सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

वाचेल तो वाचेल



वाचेल तो वाचेल
दाभोलकर, वाचन-लेखन-चिंतन, अध्ययन, व्यापक परिवर्तन
एका शाखेची बैठक. नियमित कार्यरत असलेले आठ-दहा कार्यकर्ते उपस्थित. मला एका ठिकाणी विचारलेला प्रश्न चर्चेला घेतला. प्रश्न होता, ‘मानसिक आजार बरे होतात का हो?’ सर्वांना विचारले. उत्तरे अपुरी होती. काही चक्क चुकीची होती. नेमके मुद्देसूद उत्तर एकही नव्हते. मन आजारी का पडते? सौम्य व गंभीर मानसिक आजारातील फरक, उपाय कोणते? त्याची परिणामकारकता व मर्यादा, या मुद्द्यांना स्पर्श करणारे, समोरच्या व्यक्तीचे समाधान करू शकणारे उत्तर मिळाले नाही. सत्यशोध प्रज्ञा प्रकल्पाची शिबिरे आता खूप होतात. शिबिरार्थी शिक्षक असतात. त्यांचेही चपखल समाधान होत नाही, असे अनेकदा कळते. असे का घडते? वाचणे, वाचलेले पचवणे, ते मुद्देसूदपणे प्रकट करणे, याला वैचारिक चळवळीत पर्यायच नाही. याकडे गांभीर्याने आणि आवडीने आपण लक्षच देत नाही, असे घडते आहे का? चमकदार उपक्रम आणि सतत काही कामाचा रेटा यामुळे वाचणे तेवढेसे महत्त्वाचे नाही, असे तर आपणास वाटू लागलेले आहे काय? कार्यकर्त्यांनी संघटनेत, वार्तापत्रात यावर मनमोकळेपणे बोलावयास, लिहावयास हवे. हा प्रश्न तसा जुनाच आहे. अंधश्रद्धांच्या बाबत लोकांच्या मनात जे प्रश्न सतत येतात, त्यांची उत्तरे पटतील अशी देणे, हे तर आपले कर्तव्यच आहे. परंतु त्यापलिकडेही आता त्याचा संघर्ष गेला आहे म्हणून तो पुन्हा घेतला. पुण्याच्या मेळाव्यात आलेल्या सहकाऱ्यांना हे निश्चित जाणवले असणार की, समिती व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा भाग होण्याची गरज मेळाव्यात आलेले अनेक मान्यवर वक्ते व्यक्त करत होते. त्याचा अर्थ असा नव्हे की, भ्रष्टाचार, पर्यावरण, स्त्री-पुरुष समता आणि अशा अनेक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांच्या लढ्यात समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट उतरावयाचे. मग काय करावयाचे? त्याचे सूत्र म्हणजे विचार वैश्विक करा, कृती स्थानिक करा. आपल्या आजूबाजूला बरेच काही घडत असते. अंधश्रद्धा जोपासणारे, अविवेकी बनणारे, अपरिहार्यपणे अंधश्रद्धांना शरण जाणारे व्यक्तिगत सामाजिक मन त्यामधून घडत असते. वैचारिक पातळीवर हे समजावून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कार्याचे व्यापक सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ, समाजातील आपली वृत्ती अंधश्रद्धेच्या क्षेत्रात राहील; पण जाणीव वैश्विक राहील. हे घडावे कसे?




