रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

नाठाळाच्या माथी हाणू काठी



नाठाळाच्या माथी हाणू काठी

दाभोलकर, चळवळ, शिबीर, सजगता, बुवाबाजीला विरोध
सत्यशोध प्रज्ञा परीक्षेच्या शिबिरासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर उतरलो. ५०० पुस्तकांचे मजबूत ओझे बरोबर होते. पुन्हा मी आणि कुमार मंडपे या दोघांचे पाच दिवसांच्या दौऱ्याचे सामान. एक रिक्षा गच्च भरली असती. पण रिक्षा करण्याची वेळ आलीच नाही. रोटरी क्लबला संध्याकाळी भाषण असल्याने; शिवाय जळगाव संयोजनात त्यांचा सहभागही असल्याने रोटरीचे सदस्य व त्यांच्या दोन मारुती गाड्या स्टेशनवर हजर होत्या.

जळगावचे शिबीर संपले. धावत-पळत संध्याकाळपर्यंत साक्री गाठावयाची होती. पारोळ्याचा कार्यकर्ता लालचंद नागदेव गाडी घेऊन आला होता. ती भाड्याची अँबॅसिडर अंमळनेरहून आली होती. अंमळनेर-जळगाव-पारोळा-साक्री-अंमळनेर असा प्रवास गाडीने केला. दिमतीला गाडी म्हटल्यावर प्रवास सुखकारक झालाच; परंतु भाड्याची गाडी म्हटली की, ६०० रुपये तरी खर्च झाले असणार.

साक्रीचे शिबीर उत्तम झाले. शिबीर संपल्यावर रेल्वे गाठण्यासाठी धुळेमार्गे चाळीसगाव गाठावयाचे होते. थोडी धावपळ होणार होतीच, तर साक्रीचे संयोजक नानासाहेब ठाकरे यांनी न मागताच त्यांची गाडी थेट चाळीसगावपर्यंत दिली आणि चाळीसगावला आपले कार्यकर्ते नागेश सामंत यांच्याकडे नेहमीप्रमाणे भरपेट जेवण झाल्यावर रेल्वे स्टेशनवर पोचवण्यासाठी त्यांची मारुती होतीच.

मोठीच सोय झाली हे तर खरेच. प्रवासाची दगदग टळली. वेळ कमी लागला. जाता-जाता पारोळ्याच्या कार्यकर्त्यांना भेटता आले. साक्रीहून परत येताना असलोदच्या डॉक्टर बाबा प्रकरणी पराक्रम गाजवणाऱ्या प्रतिभा साळुंखेच्या घरी चहा घेता आला. एकूण शरीर व मन दोन्ही सुखावले. खरे तर हातातली बॅग सांभाळत एस.टी.चे दार शक्यतो सर्वप्रथम पकडणे हे प्रवासातील धावपळीसाठी मी कमवलेले आवश्यक कौशल्य. स्वाभाविकच मनात विचार आला आपली दगदग टळली. सोय वाढली; पण या चळवळीचा खरंच फायदा झाला का? एकतर जळगावहून साक्रीला पोचायला बसच्या तिकिटाच्या दसपट खर्च आला. साक्रीचे शिबीर संपल्यानंतर बाकीचे सहकारी बसनेच परतले. त्यांच्या मनात गाडीतून आरामशीरपणे निघून गेलेल्या माझ्याबद्दल नेमकी कोणती भावना आली असेल?

प्रश्न केवळ माझा नाही. धावपळ जसजशी वाढते, कार्यकर्त्याला थोडेबहुत नाव, प्रतिष्ठा मिळते, तसे आपोआपच समाजाकडून त्याला मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडतो. त्यामधून सुविधा वाढतात आणि हळूहळू त्यांचे हक्कात रूपांतर होते. एकेक सवयी नकळत लागत जातात. अमुक अथवा तमुक अनुकुलता असेल तरच काम करेन, अशी एक मानसिकता नकळत तयार होते. सुरुवातीला चळवळ विस्तारासाठी सुखकारक आणि उपकारक वाटणाऱ्या या सुविधा कार्यकर्त्याच्या मर्यादा बनतात. करणारे भलाईने करत असतात; परंतु दीर्घकालीन परिणाम इष्ट होतोच असे नाही; अनिष्टही होऊ शकतो. सुखसोयी देणारा प्रामाणिकपणे व जिव्हाळ्याने देत असतो. त्या नाकारणे प्रत्येक वेळी इष्ट नसते व शक्यही; परंतु त्या घेत असतानाच त्याबाबतची एक सजगता स्वत:च्या मनाशी नक्की बाळगावयास हवी आणि वास्तवाच्या भूमीवरून व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घोळक्यामधून जमिनीवर असलेले आपले पाय कधी सुटू नयेत, काळजी बाळगावयास हवी, असे माझ्या मनात प्रकर्षाने येऊन गेले.

