गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

विवेकवाहिनी : वाटचाल




विवेकवाहिनी : वाटचाल
दाभोलकर, विवेकवाहिनी, स्वयंविकास, संघटन, उपक्रम
विवेकवाहिनीची वाटचाल आश्वासक पद्धतीने सुरू आहे, असे मला वाटते; मात्र अजून खूपच प्रगतीला वाव आहे. प्रारंभ योग्य प्रकारे झाला आहे, एवढे खरे.

विवेकवाहिनी ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मित्रसंघटना असली, तरी एक पूर्णत: स्वतंत्र संघटना आहे. सध्याच्या विद्यार्थी संघटनेपेक्षा तर ती वेगळी आहेच; परंतु महाविद्यालयातील शैक्षणिक अनुदान असलेल्या अन्य सामाजिक उपक्रमांपेक्षाही ती वेगळी आहे. मूल्यात्मक स्वयंविकास-संवादातून व कृतिशीलपणा हे त्याचे सूत्र आहे. या स्वरुपाचे काम करणारी अन्य संघटना आज महाराष्ट्रात नाही.

विवेकवाहिनीमागील विचार व संघटना बांधणी कशी करावी, याचे दोन दिवसांचे एक शिबीर श्रीरामपूर येथे ता. २३ व २४ ऑगस्ट रोजी उत्तमपणे संयोजित झाले. यामध्ये रयत विचार मंच या रयत शिक्षण संस्था कर्मचारी मंचाने अतिशय तळमळीने पुढाकार घेतला होता. नगर-नाशिक विभागाचे रयतचे अध्यक्ष अरुण कडू यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व कॉलेजच्या प्राचार्यांनी याबाबत भरीव सहकार्य दिले. मीनाताई जगधने यांचाही मोलाचा सहभाग होता. प्रा. सदाशिव कदम यांनी मनोरंजनाची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारली होती. रयत विचार मंचने असा निर्णय घेतला आहे की, शाळेतील विचार व्यासपीठ विवेकवाहिनी या नावाने उभे करावयाचे. यामुळे रयतच्या पन्नास शाळेतील प्रत्येकी दोन शिक्षक शिबिरास होते. विवेकवाहिनी चालू करू इच्छिणारे नगर जिल्ह्यातील १३ महाविद्यालयांतील प्राध्यापकही आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्यशोधकी चळवळीची वाटचाल यावर फार प्रभावी मार्गदर्शन केले. हिंदू-मुस्लिम प्रश्न व राखीव जागा याबाबत पन्नालालजी सुराणा यांनी सविस्तर चर्चा केली. जळगावचे डॉ. प्रदीप जोशी हे व्यसनमुक्ती व व्यक्तिमत्त्व विकास यासंदर्भात बोलले. नरेंद्र दाभोलकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद हे विषय घेतले. रात्री मच्छिंद्र वाघ यांनी चमत्कारांची बहारदार प्रात्यक्षिके सादर केली. संघटना बांधणीच्या सत्रात सर्व शिबिरार्थींनी आपापल्या कॉलेज व शाळेत विवेकवाहिनी चालू करण्याचा निर्धार व्यक्त केला. रयत विचार मंच याचा पाठपुरावा प्रत्यक्ष शाळा, कॉलेजात जाऊनही करणार आहे. संगमनेरचे डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते शिबिराचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी जगधनेताई होत्या.
विवेकवाहिनी सुरू करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या महाविद्यालयांना पत्रे पाठविली आहेत. सुमारे १४० महाविद्यालयांनी याबाबत अनुकुलता दर्शविली आहे. या सर्व महाविद्यालयांतून विवेकवाहिनीची संघटनात्मक निर्मिती दीपावलीपूर्वी व्हावी, असा प्रयत्न आहे. दिवाळीच्या सुट्टीत पुणे येथे महाराष्ट्रातील महाविद्यालयांत सुरू झालेल्या विवेकवाहिनीच्या सर्व कार्यकर्त्यांचे शिबीर होईल. त्यामुळे वैचारिक मांडणी, संघटनात्मक बांधणी व कार्यक्रमाची आखणी केली जाईल. डिसेंबर, जानेवारी महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात विवेक वाहिनीच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांकडे शिबीर होईल. या रचनेतून विवेकवाहिनीची वैचारिक व संघटनात्मक मांडणी आणखी स्पष्ट होत जाईल. विवेकवाहिनीचे संघटन थोड्या नीट प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात उभे राहण्याची अनुकुलता जाणवते.
     
