त्यांचा आक्षेप टिकणारा नाही.
५.    मनसेचा कायद्याला विरोध नाही.
६.    शेकाप, लोकभारती, रिपब्लिकन, सीपीएम हे पक्ष थेटपणे कायद्याच्या बाजूचे आहेत.
७.    कायद्याला अजूनही धर्माच्या नावाने विरोध करणारे जे आहेत, ते ज्या संघटनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे केली आहे, त्यांचे सभासद आहेत, याची जाणीव महाराष्ट्र शासनाला आहे. याच मंडळींनी नेहमीप्रमाणे विधानसभा अधिवेशन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आरोप केले आहेत, ज्यांची दखल माध्यमांनी घेतलेली नाही.
८. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत निवेदने कायदा करण्याबाबत पाठवण्याची जी मोहीम चालवण्यात आली, त्याला सर्वसामान्य नागरिक व मान्यवर    यांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री ना. हसन मुश्रीफ, तसेच खा. सुप्रिया सुळे, कोल्हापूरचे सध्या गादीवर असलेले शाहू महाराज, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विविध पक्षांचे आमदार यांच्या व्यक्तिगत सहीची निवेदने मुख्यमंत्र्यांच्या समोर थेटपणे ठेवण्यात आली. त्याचा परिणाम झाला आहे.
९.    कायदा करण्यासाठी सत्तारूढ पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे.

समिती आता काय करत आहे?
१.    कायदा होण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडावयास हवी, असे वर लिहिलेले आहे. ती लवकरात लवकर पार पाडावी, यासाठी प्रयत्नशील आहे.
२.    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांची एकत्रित बैठक होऊन कायदा होण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन समितीला मिळावे, यासाठी समिती प्रयत्नशील आहे. या स्वरुपाचे पत्र ना. अजितदादा पवार, दोनदा मा. मुख्यमंत्र्यांना दिले आहे, ही जमेची बाजू आहे. यामुळे अशी बैठक होण्याची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव जैन यांच्याशीही याबाबत तपशिलात बोलणे झाले आहे व त्यांनीदेखील अशी बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले आहे.

वरील सर्व आढावा लक्षात घेतला तर कायदा होण्याबाबत अनुकुलता असली तरी पूर्वीचा प्रदीर्घ अनुभव शासनावर विसंबून राहण्यासारखा नाही. त्यामुळे १० एप्रिलपर्यंत काय घडते, हे पाहिले जाईल. कायदा करण्याच्या प्रक्रियेने योग्य ती गती न पकडल्यास ११ एप्रिल महात्मा फुले जयंती ते १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत ७२ तासांचे आत्मक्लेष उपोषण मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले जाईल. हे उपोषण दबाव आणण्यासाठी नसून शासनाची असंवेदनशीलता व नाकर्तेपणा याच्या विरोधात असेल. त्यानंतर १५ तारखेला मुंबईला आझाद मैदानावर ‘अंनिस’चे सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते ‘जेलभरो’ सत्याग्रह करतील. सत्याग्रही गुन्हा कबूल करून शिक्षा स्वीकारतील.

उपोषण व ‘जेलभरो’ याबद्दलच्या सूचना :-
१.    उपोषणात सहभागी होणाऱ्यांनी एक दिवस उपोषण करणे अभिप्रेत आहे. ७२ तास उपोषण करावयाचे असल्यास स्वत:च्या प्रकृतीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. कुटुंबियांशीही बोलावे.
२.    एक दिवस उपोषण करणारे अन्य दोन दिवस उपोषणस्थळी थांबू शकतात. त्यांची आवश्यक सोय केली जाईल.
३.    पुणे, कोल्हापूर, इस्लामपूर येथून वाहनाने एकत्रितपणे व नियोजनपूर्वक कार्यकर्ते उपोषणात सहभागी होतील, असे पाहिले जात आहे. अर्थात, महाराष्ट्रातून कोठूनही कार्यकर्ते येऊ शकतात.
४.    १५ तारखेला अथवा १६ तारखेला मुंबईला ‘जेलभरो’ आंदोलन होईल.