प्रतिभा साळुंखे ही तशी अगदी अलिकडे म्हणजे एप्रिल महिन्यातील असलोदच्या डॉ. बाबा प्रकरणापासून चळवळीत आलेली तरुणी. पूर्वी स्वाध्यायी होती. (पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराची सभासद.) समितीची दोन शिबिरे करून आणि प्रत्यक्ष कृतीने ती आता चळवळीच्या प्रवाहात आहे. साक्रीहून परतताना ती बाबा प्रकरणातील तिचे अनुभव खुमासदारपणे सांगत होती. बहुजन समाजातील, चळवळीशी अपरिचित, एका तरुणीने एका अनोळखी ठिकाणी रात्रभर एका पूर्णत: अपरिचित तरुणासोबत त्यांची पत्नी असल्याचे नाटक प्रभावीपणे वठवावे, याचा मला मनापासून अभिमान वाटला, कौतुकही. विशेष म्हणजे या तथाकथित जोडप्याने मूल होण्यासाठीचा खोळ भरून घेण्याचा कार्यक्रमही बाबाच्या हस्ते त्याच्या आश्रमात जाहीरपणे केला. पारंपरिक विचाराच्या पंचक्रोशीत स्वाभाविकच या आक्रिताची प्रतिक्रिया उमटली. नाराजीचे सूर निघाले. प्रतिभाचे वडील व प्रतिभा यांनी ते पचवले. बुवाच्या विरोधात लढण्याच्या शौर्याएवढेच हे मानसिक धैर्यही मला मोलाचे वाटते.

काहीसे असेच धैर्य तऱ्हेवाईकपणे दाखवले, तासगाव तालुक्यातील राजाराम म्हस्के आणि सदाकळे यांनी. जिवंत असलेल्या सदाकळेचा पिंडदानविधी त्यांनी जाहीर केला. सावर्डे या गावी प्रचंड कुतूहल निर्माण झाले. पिंडदानासाठी पारंपरिक पद्धतीने नैवेद्य स्मशानात नेऊन ठेवला. हे अघटित बघायला कुतुहलाने स्मशानात पुरुषांच्याबरोबर स्त्रियांनीही गर्दी केली. गंमत म्हणजे न मेलेल्या सदाकळेच्या पिंडाला कावळ्याने चटकन टोच मारली. एवढेच नव्हे, तर गोमातेनेही येऊन आपले तोंड लावले आणि नंतर न उष्टावलेल्या उरलेल्या सर्व नैवेद्यावर कार्यकर्त्यांनी ताव मारला. अडावद गावातल्या दोन वर्षांच्या बालकाला नवनाथ प्रसन्न झाले व त्याच्या कपाळावर आपोआप गंध उमटू लागले. ग्रामस्थ अचंबित झाले. काही प्रमाणात टोमणेही झेलावे लगले. परंतु धडाडीच्या एका कृतीतून धक्का देऊन विचाराला चालना मिळाली, हे मात्र नक्की. पुण्याला आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने व उत्साहाने हजर होते. अलका जोशी व डॉ. साळी यांच्यावर पोलिसांनी आकसाने केलेल्या कारवाईचा विषय होता. त्यावर केलेल्या कारवाईची मी माहिती देत होतो. अलका जोशींनी त्यांचे अनुभवकथन व मतप्रदर्शनही केले. दुसऱ्या विषयाला सुरुवात झाली. एवढ्यात मध्येच माझ्याकडे कवठेमहांकाळचा धडाडीचा कार्यकर्ता सुभाष कोष्टी याची चिठ्ठी आली. त्याचे मत असे होते की, आपण अशा बाबतीत यापेक्षा कडक व प्रत्यक्ष कारवाई करावयास हवी होती. नंतर बोलताना त्याने त्याचा अनुभव सांगितला. कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या फौजदाराला २५ मुलांना बरोबर घेऊन दमात घेऊन कसा सरळ केला, याचे ते वर्णन होते.