अड्डा संस्कृती व वालेचिं
अड्डा या शब्दाचा अर्थ गप्पा-टप्पा करण्याची, चहा पिण्याची, पत्ते खेळण्याची ठराविक मंडळींची जागा, असा केला जातो आणि एका मर्यादेत तो खराही अहे. पण पुरोगामी चळवळीत या शब्दाला विचारांची अनौपचारिक; पण जोरकस देवाणघेवाण जेथे घडते ते केंद्र असा देखील एक अर्थ अनुभवसिद्धपणे चिकटला आहे. संघटनेच्या बैठकीची शिस्त अड्ड्यावर नसते, वेळेचे बंधन नसते आणि यावयास हवेच, असा आग्रहही नसतो; पण तरीही अधून-मधून अड्ड्यावर चक्कर टाकली नाही, तर संबंधितांना चुकल्या-चुकल्यासारखे वाटत असते. याचे कारण एक मनमोकळी, निकोप, ताजीतवानी देवाणघेवाण तेथे सुरू असते. विचाराला नवनवे खाद्य मिळत असते, संदर्भ मिळत असतात. समज आपोआप प्रगल्भ होत असते. पुस्तके वाचणे, शिस्तशीरपणे विषय ठरवून चर्चा करणे, यापेक्षा स्नेहबंधातील अनौपचारिक संवाद एक वेगळी समज व समृद्धी देत असतो. डाव्या चळवळीत त्यांच्या जनसंघटना जेव्हा जोरात होत्या, तेव्हा अर्थातच ही अड्डा संस्कृती बहरात होती. आज ती सर्वत्र याच स्वरुपात असेल, असेही नाही; पण नवीन वाचावे, वाचलेले इतरांना सांगावे, त्यांच्याशी वाद-संवाद-विवाद करावा, अशी भूक असणारी माणसे, छोटे-मोठे गट सर्वत्र असतात. शिस्तशीर वैचारिक अभ्यास करावयाला वेळ नसला तर अशा अड्ड्याशी कार्यकर्त्यांनी जरूर संपर्क ठेवावा. स्वत:चा अड्डा तयार करता आल्यास फारच चांगले. त्यामुळे वैचारिक कक्षा सहजपणे रुंदावल्या जातील. स्थानिक संघर्ष करता-करता व्यापकतेचे भान वाढत जाईल.

 वालेचिं’ मंडळ
वालेचिं मंडळ हा खरे तर आपल्याच धुळे शाखेने केलेला उपक्रम. वा-वाचन, ले-लेखन, चिं-चिंतन. हे तसे ठरवून करावयास हवे आणि शक्य तर सामूहिकपणे. आपल्या चळवळीच्या विचारस्पष्टतेसाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. वाचन आपण करतोच (असे आपण गृहीत धरूया) वाचलेले वा वाचनाशी सुसंगत असलेले विचार लिहून काढणे हे बहुधा कोणीच करत नाही. लिखाणाचा सर्वात सोपा; पण प्रभावी मार्ग म्हणजे वृत्तपत्रीय पत्रलेखन. त्या-त्या जिल्ह्यातील वा विभागातील वृत्तपत्रात आपल्या विचाराचे प्रतिबिंब पाडण्याचा एक परिणामकारक मार्ग पत्रलेखनातून मिळतो. आपल्या चळवळीशी संबंधित विचाराला तर तोटाच नसतो आणि बहुधा ती पत्रे छापली जातात आणि वाचलीही. अर्थात लेखन म्हणजे ते हेच, असा गैरसमज मात्र कृपया याबाबत कोणी करू नये. वाचलेले नीटपणे शब्दबद्ध करण्याची सवय लागली तर ती खूप फायद्याची ठरतेच; शिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवा पैलू मिळतो. लेखन दैनिकातील पत्रव्यवहाराचे असो वा चळवळीच्या वैचारिक मांडणीचे; पण त्यासाठी चिंतन हे लागतेच. याची जाणीवपूर्वक तयारी करण्याचा प्रयत्न करणारा वालेचिं मंडळाचा उपक्रम म्हणून महत्त्वाचा. जो वाचेल, तो वाचेल असे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते. वाचणे, पचविणे, लिहिणे आणि दुसऱ्याला समजावणे हीच तर आपल्या चळवळीची शस्त्रे आणि अस्त्रे. ती सदैव धारदारच ठेवावयास हवीत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(एप्रिल १९९७)

रविवार, ३ डिसेंबर, २०१७

बांधिलकीची व्यापक वाट



बांधिलकीची व्यापक वाट
दाभोलकर, सामाजिक कृतज्ञता निधी, नवे वाण, शनि-शिंगणापूर
आपली चळवळ व्यापक समाजपरिवर्तनाशी जोडण्याची भाषा आपण नेहमी बोलतो. आपली तशी मनापासून इच्छाही असते; प्रत्यक्षात मात्र हे तसे अवघडच असते. व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उरलेल्या वेळात आपले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य यामध्ये वेळ मिळणे जमत नाही. तरीही काही वेळा, प्रसंग असे येतात की, ही बांधिलकी सांभाळावी लागते. भावकीला मदत करताना हातातले काम बाजूला ठेवावे लागते. सामाजिक कृतज्ञता निधीच्या एक उपवास कृतज्ञतेचा या उपक्रमाला आपल्या कार्यकर्त्यांनी जो हातभार लावला, त्यामुळे त्यांच्या या व्यापक सामाजिक बांधिलकीची प्रचीती आली.

