रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

कॅच देम यंग

कॅच देम यंग
दाभोलकर, तरुण पिढी
      

शरद पवार यांनी आपल्यावरील मंत्रिपदाचा भार कमी करण्यासाठी पंतप्रधानांना केलेल्या विनंतीची बातमी अनेकांनी वाचली असणार. त्यातील राजकीय आशय जो काढावयाचा असेल, तो काढला जाईलच; परंतु स्वत: पवार यांनी त्यासाठी दिलेले कारण हे कोणत्याही चळवळीला गंभीरपणे विचारात घेण्यासारखे आहे, असे मला वाटते. शरद पवार यांनी दिलेले कारण असे की, पक्षाच्या संघटनेकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ पाहिजे आहे. पुढे त्यांनी असेही सांगितले की, मंत्रिपदाच्या कामामुळे अनेक जिल्ह्यांत मला जाता येत नाही आणि तरुणांसोबत संवाद साधता येत नाही. तो साधण्याची माझी इच्छा आहे. शरद पवार यांच्या राजकारणाबाबत गंभीर मतभेद असणे स्वाभाविक आहे, आणि ते आहेतही. मात्र त्यांची राजकीय समज व दूरदृष्टी या गुणांवरच ते राजकारणात टिकून आहेत. त्यांनी मांडलेला विचार हा जरी पक्षीय राजकारणाच्या संदर्भातील असला, तरी कुठल्याही संघटनेला या तीनही बाबी लागू आहेत. पहिली म्हणजे संघटनेला यश, नावलौकिक, प्रसिद्धी, पुरस्कार वगैरे वगैरे लाभत असले, तरी या सर्वांची पायाभूत ताकद संघटना आहे, याची जाणीव ठेवून या बाबीकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये. दुसरे असे की, ज्या संघटनेची जबाबदारी पार पाडावयाची आहे, त्यांनी सतत लोकांना भेटत राहावयास हवे. हे भेटणे पत्र, ई-मेल, फोन या मार्गानेही चालेल; परंतु त्याबरोबरच संबंधित कार्यकर्त्याच्या गावी जाऊन त्याला भेटणे याला पर्याय नाही, याचेही भान बाळगावयास हवे; पण अर्थातच या दोन मुद्द्यांची चर्चा म्हणजे संघटनाबांधणीची चर्चा होईल आणि स्वाभाविकच अं. नि. वार्तापत्राचा बहुसंख्य वाचक हा कार्यकर्ता नसल्याने यापुढील मजकूर वाचणे सोडून देईल. त्यासाठी मला प्रामुख्याने भर द्यावयाचा आहे तो तिसऱ्या मुद्द्यावर. तो मुद्दा म्हणजे तरुणांच्या सोबत सतत संवाद साधण्याचा.
     
शरद पवारांना हा संवाद निश्चितच सोपा आहे. कारण यांच्याकडे सत्तेचे चुंबकत्व आहे. विचाराच्या आधारे समाज बदलू इच्छिणारे ‘अंनिस’चे कार्यकर्ते परिवर्तनाच्या विचारावर प्रेम करत असल्यामुळे हे मासिक वाचणारे वाचक यांच्या बाबतीत हा मुद्दा अधिकच महत्त्वाचा आहे. तो लक्षात आणून देणे, यासाठी हा लेखनप्रपंच.
     