मला वाटते, चळवळीतील हा एक जुनाच वाद आहे. तो असा की, बुवाबाजीच्या विरोधात आक्रमक व्हावयाचे म्हणजे काय व कसे? बाबाच्या बदमाषीबद्दल प्रचार करणे, बाबाच्या कार्यक्रमात जाऊन आव्हान देणे, बाबाचा तपास नीट घेऊन त्याचे खरे अंतरंग समजून घेणे व लोकांना समजून देणे, त्याला पोलिसांच्या ताब्यात देणे, त्याने स्वत:ची बुवाबाजी कबूल करण्यास व थांबवण्यास नकार दिला तर त्याचा दरबार उधळणे किंवा गरज पडली तर नाठाळाच्या माथी हाणू काठी या तुकोबांच्या अभंगाची शब्दश: अंमलबजावणी करणे. मला वाटते, खरे तर हा प्रश्न केवळ एखाद्या बाबा, बुवा यांच्याविरुद्धची लढाई याच्याशी संबंधित नाही. समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे, त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे इष्ट, रास्त, प्रभावी आणि टिकाऊ मार्ग कोणते, याच्याशी याचा संबंध आहे. याबाबत सामुदायिक विचारमंथनातून जेवढी प्रगल्भ समज आपण निर्माण करू, तेवढे चळवळीला अधिक बळ लाभेल.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(फेब्रुवारी १९९४)

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

वार्तापत्राची भूमिका



वार्तापत्राची भूमिका
  
दाभोलकर, वार्तापत्र, लेखनशैली, तात्त्विक मतभेद, संयम, कार्यकुशलता
महाराष्ट्रभर फिरत असताना वार्तापत्र पोचते आहे, आवडते आहे, हे आता जाणवू लागले आहे. वर्गणीदारांची संख्याही वाढू लागली आहे. (अर्थात ती अजून बरीच वाढवावयास हवी); परंतु एक उणीव मला सातत्याने जाणवत आहे, ती म्हणजे प्रत्यक्षात चळवळ करणारी, धडपडणारी आपली कार्यकर्ती मंडळी लिहिताना हात भलताच आखडता घेतात.

वार्तापत्राची मूळ भूमिका काय? ते सर्वप्रथम वार्तापत्र आहे. महाराष्ट्रभर आपल्या संघटनेत, उपक्रमात, आपण केलेल्या चळवळीत आणि लढ्यात जे घडते त्याचे प्रतिबिंब वार्तापत्राच्या पानातून उमटावे, ही सर्वांची अपेक्षा अगदी स्वाभाविक आहे. शिवाय हे सगळे त्या-त्या वेळी घडावयास हवे म्हणजे त्यात ताजेपणा राहतो आणि पुन्हा नव्याने घडणाऱ्या घटनांच्यासाठी पाने मोकळी राहतात. १३ डिसेंबरला आपल्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी उमरगा तालुक्यातील अनेक भूकंपग्रस्त गावात शोध भुताचा मोहीम राबवली. हा उपक्रम भूकंपग्रस्तांच्या दृष्टीने वेगळा होता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांचे चळवळीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातून वेळ काढून पदरमोड करून कार्यकर्ते आले. परंतु कोणत्या गावातून हा कार्यक्रम झाला? कसा झाला? सहभागी होणाऱ्या गावकऱ्यांना काय वाटले? याची नीटपणे नोंद आणि रिपोर्टिंग एकत्रितपणे तयारच झाले नाही; मग ते वार्तापत्रात येणार कुठून? आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाखांना, आपल्या अन्य वाचकांना ते कळणार कसे? शिवाय खरे तर रिपोर्टिंग म्हणजेच सर्व काही नव्हे. आपण काही केवळ त्यात भाग घेणारे नव्हतो तर संयोजकही आपणच होतो; मग या संयोजनात त्रुटी कोणत्या जाणवल्या? चांगले काय झाले? काय फसले? भावी काळात असे कार्यक्रम घेताना कोणती काळजी घ्यावयास हवी? याचा विचारविनिमयही वार्तापत्रातून कोणीतरी उपस्थित केल्याशिवाय पोचणार कसा?