पूर्णवेळ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाप्रती समाजाची कृतज्ञता म्हणून मानधन देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना दहा वर्षांपूर्वी झाली. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, बाबा आढाव, अनिल अवचट, पुष्पाताई भावे ही आपली सारी ज्येष्ठ मित्रमंडळी त्यामध्ये आहेत; मीही आहे. निधीची रक्कम वाढवण्यासाठी एक उपवास कृतज्ञतेचा ही अभिनव मोहीम घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ३० जानेवारीस हुतात्मादिनी एकवेळचा उपवास करावा आणि त्यातून वाचलेले पाच वा दहा रुपये फक्त या निधीसाठी द्यावेत, अशी ही कल्पना. महाराष्ट्रात ती पहिल्या टप्प्यावर आठ जिल्ह्यात पोचवायची ठरली. त्यापैकी अनेक ठिकाणी उत्साहाने याचे संयोजन करणारे कार्यकर्ते नव्हते किंवा होते तरी त्यांना मदतीची गरज होती. हे काम आपल्या समितीच्या शाखांच्या विविध कार्यकर्त्यांनी फार तत्परतेने केले.

सावंतवाडी येथे नागरिकांची सभा आयोजित करणे, जिल्हाभर नागरिकांच्या पातळीवर निधी संकलनासाठी संपर्क साधणे हे काम डॉ. कदम, त्यांच्या पत्नी, डॉ. विजया चिंडक व तेथील शाखेच्या अन्य कार्यकर्त्यांनी यांनी स्वत:ला तोशिष लावून केले. रत्नागिरी जिल्ह्यात संयोजन मुळातच उभे राहत नव्हते. त्यासाठी दापोली, चिपळूण, रत्नागिरी अशी त्रिस्थळी धावाधाव स्वत:च्या खर्चाने स्वत:ची मोटार बाहेर काढून अमृते यांनी केली. छपाई, पोस्टिंग ही सारी हमाली कामे अनिश पटवर्धन यांनी पार पाडली. नगरलाही अशीच अडचण होती. तेथील जिल्हा अध्यक्ष पी. बी. कडू-पाटील, कार्यवाह बाबा आरगडे, नीलिमाताई बंडेलू, रवींद्र सातपुते, रामचंद्र तावरे यांच्या धडपडीतून नगरला संयोजन होऊ शकले. नाशिकला एकूण आखणी उत्तम केली होती. त्यामध्ये इतरांच्या जोडीने तेथील सामाजिक कृतज्ञता निधी मित्रमंडळाचे एक निमंत्रक व आपल्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. किशोर पवार यांचा महत्त्वाचा वाटा होता. जळगावच्या संयोजनात अविनाश पाटीलची धडपड होती. आपापल्या ठिकाणी हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जावा म्हणून तासगाव (जि. सांगली) व सिंदखेडा (जि. धुळे) येथे अनुक्रमे प्रताप घाटगे व परेश शहा यांनी जणू मोहीमच राबविली आणि खरे तर इथे नावे न लिहिलेल्या आपल्या इतर अनेक कार्यकर्त्यांनी घरचेच काम आहे, असे समजून अगत्य दाखविले. चळवळीच्या ज्या ज्येष्ठ मित्रांची नावे वर लिहिली आहेत, त्या सर्वांना या सहभागाबद्दल आनंद वाटला. व्यापक समाजकारणाशी दैनंदिन कामात जोडून घेणे शक्य होत नसेल; पण गरज पडताच हे तर आपलेच काम आहे, ही समज, उमज व कृती आपल्या कार्यकर्त्यांनी सहजपणे, परिणामकारकपणे दाखविली, याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करावयास हवे.