समाज कृतीने बदलावा लागतो, हे खरेच; परंतु त्याची सुरुवात लोकांच्या मनात विचाराची पेरणी करूनच करावी लागते. कोणत्या भूमीत पेरले असता भरघोस पीक येईल, या निवडीचे शहाणपण बळीराजा दाखवतो. विचारांच्या निवडीबाबतही हेच म्हणता येईल. विचार पेरण्याची सर्वांत सोयीस्कर व किफायतशीर मनोभूमी ही तरुणांची किंवा किशोरवयीन मुलांचीच असते. एकतर त्यांचे मन तुलनेने अधिक कोरे, अधिक संवेदनशील, वयामुळे अधिक सजग व प्रतिसादक्षम असण्याची शक्यता असते; नव्हे असतेच, शिवाय त्यांना जो विचार पटेल, तो आयुष्यभर जोपासण्याची आणि जी चूक वाटेल त्यासाठी लढण्याची स्वाभाविक ऊर्मी तरुणांच्यात असते. धोक्याची बाब अशीही आहे की, प्रतिगामी शक्ती या तरुणांच्या आणि किशोरांच्या मनाचा ताबा घेण्यासाठी धडपडत असतात. त्यांना त्या बीजारोपणात त्यांच्या पुढील यशाचे आडाखे दिसत असतात. अशा वेळी तरुणांशी संवाद साधणे, ही बाब केवळ अंनिस कार्यकर्त्यांसाठी नाही, तर परिवर्तनावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रामाणिक व्यक्तीसाठी आवश्यक ठरते. हा संवाद साधताना निदान दोन गोष्टींचे भान बाळगावयास हवे. पहिली गोष्ट अशी की, आपल्याला केवळ समाजाचे काही भले करण्याचा संदेश वा विचार द्यावयाचा नाही. तसे असेल तर विधायक कामाची ‘सरकारछाप एजन्सी’ असे स्वरूप या प्रयत्नाला येईल. परिवर्तनाचा पुरोगामी विचार, भले त्याची छटा कोणतीही असो; जे सूत्र मानते ते एका वाक्यात असे - ‘आपल्या आजूबाजूच्या सर्व घटनांचा कार्यकारणभाव लावता येतो आणि प्रयत्नातून अनुकूलपणे बदलता येतो. ‘माझ्या अलिकडील काळातील महाविद्यालयातील वा अन्यत्र ठिकाणच्या शेकडो व्याख्यानांचा अनुभव मला असे सांगतो की, परिवर्तन हे सूत्र बहुसंख्यांना माहीतच नसते. त्यामुळे मान्य असणे वा नसणे याचा संबंध येत नाही. अर्थातच हे सूत्र तरुणांपर्यंत पोचवावयाचे असेल, तर स्वत: त्याचा अभ्यास करणे व ती जीवनदृष्टी स्वीकारणे, हे महत्त्वाचे आहेच. मात्र हा फक्त पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की, सर्व प्रकारची साधने वापरून हा विचार तरुणांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाषण देणे वा चमत्कार करणे, यापेक्षा अन्य अनेक कल्पक मार्ग या संवादासाठी वापरता येणे शक्य आहे. ते तुम्हाला सहज सुचतील. स्वत:ची क्षमता व परिस्थितीची गरज लक्षात घेऊन स्वत:च्या विचारांची बीजे सतत चर्चेत राहतील, असा प्रयत्न करावयास हवा. उदा. जागतिक फुटबॉल सामन्यात जर्मनीच्या बलाढ्य संघाचा विजय होणार की पराजय, हे जर्मनीतील एका मत्स्यालयातील ‘ऑक्टोपस’ अचूक सांगतो, ही बाब प्रचंड चर्चेची झाली होती. आता अशा घटनेची चर्चा करून नियती, दैव, भविष्य, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा अनेक बाबींच्या चर्चा गप्पा मारत-मारत तरुणांच्यांत घडवून आणता आल्या असत्या. हेही लक्षात ठेवावयास हवे की, तरुणाचा अर्थ केवळ कॉलेजातील विद्यार्थी नाही. आज आपल्या देशात १८ ते २३ वयोगटातील फक्त ९ टक्के विद्यार्थी कॉलेजात जातात. त्यामुळे त्यांच्या बाहेर पसरलेल्या तरुणाईच्या अथांग सागराशी संवाद साधण्याचे कौशल्य आपल्या प्रतिभेने निर्माण करावयास हवे. १३ ते १६ वयोगटातला किशोर छोट्या प्रमाणात शाळेत उपलब्ध आहे. त्यांच्याशी संवाद साधावयास हवा.
     
तुम्ही समितीचे कार्यकर्ते असा वा नसा; किशोर व युवक यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलनाचा किंवा परिर्वतनवादी कोणत्याही विचाराचा संवाद साधण्याचा जो प्रयत्न कराल, त्याचा अनुभव मला जरूर कळवा. महाराष्ट्रातील तरुणाईशी संवाद साधण्याचे अभिनव मार्ग त्यातूनच मिळतील आणि असा तरुणच उद्याच्या विचारी समाजाचे चित्र साकार करू शकेल.
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २०१०)


शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

अंनिसच्या दोन बँकांचा प्रस्ताव

अंनिसच्या दोन बँकांचा प्रस्ताव
दाभोलकर, संघटन, अनुभव 



संघटनेतर्फे दोन बँका काढण्याच्या विचारात आहे. वरील वाक्य वाचल्यानंतर चळवळीचे कार्यकर्ते, हितचिंतक नक्कीच विचारात पडणार. चळवळ करणे, प्रबोधन करणे हेच ज्यांचे काम, त्या संघटनेत हा भलताच (कु) विचार कठून आला? आणि कशासाठी? असे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनावर उमटले असणार.