मल्लिनाथ महाराज हे लातूर भागातील प्रस्थ. लातूरच्या कार्यकर्त्यांनी जिवाची बाजी लावून त्या महाराजाविरोधी यशस्वी झुंज दिली. त्याची हकिकत यावयास हवीच; परंतु त्याबरोबरच यामुळे चिडून जाऊन आपल्या लातूरच्या कार्यवाहांवर खुनीहल्ला झाला. पंधरा कार्यकर्त्यांच्यावर दरोड्याच्या आरोपाखाली खोटे खटले घालण्याचा प्रयत्न झाला. हे वार्तापत्रात ताबडतोबीने यावयास नको काय? त्यामुळे अशा हल्ल्यांचा महाराष्ट्रव्यापी निषेध करता येतो. आपापल्या ठिकाणी बुवाबाजीविरोधी लढताना घ्यावयाची काळजी ही अधिक काटेकोर बनते.

व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते बोले तैसा चाले... असा प्रयत्न करतात. हा रस्ता खडतर असतो. विशेषत: ज्यावेळी भावना गुंतलेले प्रसंग असतात, त्यावेळी तर चांगलीच सत्त्वपरीक्षा होते. घरातल्यांची नाराजी पत्करून कार्यकर्ते आपले ब्रीद सांभाळतात. घटना व्यक्तिगत असते; पण तिची चौकट पूर्ण सामाजिक असते. बहुसंख्य कार्यकर्त्यांना व्यक्तिगत जीवनात हे या ना त्या स्वरुपात सोसावे लागणार असते. समाजही या कसोटीकडे साक्षेपी बघत असतो. आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या आयुष्यात अशा घटना घडतात. ते कसोटीला उतरतात. पण त्यावेळची स्वत:च्या मनातली, कुटुंबातील, समाजातील घालमेल शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न जवळपास होत नाही. एक अनुभव तसाच व्यक्तिगत बनून राहतो.

असे बरेच काही-काही सतत घडत असते की, ज्याची नोंद आवश्यक असते; पण होत नाही. खरे तर आपण वार्तापत्र विकतो ते सवलतीच्या दरात. वार्षिक ४० रुपये खर्च एका अंकामागे आपल्याला सहज येतो. परंतु आपण मात्र अंक देतो अवघ्या वार्षिक २० रुपयांत. हे यासाठीच की, वार्तापत्र जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचावे सुलभपणे आणि त्याबरोबरच आपली चळवळ ही त्यांच्यापर्यंत पोचावी; परंतु त्यासाठी लिहिण्याचा जो स्वाभाविक प्रतिसाद हवा, तो मात्र मिळताना दिसत नाही.

असे का होते? शक्य आहे की, याचे महत्त्वच लक्षात आले नसेल. कदाचित महत्त्व लक्षात येत असेल; परंतु आळस कुरघोडी करत असेल. काहीही असले तरी त्यावर मात करणे सहज शक्य आहे. एक अडचण अशीही दिसते की, इच्छा आहे, सवड आहे; पण लेखन जमतच नाही. तसे असेल तर ती चुकीची कल्पना मनातून पहिल्यांदा हद्दपार करा. महत्त्व आहे तुमच्या अनुभवाच्या जिवंतपणाला. ते तुम्हाला जमतील तशा भाषेत लिहा. गरज वाटली तर त्यासोबत त्या विषयाला धरून जे छापून आले त्याची कात्रणे पाठवून द्या. या सगळ्या घटना आणि त्यामागचा आशय संपादक स्पष्ट करून मांडतील व आपले काम साध्य होईल. काही जणांची अशीही तक्रार असते की ‘आम्ही लिहितो हो; पण ते छापले जात नाही.’ खरे तर अशी तक्रार करण्याची पाळी तुमच्यावर आली तर अपवादानेच. कारण तुमच्यासाठी तर वार्तापत्र सुरू आहे. परंतु लिहीत असताना (विशेषत: ज्यांना या ना त्या स्वरुपात लिहिण्याची सवय आहे) विषय नेमक्या शब्दांत मांडला जावा. लिखाण चांगले उतरावे, यासाठी थोडे अधिक परिश्रम घेण्यास काय हरकत आहे? आणि याबरोबरच एक गोष्टही मनात बाळगावयास हवी ती अशी की, आपल्याला चांगले वाटणारे आपले लेखन संपादित व संस्कारित करण्याचा अधिकार आपणच संपादकांना दिला आहे, तो त्यांनी बजावला तर ते आपण मान्य करावयास हवे.