नवे वाण
रूढी, प्रथा, कर्मकांडे यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी आहे, अशी सर्वसाधारणपणे कल्पना असते. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी, कुटुंबियांनी या स्वरुपाचे कोणतेही वर्तन केले की, ते लगेच चर्चेचा विषय होते. याबाबत नेहमी दोन-तीन मुद्दे पुढे येतात. एक म्हणजे सगळी कर्मकांडे सरसकट नाकारावीत. दुसऱ्या काहीजणांचा आग्रह असतो, असे वागणे म्हणजे समाजापासून तुटून पडणे होईल. त्यामुळे ज्या कर्मकांडांना शोषण, मिथ्याकथन याचा आधार असतो, ती तेवढी नाकारावीत; परंतु ज्यामध्ये परस्परातील चांगल्या भावनांचा परिपोष असेल ती आचारावीत, जसे तिळगूळ देणे-घेणे, समारंभ, स्वागतप्रसंगी श्रीफलाचा स्वीकार करणे. आणखी तिसरा एक मतप्रवाह आहे, तो असा की, आपण पारंपरिक कर्मकांडे; प्रसंगी केली तरी काय बिघडते? त्यामध्ये नवा आशय आपणाकडून भरण्याचा प्रयत्न करणे अधिक श्रेयस्कर.

विषय गुंतागुंतीचा आहे, नाजूकही. कार्यकर्त्यांच्या वर्तनावर समाजाचे बारीक लक्ष आणि बऱ्याच वेळा आसपासचे लोक टीकेसाठी टपलेले. त्यामुळे त्याला हे आचारस्वातंत्र्य कमी उपभोगता येते. कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची; विशेषत: पत्नीची गोष्ट काहीशी वेगळी असते. त्यांना स्वत:ला मत असते आणि ते कार्यकर्त्यांपेक्षा वेगळे असणे सहज शक्य असते. समाजाशी अशा कर्मकांडातून जोडलेले नाते एकदम तोडणे त्यांना शक्य नसते; अनेकदा इष्टही वाटत नाही. दुसऱ्या बाजूला आपल्या माणसाची विचारसरणी त्यांना माहीत असते, बरीचशी पटतही असते. अशा वेळेला कर्मकांडांना काही वेगळा संदर्भ देण्याचा प्रयत्न करतात.

बाबा आरगडे हे आपले महाराष्ट्राचे कार्यवाह. नगर जिल्ह्यातील. त्या जिल्ह्यातील शनि-शिंगणापूरच्या देवस्थानात स्त्रियांना असणारी बंदी उठवावी, अशी आपली मागणी आहे. स्त्रियांनी देवपूजेला जावे, याची ही चळवळ नाही, तर लिंगभेदामुळे उपासनेचे व्यक्तिस्वातंत्र्य नाकारले जाऊ नये, हा समतेचा मूल्यविचार त्यामागे आहे. या चळवळीचे नेतृत्व बाबा आरगडे करतात. आपली भूमिका नीटपणे मांडणारी एक पुस्तिकाही यानिमित्ताने आपण प्रकाशित केली आहे. बाबांच्या पत्नी सूर्यकलाबाई. रूढार्थाने फारसे शिक्षण न झालेल्या. त्यांनी हळदीकुंकू समारंभ म्हणजे एका अर्थाने महिलांचे स्नेहमिलनच बनविले. मात्र विधवा स्त्रियांना त्यातून वगळले जाते, ही मोठीच विषमता. हा दोष टाळून हळदी-कुंकू समारंभ केला तर तो एक सांस्कृतिक कार्यक्रम बनतो. त्यातलाच एक भाग असतो, वाण लुटण्याचा. आलेल्या प्रत्येक स्त्रीला काहीतरी उपयुक्त वस्तू द्यावयाची. सूर्यकलाबाईंनी स्वत:च विचार केला आपण शनि-शिंगणापूरची वस्तुस्थिती विषद करणारी पुस्तिकाच सर्वांना दिली तर... त्यांनी तसे केले. ज्या स्त्रियांच्या पर्यंत एरव्ही ही पुस्तिका पोचली नसती, त्यांच्यापर्यंत ती सहज पोचली. त्यातल्या अनेकांच्या घरात विचार वाचला गेला. पटला. महिलांची मने बदलू लागली, नगर जिल्ह्यातील अनेक हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये या पुस्तिकाचे वाण जागोजागी दिले गेले, तर परिवर्तनाचा विचार थेट संबंधितापर्यंत पोचण्याचा मार्ग वेगळ्या प्रकारे झाला. तुम्हाला याबद्दल काय वाटते?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(मार्च १९९७)