बँक काय करते?
ठेवीदारांना आधार देते. पैसे आपलेच असतात; पण सुरक्षित राहतात, वाढतात. ठेवीदाराला हवे त्या वेळी, हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होतात.
     
संघटनेच्या बँका कशाच्या? एक कार्यकर्त्यांच्या क्षमतेच्या व वेळाच्या. दुसऱ्या आर्थिक सहकार्याच्या.

थोडे अधिक स्पष्ट करतो म्हणजे नेमकेपणाने समजेल. समितीच्या क्रियाशील सभासदत्वाचा एक निकष आहे की, त्याने स्वत:च्या वार्षिक उत्पन्नाचा अर्धा टक्का अथवा २५० रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती वार्षिक देणगी वा सभासदत्वाची फी म्हणून स्थानिक शाखेला द्यावी. माझ्या कल्पनेप्रमाणे हा निकष अत्यंत अपवादानेच शाखा, क्रियाशील कार्यकर्ते पाळतात. मग शाखेचा आर्थिक भार निघतो कसा? काही ठिकाणी शाखेने मिळवलेल्या जाहिरातीच्या रकमेच्या दहा टक्के मिळतात, काही ठिकाणी व्याख्यानांचे मानधन येते. कार्यकर्ते स्वत:च्या खिशातून बिनबोभाट खर्च करतात, तर काही वेळा स्वयंअध्ययन प्रकल्प मदतीला धावतो. हे सर्व चांगलेच आहे. पण एका अर्थाने परावलंबी आहे. जाहिरात देणारे, भाषणाला बोलावणारे, स्वयंअध्ययन प्रश्नपत्रिका घेणारे, हे सर्व बाहेरचे असतात. प्रतिकूल परिस्थितीत हा आधार तुटू शकतो. कार्यकर्ता स्वत: खर्च करतो, हे उत्तमच; पण तेही प्रकल्प, चळवळ निघाली तरच खर्च, अशा स्वरुपात होतो.
प्रकाश डब्बावारांचे खालील पत्र वाचावे -

प्रिय डॉ. दाभोलकर यांना,
प्रकाश डब्बावार यांचा स.न.
कार्यकर्ता काय नाही करू शकत, असा प्रतिप्रश्न मी कार्यकर्त्याला करतो. कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्याने मनावर घेतले तर अशक्य कार्य शक्य करू शकतो. उदा. माझे विद्युत मंडळ कार्यालय यवतमाळ येथे बस स्टँडजवळ आहे. मला रोज दुपारी दीड ते दोन विश्रांतीसाठी वेळ असते. त्या वेळेत मी बसस्टँडवर ‘अंनिवा’चे जुने अंक केवळ अर्ध्या तासात अल्प किमतीमध्ये (५० रुपयांचे) विकतो. कधी-कधी अंक विकले गेले नाही तर ओळख होते. यावर थोडीफार चर्चा होते, चमत्कार सादरीकरणाची तारीख मिळते. तसेच नवीन कार्यकर्ता पण मिळतो. ‘भूत-भानामती-जादूटोणा-करणी’ कशी काय होते, जगात भूत आहे की नाही, नरबळी का दिला जातो, कर्मकांड कसे निरर्थक, हे सर्व प्रश्न या मासिकात वाचावयास मिळेल,’ असे म्हणून सुरूवात करतो. ‘आपण वाचा, मित्रमंडळीला वाचावयास द्या किंवा जवळच्या वाचनालयाला भेट द्या. आपले ५-१० रुपये कोठे जात नाहीत,’ असे नंतर म्हणतो व शेवटी ऐकले तर ‘हे बघा मी इलेक्ट्रिकल ऑफीसमध्ये बडे बाबू आहोत. मला २५ हजार रुपये पगार मिळतो. समाजकार्याचा एक भाग म्हणून मी तुमच्या समोर आलो आहे. या मासिकांचा प्रचार व्हावा व जनप्रबोधन व्हावे’, हाच मुख्य हेतू यामागे आहे.