तेव्हा थोडक्यात काय? लिहिते व्हा, इतरांना लिहिते करा आणि अगदीच अडचण आली तर संपादक मंडळाशी संपर्क साधून त्यांचा प्रतिनिधी बोलावून; पण आपली लढाई सर्वांच्यापर्यंत पोचेल याचा सजग प्रयत्न करा.

श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र, दिंडोरी, जि. नाशिक यांच्या शाखा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पसरलेल्या आहेत. त्यांच्या शिकवणुकीत अनेक अवैज्ञानिक व अंधश्रद्धा वाढवणाऱ्या गोष्टी असतात. जळगाव जिल्ह्यात त्यांच्या प्रचारकांशी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे वादविवाद केला. त्यांना जाहीर आव्हान दिले आणि स्वाभाविकच सांगण्यात येणारी मते विज्ञानाच्या निकषांवर टिकण्यासारखी नसल्यामुळे स्वामी समर्थ संप्रदायांच्या सेवेकऱ्यांना (भक्तांना) माघार घ्यावी लागली. हा एक प्रभावी व परिणामकारक कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील शाखेच्या कार्यकर्त्यांनी केला.

खरा मुद्दा आहे तो पुढचा,

यानंतर त्या संप्रदायाचे सेवेकरी, निफाडच्या कॉलेजचे प्राचार्य व्यवहारे यांची व नाशिकच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली. या चर्चेतदेखील ‘करणी खरी असते, अग्निहोमामुळे मनातील विकार नाहीसे होतात, नागनारायण बळी पूजेत (नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या पूजेचा वैशिष्ट्यपूर्ण व लोकांना लुबाडणारा प्रकार) तथ्य असते, असे सांगण्यास सेवेकऱ्यांनी सुरुवात केली. त्याला कार्यकर्त्यांनी विरोधही केला.

परंतु स्थानिक प्रमुख वृत्तपत्रात मात्र बातमी झळकली की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समर्थ सेवेकरी यांच्यात यशस्वी चर्चा होऊन उभय बाजूत समझोता झाला, असे पत्रक नाशिकच्या कार्यकर्त्यांनी काढले आहे. बरे, तर याचा त्वरित खुलासा कडक शब्दांत त्याच वृत्तपत्रात छापावयास लावणे, ही नाशिक शाखेची जबाबदारी होती. कारण अशा बातम्यांतून समितीबाबत लोकांची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता असते. वृत्तपत्राने हा खुलासा छापला नसता तर त्यांनी मध्यवर्तीकडे ताबडतोब कळवणे आवश्यक होते. अकारण व हेतुपुरस्सर चळवळीची बदनामी करणाऱ्या अशा मजकुरांचा प्रतिवाद ताबडतोब करणे शक्य, इष्ट व योग्य असते; परंतु नाशिकची शाखा यात उणी पडली.