शनिवार, २ डिसेंबर, २०१७

कौटुंबिक जिव्हाळ्याची संघटना



कौटुंबिक जिव्हाळ्याची संघटना
दाभोलकर, कौटुंबिक जिव्हाळा, शनि-शिंगणापूर, वार्तापत्र, संघर्ष
वेळ रात्री १०.३० ची. पुण्याहून फोन मिळाला, अनिल इंगवलेला अपघात झाला होता. सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे अपघात झाला. एक दिवस तेथे उपचार. पुढे दोन दिवस औरंगाबादला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार अपुरे. हाताची सूज प्रचंड. शर्टातून हात निघाला नाही. म्हणून शर्टाची बाही फाडावी लागली. शेवटी अनिल पुणे ससूनमध्ये दाखल झाला. अनिल इंगवले हा आपला कबनूर शाखेचा धडाडीचा कार्यकर्ता. हात राहतो की जातो, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. उपचार तातडीने हवेत. खात्रीचे हवेत; शिवाय आर्थिक मदत हवी आणि मानसिक आधारसुद्धा. पुणे हे गाव तसे धावपळीचे. आपले सगळे कार्यकर्ते आपापल्या व्यवसायात व्यग्र. मी रात्रीच श्री. दीपक गिरमे यांना फोन केला. सकाळपासून पुणे शाखेचे कार्यकर्ते अनिलच्या दिमतीला हजर झाले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना गाठण्यात आले. सर्व काही काळजीपूर्वक होईल, याची खात्री करण्यात आली. आवश्यक पैशांची तातडीने तरतूद झाली. चंदू चव्हाण, भालचंद्र जोशी हे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये अनिल होता तोपर्यंत रात्री झोपण्यास गेले. ही सगळी धावपळ जेव्हा मला समजली, तेव्हा खूप बरे वाटले. संघटना म्हणजे सभासदत्वाचा फॉर्म नव्हे अथवा साप्ताहिक बैठका नव्हेत. वैचारिक वादविवाद आणि अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष एवढ्यातूनही समितीचे काम उभे राहू शकत नाही. कुठल्याही संघटनेत एक कौटुंबिक जिव्हाळा असावा लागतो. आपला सहकारी अडचणीत आल्यावर स्वत:चे काम बाजूला ठेवून धावून जाण्याची वृत्ती असावी लागते. प्रसंग आला म्हणजेच त्याची परीक्षा होते आणि या परीक्षेत ज्या संघटनेचे कार्यकर्ते उतरतात, तीच संघटना सर्व प्रतिकूल परिस्थितींना टक्कर देत टिकून राहते, वर्धिष्णू होते. आपल्या संघटनेत हे घडत आहे. हा दिलासा पुणे शाखेच्या कार्यकर्त्यांनी दिला. इतरांच्यासाठी एक वस्तुपाठ उभा केला.

नगरच्या साहित्य संमेलनात शनि-शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) हे देवस्थान महिलांच्यासाठी खुले व्हावे म्हणून आपण चळवळ करणार होतो. तशा बातम्याही येऊन गेल्या. पुढे तीन आठवडे उलटले. संमेलन जवळ आले. त्यावेळी काही बाबी पुढे आल्या.
१)    या बातमीमुळे महाराष्ट्रात ज्या प्रमाणात चर्चा होईल असे वाटले होते, तशी ती झाली नाही. खुद्द नगर जिल्ह्यातही झाली नाही.
२)    नगरमध्ये जनमताची एक बाजू अशी होती की, आमचा या मागणीला पाठिंबा आहे. पण कधी नव्हे ते साहित्य संमेलन होत आहे, या आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही बाहेरून तुमचे संघर्ष कशाला घुसवता?
३)    चळवळीचा मुद्दा धर्माशी जोडलेला आणि म्हणूनच संवेदनशील आहे. या मुद्द्यावर आंदोलन करताना प्रक्षुब्ध प्रतिक्रिया आल्यास प्रचंड गर्दीत त्याचे गोंधळात वा दंगलीत रूपांतर होऊ शकेल. समितीच्या कार्यावर नाराज असलेल्या काही विघ्नसंतोषी लोकशक्ती हे कदाचित मुद्दामहून घडवून आणतील आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहून भलतेच वळण लागेल.