आपणास बसस्टँडवर शक्य नसेल, तर लाईनमध्ये (क्यू) तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती किंवा कोणत्याही सरकारी, निमसरकारी कार्यालयात विकू शकता. प्रवासात एस.टी. किंवा रेल्वेमध्ये पण विकू शकता. तसेच रविवारी सकाळी ८ ते ११ च्या दरम्यान ओळखीच्या घरी किंवा अपार्टमेंटमध्ये जाऊन चर्चा करून विकू शकता किंवा वर्गणीदार नोंदवू शकता. मनात लपलेली लाज काढून टाका. आपण चोरी, लबाडी करीत नाही; एक चांगलं समाजकार्य करीत आहोत, हे लक्षात ठेवा व प्रयत्न तर करून बघा.

नुकतीच ऑगस्ट ०९ च्या ‘अं.नि.वा.’मध्ये कार्याध्यक्षांची डायरी वाचली. स्व-मूल्यांकन केले आणि थोडा इतरांचा (नातेवाईक-शेजारी व अनेक) विचार केला की, धार्मिक लोक अज्ञानामुळे धार्मिकतेवर भरमसाठ खर्च करतात; वेळप्रसंगी कर्ज काढतात व नवस फेडतात. महालक्ष्मीचे (गणपती उत्सवा दरम्यान) जेवण द्यावयाला कमीत-कमी ५००० रुपये दरवर्षी लागतात. मी तर कोणतेच धार्मिक विधी करीत नाही किंवा देव मानत नाही; मग असाच खर्च समजून समितीला १० हजार रुपयांची देणगी दिली. मला समितीला अजून देणे बाकी आहे, हे पार विसरूनच गेलो होतो. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर व नीताताई सावंत, चाळीसगाव यांनी ऑगस्ट २००९ च्या अंकातून आठवण करून दिली, याबद्दल आभारी आहोत. तरी कार्यकर्त्यांस नम्र विनंती की, आपण पण स्व-मूल्यांकन करावे.

आपला,
प्रकाश डब्बावार, यवतमाळ
     
अशाच प्रवृत्तीची आणखी दोन नावे म्हणजे मल्हारपेठचे डॉ. वनारसे पती-पत्नी. परवाच त्यांचे २१ हजार रुपये आले. त्यांनी संघटनेला आजपर्यंत दिलेल्या देणगीचा आकडा आता लाखाच्या घरात पोचला असेल. पुण्याच्या अनंत लिमयेंना कोणतेच व्यसन नाही. पण संघटनेला पैसे देण्याचे व्यसन त्यांना असावे. पुन्हा यापैकी कोणालाही एका शब्दाचा गाजावाजा आवडत नाही, हे त्यांचे मोठेपण. मला असे दिसते की, आज संघटनेत एक वर्ग निश्चितपणे असा आहे की, वर्षाला जो हजार वा त्या पटीत संघटनेला पैसे देऊ शकतो. ते स्थानिक शाखेला द्यावेत वा ‘मध्यवर्ती’ला. परंतु त्यामुळे असा विश्वास संघटनेत उभा राहतो की, भले प्रतिकुलतेची वादळे येवोत; पण आपली नाव भरभक्कम आहे. ज्या-ज्या संघटना ध्येयवादावर उभ्या राहतात, त्यांच्यासाठी हे नवीन नाही. कम्युनिस्ट या देणगीला ‘लेव्ही’ म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला ‘गुरुदक्षिणा’ म्हणतो. गुरुदक्षिणा तर गुप्त असते. ‘इदं न मम’ म्हणून देऊन टाकायची. प्रवास, फोन, स्टेशनरी असले छोटे-मोठे खर्च तर कार्यकर्ते स्वत: करतातच; त्यापलिकडची आपली बांधिलकी म्हणजे लेव्ही अथवा गुरुदक्षिणा. ज्या संघटनांना असे आतून उचंबळलेले जिव्हाळ्याचे झरे लाभतात, त्या संघटना प्रतिकुलतेवर मात करत झुंजतात. कारण त्यांच्या बँकेवर हक्काची शिल्लक साठलेली असते. कार्यकर्त्यांनी आणि ज्यांना-ज्यांना असे काम उभे राहावे वाटते, त्या हितचिंतकांनी गांभीर्याने संघटनेच्या अशा बँकेत आपले खाते उघडण्याचा विचार करावा.
     