परंतु हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. रावेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात त्यांना हा अधिकार कुणी दिला?’ असे खडसावणारे पत्रक काढले व ते दै. ‘लोकमत’मध्ये छापून आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक शाखा दुसऱ्या शाखेविरोधात उभी आहे, असे एक विचित्र चित्र यामधून निर्माण झाले. खरे तर असे पत्रक काढण्याची अजिबात गरज नव्हती. खरोखर काय झाले आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांची चूक आहे की, वृत्तपत्रांची याची शहानिशा प्रत्यक्ष भेटून वा निदान पत्राने करून घ्यावयास हवी होती आणि संयुक्तपणे समितीच्या कार्याला सुसंगत अशी भूमिका कणखरपणे घ्यावयास हवी होती. वृत्तपत्रातून वाद वाढवणे, त्यामध्ये आपल्याच अन्य शाखांना अकारण गुंफणे, यातून काय साधले? मला ही गोष्ट उशिरा कळली. धुळे, जळगाव, नाशिक या भागातील वृत्तपत्रे महाराष्ट्रात अन्यत्र मिळत नाहीत. परंतु त्या भागातील कार्यकर्त्यांनी एक तर जागरूकपणे ताबडतोब कळवावयास हवे होते किंवा खरे तर पुढाकार घेऊन प्रकरण लगेच संपवावयास हवे होते. आपल्याबद्दल लोकांच्या मनात हेतुत: गैरसमज करून देण्याचा उद्योग अनेकांचा सुरू असतोच. शिवाय आपली चळवळ आहे प्रवाहाविरुद्ध पोहण्याची. यासाठी तरी आपला संयम, समज व कार्यकुशलता प्रभावीपणे वापरण्याचा आपला प्रयत्न हवा.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर १९९३)

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

प्राथमिक अध्ययनाची गरज



प्राथमिक अध्ययनाची गरज

दाभोलकर, विवेकवाद, वैचारिक शिबीर, अध्ययन, वाचन
विवेकवादाचे शिबीर सातारला झाले. मे महिन्यातील महाराष्ट्र पातळीवरच्या बैठकीत असे शिबीर घेण्याचे ठरले होते. कार्यकर्त्यांचे वैचारिक भान सकस करण्यासाठी. शिबीर घेतले, या विषयाचे भारतीय पातळीवरचे गाढे अभ्यासक प्रा. मे. पु. रेगे यांनी. या विषयावरचा त्यांचा व्यासंग व अधिकार सर्वमान्य आहे. कोणत्याही स्वरुपात प्रवासखर्च वा मानधन न घेता ते आले होते. निवास, भोजनाचा सर्व खर्च एकता शिक्षण प्रसारक संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीने उचलला होता. थोडक्यात, चळवळीच्या वैचारिक वर्धिष्णुतेसाठी आपल्याला निरपेक्षपणे मदत करण्यास लोक तयार होते, आहेत.

आठ जिल्ह्यांतले आपले चाळीसहून अधिक कार्यकर्ते शिबिराला आले होते. ही बाब मला आश्वासक वाटली. प्रा. रेगे यांना आम्ही विनंती केली होती की, विषयाची मांडणी शक्य तेवढी साधी सोपी करावी. प्रा. रेगेंनी ती मानली, प्रत्यक्षात आणली. युरोपमधला प्रबोधनाचा इतिहास, ख्रिश्चन धर्माचा उदय, प्रभात, त्याची चिकित्सा, विवेकवादाचा उदय, त्याचे सामर्थ्य, त्याबाबत निर्माण होणारे महत्त्वाचे काही प्रश्न, धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना, त्याचा विवेकवादाशी संबंध, हे त्यांनी थोडक्यात नेमकेपणाने मांडले.