महाविद्यालयीन विवेकवाहिनी कोणते कार्यक्रम घेऊ शकेल, याबाबत आणखी कल्पक विचार करावयास हवा. सर्वांनी आपली प्रतिभा त्यासाठी वापरावी. कार्यक्रम असा हवा की, जो नाविन्यपूर्ण आहे. उपयुक्त आहे. बिनखर्चिक आहे व त्याबरोबरच परिणामकारकही. यामुळे कार्यकर्त्यांची उमेद व उत्साह वाढतो. लोकांचे लक्षही वेधून घेतले जाते. केवळ कल्पनेसाठी दोन उपक्रम पुढे सुचवीत आहे. हे प्रत्यक्षात आणलेले उपक्रम आहेत. एक उपक्रम असा की, ज्या विचाराचा प्रसार आपणास करावयाचा आहे, त्या विषयाबाबत ठरवून विविध वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्रे लिहून पाठवणे. त्यामुळे अनेक फायदे होतात. विषय समजावून घ्यावा लागतो. मुद्देसूद नेमके लिहिण्याची सवय लागते. पत्र छापून आल्यास त्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढतो; शिवाय वाचकांचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात वाचला जात असल्याने विचारांचा प्रसार होतो. दुसरा उपक्रम असा की, आपण अगर आपल्या मित्रमैत्रिणीने हुंडा न घेता लग्न करणे अगर आंतरजातीय लग्न करणे असा निर्णय घेतला आहे, असे समजून आपल्या अगर मित्राच्या पालकांना आपल्या निर्णयाचे समर्थन करणारे आणि त्यांनी मोठ्या मनाने यास पाठिंबा द्यावा, असे विनंती करणारे पत्र पाठविणे. अशा पत्रलिखाणाच्या प्रयत्नातून आपला मुद्दा नेमकेपणाने आर्जवीपणे कसा योजला, याचा सराव काहीसा होतो. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी काही वेगळे उपक्रम शोधण्याची गरज आहे.

विवेकवाहिनी हे समाज विवेकशक्तीच्या सहाय्याने बदलण्याचा प्रयत्न करणारे अभिनव संघटन आहे. अनेकांच्या सर्जनशील विचारांची घुसळण त्यात झाली, तर हे मंथन अधिक चांगले होईल. त्यासाठी सर्वांना हार्दिक निमंत्रण !
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑक्टोबर २००३)