वरील दोन्ही कार्यक्रम हे शासनाचा प्रतिसाद काय आहे, यावर अवलंबून आहेत. मात्र आपण आपल्या बाजूने ते करावे लागतील, असे गृहीत धरून तयारी करत आहोत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल २०१३)




गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

जादूटोणाविरोधी कायद्याची वाटचाल




जादूटोणाविरोधी कायद्याची वाटचाल
दाभोलकर, कायदा, वाटचाल
नागपूरच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात ‘जादूटोणाविरोधी कायदा’ कार्यक्रमपत्रिकेवर होता. तो चर्चेला येईल, असे ठाम आश्वासन (नेहमीप्रमाणे) संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले होते. कायदा सरकारचा आहे. राज्यकर्त्या पक्षाचे विधानसभा व विधान परिषदेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे कायदा मंजूर होईल, अशी समितीची अपेक्षा होती. कायद्याच्या चर्चेच्या वेळेला मदतीची ठरावी म्हणून कायद्याचे स्वरूप, त्याबाबतचे आक्षेप व त्याबाबतची वस्तुस्थिती याची मी लिहिलेली पुस्तिका सत्तारूढ पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा पाठवली होती. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स व लोकमत या प्रमुख दैनिकांनी कायद्याला सहाय्यभूत ठरतील, असे लेख अधिवेशनाच्या आधी १५ दिवस छापले होते. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगत पत्रे लिहिली होती. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना कायदा करण्याबाबतची निवेदने देण्यात आली होती. ही सर्व अनुकुलता असतानाही एक मर्यादा स्पष्ट जाणवत होती. ती अशी की, १ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून अशी विनंती केली होती की, कायदा नागपूर अधिवेशनात मंजूर होण्यासाठी त्या उभयतांची विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांच्यासह बैठक घेऊन निर्णय व्हावा. खरे तर हे पत्र स्वत: ना. अजित पवारांनी ना. मुख्यमंत्र्यांच्या हातात दिले होते. त्याची प्रत मला पाठवली होती आणि त्यांचे कार्यालय मुख्यमंत्री कार्यालयाकडे बैठकीची वेळ मिळण्यासाठी पाठपुरावा करत होते. अधिवेशनाला तब्बल ४० दिवस असताना अशी बैठक घेणे ही बाब सहज साध्य होती; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. हे लक्षण कायदा करण्याच्या निर्धाराचे नव्हते.