२६ डिसेंबरला मी नगरला होतो. नगर जिल्ह्यातील बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जमलेले होते. त्यांच्यासमोर मी वरील वस्तुस्थिती मांडली आणि तीन पर्याय सांगितले. पहिला म्हणजे घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आंदोलन करायचे आणि जे काही सोसावे लागेल ते सर्व सोसायचे. दुसरा पर्याय आंदोलन पूर्ण रद्द करायचे आणि तिसरा म्हणजे आंदोलन न करता फक्त प्रबोधन करावयाचे. त्याबाबत आपली भूमिका मांडणाऱ्या छोटेखानी पुस्तिकेचे वितरण करावयाचे आणि संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांच्या पाठिंबादर्शक सह्या घ्यावयाच्या.

सर्व कार्यकर्त्यांना मत विचारण्यात आले आणि सर्वांनी एकमुखाने असे सांगितले की, मोहीम प्रबोधनापुरती मर्यादित करावी. याबरोबरच या प्रश्नांवर महाराष्ट्र पातळीवर महिलांची परिषद घेणे, देवस्थानच्या दारात सद्भावना जागृती उपोषण करणे आणि त्यातूनही प्रश्न नाही सुटला तर सत्याग्रह करणे. ही पुढील वाटचालही नक्की करण्यात आली.

समितीमधील नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयातून मला असे जाणवले की, चळवळीतील कार्यकर्त्यांचे मन प्रगल्भ होत चालले आहे. आततायीने एखादी गोष्ट करणे किंवा एकदम घूमजाव करणे यापेक्षा चिवटपणे संघर्ष करण्याचा हा दीर्घकालीन मार्ग आहे, याची समज त्यांना येत नाही. मला ही खूण आशादायी वाटते.

डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांत तरी गेलो. सर्वत्र चौकशी करत होतो. वार्तापत्र वर्गणीदार नोंदणी कशी चालली आहे? प्रतिसाद अजिबात उत्साहवर्धक नव्हता आणि त्याचे एकमेव खरे कारण म्हणजे कार्यकर्ते वर्गणी मागण्यास बाहेरच पडलेले नव्हते. हे चित्र अस्वस्थ करणारे. वर्षाकाठी कार्यकर्त्यावर असलेली राज्य पातळीवरील जबाबदारी ती फक्त एवढीच. त्यातही आपली वर्गणी निश्चितच कमी, अंक नियमित, दर्जा चांगला. चळवळीला मर्यादित का होईना; पण अनुकुलता. हे सर्व असताना केवळ उदासीनता आणि निष्क्रियता यामुळे जर आपण वर्गणीदार वाढवण्याच्या कर्तव्यात कसूर करणार असू तर चळवळ वेगाने पुढे कशी सरकणार? कार्यकर्त्याने जिद्द दाखवली तर काय घडते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंदखेड्यामध्ये या डिसेंबरला दोनशे वर्गणीदार केले. धुळे जिल्ह्यातील एकट्या तालुक्यात जर हा प्रतिसाद मिळू शकतो आणि कर्तृत्वाने मिळवला जातो, तर महाराष्ट्रातील सर्व शाखांनी मनावर घेतले तर केवढी झेप आपण मारू शकू?
पण लक्षात कोण घेतो?
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी ११९७)

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

हलकारेची हलकी कृती




हलकारेची हलकी कृती
दाभोलकर, गणेश हलकारेची भ्याड कृती, विरोध, काळे फासणे
ता. ४ डिसेंबर १९९६. अकोला येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचा हॉल. गावातील दोन्ही रोटरी क्लब व आर्किटेक्ट असोसिएशन यांनी माझे व्याख्यान आयोजित केलेले. विषय वैज्ञानिक दृष्टिकोन व वास्तुशास्त्र. तुडुंब गर्दी. भाषण रंगले. प्रश्नोत्तरे झकास झाली. पुस्तकविक्री चांगली झाली. बहुतेक श्रोते परत गेले. संयोजकांपैकी काही जण आणि मी एवढेच उरलो. मी हॉल सोडला. पायऱ्या उतरून खाली येणार आणि पुढच्या कार्यक्रमाला जाणार एवढ्यात अमरावतीचा अ‍ॅड. गणेश हलकारे पाच-सहा जणांच्या टोळक्यासह अचानक समोर आला. दारूचा भपकाराही त्याचवेळी आला. मला घेरून ते उभे राहिले. हिंदी सिनेमाच्या पद्धतीने. मला मारहाण करण्याची खूण त्यांनी एकमेकांना केली. गणेश हलकारेने माझ्या डाव्या गालावर एक थप्पड जोराने मारली. त्याबरोबरच तोंडाला काळे फासले. माझा चष्मा बाजूला पडला. आजूबाजूला असलेले संयोजक धावले. त्यांची संख्या या टोळक्याला सरळ करण्याएवढी सहज होती. परंतु सभ्यतेमुळे त्यांनी मारहाण केली नाही. गणेश हलकारेला खेद नव्हताच. बहुधा त्या अवस्थेतही तो नसावा. सुरेंद्र घाडगे (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) हा कार्यकर्ता माझ्याबरोबर होता. त्याला तो म्हणाला, ‘गरज पडली तर दाभोलकरांना चाकूही मारेन.