बुधवार, ३ जानेवारी, २०१८

‘विवेकवाहिनी’चा विस्तार वाढतो आहे




‘विवेकवाहिनी’चा विस्तार वाढतो आहे
दाभोलकर, विवेकवाहिनी, तरुण पिढी, विद्यापीठांशी संपर्क
विवेकवाहिनी सुरू करण्याची इच्छा आहे का?  असे पत्र शिवाजी, पुणे, मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयांना पाठवले. सुमारे ७० जणांची होकारार्थी उत्तरे आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात मी व अविनाश पाटील जाऊन आलो. सोबत प्रा. विलास चव्हाण होते. या विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना उत्तमपणे सांभाळलेले ते कर्तृत्ववान प्राध्यापक आहेत. विवेकवाहिनीचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे निमंत्रक आहेत. दौऱ्यातील एक दिवस राखीपौर्णिमेचा होता. कॉलेजला सुट्टी होती. नंदुरबारमध्ये पाच महाविद्यालयातील प्राध्यापक होते. धुळ्यातही तेवढ्याच महाविद्यालयाचे होते. आलेले प्राध्यापक प्रामाणिक व उत्साही होते. पुन्हा एकदा नीट संपर्क करून धुळे व नंदुरबारच्या बैठका प्रा. विलास चव्हाण घेणार आहेत. जळगावची बैठक १३ ऑगस्टला झाली. अकरा महाविद्यालयांतील प्राध्यापक आले होते. या तीनही जिल्ह्यात विवेकवाहिनीचे एक दिवसाचे शिबीर दिवाळीपूर्वी घेण्यात येईल. नाशिक जिल्हा बैठकीला दहा महाविद्यालयांचे प्रतिनिधी होते. प्रा. बैसाणे व प्रा. डॉ. वाघ हे अनुभवी व उत्साही आहेत. त्यांच्या सहभागातून नाशिक जिल्ह्यात विवेकवाहिनी चांगल्या प्रकारे उभी राहील, अशी उमेद आहे.

मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठे व विदर्भातील दोन्ही विद्यापीठे यांच्याशी संपर्क सुरू आहे. या महिन्यात चित्र स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातील महाविद्यालयातील विवेकवाहिनीचे प्रतिनिधी यांचे एक शिबीर ता. २३, २४ ऑगस्ट रोजी श्रीरामपूरला होईल. रयत सेवक मंच या नगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेतील कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापकांच्या संघटनेने आपल्या विचार मंचाचा एक भाग म्हणून नगर जिल्ह्यातील रयतच्या शाळांत विवेकवाहिनी चालू करण्याचे ठरवले आहे. सुमारे पन्नास शाळांत ती चालू होईल. हा एक नवीन प्रयोग ठरेल. शिबिराचे उद्घाटन प्रा. एन. डी. पाटील सर करणार आहेत.
विवेकवाहिनीसाठी साहित्यनिर्मितीचे कार्य करण्याची व संघटनात्मक बाबींसाठी फिरण्याची गरज तीव्रतेने जाणवत आहे.       
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर २००३)




मंगळवार, २ जानेवारी, २०१८

संघटनेत तरुणांचा सहभाग हवाच




संघटनेत तरुणांचा सहभाग हवाच
दाभोलकर, तरुण पिढी, कृती कार्यक्रम, विद्यार्थीसंवाद
मनात सदराच्या मजकुराची जुळवाजुळव चालू होती आणि क्षणभर विचार चमकून गेला. संघटनेच्या आघाडीवर की संघटनेच्या पिछाडीवर? ‘पिछाडी’ हा शब्द कोणाला आवडतो? मलाही आवडत नाही. संघटनेच्या बाबतीत तर नाहीच नाही. परंतु तरीही माझ्या मनात तो का बरे डोकावला? विशेषत: अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या कायद्याची लढाई एका टप्प्यापर्यंत यशस्वी झाल्यामुळे संघटनेची हिंमत व नाव वाढलेले असताना?