१० डिसेंबरला अधिवेशन चालू झाले. १३ डिसेंबरला मी, अविनाश पाटील, गजेंद्र सुरकार नागपूरला विधिमंडळात होतो. वर उल्लेखलेली बैठक घेण्याबाबत दोनदा पत्र निघाले होते. परंतु प्रत्यक्षात बैठक झालेली नव्हती. ना. अजित पवार, ना. छगन भुजबळ, ना. लक्ष्मणराव ढोबळे, ना. हर्षवर्धन पाटील, ना. शिवाजीराव मोघे, ना. सचिन अहिर, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख, आ. विलासकाका उंडाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. डॉ. तांबे, आ. शिरीष चौधरी इतक्या जणांना त्या दिवशी आम्ही भेटलो. सगळ्यांचा सूर होकारात्मक होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलावलेली बैठक दोनदा पुढे का ढकलली गेली, हे कोणालाच माहीत नव्हते. शेवटी आम्ही मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गाठले. तेथील अधिकारी वर्ग कायद्याबाबत मनापासून मदत करणारा आहे. त्यामुळे ही बैठक ताबडतोब दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ तारखेला दुपारी २.०० वाजता लावण्यात ते यशस्वी झाले. सर्व मंत्र्यांच्या टेबलावर कायद्याला का विरोध करावा, याबाबत ‘सनातन प्रभात’चे अंक आदल्या दिवशी पोचल्याचे आढळले. १४ तारखेला आम्ही पुन्हा विधानसभेत गेलो. अपेक्षा अशी होती की, बैठकीत एकमत होऊन कायदा चर्चेला आणला जाईल, मंजूर होईल; परंतु असे दिसते की, कायदा सहमतीनेच व्हावे, असे मुख्यमंत्र्यांना वाटते आहे. जी बैठक १४ तारखेला झाली, त्याबद्दल जी माहिती मिळाली, त्याप्रमाणे मा. सभापतींनी कायद्याबाबत वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधींसमवेत आणखी चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला. अशी बैठक बुधवार, ता. २० डिसेंबर रोजी झाली असे कळते. तिला मुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे आणि वारकरी संप्रदायाचे नेते हजर होते. या बैठकीत कायद्याच्या प्रारूपावर काही आक्षेप घेण्यात आले. खरे तर या आक्षेपात काही नवीन नव्हते. दीड वर्षांपूर्वी ना. अजित पवार यांनी जी बैठक घेतली, त्यामध्ये असेच आक्षेप घेण्यात आले होते व त्याचे समाधानकारक उत्तर ना. पवार, ना. आर. आर. पाटील, विधी खात्याचे सचिव यांनी दिले होते. तसेच त्यांनी हे देखील सांगितले होते की, तुमचे अजून काही म्हणणे असेल तरी तुम्ही पुन्हा सचिवांना भेटा. पुन्हा दीड वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती होत होती. शासनाने तत्परतेने काम केले असते, तर ही बाब सहज टाळता आली असती. एक गोष्ट बरी होती, कायद्याबाबत आक्षेप घेणारा व अधिक चर्चेची मागणी करणारा एक विस्तृत लेख १६ डिसेंबरच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाला होता. मात्र त्यातील माहिती ही वास्तवाचा विपर्यास करणारी होती. त्यामुळे उत्तर देणारा माझा लेख १८ तारखेच्या ‘लोकमत’मध्ये त्याच जागी आणि तेवढ्याच विस्तृतपणे छापला गेला होता. तो ना. शिवाजीराव मोघे यांनी वाचला होता. तसेच अधिवेशन सुरू होण्यापूर्वी वृत्तपत्रात कायद्याबाबत आलेले माझे लेख हे मुख्यमंत्र्यांच्या नजरेसमोर ठेवण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्री कायदा करण्याबाबत होकारार्थी होते, असे कळते. तसेच तुकारामांचे थेट वंशज, ज्येष्ठ साहित्यिक व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनीही कायद्याच्या आवश्यक सामाजिक कार्याला वारकऱ्यांनी पाठिंबा देण्याची गरज व्यक्त केली. शेवटी ठरले असे की, सर्वांना सध्याच्या कायद्याचा मसुदा देण्यात यावा. त्यांच्या सूचनांसह कायदा पुन्हा तयार करावा आणि मंत्रिमंडळात मंजूर करून तो विधानसभेत मांडावा. कायदा शासनाचा आहे, त्यामुळे तो कशा पद्धतीने करायचा, हे अर्थातच शासन ठरवणार हे उघडच आहे; मात्र जे करावयाचे ते शासनाने कालबद्ध पद्धतीने व सत्वर करावे, अशी आपली अपेक्षा आहे.