प्रा. नितीन ओक हा अकोल्याचा उमदा तरुण प्राध्यापक. चळवळीचा मित्र. त्याच्याकडेच मी उतरलो होतो. त्याच्या मोटारसायकलवरून त्याच्या घरी निघालो मुक्कामासाठी. घरी त्याची वृद्ध आई एकटीच होती. ही गुंडागर्दी मला शोधत त्याच्या घरी गेली, तर त्याच्या आईला अकारण त्रास नको. यासाठी तो मला घेऊन जिल्हा पोलीसप्रमुखांच्याकडे गेला. जिल्हा पोलीसप्रमुख त्याचे परिचित तर होतेच; पण एकूण कामाबद्दल आस्था बाळगणारे होते. त्यांनी सर्व प्रकार नीट समजावून घेतला. मला विचारले, ‘तुम्ही गणेश हलकारेविरुद्ध गुन्हा नोंदवू इच्छिता का?’ मी सांगितले, असल्या गुंडगिरीचा मुकाबला आम्ही लोकांत जाऊन करू इच्छितो. पोलीस, कोर्टकचेऱ्या यामध्ये मला रस नाही. जिल्हा पोलीसप्रमुख मला म्हणाले, ‘निर्णय तुमचा आहे. तुमचे कार्यक्रम आहेत. ते स्थळ आणि प्रा. ओकांचे घर येथे बंदोबस्त ठेवतोच; परंतु तुम्ही म्हणालात तर केव्हाही तक्रार नोंदवतो. मी तेथून स्काऊट-गाईड शिक्षकांचे अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण शिबीर चालू होते तेथे गेलो. कुमार मंडपे, अनिल इंगवले व सुरेंद्र घाडगे तेथे होते. आम्ही चर्चा केली. प्रकरण पोलिसांमार्फत न्यायप्रविष्ट झाले की, मग मूळ मुद्दा बाजूला जाणार आणि कोर्टाच्या निकालाकडे नजरा लागणार. तो निकाल कधी होणार हे सांगणेही अशक्य. लोकांच्या विवेकबुद्धीच्या न्यायालयाला सामोरे जाणे अधिक इष्ट, असे आम्ही सर्वानुमते ठरविले. ओकच्या घरी जाण्यापूर्वी संबंधित विभागाच्या पोलीस निरीक्षकांना भेटलो. त्याला जिल्हा पोलीसप्रमुखांचा फोन आला असल्याने काम आणखी सोपे झाले. ओक याच्या घरावर; तसेच शिबीरस्थळी तेथून पुढे २४ तास म्हणजे मी अकोला सोडेपर्यंत पोलिसांचे लक्ष होते. पोलिसांना एक प्रश्न होता. तो असा की, मला मारहाण करणे, तोंडाला काळे फासणे हे सगळे का केले गेले? आपल्याच विषयातील आपल्यापेक्षा वेगळी संघटना जनमान्यता मिळवत आहे. संघटनात्मकरित्या बलिष्ठ बनत आहे, याची गणेश हलकारेच्या मेंदूतील खुन्नस ही पोलिसांच्यादेखील आकलनापलिकडची होती. म्हणजे किती विद्वेषी असेल, यावर भाष्य न केलेले बरे.