कारण सरळ आहे. माझे मत वास्तवावर आधारलेले आहे. गेल्या महिन्याभरात मी महाराष्ट्रात जे हिंडलो, कार्यकर्त्यांशी बोललो, शाखांची स्थिती पाहिली वा समजली, त्या प्रत्यक्ष अनुभवावर माझे मत बनलेले आहे. हे वास्तव काय आहे? ते परखड सत्य असे आहे की, आपल्या काही महत्त्वाच्या शाखांत तरुणांची आवक थांबली आहे. कारणे अनेक असू शकतात. त्याची चर्चा हवी तर करावीही; परंतु त्यामुळे फार तर परिस्थितीचे आकलन अधिक पक्के बनेल. परिस्थितीचे आव्हान तर स्वीकारावेच लागेल. तरुण मोठ्या संख्येने यावयास हवेत. नोकरीसाठी, पोटासाठी ते इतस्तत: जातातच. हे लक्षात घेऊन प्रत्येकी दोन-तीन वर्षांनी नव्या तरुणांचा राबता वाढता राहावयास हवा. त्याच्यामुळे चळवळीत सळसळता उत्साह राहतो. केवळ तेवढ्याने भागत नाही. कामाची चौकट नीटपणे सांभाळणारे प्रौढ कार्यकर्तेही लागतातच. असे कार्यकर्ते मिळणेही तसे अवघड असते; पण ते मिळाले की, ते दीर्घकाळ काम करतात. वय आणि अनुभव यामुळे आलेली पक्वता त्यांच्यात असते. त्यामुळे काम टिकून राहावयास मदत होते. पण चळवळ म्हणजे केवळ टिकून राहणे नव्हे, तर तारुण्याच्या ताजेपणाचा स्पर्श हाच खरा संजीवक असतो.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल तरुणांच्यात एक स्वाभाविक उत्सुकता असते. त्यामुळे त्यांना जोडणे हे तुलनेने अधिक सोपे; परंतु त्याबद्दलचे प्रयत्न जास्त चिकाटीने व कर्तृत्वाने करावयास हवेत. सांगली, जळगावसारख्या महत्त्वाच्या शहरात आज चळवळीचे संघटनात्मक काम थंडावले आहे. पुणे, औरंगाबाद, धुळे, सोलापूर अशा मोठ्या शहरात कार्य चांगले वा बरे चालू आहे. परंतु तरुण जवळपास नाहीतच. या सर्व ठिकाणी संघटनेत चैतन्य ओतण्यासाठी तरुणांना भिडावयास हवे.

हे कसे करता येईल?
एक थेट सोपा उपाय म्हणजे गावातील महाविद्यालयात व्याख्याने लावून द्यावयाची. व्याख्याने शक्यतो एफ.वाय.च्या वर्गावर द्यावीत. त्यामुळे हाताशी लागणारे विद्यार्थी पुढे तीन वर्षे लाभण्याची शक्यता अधिक. सलग एक आठवडा व्याख्याने घ्यावीत. वेगवेगळ्या कॉलेजात, एकाच कॉलेजच्या वेगवेगळ्या विद्याशाखांत अथवा वर्गातही. कार्यक्रम संपला की, काही मुलांना उत्सुकता तयार होतेच (ती तर वक्त्याच्या यशस्वितेची कसोटी) त्यांना त्या आठवड्यातील बैठकीची आधीच ठरवलेली तारीख, जागा, वेळ सांगावी. संपर्काच्या दृष्टीने फॉर्म भरून घेता आल्यास अधिक चांगले. पाच दिवस अशी मोहीम चालली तर त्या सर्व व्याख्यानांच्या प्रभावातून नक्कीच काहीजण बैठकीस येतील. त्यापैकी काही गळतील, थांबतील. कमी-जास्त काम करतील, हे सर्व गृहीत धरावयास हवे. तरीही नवी भरती नक्की होईल. विद्यार्थी वसतिगृहातूनही याच प्रकारे विद्यार्थी मिळू शकतील. अतिशय साध्या-सोप्या बिनखर्चिक असणाऱ्या या उपायाची अंमलबजावणी काही महाविद्यालये असणाऱ्या मोठ्या शहरात का केली जात नाही, हे मला कोडेच आहे. खरे तर मुलांना आवडेल, रूचेल, पचेल अशा भाषेत चांगले बोलू शकणारे वक्ते जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आहेत. मग तरुण विद्यार्थ्यांना थेट भिडण्याच्या कार्यक्रमाचे, मोहिमेचे नियोजन का बरे होत नाही? प्रा. संजय बनसोडे हे आपले सांगली जिल्हा अंनिसचे कार्याध्यक्ष. त्यांनी एक दिवसाचे ‘अंनिस’चे प्रशिक्षण शिबीर घेतले, कॉलेज युवकांसाठी. वर्गावर्गात जाऊन पाच-पाच मिनिटे आवाहन केले. चाळीस जणांची अपेक्षा, तेथे एकशे चाळीस विद्यार्थी-विद्यार्थिनी आले. इतरत्रही याचे अनुकरण व्हावयास हवे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(सप्टेंबर २००३)