नेमकी याच दिवशी आयबीएन लोकमत या चॅनेलवर ‘प्राईम टाईम’मध्ये मी, शिवसेना नेते दिवाकर रावते व काँग्रेसचे नेते आ. भाई जगताप यांची चर्चा झाली. कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांत प्रथम क्रमांकावर आ. रावते होते. मात्र त्या दिवशीचे त्यांचे प्रतिपादन वेगळेच होते. ते असे सांगत होते की, कायद्यात काही बदल करू घातले आहेत. ते झाले तर विरोधाचा फारसा प्रश्न उरणार नाही. आम्हाला ‘प्रबोधन’कार ठाकरे यांचा वारसा आहे. मात्र कायदा सर्व धर्मांना लागू हवा. (तो तसाच आहे). कायद्यातील हे बदल मंत्रिमंडळ गुरुवार, ता. २१ रोजी मंजूर करेल आणि पुढच्या दोन दिवसांत कायदा मंजूर करेल, अशी एक शक्यताही त्यांनी या चर्चेत व्यक्त केली. भाई जगताप यांनी तर मुख्यमंत्री होकारात्मक निर्णय लवकर घेणार, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गुरुवारच्या वृत्तपत्रात असे होण्याची शक्यताही व्यक्त झाली होती. अर्थात असे काही झाले नाही, हे कायद्याच्या आजपर्यंतच्या वाटचालीला धरूनच झाले.

आता ९ जानेवारीला वारकरी संप्रदायाच्या नेत्यांच्याबरोबर कायद्यातील प्रारूपात सुधारणा सुचवण्यासाठी शासनाची बैठक होईल. तिला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर गृहमंत्री आर. आर. पाटील, पिढीजात वारकरी असलेले. ना. बबनराव पाचपुते हजर असतील. त्यानंतर या सुधारणांबाबत शासन बहुधा विरोधी पक्षनेत्यांशी आणि समितीशीही चर्चा करेल. यातून सहमतीने तयार होणारे विधेयक मंत्रिमंडळासमोर जाईल व तेथे मंजूर झाले की, विधिमंडळात चर्चेला येईल. सहमतीच्या या प्रक्रियेमुळे कायदा सुरळीतपणे मंजूर होईल, असे सरकारला वाटते.

प्रत्यक्षात काय घडले हे पाहावे लागेल. शासनाची कार्यक्षमता व राजकीय इच्छाशक्ती याचा आजपर्यंतचा अनुभव आश्वासक नाही. शासनाला जर खरेच जादूटोणाविरोधी कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करावयाचा असेल तर त्यांना ते सहज शक्य आहे. कायद्यामधील सुचवलेल्या बदलांबाबत त्वरित निर्णय घेणे, कायद्याचा सुधारित मसुदा मंत्रिमंडळाने ताबडतोब मंजूर करणे व अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात स्पष्ट बहुमत असल्याने कायदा सहमतीने व ती न झाल्यास बहुमताने मंजूर करून घेणे, हे शासन सहज करू शकते. परंतु यातील प्रत्येक टप्प्यावर कितीही वेळकाढूपणा होऊ शकतो; तसेच कोणत्या स्वरुपाचा कायदाच होऊ नये, यासाठी कार्यरत असणाऱ्या शक्ती सहजासहजी आपला पराभव मान्य करणाऱ्या नसल्याने कायदा होण्यापासून सरकारला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न त्या करणार, हे उघड आहे. काय होते ते प्रत्यक्षात दिसेलच; मात्र माझा असा अनुभव आहे की, कायदा व्हावा, याबाबत जनमत दिवसेंदिवस अधिक अनुकूल होत चालले आहे. या हिवाळी अधिवेशनात कायदा होईल, अशी त्यांची अपेक्षा होती आणि तो झाला नाही, याबाबत नाराजीही अनेक ठिकाणी व्यक्त झाली आहे. कायद्यात धर्मविरोधी काही नाही, याची तर आता लोकांना खात्री पटली आहे आणि कायद्याची गरज स्पष्ट करणाऱ्या इतक्या घटना आजूबाजूला घडत असतात की, त्यासाठी वेगळे सांगण्याचीच गरज नाही. हे सर्व लक्षात घेता समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सहानुभूतीदारांनी, पाठीराख्यांनी कायदा होण्याबाबतचा आपला आग्रह कायम ठेवला पाहिजे. सत्याचा विजय उशिरा; पण निश्चित होईल, अशी माझी धारणा आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी २०१३)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...