दुसरी बँक त्याहीपेक्षा गरजेची. संघटनेसाठी द्यावयाच्या वेळेची आणि क्षमतांची. खरे तर आज ती सुरू आहेच; पण असंघटित स्वरूपात. ती कल्पना मला सुचली. मकबूल गवंडी, जत यांच्या मागील वार्तापत्रातील निवेदनावरून मकबूल गवंडी यांनी काहीशी मुदतपूर्व निवृत्ती घेतली आणि सर्व वेळ ‘अंनिस’ला देण्याचे जाहीर केले. गेल्या वर्षभरात अशा आणखी दोन घटना घडल्या. मिलिंद देशमुख, पुणे व शहाजी भोसले, औरंगाबाद यांना निवृत्तीआधी बरेच दिवस सक्तीची स्वेच्छानिवृत्ती पत्करावी लागली. पर्यायी नोकरीच्या शोधात जाण्याऐवजी त्यांनी समितीचे कार्य करण्याचा निर्णय घेतला. शहाजी भोसलेंमुळे औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील कामाला अधिक उठाव मिळाला. मिलिंद देशमुखांमुळे पुणे शहर शाखा उत्तम प्रकारे रांकेला लागली. संघटनात्मक शिबिरात त्याचा चांगला उपयोग झाला. शहाजी भोसले तर चमत्कारांचे सादरीकरण व्यावसायिक दर्जाचे करतो. या सहकाऱ्यांकडे वेग आहे, क्षमताही आहे. अशीच आणखी दोन नावे म्हणजे प्रा. प. रा. आर्डे व श्रीमती सुमन ओक. आर्डे सर यशस्वीपणे वार्तापत्र सांभाळत आहेत; तर श्रीमती सुमन ओक मराठीचे इंग्लिश व इंग्लिशचे मराठी भाषांतर उत्तम आणि सत्वर करून देतात. आमच्याकडे एवढा वेळ आहे, या क्षमता आहेत आणि या स्वरुपाच्या कामाची इच्छा आहे. असे अनेक जण असणार. त्यांनी या बँकेत खाते उघडावे (म्हणजे मला कळवावे) बँकेतील पैसे गरजेनुसार काढतो, तसे या सर्वांचा वेळ आणि क्षमता संघटनेच्या गरजेला हुकमी पद्धतीने उपयोगात आणता येतील.
     
आजचे जग आहे व्यवस्थापनाचे, नियोजनाचे व स्वावलंबनाचे. या दोन्ही बँका आपण समृद्ध केल्या तर संघटनेचा पाया अधिक मजबूतपणे विस्तारला जाईल. 
पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर २००९)


शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

चमत्कार सादरीकरण प्रभावी हवे

चमत्कार सादरीकरण प्रभावी हवे
दाभोलकर, चमत्कार, प्रभाव



अलिबागला गेलो होतो. सायंकाळी जाहीर व्याख्यान होते. त्याआधी दुपारी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या समवेत चर्चा झाली. जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी गेली २० वर्षे सातत्याने क्रियाशील राहून जिल्ह्यात चळवळ रुजवली आहे. मुख्य उपक्रम चमत्कारांचे सादरीकरण व भाषण. २० वर्षांत किती भाषणे दिली असतील व चमत्कार केले असतील, याची मोजदादच नाही. त्यांचे प्रतिपादन असे होते की, ‘आम्ही चमत्कार करतो, भाषणे देतो, लोकांनाही कमी-जास्त प्रमाणात ती आवडतात. पण आम्हाला आता असे वाटते की, तेच-तेच चमत्कार आणि तीच-तीच भाषणे देऊन आता काहीसा कंटाळा येतो आहे. यावर उपाय काय?’ हा प्रश्न प्रातिनिधिक मानावयास हवा. आपले अनेक प्रमुख कार्यकर्ते चमत्कारांचे सादरीकरण आणि त्यासोबत ‘तेच-तेच’ भाषण देत असतात. श्रोतृ वर्ग वेगळा असतो. त्यामुळे श्रोत्यांना कदाचित ते चमत्कार व ते व्याख्यान आवडतही असेल; परंतु कार्यकर्त्याला त्याचा आनंद घेता येत नसेल तर..? तरीही ‘आता कंटाळलो बुवा चमत्कार करून, पुरे झाले, आता इतरांनी; ज्यांना हे प्रयोग करावयाचे असतील त्यांनी करावेत,’ असा विचार कार्यकर्त्याने करणे चूक आहे. चमत्कार सादरीकरण हे चळवळीचे प्रभावी हत्यार आहे. चळवळवाढीची अत्यंत गरज आहे. अशा वेळी आपले प्रभावी हत्यार म्यान करण्यात काहीच शहाणपणा नाही. पण मग करायचे काय? त्याच कंटाळवाण्या पाट्या परत-परत टाकत राहावयाच्या काय? याचे खरे उत्तर असे आहे की, आहे या परिस्थितीतही अनेक सुधारणा निश्चितपणे शक्य आहेत की, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढेल आणि स्वाभाविकच सादर करणाऱ्याचाही उत्साह वाढेल. यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे :



१) अनेक वेळा तेच-तेच चमत्कार सादर केले जातात. कारण नवे चमत्कार शिकण्याची वृत्ती दाखवली जात नाही. समितीच्या प्रकाशनात अनेक चमत्कार आहेत. त्यातील काही ना काही चमत्कारांची भर स्वत:च्या कार्यक्रमात कार्यकर्ता घालत राहिल्यास त्याला ही भावना येणार नाही.