सोमवार, १ जानेवारी, २०१८

विवेकवाहिनी

विवेकवाहिनी
दाभोलकर, विवेकवाहिनी, विद्यार्थ्यांचा सहभाग, स्वयंविकास
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दोन वर्षांपूर्वी लातूर येथे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची वैज्ञानिक जाणिवा कृती परिषद घेतली. शिक्षण क्षेत्रात वैज्ञानिक जाणिवा कृतिशीलपणे पोचवण्यासाठी महाविद्यालयात विवेकवाहिनीची स्थापना करण्याचा निर्णय त्यात झाला. यानंतर नंदुरबारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांपर्यंत थेट संपर्क साधून विवेकवाहिनीचा विचार पोचवण्यात आला. या कल्पनेला मिळालेला प्रत्यक्ष प्रतिसाद खूपच आश्वासक होता. महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण खात्याशी याबाबत चर्चा झाली. मंत्रिमहोदय, नामदार लक्ष्मणराव ढोबळे, शिक्षण विभागाचे संचालक, सहसंचालक यांनी कल्पना मनापासून उचलून धरली. त्याबाबत एक चांगले परिपत्रकही काढले. विवेकवाहिनीचे कार्य महाराष्ट्रातील महाविद्यालयात सुमारे पन्नास ठिकाणी सध्या चालू आहे. या ठिकाणी कोणते कार्य चालू आहे, याची माहिती या सदरातून दरमहा तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळी फक्त विवेकवाहिनीची एक सर्वसाधारण रूपरेखा समोर ठेवत आहे.

सध्या विवेकवाहिनी ही फक्त महाविद्यालयात चालू आहे; परंतु मुख्याध्यापकांच्या संमतीने ती माध्यमिक शाळांच्यातून सुरू करता येऊ शकेल. याबाबत माध्यमिक शिक्षक संचालक यांचे परिपत्रक निघावे, असा प्रयत्न चालू आहे; परंतु त्यासाठी विवेकवाहिनी शाळेत सुरू करण्याची इच्छा असल्यास थांबून राहण्याची गरज नाही. विवेकवाहिनीबद्दल ठळक बाबी पुढीलप्रमाणे -
१)    सध्या महाविद्यालये व शाळा यांमध्ये चालू असलेल्या सर्व उपक्रमांपेक्षा हा उपक्रम वेगळा आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी,            प्राध्यापकांनी यासाठी वेगळा वेळ द्यावा, अशी अपेक्षा आहे.
२)    विवेकवाहिनी हा विवेकाधिष्ठित स्वयंविकासाचा कृतिशील असा आगळा-वेगळा प्रकल्प आहे. यामध्ये सकस विचारमंथन चर्चेद्वारे करणे, स्वत:मध्ये मूल्यपरिवर्तन करणे व कृतिशीलपणे प्रत्यक्षात काही घडवून आणणे अभिप्रेत आहे.
३)    विवेकवाहिनीचे सभासद होण्यासाठी देखील साधे, सोपे, अर्थपूर्ण असे व्यक्तिगत स्वयंविकासाचे निकष आहेत.
४)    शाळेचे मुख्याध्यापक अथवा कॉलेजचे प्राचार्य विवेकवाहिनीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उत्साही प्राध्यापक वा शिक्षक, कार्याध्यक्ष वा उपाध्यक्ष असतात. १५ ते ७५ विद्यार्थ्यांचे युनिट असते. त्यांच्यातून एक विद्यार्थी व विद्यार्थिनी संघटक म्हणून निवडली जाते.
५)    विवेकवाहिनी ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीपेक्षा पूर्ण स्वतंत्र संघटना आहे. श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म, हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील बहुचर्चित विषय विवेकवाहिनीत प्राधान्यक्रमाचे नाहीत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
(ऑगस्ट २००१)





‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...