शिबीर कसे वाटले, याच्याबद्दल माझ्याशी फारसे कुणी बोलले नाही. परंतु कार्यकर्त्यांच्यात आपापसांत झालेली चर्चा कानावर आली. चौकशी केल्यावर थोडे अधिक कळले. कळले ते असे की, शिबिरातील मांडणी नीटपणे फारशी कोणाला उमगली नाही. बऱ्याच जणांना तर ती दुर्बोधच वाटली. आपण सातत्याने सांगत आलो आहोत की, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही केवळ बुवाबाजी, भूत, भानामती, फलज्योतिष अशा अंधश्रद्धांना विरोध यासाठी नाही. या प्रकारावर व्यक्ती विश्वास ठेवते. त्याचे कारण या चुकीच्या बाबींचा तिच्यावर झालेला संस्कार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तिच्यामधील अभाव. हा संस्कार दूर करणे, शास्त्रीय जाणीव रूजविणे, विवेकाधिष्ठित नीतीचा आग्रह धरणे, खऱ्याखुऱ्या राष्ट्राच्या उभारणीला मदत करणे, हा आपल्या चळवळीचा व्यापक आशय आहे. याबाबत आपली चळवळ पुरेशी स्पष्ट आहे; परंतु ही झाली कागदावरची भूमिका. ती स्वत:च्या जीवनात उमटावयाची, इतरांवर संस्कारित करायची, समाजजीवनावर प्रभावी करावयाची तर स्वत:च्या अध्ययनात ती स्पष्ट हवी. मला हल्ली स्पष्टपणे जाणवू लागले आहे की, याबाबत आपण अजून फार म्हणजे फारच मागे आहोत. अंधश्रद्धेच्या लोकप्रिय प्रकाराबाबतची खुमासदार भाषणे, ठराविक पुस्तकातील तेच ते मुद्दे यापलिकडे व्यापक विचाराला भिडण्याचेही आपण टाळतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल आपण शाळा, कॉलेजातील विद्यार्थ्यांना नीटपणे समजावून सांगू का, याचा विचार प्रत्येकाने केला तर स्वत:लाच त्याचे काय उत्तर मिळेल. धर्माचा इतिहास, विवेकवाद, नीती, धर्मनिरपेक्षता हे तर मग फार पुढचे झाले.

एक मला मान्य आहे की, या अभ्यासाची गरज काय? असा प्रश्न आपल्यातील बहुतेकांना पडत नाही, त्यांना गरज जाणवते, आवश्यकता पडते; परंतु प्रत्यक्षात त्या पलिकडे पाऊल पडत नाही. वाचन, लेखन, चिंतन याची एक स्वाभाविक अनिच्छा, वैचारिक परिश्रम घेण्याबद्दल निरुत्साह आणि बुवाबाजी, भूत, भानामतीविरोधी लढताना उदंड उत्साह, असे चित्र जाणवते. चळवळीला कृतीची गरज असतेच; परंतु कृती म्हणजेच चळवळ नव्हे. आपल्यासारख्या समाजपरिवर्तनाच्या व्यापक चळवळीला एक तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान लागते. आपले अधिष्ठान आहे धर्मनिरपेक्ष विवेकवादी नीतीचे. पण हा शब्द उच्चारून भागत नाही. तो नीट समजावा लागतो, पचावा लागतो. स्वत:च्या जीवनात चळवळीच्या कृतीत उतरावा लागतो.

यासाठी प्राथमिक अध्ययनाची गरज अनिवार्य असलेली मला वाटते. चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी यासाठी सजगपणे सुरुवात करावयास हवी. इतर समविचारी संघटनेतील मित्रांचेही सहाय्य घेण्यास हरकत नाही. पण महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारतातील समाजसुधारणांचा इतिहास, प्रमुख धर्मतत्त्वज्ञानाची प्राथमिक नीट ओळख, मानवेंद्रनाथ रॉय, बर्ट्रांड रसेल यांचे लेखन, नीतिशास्त्राबद्दलची प्राथमिक माहिती. धर्मनिरपेक्षतेबाबतची मांडणी या व अशा अन्य गोष्टी आपल्या वाचनाच्या, अध्ययनाच्या भाग बनवावयास हव्यात. आपापल्या ठिकाणी केंद्रातील अन्य कार्यकर्त्यांपर्यंत हा विचार पोचवायला हवा. चर्चेतून, चिंतनातून स्पष्टता वाढवावयास हवी, बुवाबाजी आणि इतर अंधश्रद्धा या विरोधातील संघर्ष महत्त्वाचा आहेच; पण तो पुरेसा नाही. शिवाय अनेक जण या ना त्या कारणाने त्या रणधुमाळीत नसतात. तेव्हा कसाही विचार केला तरी खोल पाण्यात उतरण्याचे महत्त्व वादातीतच राहतं. तुमच्या विवेकाला काय वाटतं?

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट १९९३)  

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...