डॅडी देशमुखांचा खेद
प्रा. ओकच्या घरी पोचलो. तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. परंतु माझी वाट पाहत, रोटरीचे पदाधिकारी आणि आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष थांबले होते. त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेला असे घडावे, याचे त्यांना खूप वैषम्य वाटत होते. अकोल्यामध्ये कोणत्याही वक्त्याबद्दल असे पूर्वी घडले नव्हते. त्यामुळे बाहेरच्या कोणीतरी येऊन गोंधळ घातला आणि अकोल्याला कमीपणा आणला, हा संतापही होता. रात्रीच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अकोला येथील दोन-तीन प्रमुख कार्यकर्त्यांचे फोन नितीन ओकला आले. झाल्या प्रकाराबद्दल त्यांना लाज वाटत होती. त्यापैकी शरद वानखेडे या जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला नितीन म्हणाला, दाभोलकरांच्या बरोबर बोलावयाचे आहे काय?’ तो म्हणाला, ‘बोलण्यासाठी आम्हाला तोंड कुठे राहिले आहे?’
     
दुसऱ्या दिवशी सकाळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन परिषदेचे अध्यक्ष संजय चंदनगीर व सचिव अ‍ॅड. उज्ज्वला रोकडे यांची भेट झाली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुंबईतील नेत्यांच्या कारवायांमुळे त्यांच्याबरोबर पहिल्यापासून काम करणाऱ्या या दोघांची फरफट झाली. असंगाशी संग भोगावा लागला. कामात ठेच आली. त्यामुळे त्यांनी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन परिषद या नावाने स्वतंत्र काम उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना ही कार्यपद्धती नवी नव्हतीच. त्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर मी प्राचार्य डॅडी देशमुख यांना भेटलो. अकोला येथील समाजकारण, राजकारण यामधले ते मोठे नाव आहे. एकेकाळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते विदर्भ विभागाचे अध्यक्ष; आजही त्यांचे नाव अ. भा. अंनिस वापरत असते. झालेला प्रकार समजताच या घृणास्पद घटनेबद्दल स्पष्टपणे त्यांनी चीड व्यक्त केली. स्वत:च्या पुढाकाराने मी या विरोधात पत्रक काढेन, असे सांगितले.

अकोला येथून निघणारे देशोन्नती हे दैनिक अकोला येथे जास्त खपाचे; तसेच अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड येथून स्वतंत्र आवृत्त्या काढणारे दैनिक. त्यांचे संपादक श्री. पोहरे यांनी मला भेटण्यासाठी आवर्जून बोलवले होते. शेतकऱ्यांसाठी; तसेच अन्यायाविरुद्ध सतत संघर्षशील असणारे असे हे संपादक मालक. त्यांच्याबरोबर समाजकारण, राजकारणाच्या बाकीच्या गप्पा झाल्याच; परंतु आदल्या दिवशीच्या प्रकरणाची चर्चा अटळपणे झालीच. त्यांनी अतिशय स्पष्टपणे झाल्या प्रकाराबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुंबईतील श्रेष्ठी ज्या पद्धतीने विदर्भातील दोन-चार जिल्ह्यांत चळवळ चालवत आहेत, त्याला असहमती दर्शवली. झालेल्या गुंडगिरीच्या प्रकाराबद्दल सर्व काही परखडपणे व सविस्तरपणे छापण्याचे स्वत:हून आश्वासन दिले.

सायंकाळी डॉ. दीपक केळकर भेटले. ते मानसोपचारतज्ज्ञ आहेत. शिवसेनेचे कार्यकर्तेही आहेत. व्यसनमुक्तीचे कार्यही हिरिरीने करतात. झालेला प्रकार त्यांच्या कानावर गेलेलाच नव्हता. त्यांना तो आमच्या भेटीत समजला आणि त्यांनी त्याबद्दल अतिशय कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते मत जाहीर करण्याचेही आश्वासन दिले. वृत्तपत्रातून (अकोला विभागातील) या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. गणेश हलकारेची गुंडगिरी सव्याजपणे पेपरवाल्यांनी त्यांच्या पदरात बांधली. रजनीकांत हा विदर्भातील शेतमजूर संघटनेचे व अन्य परिवर्तनाचे कार्य करणारा एक महत्त्वाचा कार्यकर्ता. त्याने लिहिलेले पत्र या अंकात स्वतंत्र चौकटीत दिले आहे.

काम आणि व्यक्तीला बदनाम करण्यासाठी झालेल्या हल्ल्यातून हल्लेखोरांना त्यांच्या या कृत्याने जनमानसात निर्माण झालेले त्यांचे स्थान कळले आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पाऊल घट्टपणे विदर्भात रोवण्याची क्षमता निर्माण झाली. गणेश हलकारे करायला गेले एक आणि झाले वेगळेच. असो.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(जानेवारी १९९७)




‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...