२) सर्वच चमत्कार बुवाबाजीविरोधाचे असण्याची गरज नाही. विज्ञानाच्या नियमावर आधारित अनेक चमत्कार आता तयार विकत मिळतात. ते खरे तर रंजक विज्ञान प्रयोग असतात. त्यापैकी काही प्रयोगांचा सराव करून त्याचा समावेश चमत्कार सादरीकरणाच्या कार्यक्रमात करावा.

३) काही प्रयोग चक्क जादूचे असतात; परंतु थोड्या कल्पकतेने त्याला बुवाबाजी चमत्काराचे रूप देता येते. असे प्रयोग हुडकावेत.



४) राज्यातील वेगवेगळ्या शाखेतील कार्यकर्ते काही निराळे चमत्कार करत असतात, ते मिळवावेत.



५) चमत्कार सादरीकरणाएवढेच त्या समवेत द्यावयाचे भाषणदेखील महत्त्वाचे असते. हे भाषण तेच-तेच करणे हा निव्वळ आळसाचा प्रकार आहे. तीन प्रकारच्या समावेशाने भाषण एकाच वेळी रंजक व उद्बोधक बनू शकते. त्या बाबी अशा

·         वैज्ञानिक दृष्टिकोन,

·         बुवाबाजी, भूत, भानामती या विरोधातील वैचारिक मुद्दे,

·         चळवळीचे किस्से.

या तिन्ही बाबतीत भरपूर तपशील चळवळीत उपलब्ध आहे. त्यापैकी फारच थोडा भाषणात वापरावयास मिळतो. स्वाभाविकच वेगवेगळ्या भाषणात वेगवेगळे मुद्दे येतात आणि त्यामुळे भाषण देणाऱ्याला कंटाळा येण्याचा प्रश्नच येत नाही.



६) चमत्कारांची खरी शक्ती ही सादरीकरणाच्या कौशल्यावर अवलंबून असते. याबाबत मला असे स्पष्ट जाणवते की, सुधारणेला प्रचंड संधी आहे. चमत्काराची परिणामकारकता ही बहुसंख्य प्रमाणात सादरीकरणाच्या क्षमतेवर अवलंबून असते. यासंदर्भात कार्यकर्ते अजिबात लवचिकता दाखवत नाहीत. चमत्कार तोच असतो; परंतु वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळे कार्यकर्ते, विविध प्रकारे चमत्कार सादर करून रंगत आणत असतात. याबाबत एक स्टॅण्डर्ड यशस्वी फॉर्म्युला ही समितीच्या ‘चमत्कार सादरीकरणाची संहिता’ या कुमार मंडपे व प्रशांत पोतदार लिखित पुस्तकात आहे. तोच वापरावयास हवा, असा आग्रह नाही; परंतु तो पुरेसा परिणामकारक आहे, हे सिद्ध झाले आहे आणि बहुसंख्य ठिकाणी तेवढीही परिणामकारकता सादरीकरणात साधली जात नाही. अर्थातच तो काही शेवटचा शब्द नाही. आपले सादरीकरण इतरांच्या सूचनांनी, मदतीने, अनुभवांनी, परीक्षणांनी सतत सुधारत ठेवावयास हवे. असे झाले तर चमत्कार सादरीकरण हे व्यावसायिक तोडीचे होऊ लागते आणि स्वाभाविकच त्यातील स्वत:ची आणि इतरांची रूचीही वाढते. याबाबत जे कार्यकर्ते चमत्कार सादरीकरणाचे कार्यक्रम करतात, त्यांच्या सूचनांचे संघटनेला अगत्य आहे. त्यांनी जरूर त्यांचे अनुभव मला कळवावेत. या टिपणात नक्कीच त्यांची भर घालून आपण संघटनेचे हे हत्यार अधिक परिणामकारक व अधिक प्रभावी करू शकू.

पूर्व प्रसिद्धीः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

(जून २००९)



‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...